बाहुबली आन जानराव

bahubali poster1

दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती ‘कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.’ आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो. धन्यान तर परेसान करुन सोडल होत, घंटाघंट्याले इचारे ‘फोन आला का, फोन आल का’. साडभावान टिकिट काढल्याचा फोन केला आन म्या आन धन्या शिद्दे नागपुरात पिक्चर पाहाले पोहचलो. तुम्हाले सांगतो राजेहो येक रुपयाचा पछतावा नाही झाला, का पिक्चर हाय पूरा पैसा वसूल. असा पिक्चर आजवरी बनला नाही. मजा आली.

पिक्चरमंधी जे बी हाय ते पहील्या बाहुबलीवाणीच लय मोठ, कोठ बी लहाणसहाण काम नाही. कंजूशीचा कारभारच नाही. येथ बैल मोकाट नाही सुटत हत्ती मोकाट सुटते, तो बाहुबली खासर वढत नाही आणत तर रथ वढत घेउन येतो. येकटा माणूस हत्तीले आटोक्यात आणते, मंग बाहुबली हाय तो. त्या बाहुबलीले पाहून आमचा धन्या तर नुसता लवत होता. तिकड तो बाहुबली कुदला का इकड आमचा धन्या लवे. म्या त्याले म्हटल ‘आबे धन्या कायले लवते बे येवढा, चांगल नाही दिसत अस.’ तो काही आयकत नव्हता, आता पिक्चरच तसा चालला होता नाी जी त्याचा बी काय दोष म्हणून मंग म्याच त्याले पक्का धरुन ठेवला. बिल्कुल लवू नाही देल. तिकड तो बाहुबली हत्तीच्या सोंडेवरुन हत्तीवर यंगला, हत्तीच्या सोंडेत त्यान बाणाची दोरी देली. आता तो बाण मारनार तसा म्या धन्याले सोडला म्हटल ‘धन्या लव लेका तुले जेवढ लवाच तेवढ लव.’ बाहुबली पायताना नाही उड्या माराच्या तर कवा माराच्या जी. खर सांगू मले बी लवाव अस वाटत होत पण … जाउ द्या.

या पिक्चरमंधी का नाही ते सांगा लवस्टोरी हाय, मायलेकाच प्रेम हाय, येकापेक्षा येक फायटा हाय, गाणे हाय, कॉमेडी हाय, मोठाले माहाल हाय, शिनशिनेरी हाय, भावाभावातला झगडा हाय. प्रेम, वचन, धरम साऱ्या गोष्टीचा झोलझाल हाय. कणच्या बी चांगल्या अशा बेस पिक्चरमंधी जे जे पायजेन ते ते हाय. बंद येकाच पिक्चरमंधी मंग हाय का नाही पैसा वसूल. आपल्या बाहुबलीची लवस्टोरी अशी जोरदार हाय का नुसत्या लवस्टोरीचाच पिक्चर बनला असता. बाहुबलीच्या हिरोइनचे नुसते डोळेच दिसले आन तिच्या डोळ्यान बाहूबलीच का म्या बी घायाल झालतो. फॅन झालतो. नुसती तिलेच पाहत राहाव वाटे जी. पहील्या पार्टातली खप्पड म्हातारी तिच्या जवानीत अशी गोड पोरगी असन अस वाटलच नाही जी. ज्यान कोण त्या गोड पोरीची खप्पड, खंगलेली म्हातारी करुन टाकली अशा माणसाले जगाचा काही अधिकार नाही. अशा भल्लाले मारलाच पायजे चांगला ठेचून काढला पायजे. आता ते बाहुबलीची हिरोइन तवा ते बी त्याच्यावाणीच पायजेन का नाही. तेबी अशी तलवार चालवते, बाण तर असा मारते य़ेका झटक्यात तीन तीर समोरचा खल्लास. रानडुकरायची शिकार करते. डेरींग बी केवढ पोरीत, ते महाराणी शिवगामीच्या राजदरबारात जाउन त्या महाराणीलेच खरीखोटी सुनवुन येते. डेरींग लागते ना भाउ, मजाकची गोष्ट हाय का. बाहुबलीले हिरोइन पायजे होती तर अशीच, ते काही महालात बसून इकडून आले ना तिकडून गेले अशी बोंबलत नाही बसत. महालावर हमला झाला तर तेबी हातात बाण घेउन धावते. का सिन हाय जी तो, दिलखूष. अशी हिरोइन जवा प्रेम करते ते मनापासून करते. येकदा प्रेम केल ना का मंग त्याच्या संग कोठबी जाले तयार होते. लयच आवडली आपल्याले हिरोइन, म्या त्या हिरोइनच नाव टिपून ठेवल आता फुड तिचा कणचाबी पिक्चर आला तरी आपण पायनार, भाषा समजो अगर ना समजो.

बाहुबलीची हिरोइन अशी जबरदस्त तर त्याची माय का कमी होती का. ते तर महाराणीच व्हय. महिष्मती साम्राज्याची महाराणी शिवगामी, हे वटारडोळी, कवाबी पाहाव तिचे डोळे तसेच मोठाले. डोळे वटारुनच रायते ते. तिच्या नुसत्या डोळ्याले पाहूनच कोणाले बी भ्याव वाटन जी तिच मंग तो बाहुबली का असेना. का तो तिचा महाल, का तिचा राजदरबार, का तिची बसाची स्टाइल का तिच सिंहासन, साली नजर खालपासून वर पर्यंत पोहचालेच केवढा टाइम लागत होता. तिन नुसती नजर फिरवली का बंदे चूप. तिची चाल बी तशीच. महाराणी पायजेन तर अशी, तिले पहीली चिंता आपल्या प्रजेची. लोकासाठी ते काहीबी करु शकत व्हती. मंग मागपुढ पाहात नव्हती येच्यात आपला जीव जाउ शकते, पोरायचा जीव जाउ शकते. अंहं पयल काम लोकायले वाचवाच, त्यायच रक्षण कराच. महाराणी म्हणून ते अशी येकदम कडक तर माय म्हणून लय जीव लावनारी. आपल्या पुतण्याले पोटच्या पोरावाणी सांभाळल तिन. म्या तुम्हाले सांगतो बाहुबली नशीबवान होता त्याले देवसेना सारखी बायको आन शिवगामी सारखी माय भेटली. हे जर त्याले भेटले नसते तर तो आखाड्यात कुस्त्या खेळनार पहेलवाण बनला असता, बाहुबली बनला नसता. बाहुबलीले बाहुबली बनवल ते त्याच्या मायन आन बायकोन. साऱ्यायलेच अशी बायको आन अशी माय भेटली तर बंदेच बाहुबली बनते पाय.

