
(मंगल वाद्यांच्या सुरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचाचा एक भाग दिसतो. दुसऱ्या भागावर अंधार असतो. जिथे प्रकाशअसतो तिथे पुणे असा बोर्ड दिसतो. त्या बोर्डाजवळ एक साठीतली स्त्री आणि तिशीतला मुलगा उभे असतात. मुलगा वृत्तपत्र वाचत असतो. त्यावर बातमी असते. US election: Polarized Democracy Is it just in America? किंवा हेच तो कानाला हेडफोन लावून ऐकतोय असेही करता येईल. पार्श्वभूमीला शास्त्रीय संगीत ऐकू येते. मधेच जोरात रिक्षाच्या हॉर्नचा आवाज येतो. शास्त्रीय संगीत आणि रिक्षाचे आवाज आलटून पालटून सुरु राहतात. ती दोघे कशाचीतरी वाट बघत असतात. तो शांत असतो पण ती बेचैन असते. हळूहळू शास्त्रीय संगीत फेड आउट होऊन काही चर्चा ऐकू येतात.
एक: काटाकिर ते काटाकिर बेडकरला ती चव नाही. विषय संपला.
दोन: घाट काय बघायचे पुण्यात जिकडे तिकडे आहेत. बघायचे असले तर कासचे पठार बघ.
तीन: मी म्हणतो पुण्यात मेट्रो हवीच कशाला सायकली घेऊन फिरायला काय जाते.)
आई | अरे काय त्या पेपरात डोकं खुपसुन उभा आहे? (तो वृत्तपत्र गुंडाळुन तिच्याकडे बघतो.) असे किती वेळ उभे राहायचे आपण? बसस्टॉप ही काय टॅक्सीची वाट बघायची जागा आहे? बसस्टॉपवर जर उभे राहायचे होते तर मनपाची बस पकडून गेलो असतो. लोक काय म्हणतील यांना बसच्या पाट्या वाजता येत नाही इतक्या बस गेल्या पण यांची बस आलीच नाही? पुणे आहे हे, इथे सुशिक्षित, सुसंस्ंकृत आणि सभ्य लोक राहतात. (तो थोडा पुढे जाऊन टॅक्सी आली का बघतो) पुण्यातली लोकं अशी उगाच रस्त्यावर येत नाहीत. त्या टॅक्सीला घरी यायला सांगायचे होते. | |
मुलगा | आई तो नाही म्हणाला. पेठेतल्या गल्लीत येत नाही म्हणे. | |
आई | का? गल्लींतल्या कुत्र्यांची भिती वाटते त्याला. | |
मुलगा | नाही वनवेची भिती वाटते. | |
आई | नक्कीच पुण्याबाहेरचा असेल मेला. त्याला सांग हे पुणे आहे. इथे वनवेत जर सरळ गेले ना तर पोलीस पकडतात. या पुण्याबाहेरच्या मंडळीनींच पुण्याची बदनामी केली आहे. हे लोक एक दिवस पुण्याची पार मुंबई करुन ठेवतील. आणि का रे तू तर पुण्याचा आहेस ना? त्या टॅक्सीवाल्याला फैलावर घेऊन त्याचा चांगला अपमान करायचे सोडून तू मला रस्त्यावर आणलं. (परत काही वेळ वाट बघतात.) किती उकडतय. पूर्वीचे पुणे राहिले नाही आता. पुण्याबाहेरची मंडळी पुण्यात आली आणि पुण्यात उकडायला लागले. | |
मुलगा | का पूर्वी पुण्यात स्नो पडत होता. चुकलो हिमवर्षा होत होती? | |
आई | टोमणे मारु नको. आम्ही आमच्या वाड्यात भर दुपारी फॅन न लावता झोपत होतो. आता एसी लावून सुद्धा झोप येत नाही. | |
मुलगा | झोप ट्रॅफिकच्या आवाजाने येत नाही. | |
आई | तेच म्हणतेय मी पुण्याची पार मुंबई करुन ठेवली आहे. गोंधळ झाला आहे सारा. आता हेच बघ ना माझ्या झोपेच्या वेळेत तू मला लोणावळ्याला घेऊन चालला. (थांबून) त्या टॅक्सीवाल्याला माहित आहे ना आपण असे रस्त्यावर आलोत ते. म्हणजे इथे उभे आहोत ते. | |
