नट्या नाटक करतो

ये कहा आ गये हम .……………….

नट्याने कुणाला चहा प्यायला घेउन जाणे म्हणजे दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रंपने तुमच्या घरी येउन व्हीसाच्या कागदावर सही करण्यासारखे होते. अगदी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. तेंव्हा मी चहा पाजतो असे नट्याने म्हटल्यावर निर्मल आणि जोशा नाही म्हणणे शक्यच नव्हते. तसेही फुकटात चहा प्यायला मिळतो म्हटल्यावर कोण नाही म्हणनार.

“भैया तीन स्पेशल चाय बनाना.”
एखाद्याने थालीची अपेक्षा करीत मेसवर जेवायला जायचे आणि मेसवाल्या बाईने मटन बिर्याणी वाढायची असे काहीसे झाले होते. निर्मल आणि जोशा धक्का बसल्यासारखे नट्याकडे बघत होते. जोशाची नजर आता समोशावर पडली. चहासोबत समोसाही मिळाला तर बरे होइल असे त्याला वाटत होते. माणसाचा लोभ काही संपत नाही अख्ख हस्तिनापूर मिळाल तरी इंद्रप्रस्थ हवच असते आणि म्हणून मग महाभारत घडत. मनातला कोलाहल तसाच दडपून जोशा गप्प बसला. पण जोशाला असे स्तब्ध, शांत बसणे सहन होत नव्हते. कैदेत असल्यासारखे वाटत होते. नेहमी उगाचच बडबड करनारा नट्या असा गपचुप उभा असलेला जोशाला बघवत नव्हता. त्याने पेपर हातात घेतला. नट्याला खुलविण्यासाठी म्हणून त्याने नाटकाच्या जाहीरातीचे पान काढले.

“नट्या तू हे गाजराची पुंगी नाटक बघितले का?”
नट्या काहीच बोलला नाही. निर्मल कुठेतरी शून्यात नजर लावून बसला होता. तसाही तो शून्यातच बघत असतो जोशाला त्याचे काही वाटत नव्हते. नट्याचे वागणे मात्र त्याला अस्वस्थ करीत होते. तो यांना चहा प्यायला काय घेउन आला होता. आल्यापासून शांत काय होता. काय झाले काही कळत नव्हते. थोड्या वेळात तीन स्पेशल चहा आला. तेंव्हा भयाण शांततेतून स्वतःची सुटका करुन घ्यायला नट्या फुसफुस असा आवाज करीत चहा प्यायला लागला.