बाहुबली असा तगडा तर त्याच्यासंग फाइट करनारा विलन बी तसाच तगडा पायजेन जी. तो जर लुचुपुचा असता तर कस जमन जी. बाहुबलीन येवढी ताकत का हत्ती आन घोडेच अडवाले वापराची का? विलन नुसता ताकतवाला पहेलवाणच होता आस नाही तर लय डोकेबाज होता. त्याचा दिमाग कांपुटरपेक्षाही तेज चालत होता. कोणच्या टायमाले कोण का बोलल पायजे त्याले बराबर समजे. त्याचा बाप येडा होता, त्या कटप्पान त्याले सांगतल व्हत तू मंदबुद्धी हाय म्हणून. फालतूची बडबड करनारा पण तो भल्ला त्याले बराबर चूप करे आन त्याले तवाच बोलू दे जवा जरुरत राय. आखरीच्या फायटमंधी विलन का दिसला जी साल कणच्या हिरोले खाली पाहाले लावन. केसाची गाठ पाडून शर्ट फाडून का फाइट खेळतो जी. मोक्यांबो मेल्यापासून असा विलन पायलाच नव्हता. त्याचे दंड व्हय का व्हय. त्यान आखरीच्या फायटमंधी बाहुबलीले म्हणजे पहील्या बाहुबलीच्या पोराले माराले का का नाही वापरल जी. लोखंडाचा गोळा माराच तर तो केवढा मोठा शंभरक किलोचा असन, तो उचलाले बी ताकत लागते न जी अस चिरकूट लकडी पहेलवाणाचा काम हाय का ते. त्यायच्या आखऱीच्या फायटीमंधी का नाही तुटत सांगा. भल्लाचा रथ तुटते, भल्लाचा पुतळा खाली पडते, भितीच्या भिती तुटते, झाडच्या झाड मोडून निघते. येक गोष्ट सुटत नाही, येवढा खर्च करुन जे जे काही मोठ बनवल ते बंद तोडून टाकल. जे हातात लागन त्यान फाइट खेळले. याले म्हणते दुष्मनी याले म्हणते फाइट. का हो भाउ बराबर हाय का नाही. अशी फाइट म्या याच्या आधी पायली नवती. तिकड त्यायची फाइट चालली होती इकड आमचा धन्या फायटा मारत होता. जोरजोरात वरडत होता मार. मार.

कॉमेडी कराले आपला कटप्पा हाय न जी, बाहुबलीचा मामा. लय हासवल बा त्यान. पहील्या पार्टात त्याले पायल तवा वाटलच नाही हा बुढा कॉमेडीबी करत असन म्हणून. पण काहीही म्हणा खरा कटप्पा हातात तलवार घेउन लढाइच्या मैदानावरचाच. त्यान शेवटी बाहुबलीले मारलाच नाहीतर बाहुबली काही असा मरत नव्हता. मले वाटते त्याले बाहुबलीले माराची गरज नव्हती त्यान बाहुबलीले नुसत सांगतल जरी असत तर बाहुबलीन सोताच सोताले मारुन घेतल असत. त्याचा लय जीव होता कटप्पावर आन कटप्पाचा बाहुबलीवर. या कटप्पानच मायी लय मोठी परेशानी दूर केली त्यानच शेवटी उत्तर देल ना
‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?’

लिहनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा.

ते का करुन रायली असन बा

ti-saddhya-kay-kartey-marathi-movie-poster-arya-ambekar-and-abhinay-berde

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं? आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास. पुढ जाउन आयटीआय केलं आन पुण्यात कोण्या कंपनीत जाउन चिकटलं. आता हे पोट्ट पुण्यात रायते तर मले शिकवते, “काहून नको म्हणत जाउ बे, का बरं म्हणत जा.” म्या काय कमी हाय का, म्याच त्याले वर इचारतो, “काहून बा, काहून काहून नाही म्हणाचं? काहून म्हटल तर का बिघडल?” त्याच्या बहीणीचा तिळवा होता तवा तो संक्रांतीले गावाकड आलता. मले म्हणे, “चल, नागपुरात जाउ पिक्चर बिक्चर पाहू, थोडीसी दारु गिरु पिउ.” तसे मले का कमी काम होते का सोयाबीन मार्केटात न्याच होत, कापसाले बाया पाहाच्या होत्या, तूरीवर फवारा माराचा होता, पण दोस्तीखातर जाच लागनार होत. बायकोले सांगतलं, “तू कापसाले बाया पायजो, म्या सोयाबीन मार्केटात नेउन टाकतो आन पवन्यासंग नागपुरले जाउन येतो. त्याले काही खरेदी कराची हाय म्हणे.”