मुलगा | हो त्याला लोकेशन कळविले होते. | |
आई | कळविले तर तो आला का नाही अजून. म्हात्रे पुलापाशी सांगून सारसबागेत गेला का काय? | |
मुलगा | ते तू तो आल्यावर त्यालाच विचार | |
आई | बरोबर पत्ता सांगितला आहेस ना. तुही तुझ्या वडीलांसारखा (उजवा हात दाखवित) डावीकडे वळा, डावीकडे वळा असे सांगायचा. | |
मुलगा | गुगल लोकेशन शेअर केले होते. गुगलला डावउजव करायची गरज पडत नाही. | |
आई | अरे वा हुषार दिसतो तुझा गुगल. नक्की पुण्याचा असला पाहीजे. नुसता गुगल हुषार असून काय उपयोग? हे सार तुझ्या त्या टॅक्सीवाल्याला कळायला हवे ना. तो पुण्याबाहेरचा आहे. या पुण्याबाहेरच्या लोकांना काहीही कळत नाही ते पिंपरीला सुद्धा पुणे म्हणतात. (पॉझ) जुना असला तरी चांगला विनोद आहे. | |
मुलगा | (तो टॅक्सी आली असे बघत)आली टॅक्सी. | |
आई | आली तर थांबली का नाही | |
मुलगा | ती टॅक्सी आपली नव्हती. | |
आई | कशावरुन? तू नंबर व्यवस्थित बघितला ना. | |
मुलगा | आई डोळे फुटले नाहीत माझे अजून. | |
आई | माहित आहे मला तुझे डोळे नाही डोकं फुटले आहे ते, म्हणूनच तर पुण्याचा असूनसुद्धा त्या मुंबईच्या मुलीशी लग्न करायला निघाला. आणि काय रे? हे अस मधेच लोणावळ्याला जाउन भेटायच काय काढल तू? ती पुण्यात आली असती तर काय तिचा मेकअप उतरला असता का तिला स्कर्टची लांबी वाढवावी लागली असती. हा लोणावळ्याचा तिचाच प्लॅन असणार. या मुंबईच्या लोकांना लोणावळ्याचे खूप कौतुक आहे. काय तर म्हणे धबधबा बघायचा आहे. तिला सांग पूर्वी आमच्या पुण्यात गल्लोगल्ली धबधबे होते. (तो आश्चर्याने कधी असे तिच्याकडे बघतो) काय आहे त्या लोणावळ्यात. चिकी? मुंबईवाल्यांनाच कौतुक त्या चिकीच. ती मुंबईतली माणसं दोन रुपयाचा गुळ आणि चार रुपयाचे दाणे शंभर रुपयाची चिकी म्हणून विकत घेतात. | |
मुलगा | जायचे कधी तिकडे. लोणावळ्यावरुन मुंबई कशी दिसते ते बघायच. | |
तआई | काय बघायची आहे मुंबई. बकाल आहे. कचऱ्याचा ढिग वरुन बघितला म्हणून पर्वतीचा डोंगर भासत नाही. | |
मुलगा | मुंबईत काहीतरी चांगले असेलच ना. म्हणजे तिथल्या दळणवळणाच्या सुविधा. | |
आई | सुविधा. कोंबलेल्या माणसांनी भरलेल्या लोकलला सुविधा म्हणण म्हणजे मुळामुठेतून वाहणाऱ्या पाण्याला मिनरल वॉटर म्हणण्यासारखे आहे. | |
मुलगा | (हात जोडून)आवरा. टॅक्सी आली बघ (दोघेही टॅक्सीत बसल्यासारखे निघून जातात. अंधार होतो) | |
(प्रकाश येतो तेंव्हा रंगमंचाचा दुसरा भाग दिसतो आणि पहिल्या भागावर अंधार असतो. एक बोर्ड दिसतो त्यावर मुंबई असे लिहिले असते. तिथे एक मुलगी कानात इयरफोन घालून उभी असते. पाश्चात्त संगीत ऐकत असते, मधेच लोकल जाण्याचा आवाज येत असतो. चर्चा ऐकू येतात एक: ही वेस्टर्न लाइनची माणसं काय समजतात स्वतःला माहित नाही. सेंट्रलवाल्यांना नेहमी छळतात. दोन: मी तुला सांगतो रे धोनी क्या है. लकी बास. तेंडल्याचा क्लास नाही रे त्याच्याकडे. तीन: गिरगाव चौपाटी भेळ एक नंबर. मुलगी सतत घड्याळ बघत असते. मुलगा धावत पळत धापा टाकत येतो) | ||