“दोस्तो” हातात चहाचा कप हातात घेउन आवाजात आणता येइल तेवढी नाट्यमयता आणत नट्याने बोलायला सुरवात केली. “मैने आज मेरी जिंदगीमे बहुत बडा फैसला लिया है. हर कलाकारकी जिंदगीमे ये दिन आता है.”
“कारे काल रात्री जास्त झाली का?” समोरचा मराठी असूनही हिंदीत बोलला म्हणजे त्याच्या पोटात अजूनही कालची जास्त झालेली शिल्लक आहेत असे समजावे ही नट्याचीच शिकवण जोशा नट्यावरच वापरत होता.
“जोशा फालतू मजाक करु नको नाहीतर इथेच वस्त्रहरण करील.”
“आता कुठे यदाकदाचित जर माझ्या एका लग्नाची गोष्ट झाली तर वस्त्रहरण”
“तू काही सुधरत नाही. सांग मी मुंबईत का आलो होतो.”
“एसी दुरुस्त करायला.”
“जोशा लेका मी एसी काय यवतमाळात दुरुस्त करु शकलो नसतो.”
“तिथे तर फक्त कुलर असतात, एसी नाही तूच सांगत होता.”
“जोशा तू चूप बस बे त्याला काय सांगायच ते सांगू दे.”
“मी मुंबईत आलो होतो ते नाटकात काम करायला. गेली सहा महिने मी एसी दुरुस्त करण्याचे नाटक करण्यापेक्षा दुसरे काहीच करु शकलो नाही. तेंव्हा मी ठरविले परत जायचे.”
“का तुला काय वाटले त्या अमिताभसारखे तुलाही कोणी स्टेशनवरुन बोलावून घेउन जाइल.”
“जोशा.”
“खरच मी वाचल होत पेपरात. बाकी एक अमिताभ जरी परत आला असला तरी असे हजारो अमिताभ स्टेशनवरुन गाडी पकडून घरीच गेले.”
“आयुष्याविषयी बोलून राहिलो आन तुल मजाक सुचत आहे. आता मधेमधे बोलू नको.”
“काय करनार आहे घरी जाउन?” निर्मलने थंड चेहऱ्याने विचारले.
“काहीही करीन. नोकरी करीन, शेती करीन काहीही करीन. अरे जिथे नाटक नाही तिथे नट्या नाही. या नटाचारीतला नट्या आता संपला. मी मुंबईत आयुष्यात काहीतरी बनायला आलो होतो.”
“मुंबईत कोणीच रस्ते झाडायला येत नाही काहीतरी बनायलाच येतात, नट्या.”
“म्हणूनच मुंबईतल्या रस्त्यावर एवढी घाण आहे. साऱ्यांनाच काहीतरी बनायचे असते तर रस्ते झाडनार कोण.” जोशा परत पचकला आणि आपले चुकले हे लक्षात येताच. “सॉरी.”
“वैताग आला आहे साला. कोणी साध पडदा ओढायच सुद्धा काम देत नाही नाटकात. मी काय कमी प्रयत्न केले. पण नाही. रात्री नाटक बघायचे मग सकाळी उशीरा उठायचे. ऑफिसला जायला उशीर झाला म्हणून बॉसला टोप्या द्यायच्या इथे जॅम आहे तिथे जॅम आहे. आता तर साला बॉस सुद्धा हॉर्नचे आवाज ऐकून ओळखायला लागला मी डोंबिविलीत आहे की चेम्बूर मधे.”
“मग तू ठाण्यात जा.”
“जोशा लेका तुला एकदा सांगितले ते समजत नाही का?”
“खरच, ही जाहीरात बघ”
जोशाने मग नट्याला जाहीरात दाखविली. सूर्योदयी सूर्यास्त नटमंडळी या संस्थेच्या आगामी नाटकासाठी कलाकरांची गरज आहे. खालील पत्यावर संपर्क साधा. पुढे ठाण्याचा पत्ता होता.

“नट्या लेका हीच तुझ्या आयुष्याची अमिताभ मोमेंट.”
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी अमिताभ मोमेंट येत असते किंबहुना आलेली प्रत्येक संधी ही आपल्या आयुष्याची अमिताभ मोमेंट आहे असे प्रत्येक होतकरुला वाटत असते. नट्यालाही तेच वाटत होते. आता आपल्या आयुष्याला कलाटणी मिळनार. ही रखडलेली गाडी आता मार्गी लागनार. तेवढ्यात एक गाडी जोऱ्यात बाजूने गेली. नट्या त्या गाडीकडे टक लावून बघत होता. त्या गाडीने पुढच्या चौकात वळण घेतले ते बघत नट्या बोलला.
“मेरी जिंदगीभी अब उस गाडीकी तरह मोड लेनेवाली है.”
“त्याच्यामागे एक रिक्षा आणि दोन सायकली सुद्धा वळल्या.” इति जोशा. यावेळेला नट्या आणि निर्मल दोघांनीही तिकडे दुर्लक्ष केले. नट्या अजूनही तिकडे चौकात बघत होता.