सकायी सकायीच सोयाबीन हिंगणघाटाच्या मार्केटात टाकलं, तेथूनच बस पकडून नागपुरले आलो. पवन्या म्हणे कोणचा का मराठी पिक्चर पाहू, ‘ते का करुन रायली असन बा.’ मी तर मराठी पिक्चर पाहतच नाही न जी. ते पुणे मुंबइवाले मराठी पिक्चर आपल्याले काही समजत नाही, तवा कायले फालतू टाइमपास कराचा? आता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. माया सोबती पक्का पुणेवाला झाला. मले म्हणे, “आबे नाय तू पाय, मस्त पिक्चर हाय.” दोस्तीखातर माणूस काहीबी कराले तयार रायते, तर मंग पिक्चर पाहाले का जाते? काहो?

तुमाले सांगतो राजेहो, हा पिक्चर म्हणजी मजाक हाय, बंदा पिक्चर मजाक मजाक मधी बनवलाय. पिक्चरची स्टोरी ना धड लवस्टोरी हाय, ना बदला हाय काहीतरी भलतीच मजाक हाय. मजाक मजाक मधी एकाच कालेजात शिकलेली पोर पोरी एकत्र येते. बसून दारु गिरु पेते, कालेजातले फोटो पायते. कालेजातल्या गोष्टी करते. आता हे नाही इचारच हे समद कराची जरुरत का हाय बा. आम्ही का कालेजात गेलो नाही का कधी? मले तर मालूम हाय, अर्ध कालेज चहाच्या टपरीवर गेल रायते आन अर्ध पानठेल्यावर गेल रायते. कालेज आठवाच म्हणजे का ते टपरी आठवाची का पानठेले? जाउ द्या, पुणेवाल्यायच कालेज हाय ते. त्यायन कान व्हाटसअप वर ग्रुप जमवून मिटिंग ठरवली. आपल्याच कालेजात शिकलेल्या पोट्ट्यायले भेटायले कायले य़ेवढ्या झंझटी पायजे. आमले तर नाही लागत, मायाकड फोन नाही अस नाही. वाटण्या होउन मले इस एकराची शेती आलती. कोरडवाहू शेतीत पंप लावले आन वलीत केल. आजही माणूस माणूस पऱ्हाटी उभी हाय आपल्या वावरात. मायाकड बी सॅमसंगचा फोन हाय. दुसरा तिसरा घेतच नाही आपण. ते व्हाटसअप बी हाय. रायले कालेजातले पोट्टे ते तर भेटतच रायते. पोट्टे जाउन जाउन जाइन कुठ जी, हिंगणघाटात नाहीतर वर्धेत, मोठच झाल तर नागपुरात. सणवार रायला का गावाकड येत रायते तवा भेट होतच रायते. कालेजातल्या पोट्ट्यायले भेटण्यात अस का खास हाय हेच मले समजल नाही. अशी स्टार्टींगच समजली नाही तर फुडं पिक्चर का समजन जी!

पिक्चरमधला हिरो, त्याच लगीन झाल हाय, त्याले बायको हाय, गोड पोरगी हाय, पिक्चरची हिरोइन तिचबी लगीन झाल हाय, तिलेबी नवरा हाय, तिलेबी गोड पोरगी हाय. अस दोघायचबी समद मस्त चालल असताना मंग ‘ते का करुन रायली असन बा’ अशी झंझट कायले पायजेन म्हणतो मी. फुकटच दिमागाले तरास द्याचा. काहो, तुम्हीच सांगा, फालतूचाच डोक्याले ताप हाय का नाही हा? पण नाही, हा लफूट पोट्ट्य़ावाणी तिच्या मांग मांग हिंडत रायते. चांगल्या शिकल्या सवरल्या संसारी माणसाले हे शोभते का जी? मले तर समजतच नाही पोट्टे शिकले का काहून जास्त इचार कराले लागते ते? तिच्या मांग लागूनबी याले का भेटनार होत, तिच तर लगीन झालत याचबी झालत. ना याले तिच्याशी लगन कराच होत ना तिले याच्याशी लगन कराच होत. मंग कायले भेटाची भानगड कराची? मले तर ते गणित काही समजल नाही. बरं, हा असा बहकला जाउ द्यास, पोट्ट व्हय, कधी नशेत बहकते. पण त्या पोरीन तरी बराबर वागाव का नाही? सांगाव ना, बाबा जे होत ते झाल गंगेल जाउन मिळाल, आता माया नवरा हाय, पोरगी हाय तवा आता माया मांग काही हिंडू नको. पण नाय तिले बी याले भेटाच रायते. भेटून का लगीन करनार होती का त्याच्याशी, आपल्या नवऱ्याले आन सोन्यासारख्या पोरीले टाकून त्याच्या मांग हिंडनार होती? आता तुम्हीच सांगा हे मजाक नाही तर काय? हा मजाक मजाक मंधी तिले भेटाले जाते आन तेबी मजाक मजाक मंधी याले भेटते. हे अशी मजाक पायत टाइमपास करण्यापेक्षा बर्डीवर मॉलमंधी हिंडू, सावजीले जाउन ताव मारु अस पवन्याले सांगाव म्हणून म्या पवन्याकड पायल. तर पायतो काय ते आमच गाववाल पोट्ट आता पार पुण्याच झालत. ते मधेच हासत का होत, त्याच्या डोयात पाणी का येत होत. पार येड झालत. मले तर समजतच नव्हत त्याच्याकड पाहून हासाव का रडाव. तवा म्या मस्त एसी मंधी ताणून देल्ली.