मुलगी | अरे किती उशीर | |
मुलगा | (आश्चर्य व्यक्त करीत) उशीर, अगदी वेळेत पोहचलो मी. | |
मुलगी | सहा वाजता भेटायचे ठरले होते. पाच सत्तावन पासून मी उभी आहे आणि तू सहा एकतीसला आला. | |
मुलगा | ए बाई माझी सात अकराची विरार फास्ट त्याचे जरा आठ तेराची कल्याण स्लो होऊ दे. सहाचे साडेसहा चालायचे. त्यात काय | |
मुलगी | You Pune people, तुम्हाला दुसऱ्याच्या वेळेची कदर नाही. | |
मुलगा | काही काय, लगेच काय मुबंई पुणे मुंबई. त्याचेही तीन वर्जन निघाले. | |
मुलगी | पहिले मस्त होते ना, नंतर ती मजा नाही आली. | |
मुलगा | तुला तेच आवडणार त्यात ती दोघं पुणे मुंबई करत भांडत होते. जसे एकत्र आले तर तुला कंटाळा आला. येवढासा उशीर झाला तर किती कांगावा करते. तुम्ही मुंबईतल्या मुली काय घड्याळाचा गजर लावून प्रेम करता का? समोरच्याने I Love म्हटले आणि गजर वाजला. या पुढे उद्याच्या एपिसोडमधे. जगातली सारी घड्याळं बंद पडली तर मुबंईतला माणूस किती वाजता उठला हे बघून सुद्धा घड्याळ सेट करता येईल. प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरलेल्या. | |
मुलगी | झाल तुझं. तू लोणावळ्याला जायचे काय काढले? | |
मुलगा | अग आईची भेट घ्यायला. | |
मुलगी | का त्या मुंबईत येऊ शकत नाही. मुंबईत आल्याने त्यांचे मराठी शुद्धिकरण यंत्र बिघडेल का? तुम्ही पुणेकर समोरचा बोलत असला तरी त्यात शुद्धलेखनाच्या चुका शोधत असता. | |
मुलगा | तिला मुंबईची भिती वाटते. | |
मुलगी | का मुंबई खाते. भ्यायचे अजिबात कारण नाही म्हणा. त्यांना सांग इथे रात्री अकरा वाजता सुद्धा रिक्षावाला अजिबात कटकट न करता घरी सोडायला तयार असतो. | |
मुलगा | लोणावळ्याला जाव कधी. बघाव तिथून पुणे कसे दिसते ते. | |
मुलगी | कशाला ती एक ते चार झोपलेली माणसे बघायला. | |
मुलगा | तुला लोणावळ्यावरुन दिसनार आहे पुण्यातली माणसं झोपली आहे की जागी. नेहमीचच काहीतरी. | |
मुलगी | जगात झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभे राहायचा नियम आहे तर पुण्यात झेब्रा क्रॉसिंगपासून समोर उभे राहायचा. | |
मुलगा | अजून | |
मुलगी | काय नांव असतात पुण्यात ढोल्या मारुती, नवस्या मारुती. | |
मुलगा | त्यात काय चुकीचे आहे मुंबईत नाही चिंचपोकळी, संडास रोड. | |
मुलगी | ते संडास रोड नाही सँडहर्स्ट रोड असे आहे. | |
मुलगा | भाऊचा धक्का तसेही भाऊ आणि भाईचेच राज्य आहे मुंबईत. | |
मुलगी | तू मुंबई पुणे असा वाद घालायला लोणवळ्याला बोलावले का? यावर वाद घालावा इतका सुद्धा तो विषय माझ्यासाठी महत्वाचा नाही. | |
मुलगा | तुला का वाटते पुण्यात सारं वाइटच आहे. तिथेही काही चांगले आहे. पुण्याला इतिहास आहे. | |