“नट्या तू ते हेल्मेट का नाही घोकत बे.” नाटकाचा न सुद्धा माहीती नसनारा निर्मल नट्याला सल्ला देत होता. शेक्सपिअरचा श सुद्धा माहिती नसनाऱ्याला हॅम्लेट माहीती असते, त्याचे ते To be or not to be माहित असते. मुळात be या इंग्रजी शब्दाला स्वतंत्र असा अर्थ असतो हे त्या संवादामुळेच साऱ्या जगाला समजले. तसे be म्हणजे एक निरुपयोगी क्रियापद त्याला स्वतःचा असा काही अर्थ नाही.
“का ते अस काय वाटल तुला हॅमलेट मधे? अरे नाटक म्हणजे.. जाउ दे तुला काय सांगनार. आणि हो ते हेल्मेट नाही हॅमलेट आहे.” निर्मलला एकवीस प्रश्नांचा अपेक्षित प्रश्नसंच जसाच्या तसा घोकायचा यापलीकडे जाउन अभ्यास करायची दुसरी पद्धत माहीत नव्हती. त्याचे आयुष्य एकवीस प्रश्नोत्तरी मधेच अडकले होते. कुठल्याही विषयाचे एकवीस प्रश्न असतात आणि त्याची एकवीस उत्तरे असतात. ती एकदा पाठ केली की विषय संपला. मग तो विषय संगणकशास्त्र असू द्या किंवा तलवारबाजी निर्मलच्या दृष्टीने दोन्ही सारखेच होते.
“जे असेल ते हॅमलेट नाहीतर आमलेट अपुणको क्या.” हॅमलेट आणि आमलेट एकाच वाक्यात उच्चारल्यामुळे नट्यातल्या नटाला निर्मलचा भयंकर राग आला होता.
“नाटकात घोकंपट्टी चालत नाही. तिथे भूमिका जगायची असते. त्यांच तर नावच वेगळ आहे तिथे काहीतरी वेगळ असनार.”
“हो यार काय विचित्र नाव आहे सूर्योदयी सूर्यास्त नटमंडळी. काही समजत नाही, सकाळच्या लोकसत्तावाले आहे की संध्याकाळच्या संध्यानंदवाले.”
“जोशा तू कधीपासून मिडडे सोडून लोकसत्ता आणि संध्यानंद वाचायला लागला.” निर्मलने जोशाला डिवचून आपला राग बाहेर काढला.
“ते प्रायोगिकवाले आहे. त्यांच कुणालाच काही कळत नाही. बऱ्याचदा त्यांनासुद्धा. पण जे काही असत ते जोरदार असत.”
“प्रायोगिक म्हणजे तेच नाटक ना जे कुणी फुकट पास असल्याशिवाय बघत नाही.”
“जोशा तुला काय कळत रे नाटकातल. दोन विनोदी नाटकं पाहून खिखि केल्याने नाटक समजल अस होत नाही. तसेही तुझे नाटकापेक्षा नाटकाला आलेल्या मुलींवरच जास्त लक्ष असत. प्रायोगिक रंगभूमी ही मराठी व्यावसायिक नाटक आणि चित्रपटांची प्रयोगशाळा आहे. आज इथे जे होत ते उद्या तिथे होत.” नक्की कुठे काय होत हे जोशा आणि निर्मल दोघांच्याही पचनी पडले नाही पण दोघांनींही मान डोलावली. नट्या बाथरुममधे गेला. निर्मल पुस्तक काढून बसला. जोशा बुटाला पॉलिश करीत गाणे गुणगुणत होता.

“हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणाच्या मखमालीचे, सुंदर त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. फुलराणी ती खेळत होती.”
“जोशा” नट्या बाथरुममधूनच ओरडला. हा बसला आणि संडासाच पाणी संपल की काय अशीच शंका निर्मलला आली. त्याच्या मते डोंबिविलीतल्या घरांचे पाण्याशी अजिबात पटत नाही त्याचमुळे ते बिचारे पाणी डोंबिविलीतल्या घरात फार काळ थांबत नाही. एकवेळ मंगळावर पाण्याचा शोध लागेल पण डोंबिविलीतल्या नळाला दुपारी पाणी सापडनार नाही. नट्या लगेच बाहेर आला. निर्मलने त्याला निरखून बघितले. त्याच्या अंगावरील कपडे व्यवस्थित होते. तेंव्हा पाणी ही समस्या नव्हती.