मधे मधे उठत होतो आन पिक्चर पाहात होतो आन पुन्हा झोपत होतो. येकदा पायल त्यान भावाची जिन्स घातली म्हणून त्याच कवतुक चालल होत. त्याले का लागते म्या तर अख्ख कालेज बापाची आल्टर केलेली पँट घालून काढल. दाहावीपर्यंत आम्ही हाफपँटीतच फिरत होतो, आमचा बाप फुलपँट देतच नाही म्हणे. तवा कालेजात गेल्यावर फुलपँट भेटली तर केवढ कवतुक आमाले, बापाची आल्टर केलेली पँट म्हणून का झाल फुलपँट तर होती. येथ यान भावाची जिन्स घातली म्हणून कवतुक, मजाक नाही तर का जी हे राजेहो? येकदा पायल पोरगी पोरायसाठी बापाची उरलेली दारु आणून देते. म्या बी चार पावसाळे पायले. जर कोणची पोरगी लग्नाअगुदर का तुमाले तिच्या बापाची उरलेली दारु आणून देत असन तर तिच्यासारखी बायको या जगात दुसरी कोणची नाही. य़ेकदम बेस नंबर वन. लग्नाअगुदर पासूनच तुमची प्याची सोय करनारी बायको सापडते का आजच्या जमान्यात. अशा पोरीले सोडून देनार पोरग भैताडच म्हणा लागन. हे असे भैताड अशा पिक्चमंधीच सापडते असली जिंदगानीत नाही सापडत. म्हणून म्हणतो मी, बंदा पिक्चर मजाक हाय.

पिक्चरचा येंड आला, तवा म्या जोरजोरात घोराले लागलो होतो. बाकीचे मायकड पाहात होते म्हणून माया दोस्ताले मायी लाज वाटली. त्यान मले उठवल. डोकच उठल माय. म्या पवन्याले इचारल ‘हे दोघ कोठ आले बे आंधाराचे?’ पवन्यान मले चूप बसाले सांगतल. आता याले येकट्यालेच पिक्चर पाहाचा होता तर मले कायले घेउन आलता देव जाने. म्या झोपलो होतो तर मले सांगाले का जाते जी? तेथ आंधारात बसून ते दोघबी लंबाले डायलाग फेकत होते. आता पिक्चरचा येंड आलता आन हे डायलाग फेकत होते. अस रायते का कधी? बर डायलाग फेकाचे असन तर आपण कोण आहो हे तर पायल पायजे का नाही? आपण का अमिताभ आहो का दिलीप कुमार, मंग कायले बकबक कराची? हे बकबकच, डायलाग नाही. येकदाची त्यायची बकबक संपली पिक्चर संपला. म्या सुटलो येकदाचा. कैदेतून सुटल्यावाणी झालत मले. आमच्या पवन्याले हे पिक्चर लयीच आवडल. मले म्हणे,

“याले म्हणते पिक्चर जन्या. कस आपल्या मनातल सांगते. आपल्याले बी वाटते ना कधी कधी ते आता का करुन रायली असन बा?”

“कायले वाटाले पायजे बे? सारेतली गोष्ट येगळी होती आताची येगळी. आता काही त्या साऱेतल्या सुबाभळीवाणी रायल्या नसन साऱ्या वडाच्या झाडावाणी सुटल्या असन. वडाच्या फांद्यावाणी येका खांद्यावर येक पोरग आन येका हातात दुसर पोरग. का करनार हाय बे त्या दुसर? बायाच्या मांग हिंडाच, घरचा सैपाकपाणी कराच, बाजाराले जाच. आपल्याच घरात पाहाच. जे आपल्या घरात चालल रायते तेच समद्यायच्या घरात. समदीकड मातीच्याच चुली हायेत पाय.”

“तस नाही जन्या, वाटत लेका. तुले कधी इमलीची आठवण येत नाही?”

म्या म्हणतो फोड बसल्यावर त्याच्यावरची खिपली कायले काढाची? जे व्हाच ते होउन गेल. खिपली काढून कायले पाहाच फोड बसला का नाही ते? फोड बसल्याबिगर का खिपली येते का? मले असा घुस्सा आलता. इमली आमच्या सारेत होती हायस्कूलले. येका वरसान लहान होती मायी सारा सुटल्यावरच म्या तिले पायल होत. ते दुसऱ्या गावावरुन बसन येत होती तिच्या गावात सारा नव्हती. आम्ही पोट्टेबाट्टे तेथच फाट्यावरच्या पानठेल्यावर बसून राहत होतो. तिले पायल न दिलखूष. येकदम सुबाभुळीवाणी होती. मंग तिच्या बसच्या टायमाले म्या तेथच बसून राहो. रोज तिले जसाजसा पाहत होतो तशीतशी पोरगी लइ आवड्याले लागली होती. तवा म्या आधी तिची चवकसी केली कणच्या गावची हाय, तिचा बाप का करतो. उद्या लफड नाही पायजे न जी. तिचा बाप चांगला दोन बैलजोडीचा कास्तकार होता तवा फुड जाउन काही लफड नव्हत. आमच्या बापाले पटवता आल असत. आपल बंद काम प्लॅनींगनच रायते.