मुलगी | काय करायचा इतिहास. इतिहास म्हणजे वर्तमानात वादाचे कारण | |
मुलगा | तू ये तर लोणावळ्याला मग बोलू (ते दोघेही असे म्हणत चालायला लागतात. तो परत धावत येतो) आणि हो ते लोणावळा आहे मुंबई नाही. वेळ इकडे तिकडे होउ शकते. | |
(रंगमंचाच्या दोन्ही भागावर प्रकाश असतो. मघाचेच पुणे, मुंबई बोर्ड तसेच असतात. मधे लोणावळा असा बोर्ड असतो. त्यासमोर मुलगा बसला असतो त्या दोघी आपल्या आपल्या बोर्डापाशी उभ्या असतात. धबधब्याच्या पाण्याचा आवाज येत असतो. चिकी चिकी असे ओरडण्याचे आवाज येत असतात.) | ||
मुलगा | काय ठरले तुमचे | |
मुलगी | या पुणेकर बाईसोबत माझे पाच मिनिट देखील पटेल असे वाटत नाही. | |
आई | जसे काही मला तुझ्यासोबत रोज शिक्रण शेअर करावसे वाटते. मी पण सांगते मला सुद्धा या टवाळ मुंबईकर मुलीसोबत पाच मिनिटसुद्धा घालवायची इच्छा नाही. | |
मुलगी | अरे मी साधं नमस्कार आई म्हणाली तर ‘कोण आई’ अशी खेकसली ही बाई. तू ना हिला घेऊन पुण्यातच रहा रोज जाऊन मारुतीला नाहीतर गणपतीला नवस बोल. तुझ्यासाठी तिच इन्व्हेस्टमेंट खूप आहे इन्व्हेस्टमेंट बँक तुझ्या नशीबात नाही. ती तुळसीबाग का काय गल्ली आहे ना पुण्यात तिथल्या दुकानाचा हिशेब ठेवण्यातच MBA डिग्री वाया घालव. (थोडा वेळ थांबते) And yes forget about marrying me. पुण्यातल्या कुण्या मुलीबरोबर लग्न करुन आयुष्यभर वैशाली का रुपाली हा वाद घालत बैस. | |
आई | ही तुळसीबागेला गल्ली म्हणाली. उद्या ही पेठेला चाळ म्हणेल. | |
मुलगी | काय वेगळं आहे. अरुंद बोळी आणि डोक्यावर पडलेली माणसं | |
आई | तुम्हा मुंबईच्या लोकांना खूप अक्कल असते ना ठिगळं लावलेल्या कपड्यांना फॅशन म्हणून मिरविता. लोकलच्या गर्दीतून निवांतपणा हवा म्हणून पबच्या गर्दीत जाता. हे म्हणजे शनिवार वाड्यातले दुकान बंद आहे म्हणून लक्ष्मी रोडला जाण्यासारखे झाले. इकडे बंद तर तिकडेही बंदच असनार आहे ना. | |
मुलगी | नाहीतर मग कुठे जाऊ सवाई गंधर्वला तकिये लावून झोपायला. | |
आई | अरे ही बघ सवाई गंधर्वला नाव ठेवते. | |
मुलगी | सवाई गंधर्वला नाही तुमच्या सारख्या झोपणाऱ्यांना बोलतेय. समजत नाही तर जाता कशाला. मला जे आवडत मी तेच करणार. | |
आई | (मुलाकडे बघत) बघ कशी बोलते ती. आता तुला ठरवायचे आहे तुला मुंबईकर व्हायचे की पुणेकर. | |
मुलगा | असे जरुरी आहे का मी मुंबईतला नाहीतर पुण्यातलाच व्हायला हवे. हे असे डावे उजवे करायलाच हवे का? मी थोडा पुण्यातला थोडा मुंबईतला असा राहू शकत नाही का? | |
आई | छे असल काही नसतं मनुष्य एकतर मुंबईचा असतो नाहीतर पुण्याचा | |
मुलगी | Yes if you want to be in Mumbai तुला ते पुणे मुळामुठेत सोडून यावे लागेल. | |
मुलगा | आई मी जर पुण्यात राहिलो तर मला माझे करीयर करता येणार नाही आणि मी तुला सोडून मुंबईत राहू शकनार नाही. | |
