शुभ दिपावळी २०१८

WhatsApp Image 2018-11-06 at 5.46.27 PM

मित्रहोच्या सर्व वाचक मंडळींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चिवडा, लाडू, करंजी, अनरसे, चकली, शंकरपाळे या सर्वांवर ताव मारताय की नाही. दिवाळीच्या सणात मोठ मोठे डायेटिशियन सुद्धा खाण्यावर ताव मारायला परवानगी देतील. हल्ली यांचेही पिक भरपूर आले बर. नाही दिली तर त्या साऱ्यांना दूर कोपऱ्यात बसवून मनसोक्त खा, अर्थात तब्येत सांभाळानूच. दिवाळीत खायचे नाही तर मग कधी खायचे. तेंव्हा दिवाळीचा भरपूर फराळ करा. स्वतच्या आवडीचा, वेगळ्या चवीचा फराळ बनवा आणि खा. खर म्हणजे स्वतःती वेगळी अशी चव जोपासलीच पाहीजे. मिपाच्या दिवाळी अंकाच्या संपादकीयातील वाक्य घेउन बोलायचे झाले तर उदया झी विकते तीच चकली आणि तोच अनरसा असे म्हणावे लागेल. काही सांगता येत नाही काही दिवसात झी वाहिनी दिवाळीचा फराळ सुद्धा विकायला लागेल. तेंव्हा आपली वेगळी चव जोपासा आणि दुसऱ्याची आवडली तर तिही अंगीकारा.

आपली भाषा मग ती बोलीभाषा का असेना जोपासायलाच पाहिजे. गेल्या दिवाळीत मी सिनेमावाला विज्या हे व्यक्तिचित्र लिहिले होते. ते मिपाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाले. यावेळेलाही अजून एक व्यक्तिचित्र गवत्या पण कथा वाटेल असे लिहिले. य़ा दोन्ही व्यक्तिचित्रांची भाषा वऱ्हाडी आहे. गेल्या वेळेला खूप छान प्रतिसाद होता यावेळेला भट्टी जमली कि नाही ते माहीत नाही. अशा रितीने सलग पाचव्या वर्षी मिपाच्या दिवाळी अंकासाठी लिहिले. मिपाचा या वर्षीचा दिवाळी अंक सुद्धा खूप संपन्न असा आहे. सुंदर लेख आहेत, कथा आहेत आणि प्रवासवर्णन आहेत. अजून सारे वाचून झाले नाही पण जे वाचले ते उत्तम होते. मला शैलेंद्र यांचा प्रसारमाध्यमांचा आढावा घेणारा लेख आवडला. तसेच प्रचेतस यांनी दक्षिण गोव्यातील वेताळांच्या मूर्त्यांविषयी माहिती देणारा लेख पण सुंदर आहे.  पुढे जाउन मोबाइलच्या अतिवापरामुळे मोबाइल डायेट करावे लागले तर ते कसे असेल याची एक छोटीशी विनोदी कथा माझा मोबाइल डायेट मराठी कल्चर आणि फेस्टीवल्सच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली. हा दिवाळी अंक बुकगंगावर सुद्धा उपलब्ध आहे. दिवाळी अंकात खूप सुंदर लेख आणि कथा आहेत. बऱ्याच सिद्धहस्त लेखकांनी दिवाळी अंकासाठी लेखन केले आहे.

पाच वर्षे झाली ब्लॉग लिहतोय पण अजूनही लिहायचा कंटाळा आला, काय लिहावे सुचत नाही, असे होत नाही. यावर्षी नाटक, एकांकिका अशा प्रांतात सुद्धा भरारी मारली. लिहायच्या बाबतीत डोक्यात रोजच दिवाळी असते पण कागदावर उतरवायच्या बाबतीत मात्र शिमगाच असतो. काहीतरी उद्दीष्ट समोर असायला हवे. कधी उत्साह असतो पण बऱ्याचदा कंटाळाच. असो या दिवाळीत लाडू, चिवडा, अनरशासोबत बरीच साहित्याचीही पाने खा. स्वतःला, तुमच्या दिवाळीला समृद्ध करा.

जाता जाता पुन्हा एकदा लक्ष लक्ष दिव्यांची रांगोळी करताना एक दिवा असा लावा कि जो कुणाचे आयुष्य उजळून जाईल.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!