येकदिस हिम्मत करुन तिच्यासंग बोलाच ठरवल. ते फाट्यावर उतरली आन गावाकड चालली होती, गाव थोड दूर होत. उन तापल हात तवा रस्ता तसा सुनसान होता. कोणी चिटपाखरु नव्हत. मनात मारुतीच नाव घेतल आन म्या तिले इचारल ‘तुय नाव का हाय व इमले?’ म्या अस इचाराची सोय आन ते अशी पराली जी. ढोऱ्यायच्या शेपटीखाली हात लावला का ढोर कसे परते तसी पराली जी. मले समजतच नव्हत म्या अस का केलत ते. म्या तर फकस्त नावच इचारल होत. तिच नाव मले मालूम होत पण काहीतरी बोलाच म्हणून नाव इचारल. त्या दिसापासून मायी तिच्याशी बोलाची हिम्मतच झाली नाय. मी चुपचाप रोज फाट्यावर तिची वाट पाहात होतो अन मंग कालेजले जात होतो. तिची दाहावी संपली आन तिच आमच्या गावात येन बंद झाल. मले काही चैन पडत नव्हती. रातभर झोप येत नव्हती. कसकस होत होत. कालेजात मन लागत नव्हत. म्या तिच्या गावात चकरा माराले लागलो. लय भेव वाटत होत. तिच्या गावच्या पोट्यायन पायल तर केवढ्याची आली असती? तरीबी रोज घरुन वावरात जात होतो आन तेथून चालत तिच्या गावात जात होतो. तेथूनच बस पकडून कालेजले जात होतो. कधी ते दिसत होती कधी नाही. तिले मालूम झालत का म्या तिच्यासाठीच तिच्या गावात येउन रायलो ते. गाडी येथच अडकली होती, फुडं का कराव काही समजत नव्हत. कोणाले इचारव बा त्याचाच इचार करत होतो तवा माया मामा घरी आलता. तो करंजीले रायते हे तरोड्यापासच करंजी. मामा मायाच वयाचा म्हणान जी पाच वरसान मोठा. त्यान बारावी करुन डियेड केलत आन कोण्या सारेत मास्तर होता. म्या त्याले बंद समजावून सांगतल. त्याले घेउन तिच्या गावात गेलो. त्या दिवशी ते आमच्यासंगच बसमंधी आलती, तिचा बाप, माय, भाऊ बंदे बसमंधी होते. कोठका लग्नाले चालले असन. मले मामान सांगतल,

“जन्या, हे पोरगी काही अशी भेटनार नाही. तू काही हिच्यापायी तुय कालेज बरबाद करु नको. तिच्या गावात तर जाउच नको. पकडल्या गेला तर लइ मार खाशीन. तू कालेज कर बराबर, मंग शिद्दा तिच्या बापालेच जाउन इचार.”

मामाच म्हणन मले पटल म्या तिच्या गावात जान बंद केल. ते घरुनच परीक्षा देत होती, तवा कधीकधी बसमंधी दिसे. साहा आठ महिन्यान मामाच लगन जमल. टिका लावाचा प्रोग्राम करंजीलेच होता. अस गडबडीतच लगन जमल होत, तवा मायले घेउन मलेच जा लागल. तवा मले समजल माया मामा लइ चालू निंगाला. कंसमामा तरी बरा पण हा नको. लेकान मलेच मामा बनवल.

‘ते का करुन रायली असन बा’ याच मले काही देनघेन, पण म्या का करुन रायलो ते तुमाले सांगतो राजेहो. दर दिवाळी आन दसऱ्याले करंजीले जातो, …………………………. मामा मामीचा आसीरवाद घ्याले.

लिहिनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा.

जिता असल्याचा दाखला

लय जुनी नाही, आता आताचीच गोष्ट हाय, २०४७ सालातली. देशाले स्वातंत्र भेटून शंभर वर्षे झाले. या शंभर वर्षात जमाना बदलला. आजकाल जेथ तेथ अंगूठा लावा लागते. बँकेतून पैसे काढाचे हाय – लावा अंगूठा, मत टाकाच हाय – लावा अंगूठा, कंट्रोलच सामान उचलाच हाय – लावा अंगूठा. मोठाला साहेब असू द्या नाहीतर गावातला पोट्टाबाट्टा असू द्या, अंगूठा लावण्यापासून कोणी सुटला नाही. बंदे अंगूठाछाप झालेत. माणसाहून अंगूठ्याचच महत्त्व वाढलं, म्हणूनच तर अंगूठ्याले लय जपा लागते. जमानाच तसा खराब हाय. रस्त्यान जाता जाता कोण कोठ कसा अंगूठा लावून घेइन सांगता येत नाही. शाम्याबी अंगूठ्याले लइ जपत होता. बारावी पास होतवरी अंगूठा तोंडातच ठेवत होता. मंग त्यान अंगूठ्याले मोजा शिवून घेतला. ते चांगल दिसत नव्हतं, म्हणून मंग त्यान पँटाले अंगूठ्याच्या मापाचा चोर खिसा शिवला. कोठबी जाच असल का अंगूठा चोरखिशात ठेवून जातो. पण शाम्याचा उलटाच घोटाळा झाला, अंगूठा हाय पण माणूस मेला. म्हणजे कस बँकेच कारड हाय पण बँकच बंद पडली. आता आली का नाही पंचाइत!

इलेक्सनची लाइन लागली होती, अंगूठे आले तरी लाइन तर रायतेच. शाम्या आन त्याची बायको शेवंता दोघबी लाइनमंधी आपला नंबर याची वाट पाहात होते. शाम्याचा नंबर आला त्यान अंगूठा लावला. तेथ बसलेल्या पोरान मंग कांपुटरमंधी पाहून सांगतलं,

“तुमचे नाव नाही लीस्टमधे. तुमच वोटींग येथच हाय ना?”
“आजंतीवाले बंदे येथच रायतेन गा.”
“पण तुमच नाव नाही.”
“शेवंतीच पाहा बर” शेवतीन अंगूठा लावला, लीस्टमंधी तिच नाव होत.
“बाप्पा! हीच नाव हाय आन माय नाही, असकसं गा? येकाच घरात रायतो न आम्ही.”
“Person is expired. तुम्ही मेला आहात”
“आबे भोकना हाय काबे? येथ कोण उभ हाय. मायं भूत? ”
“फालतूमंधी शिव्या नाही द्याच्या सांगून ठेवतो. ”
“अरे देवा, म्या का भुताची बायको हाय?”
“तू चूप व. अस कस जित्या माणसाले मारुन रायले जी तुम्ही?”