आई | म्हणून म्हणते पुण्यातच रहा. तू पुणेकर असल्याचा अभिमान असायला हवा तुला. | |
मुलगा | त्या पुण्याच्या अभिमानासाठी माझ्या करीयरचा बट्टयाबोळ करु. | |
आई | पुण्याच्या अभिमानासाठी अशी छप्पन करीयर बलिदान करील मी. | |
मुलगा | आई तुला एकच मुलगा आहे आणि त्याला एकच करीयर आहे त्यात कुठे तू पुण्याचा अभिमान घुसडतेय. | |
आई | अरे त्या करियर आधी तुझी पुणेकर म्हणून एक ओळख आहे. त्या दीड दमडीच्या करीयरसाठी तू ती ओळख पुसायला निघाला. | |
मुलगा | अशी ओळख पुसल्या जात नाही. ओळख ठीक आहे ग पण अभिमान कशाला हवा? काय पराक्रम गाजवला की अभिमान हवा. | |
मुलगी | आमच्या मुंबईत या तुझ्या मान अभिमानाला अजिबात स्थान नाही हं. तो अभिमान वगैरे चटणीसारखा वड्यासोबत पावात भरायचा. वडापाव खाऊन पाणी पिऊन ढेकर द्यायची. इथे कुणाला वेळ नाही. Everyone is running on way to prosperity. जो वेगात धावला तो लिफ्ट पकडून पन्नासाव्या मजल्यावर पोहचला नाहीतर सरळ तळाला. | |
आई | तुमच्या नवीन पिढीतल्यां पोरांना करीयरच्या नावाने मान अभिमान, प्रेम काही उरले नाही. सारे असे लिफ्ट पकडून धावायच्या मागे लागले आहेत. | |
मुलगा | एक मिनिट, एक मिनिट (आधी हात वर करुन थांबायला सांगतो. मग शांतपणे स्वतः बोलतो) आता हा मधेच नवीन पिढी विरुद्ध जुनी पिढी असा पिढीजाद वाद कशाला? आपण इथे मुंबई पुणे या विषयावर वाद घालतोय ना तो तितकाच मर्यादित ठेवा. विषयाला फाटे फोडू नका त्याने चर्चा भरकटते. (प्रेक्षकांकडे बघत) अरे त्या जर्मन लोकांनी बर्लिनची भिंत पाडून पूर्व जर्मनी पश्चिम जर्मनी एकत्र केले आपल्याला साधा पुणे मुंबई वाद सोडवता येत नाही. (पात्रांकडे बघत) कंटिन्यू | |
मुलगी | प्रश्न साधा आहे तुला करीयर हवे की अभिमान | |
मुलगा | अरे पण तुमच्या मुंबईइझम आणि पुणेइझम मधे मी माझा बळी का देऊ? | |
मुलगी | ये जो वर्ल्ड है ना वर्ल्ड यात दोन प्रकारची माणसे असतात एक जी मुंबईची माणसे असतात, माझी माणसे असतात, आपली माणसे असतात, साधी माणसं असतात, भोळी माणसं असतात. | |
मुलगा | आणि दुसरी | |
मुलगी | (कॅझ्युअली) माणसेच नसतात | |
आई | आमच्या पुण्यात सुद्धा दोन प्रकारची माणसं असतात हं. एकतर पुण्यातली नाहीतर. | |
मुलगा | नाहीतर काय? | |
आई | पुण्याबाहेर अस काही नसतच. | |
मुलगा | प्रत्येक गोष्टीत हे असं डावउजव का? मुंबई पुणे आणि पुणे मुंबई. इकडे या (दोघी जवळ येतात) मला सांगा ख्रिस गेल, बेन स्टोक्स, सौरभ गांगुली यांच्यात काय साम्य होते. | |
आई | मला नाही माहित मी कधी दुपारच्या झोपेचा बळी देऊन क्रिकेटची मॅच बघत नाही. मुंबईकरांनांच त्याचे कौतुक | |
मुलगी | अज्ञानाचाही अभिमान आहे तुम्हा पुणेकर मंडळींना. तिघेही ऑलराउंडर क्रिकेटर होते. | |
मुलगा | आणखीन काही | |
मुलगी | (थोडावेळ विचार करीत. मुलगा उगाचच डाव्या हाताने बॅटिंग करतो आणि उजव्या हाताने बॅलिंग करतो) अरे हो तिघेही डाव्या हाताने बॅटींग करायचे आणि उजव्या हाताने बॉलिंग करायचे. | |
