नूतन वर्षाभिनंदन २०१९

मित्रहोच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०१९ हे वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि उत्तम वाचनाचे जावो हीच मनःपूर्वक शुभेच्छा. उत्तमोत्तम साहित्याशी तुमचा परिचय होवो.

२०१८ मधे मित्रहोवर काय लिखाण आले तर विनोदाचा पिेंड सोडला नाही. वेगवेगळ्या प्रकारे विनोद लिहिण्याचा प्रयत्न मी केला. वऱ्हाडी भाषेतल्या कथा, व्यक्तिचित्र, तर शहरी जीवनातील विसंगती असे सारे लिखाण केले. जवळ जवळ चार वर्षानंतर मी स्ट्रगलर्सच्या जोशा, निर्मल आणि नट्याला घेउन नट्या नाटक करतो ही गोष्ट लिहिली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी मित्रहोच्या वाचकांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. सहजच म्हणून लिहायला सुरु केलेला हा ब्लॉग केवळ वाचकांच्या प्रतिसादांमुळेच मोठा झाला. नेहमीप्रमाणे यावर्षीही मिसळपावच्या दिवाळी अंकासाठी एक व्यक्तीचित्र लिहिले ‘गवत्या‘ तसेच मराठी कल्चर आणि फेस्टीवल्स लॉस एंजिल्सच्या दिवाळी अंकासाठी ‘माझा मोबाइल डायेट‘ असा लेख लिहिला. दोन्ही लेख येथे येतीलच.

आकड्यांच्या बाबतीत सुद्धा २०१८ वर्ष खूप जबरदस्त होते. या वर्षात पंचवीस हजारांच्या वर वेळा ब्लॉग वाचला गेला. तेही फार जास्त नवीन लेख न येता. दोन महिन्यानंतर मित्रहो हा ब्लॉग सुरु करुन पाच वर्षे पूर्ण होतील आजवर मित्रहोवर एकूण ६९ लेख आलेत, आजवर सत्तर हजाराच्या वर ब्लॉग वाचला गेला. वाचकांचा असा उत्साहच परत लिहिते ठेवतो. आजही असे होत नाही की काय लिहायचे उलट सतत हेच वाटत असते अरे लिहायला तर भरपूर आहे पण लिहायला वेळ मिळत नाही. मलातरी त्या भावनेतच खूप आनंद वाटतो. पुढेही असेच वाचत राहाल अशी अपेक्षा.

यावर्षी दोन महत्वाच्या घटना घडल्या गेल्या वर्षी हैद्राबादला सुरु झालेल्या मित्रांगन साहित्य कट्टा या उपक्रमाने बाळसे धरले. यात बरेच समविचारी व्यक्तींची भेट झाली. नवनवीन प्रकारचे साहित्य ऐकायले मिळाले. ज्योती कानेटकर यांच्या पायरव या कविता संग्रहातील कविता तर आजही मनात घर करुन आहेत. परत परत वाचतो. साहित्य कट्टावर मी केलेल्या वाचनांनी मला स्वतःला बरच काही शिकायला मिळाल. कस वाचायचे, कुठे पॉझ हवा, कधी चांगला प्रतिसाद मिळतो कधी नाही याचा अभ्यास करता आला. हा उपक्रम सुरु करुन तो सुरु ठेवनाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

दुसरी गोष्ट यावर्षी घडली ती म्हणजे छोट्या नाटिका आणि एकांकिकांच्या लिखाणाची. सहज गंमत म्हणून लिहिलेली रंगेहाथ ही छोटी नाटिका खूप लोकांना आवडली. कितीतरी लोकांनी त्याचे प्रयोग करायची परवानगी घेतली. पुण्यातील स्वप्न या नाट्यसंस्थेला त्यासाठी पुरस्कार सुद्धा मिळाला. महाराष्ट्र मंडळ नैरोबी यांनी त्यांच्या गणेशोत्सवासाठी साधारण एक तासाची एकांकिका लिहून द्या अशी विनंती केली. बाप्पाच्या कार्यक्रमाला नाही म्हणणे शक्यच नव्हते. मी ‘ढेरपोट्याचा डाव खल्लास’ अशी विनोदी नाटिका लिहून दिली. तेथील मंडळींनी अफलातून प्रयोग केला. रिस्पाँस खूप मस्त होता. मलाच विश्वास बसत नव्हता. एकांकिका नाटक लिहायला आवडायला लागले. ‘चक्र’ ही एकपात्री एकांकीका लिहिली. तसेच जवळ जवळ पूर्ण झालेली ‘एक फसलेले नाटक’ ही दोन पात्रांची विनोदी एकांकिका. ‘पसारा’ या एकांकिकेचा पहिला ड्राफ्ट लिहून पूर्ण झाला तरी अजून हवी तशी जमली नाही. यावर्षी पूर्ण व्हावी अशी खूप इच्छा आहे. बऱ्याचदा मनासारखी लिहिल्या जात नाही.

अस सार चांगल घडत असताना एक मनाला चटका लावनारी घटना घडली ती म्हणजे मिसळपाववरील लेखक बोका-ए-आझम उर्फ ओमकार यांचे निधन. त्यांच्यामुळेच मी रहस्यकथा वाचायला लागलो होतो. कधीही रहस्यकथा वाचताना त्यांची आठवण येइलच. त्यांना कधी प्रत्यक्षात भेटलो नाही पण ते मनात मात्र कायम राहतील.

यावर्षी जसे प्रेम दिले तसेच प्रेम पुढेही देत राहाल अशी आशा करतो. यावर्षीचे काही आवडलेले लेख
नट्या नाटक करतो
सरप कुपात धसला कुपात
फुटबॉल फायनल आणि जानरावची बायको

नेहमी आवडनारे लेख
ओबामा आला रे आला
मर मर बॅचलर
तिचे न येणे

धन्यवाद
नूतन वर्षाभिनंदन २०१९

Advertisements