असाच गोंधळ काही वेळ चालू होता तसे लाइन मंधी उभे असलेले मांगचे लोक बोंबलाले लागले. पोरान श्याम्याले शेवटच सांगतलं,

“लीस्टमधी तुमच नाव नाही तेंव्हा मत टाकता येनार नाही. पाहीजे तर साहेबांना जाउन भेटा.”
“भेटतो जाउन, रायतो का.”
‘मले का भेव हाय का? अंगूठा तर हाय ना मायापाशी. असे कसे हे जित्या माणसाले मारु शकते? मी सोडनार नाही यायले, मी वरपर्यंत जाइन.’ येकटाच अशी बडबड करीत शाम्या साहेबाच्या कॅबीनमधे धसला आन तावातावात बोलाले लागला. साहेबाले काही समजल नाही. साहेबान शांतपणे सांगतल
“अंगूठा लावा.” शाम्याले लइ राग आलता. इथ जिता माणूस यायन मारुन टाकला ते पाहाच सोडून हे अंगूठाच लावाले सांगते. त्यान रागारागातच मशीनवर अंगूठा ठेवला.
“शाम सोनवणे, आजंती, ता हिंगणघाट, जि. वर्धा. कोणती आजंती तुमची?”
“हे जामच्या फाट्यापासची.”
“अरे वा आपण गाववालं. आमच गाव समुद्रपूर तालुक्यात, जवळच. बोला काय काम हाय?”
“साहेब मी मत टाकाले आलतो, अंगूठा लावला तर तो पोरगा म्हणतो तुमच नाव लीस्टमंधी नाही. काहून तर म्हणे मी मेलो कान. असा कसा मरीन जी मी?” साहेबान पुन्हा कांपुटरमंधी काही बटना दाबल्या.
“त्याच म्हणन बरोबर हाय. मांग दोन महीन्याआधी बरेलीत रेल्वे उलटली त्याच्यात तू मेला. मेलेल्या माणसाच नाव कस राहीन गा इलेक्सनच्या लीस्टमंधी?”
“कोठ आल जी हे बरेली? तेथ रेल्वे उलटली. काहीतरी घोटाळा हाय साहेब.”
“रेल्वे उलटली याच्यात काय घोटाळ हाय गा?”
“अशी कशी रेल्वे उलटते जी? तुम्ही जेथ तेथ अंगूठे लावून घेता ना.”
“अंगूठे लावाचा आन रेल्वे उलटाचा का संबंध? उलटली असन रेल्वे, मेले असन काही माणसं. त्याच्यात तुयबी नाव होत.”
“मारक्यात नाव असल्यावाणीच सांगून रायले तुम्ही. अजी म्या त्या गावाच नावच नाही आयकल कधी, तर मी कायले मराले जाइन तेथ.”

“तू खरच मेला अस कोण म्हणते बे, पण मरनाऱ्याच्या लीस्टमधी तुय नाव हाय. आपल्या गावचा म्हणून तुले सांगतो. आजकाल का झाल हे दहावी नापास पोट्टे रायते ना हे मनरेगात काम कराले येते. आता त्यायले का खंतीच्या कामाले पाठवनार हाय? अशी काही घटना घडली का त्यायले लावते कामाले. टीकाटावरुन नंबरं घ्याचे आन मरणाऱ्याची लीस्टं बनवाची. तुल तर माहीत हाय हा परत्येकाचा नंबर केवढा मोठा रायते. होते गडबड कधी कधी. होते एखादा आकडा इकडचा तिकड. चालाचच…”
“मेलेल्या माणसाचाबी अंगूठा काहून लावून नाही घेत, म्हणजे अशी गडबड तरी होनार नाही.”
“आयडीया चांगली आहे पण आता काही फायदा हाय का? जे व्हाच ते होउन गेल. तू मेला आन तुय प्रेत बेवारस म्हणून जाळून टाकल. फक्त तुले हे सार आज समजल.”
“कशी पंचाइत केली जी मायी या रेल्वेवाल्यायन. ”
“तुले इस्वास हाय ना तू जिवंत हाय ते?”
“इश्वास? मी तर जिताच हाय न जी.”
“झाल तर मग. भिखूबाबा काय सांगते आयुष्यात काही मिळावाच असन तर इस्वास पायजे. जातो का नाही बाबाच्या मठात? जात जा अधूनमधून, डोक शांत रायते. जवळ हाय गावापासून. तू आता एक काम कर रेल्वेत जा त्यायले सांग तुमची चूक झाली. दुरुस्ती करुन द्या.”

शेवंती मत टाकून आली. शाम्याने का घडल ते सार तिले समजावून सांगतल. काहीतरी भलताच घोटाळा झाला हे तिच्या ध्यानात आल.
“शेवंते, खर सांग, तुले का वाटते म्या जिता हाय का मेला?”
“माया सांगण्यान का होनार हाय? सरकारले पटल पायजे. आता फुड कस कराच जी? बारीक सारीक कामं मी करुन घेइन. पण युरीया उचलाचा हाय, कापूस इकाचा हाय, सिलेंडर हाय तेथ तुम्हीच लागन जी. तुम्हाले मरुन जमनार नाही लवकर जितं व्हाच लागल.”
“ते जाउ दे. तुले का वाटते ते सांग. म्या जिता हाय का मेला?”

शेवंती नुसती हासली. शाम्या मात्र रागान लाल झाला. आपल्या बायकोलेबी आपल्यावर इस्वास नाही. शाम्यान ठरवलं, उद्याच्या उद्या नागपूरच्या स्टेशनावर जाच आन दुरुस्ती करुन आणाची. हे अस भूतावाणी नाही जगाच. दुसरे दिवशी सकाळी आंघोळबिंघोळ करुन शाम्या मारुतीच्या देवळात गेला.

‘मारुतीराया तुले तर मालूम हाय म्या भूत नाही. भूत असतो तर येथ देवळात आलो असतो का? देवा मले परत येकदा जिता कर, येथ देवळासमोर अकरा लोटांगण घालीन.’