“जोशा सापडल, सापडल.” आर्किमिडीजच्या तालात नट्या बोंबलत होता. त्याला काहीतरी मोठा शोध लागला होता. जगातले सारे शोध संडासातच का लागतात याचाही कुणीतरी शोध लावायला हवा. शोधांचा असा इतिहास माहीत असताना जगातल्या साऱ्या प्रयोगशाळा टॉयलेट सारख्या बाघायला हव्या. एखाद्या शोधामागे वीस वीस वर्षे वाया घालवण्याएवजी वीस मिनिटात शोध लागतील. एखादा गीतकार गाणे देत नाही किंवा एखादा पटकथाकार पटकथा देत नाही तेंव्हा लाखो रुपये खर्च करुन त्यांना हिल स्टेशनवर ठेवण्याएवजी संडासात कोंडून ठेवायचे लगेच गाण बाहेर येइल.
“आधी पँटची चेन लाव. नाहीतर पब्लीक नको ते शोध लावतील”.
“जोशा फुलराणी”
“कोणती केळकर रोडवरची कि गावदेवीची?”
“आबे फुलवाली नाही बे फुलराणी. मी फुलराणी करनार पुरुषाच्या दृष्टीतून. आजवर अस कधी झाल नाही. तुझा ध, तुझा ण, तुझ वसकन अंगावर येण. वा जोशा सापडल.”

त्यादिवशी दिवसभर, रात्रभर हेच चालल होत तुझा ध, तुझा ण. निर्मल तर लगेच कंटाळला आणि झोपी गेला. जोशा मात्र भीष्माच्या अगतिकतेने सारे सहन करीत होता. नट्या रात्रभर नाटकाच्या ऑडीशनची तयारी करीत होता. कालपरवापासून फक्त ठाणे डोंबिविलीतली सौंदर्यस्थळ बघायला म्हणून नाटक बघनारा जोशा हा त्याचा एकमेव प्रेक्षक होता. संगीत नाटकात एक पात्र तानावर ताना घेत असताना दुसरे पात्र ज्या दिनवाण्या नजरेने बघत असते तशाच नजरेने जोशा नट्याकडे बघत होता. दुसरे दिवशी सकाळी तयारी करुन नट्या ठाण्याला त्या सूर्यादयी सूर्यास्त नटमंडळी असे विचित्र नाव असलेल्या नाटक कंपनीच्या ऑफिसमधे पोहचला. ऑफिस कसल, एका अर्धवट बांधकाम झालेल्या बिल्डींगच्या टेरेसवर ते लोक नाटकाची रिहर्सल करीत होते. नट्यासारखे दहाबारा होतकरु नट तिथे आले होते. दोन तासाने दिग्दर्शक आला. आल्या आल्या समोर बसलेल्या बकऱ्यासमोर त्याने लांब केसांची पोनी बांधत भाषण ठोकले.

“आपण एक अदभुत नाट्यविष्कार उभा करतोय, बघनाऱ्याने त्याची इंटेनसिटी अनुभवायला हवी. अभिनयात जिवंतपण आणा. ढोंगी नाटकीपणा नको.”
हे असल काही ऐकून नट्या भारावून गेला. ही मंडळी काहीतरी भयंकर, क्रांतीकारी ह्रदय हेलावणार करताहेत अशी त्याची ठाम समजूत झाली. ही संधी आपण मिळवायची असे त्याने ठरविले. तो दिग्दर्शकाजवळ गेला. हळू आवाजात त्याने दिग्दर्शकाला सांगितले.
“हे मी याआधी केलेल्या कामाची सर्टिफिकेट्स.”
“ते बघू नंतर काम दाखवा आधी, कागदाचे तुकडे काय दाखवता.” बिचारा नट्या, तरी तो तिथेच उभा होता.