मुलगा | तिच गोष्ट सचिनची तो बॅटींग, बॉलिंग उजव्या हाताने करायचा पण खऱ्या आयुष्यात तो डावखुरा होता. | |
मुलगी | ते सगळं ठिक आहे रे. त्याचा इथे काय संबंध. पुण्यातून एकतरी क्रिकेटर झाला का कधी? | |
मुलगा | मनुष्य फक्त डावा किंवा फक्त उजवा असा कधीच नसतो. तो त्याच्या दोन्ही हातांचा व्यवस्थित उपयोग करु शकतो. एक हात दुसऱ्या हाताला पूरक असतो. (तो उठतो दोघींचे हात एकमेकावर ठेवतो) अग ही पुण्याची ही मुंबईची अस नसत ग कधी. दोन्हीकडे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात. पुणे विद्येचे माहेरघर आहे तर मुंबईत संधी आहेत. आहेत की नाही. (दोघीही मान डोलवतात) पुण्यातला माणूस काटकसरी आहे तर मुंबईकर वेळेच्या बाबतीत काटेकोर आहे. आहेत की नाही. (दोघीही मान डोलवतात) पुण्यात अभिजात शास्त्रीय संगीत आहे तर मुंबईत वेस्टर्न क्लासिकल आहे. आहेत की नाही. (दोघीपैकी कुणीच मान डोलवत नाही.) अरे मान डोलवा (मान डोलावतात) दोन्हीकडल जे जे चांगलं आहे ते जर घेतल तर पुण्यातली आई आणि मुंबईतली बायको असे दोघींनाही घेऊन हा तुम्हा दोघींचा लाडका सुखाने संसार करु शकेल. होय की नाही. (दोघीही मान डोलावतात) | |
(दोघीही दोन विरुद्ध दिशेला चालायला लागतात. तो लांब श्वास घेऊन हाताने काम फत्ते अशी खूण करतो. त्याच्या मनात वाजायला लागलेले मंगलाष्टक प्रेक्षकांना ऐकू येऊ लागतात. तो रंगमंचावर फेर धरुन नाचतो. अचानक दोघीही एकाच वेळेला बोलतात ) | ||
आई आणि मुलगी | पण माझ्या काही अटी आहे. | |
(तो नाचता नाचता थांबून बघायला लागतो. पुढे दोघीही तावातावे बोलत राहतात. काही वाक्यानंतर दोघीही सोबतच बोलतात.) | ||
आई | मुंबईचा तोरा मिरवायचा नाही | |
मुलगी | पुण्याचा माज दाखवायचा नाही. | |
आई | बोलताना मधेच हिंदीत बोलून पुणेकराची विकेट काढायची नाही. | |
मुलगी | भाषेतल्या चुका काढायच्या नाही | |
आई | सारसबागेत एस्सल वर्ल्डचे कौतुक सांगायचे नाही | |
मुलगी | सिद्धिविनायकला गेलो तर मानाच्या गणपतींचा विषय काढायचा नाही | |
आई | सिंहगडावर गेलो की इथून समुद्र दिसत नाही असा टोमणा मारायचा नाही. | |
मुलगी | चौपाटीवर भेळ खाताना बेडकरांच्या मिसळची आठवण काढायची नाही | |
आई | पुण्यातले ट्रफिक, रस्ते, शिस्त, सिटी बस याला नाव ठेवायचे नाही. फटकळ बोलण समोरच्याचा अपमान करण हे शिकून घ्यायचं. | |
मुलगी | मुंबईतली गर्दी, पाऊस, गरमी, घाम, लोकल याला नाव ठेवायचे नाही. घरुन निघताना छत्री घ्यायची सवय लावायची. लोकलला लटकायची सवय लावायची | |
(तो चिडतो, केस ओरबाडतो, ओरडतो पण त्यांचे चालूच असते. शेवटी तो डोकं धरुन खाली बसतो. आणि पडदा पडतो) |
पुर्वप्रकाशित: साहित्यवड (साहित्य कट्टा हैदराबाद दिवाळी अंक २०२१)
You must be logged in to post a comment.