मारुतीरायाले नवस बोलून शाम्यान फटफटीले टांग मारली आणि शिद्दा नागपुरच्या स्टेशनात पोहचला. नागपुरच स्टेशन म्हणजे काय मॉलच हाय. हिंगणघाटात मॉल नाही अस थोडी हाय, पण हा मॉल लय मोठा हाय जी. जे लोखंडी पुलापासून सुरु होते ते दुसर टोक दिसतच नाही. त्या मॉलसमोर गणपतीची टेकडीबी आता लहानशी वाटते. शाम्यान फटफटीवरुनच गणपतीबाप्पाले नमस्कार केला आन मॉलच्या भवताल एक परदक्षणा मारली. फटफटी कुठ उभी कराची तेच समजत नव्हत तर का करनार. अंदर धसाचा रस्ता दिसालेच धा मिनिटं गेले. शाम्या फटफटी उभी करुन वर आला. नुसती दुकानच दुकान, त्या दुकानायच्या मधी हे प्लॅटफार्मच्या प्लॅटफार्म आन वरवर जानारे जिने. गाड्या तर येकदम चकाचक हिंगणघाटासारख्या पॅसेंजर नाही. आपली ढकलगाडी काझीपेठ पॅसेंजर अजूनही लेटच चालते लेकाची. ह्या अशा दुकानाच्या गर्दीत त्या रेल्वेच्याच मॉलमंधी रेल्वेचच हापिस सापडत नव्हत. मोठ्या मुष्कीलीन हापिस सापडल. शाम्या हापिसाच्या खिडकीसमोर जाउन उभा रायला.

“Yes sir how can I help you?”
“अ मले”
“Oh Marathi, just minute.” अस म्हणून त्यान य़ेक यंत्र काढल आन दोघाच्या मधे ठेवल. हेडफोन्सची येक जोडी शाम्याले देली येक सोता घातली. त्याच्यात कान दोघानबी आपल्याआपल्या भाषेत बोलाच, समोरचा त्याले समजते त्या भाषेत आयकतो.
“बोला”
“तुमच्या कांपुटरमंधी काहीतरी गडबड हाय. जित्या माणसाले मारुन टाकल.”
“त्यात गडबड कसली? जिवंत माणूसच मरत असतो.”
“तस नाही. रेल्वेची चूक झाली.”
“रेल्वे चुकत नाही.”
“असकसं, तुमची रेल्वे म्हणते शाम सोनवणे मेला.”
“म्हणजे तो मेला.”
“हे कागदपत्र पाहा कोण्याच्या नावान आहे.”
“ही कागदपत्र शाम सोनवणे यांची आहेत आणि तो मेला आहे. ”
“पण म्या जिता हाय. हेच तर चुकल.”
“शाम सोनवणे मेलेला आहे आणि तुम्ही जिवंत आहात यात रेल्वेचे काय चुकले?”
“कारण म्याच शाम सोनवणे हाय.”
” शाम सोनवणे मेला असूनही तुम्ही जिवंत आहात ही तुमची चूक की रेल्वेची?”
“तुम्ही नुसती गोष्ट फिरवून रायले. अजी जो मेला तो कोणी दुसराच होता, शाम सोनवणे नव्हता.”
“काही पुरावा?”
“कोण कोण टिकिटा काढल्या ते पाहा.”
“टिकीटाचा रेकार्ड महीन्याभराच्या वर ठेवत नाही. तुम्हीच शाम सोनवणे आहात आणि जिवंत आहात असा दाखला घेउन या.”

असा दाखला कुठुन आणाचा हे टेंशनच होत. इकड गावात भलतच टेंशन चालू झालत. त्या दिवशी सारा तमाशा इलेक्सनच्या लाइनीतच झालता. तवा गावावले होतेच लाइनमंधी. त्यायनबी आय़कल का झाल ते. हळूहळू बंद्या गावात बोंब झाली शामराव सोनवणे मेला आन त्याच भूत गावात फिरुन रायल. शेवंती तर तरासून गेलती. रोजच्या रोज बाया तिच्याकड याले लागल्या, ‘कस झाल, का झाल’ अशी इचारपूस करु लागल्या. भूत घरात होत तर तिले काही संशय आला का बा. कोणी सटवाइले नारळ फोडाले सांगत होता, कोणी मांत्रिकाचा पत्ता देत होत, कोणी कोणाच्या आंगात देवी येते त्याचा पत्ता देत होता. गावात नुसत्या भूताच्या चर्चा चालल्या होत्या. जो तो कोण कवा कस भूत पायल त्या गोष्टी सांगत होता. बाया शाम्या दिसला का त्याच्याकडे भलताच संशय़ घेउन पाहत होत्या. आंगणात पोरबाळ खेळत असन तर लगेच उचलून अंदर नेत होत्या. आता तर शाम्याले सोताचा इस्वास रायला नव्हता, तो रोज आरशात चेहरा दिसतो का कवटी ते तपासत होता, पाय शिद्दे हाय का उलटे ते पाहत होता, मारुतीच्या देवळात जाउन चिमटे काढत होता. कहर तर तवा झाला जवा त्याचा जानी दुश्मन रव्यान त्याले फोन केला. मांग बरबडीच्या वावरातल्या आंब्यावरुन रव्याचा आन शाम्याचा झगडा झालता. मारक्यावर गोष्ट गेलती तवापासून दोघात बोलन बंदच होत.