लगेच दिग्दर्शकाच्या सहायकाने आज्ञा केली
“सारे इथे एका लाइनीत पुतळे बनून उभे राहा.” दिग्दर्शकाने डोळ्यानेच नट्याला तो इथे का उभा आहे असे विचारले मग नट्याही त्या ओळीतला एक पुतळा बनला.
“अभिनयात जिवंतपणा आणा. तुमच्या जिवंत अभिनयातून निर्जीव पुतळा हुबेहुब वठला पाहीजे. लक्षात ठेवा जिवंतपणा ….. निर्जीव पुतळा. हा समाज पुतळ्यांसारखा मुर्दाड झाला आहे हे लोकांपर्यंत पोहचायल हव.” दिग्दर्शकाने सूचना दिली.

“राणी” दिग्दर्शकाने प्रेमाने आवाज दिला. आताच चार घरची धुणीभांडी करुन आली आहे अशा अवतारातली एक मुलगी आली.
“ही राणी या नाटकाची हिरोइन. राणी तू या पुतळ्यांच्या मधून किंचाळत जायचे. एक असहाय स्त्री टाहो फोडतेय पण समाज पुतळा बनलाय हे आपल्याला सांगायचे आहे. तुझ्या किंचाळीने समाज हादरायला हवा.”
त्यानंतर ती मुलगी अशी काही किंचाळली कि या पुतळ्ंयांचे काय चौकातल्या खऱ्याखुऱ्या पुतळ्याला सुद्धा घाम फुटला असेल. हे तर बिचारे हाडामासाचे पुतळे होते काही हादरले, काही घाबरले तर काही पुतळे चक्क हसले.
“अरे हसता काय? तुम्ही भावनाहीन पुतळे आहात, चेहऱ्यावर त्या भावनाहीनतचे भाव प्रकट होउ द्या.”
असा प्रकार तीनचारदा झाला. शेवटी त्यातल्या त्यात अविचल अशा तिघांची पुतळे म्हणून निवड करण्यात आली. नट्याचा त्यात नंबर लागला नाही.

लगेच दुसरी सूचना आली.
“आता झाड बना रे सगळ्यांनी.” सारे झाड बनून उभे राहिले. कुणी हलत होते. कुणी नुसतेच उभे होते. नट्याने झाडाच्या अभिनयात जिवंतपणा आणण्यासाठी इंग्रजी नृत्यासारखे हातपाय हलविले तसा दिग्दर्शक जोरात ओरडला.
“ए मूर्ख ब्रेक डांस काय करतोय. झाड बन मायकेल जँक्सन नाही. कायिक अभिनयातून झाडाची बॉडी लँग्वेज येउ दे.” मग कायिक अभिनय करायच्या नावाने नट्या काहीही न करता अविचल उभा राहीला. थोड्या वेळाने एक मुलगा विमानासारखे हात करीत त्यांच्या मधून जोरात धावत गेला. हे काय चालले ते न कळल्याने सारे मठ्ठासारखे त्याच्याकडे बघत उभे होते. दिग्दर्शक जोरात ओरडला.
“अरे उभे का आहात. वार आहे ते. बरच काही बदलायची ताकत आहे त्याच्यात आणि तुम्ही साधे हलत सुद्धा नाही. तुम्ही झाड आहात पुतळे नाहीत. हला थोडे.” तो वारा होता की विमान हे कळनार कसे? दुसऱ्यांदा जेव्हा तो तसाच धावला तसे सारे त्याच्यासारखेच हात करीत त्याच्या दिशेने वळले.
“छी, छी.. वास्तववादी अभिनय हवा. फक्त मान हलली पाहीजे शऱीर नाही, झाड आहे ते. अगदी नैसर्गिक अभिनय, फक्त त्रेपन्न अंशातून मान हलवा.” परत तो व्यक्ती मधून तसाच हातवारे करीत धावला. साऱ्यांनी मग शरीर स्थिर ठेवून फक्त मान वळवायचा प्रयत्न केला पण त्रेपन्न अंश म्हणजे नक्की किती हे न समजल्याने सारे एकमेकाच्या तोंडाकडे बघत उभे होते. दिग्दर्शकाला हवी तशी कुणाची मान वळत नव्हती. शेवटी कंटाळून दिग्दर्शकच झाडासारखा उभा झाला आणि नव्वद अंशात मान वळवून बोलला.
“याला म्हणतात त्रेपन्न अंश, वास्तववादी अभिनय.” नव्वद अंशाच्या कोनाला त्रेपन्न अंशाचा कोन म्हणणे म्हणजे वास्तववादी अभिनय अशी अभिनयाची नवीन परिभाषा नट्याच्या मनात तयार झाली.

“आता कस्पटसारख पडायच. जगाच्या उकिरड्यावर मनुष्याचे जीणे हे कस्पटासारखे झाले आहे या वास्तवाचा दाह प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवा. ह्रदयात भोकं पडायला हवी.”
कस्पटाने भोक पडायला लागली असती तर गुंडांनी चाकू, छुरे सोडून कस्पटच वापरले असते. नट्याला या साऱ्याचा आता कंटाळा आला होता. नाटक नको पण ऑडीशन आवर अशी त्याची परिस्थिती झाली होती. तो तसाच निर्जीव निपचित पडला राहिला. त्याला डॉ लागूंसारखे स्वगत बोलायचे होते, भरत जाधवसारख्या टाळ्या घ्यायच्या होत्या, प्रशांत दामले सारखे हायकाय नायकाय करायच होत आणि हा दिग्दर्शक त्याला कस्पटासारख पडून राहायला सांगत होता.

आता त्याने युद्धात उडी घेतली होती तेंव्हा सारे सहन करण्या खेरीज तो काहीच करु शकत नव्हता. दिग्दर्शकाने नाटकाच्या शेवटी सर्वांना स्लो मोशन मधे धावायला सांगितले. दिग्दर्शक ओरडून सांगत होता पण कुणाचेच लक्ष नव्हते.
“स्लो मोशन मधे धावा, हळू नाही. धावण्याला वेग हवा पण स्लो मोशनमधे.” नट्याला त्या माणसाचे केस ओढून त्याच केसाने त्याचा गळा कापावा अशी तीव्र इच्छा होत होती. त्याने आपल्या संतापावर फुंकर मारली. निदान या धावण्याच्या अभिनयात काहीतरी हालचाल होती. शेवटी एकदाचे ऑडीशन संपले. सारे ठोकळेच घ्यायचे असल्याने कुणाला हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.

एक शेवटचा प्रयत्न म्हणून नट्याने त्या दिग्दर्शकाला सांगितले
“मी फुलराणीतला संवाद म्हणून दाखवू.”
“संवाद म्हणजे शब्दांचे बुडबुडे ते नाटककार तयार करतो. माझ्यासारख्या दिग्दर्शकाला असल्या कुबड्यांची गरज नाही. मी एक्सप्रेशनलेस कवायतीतून रंगमंचावर एक जिवंत अनुभव तयार करतो. नटांनी संवादाविरहीत ठोकळ्यांचा अभिनय शिकायला हवा.”
आता नट्या खरच ठोकळ्यासारखा एक्सप्रेशनलेस होता पण थोडासा का असेना आनंदी होता. नट्याला मुंबईच्या रंगमंचावर प्रवेश मिळनार होता. असा स्लो मोशनमधे नट्याचा तोंडाला रंग फासण्याचा शोध संपला होता.

या आधीचे स्ट्रगलर्स भाग.

स्ट्रगलर्स १ मर मर बॅचलर, बॅचलर्सच्या घराच्या शोधाची कहाणी

स्ट्रगलर्स २ उदंड झाले नोकरीच्या शोधाचे ताप

स्ट्रगलर्स ३ जोशाची गर्लफ्रेंड अर्थातच

2 thoughts on “नट्या नाटक करतो

टिप्पण्या बंद आहेत.