“काबे शाम्या तू मेला म्हणते. मेल्यावर दुश्मनी रायते काबे? खबर तर दयाची होती. खांदा द्याले नाही तर तेरवीच्या परसादाले तर बोलवाच होत. पाय आता तुया आत्मा रायलान अडकून.” रव्याले तर मोकाच पायजे होता. शाम्याचा टाळक सणकल. कसही करुन हा बट्टा मिटवाचा अस त्यान ठरवल. दोघातिघाले इचारल तवा माहीती भेटली का वर्धेले ‘एक खिडकी हापिस’ हाय. सारे दाखले य़ेकाच ठिकाणी भेटते.

दुसऱ्या दिवशी शाम्यान मारुतीरायाले नारळ फोडला आन नवस बोलला ‘देवा हा बट्टा पुसु दे. या हनुमान जयंतीले बंद्या गावाले जेवण देतो.’ अस मारुतीरायाले इनवून शाम्या एक खिडकी हापिसात पोहचला. हापिस लइ चकाचक होत. जिकड तिकड काचा लागल्या होत्या. थंडगार एसी होता. शाम्यान अंगूठा टेकवला तस कांपुटरवर लिहून आल. ‘कैलासवासी शाम सोनवणे’, कैलासवासी असला तरी शाम्याले टोकन मात्र भेटल. टोकन घेउन शाम्या सोफ्यात जाउन बसला. बराबर बारा मिनिटान शाम्याचा नंबर आला आन शाम्या आपल्या नंबरच्या खिडकीसमोर जाउन बसला.

“बोला काय हवे आहे आपल्याला?”
“मी जिता हाय असा दाखला पायजे.”
“जन्माचा दाखला.”
“तो हाय पण मरणाचाबी दाखला बनला.”
“अरे हो तुमचे डेथ सर्टीफिकेट रेडी आहे प्रिंट देउ का?….. तुम्ही मेलात तर मग इथे कसे?”
“तेच सांगतो न जी मी. तुम्ही मले ‘शाम सोनवणे जिता हाय’ असा दाखला द्या.”
“जन्माचा दाखला असतो नाहीतर मरणाचा. मधल्या काळात माणूस जिवंत आहे असा दाखला मात्र नसतो. तसेही तुम्ही मेले आहात, तुम्हाला जिवंत कसे करता येइल?” शाम्यान इकड तिकड पायल आन हळू आवाजात इचारल.
“साहेब जमवा काहीतरी. काय जो खर्च होइल ते पाहून घेउ. वरुन वावरात पार्टीबी करु. कोंबडगिंबड कापू.”
“डोक फिरल का तुझ? विमा भेटत नसेन तर मरणाची तारीख इकडे तिकडे करता येते पण मेलेला माणूस जिवंत नाही करता येत. उद्या चौकशी झाली तर केवढ्याल पडेल. मेडीकलचा मामला आहे राजा, डॉक्टरचाच दाखला पायजे. तू सरकारी दवाखान्यातून सिव्हील सर्जनचा दाखला घेउन ये.”

आता सिव्हील सर्जनले भेटाच म्हणजे लय लफडे रायते. तेथ तर दाखले मागनाऱ्याची लाइन लागली रायते. तवा त्याची भेटाची येळ ठरवा लागते. नशीबान सरपंच्याची त्याच्या पीयेची ओळख निंघाली आन पियेन मग भेट ठरवून देली. दोनची येळ होती तरी शाम्या दाहा वाजल्यापासूनच तेथ जाऊन बसला. डाक्टरसाहेब मात्र पाच वाजता आले. शाम्या अंदर गेला आन तसाच उभा राहीला. शाम्याच अर्ज पियेन फाइल मंधी ठेवला होता. डॉक्टरसाहेबान फाइल वाचली आन इचारल

“हे काय आहे? मरुन जिवंत झालात असा दाखला हवाय.”
“साहेब नस्ती आफत झाली हाय. कोणतरी नजरचुकीन मी मेलो अस करुन टाकल. तवा जसा तुम्ही कोणी आजारातून बरा झाला असा दाखला देता तसा मले मेलेला माणूस जिवंत झाला असा दाखला द्या.”
“वेडा समजतो मला? मी डॉक्टर आहे. मेलेला माणूस जिवंत झाला असा दाखला दिला तर माझ्या डॉक्टरकीच दिवाळं निघेल.”
“साहेब मायी लय पंचाइत झाली जी, जो मेला तो कोणी भलताच होता आन त्यायन शाम सोनवणेच्या म्हणजे माया नंबरची एंट्री करुन मलेच मारुन टाकला. सारे व्यवहार बंद झाले साहेब, गावात तोंड दाखवाले जागा राहीली नाही गावातल्या बायाबी मायाकड भूत समजून पायते.”
“हूं, इंटरेस्टींग. हे पाहा मी तुम्ही जिवंत आहात असे लिहून देउ शकतो परंतु तुम्हीच शाम सोनवणे आहात हे कसे ठरविनार.”
“मी पायजेन तर पाच साक्षीदार आणून उभे करतो.”
“साक्षीदार आणून काम भागनार नाही. काहीतरी ठोस पुरावा पाहीजे. तुम्ही शाम सोनवणे म्हणून जिवंत असताना कधी डिनए टेस्ट वगेरे केली होती का?”
“कणची टेस्टं? शुगरची टेस्टं का?”

डाक्टर हासला आन शाम्याले भायेर जाले सांगतल. आता ह्या टेस्टची नवीनच भानगड पैदा झालती. दर दिवसाले काहीतरी नवीन पैदा होत होत पण जित्या माणसाचा जिता असल्याचा दाखला काही भेटत नव्हता. ज्या टेस्टंच नावच कधी आय़कल नव्हत अशी काही टेस्टं कराचा सवालच नव्हता न जी. तुम्हीच सांगा, कोण कायले कराले जाइल अशी टेस्टं? कोणाले मालूम रायते का आस काही होनार हाय ते? शाम्या मारूतीच्या देवळाच्या जोत्यावर जाउन बसला. मारुतीले नमस्कार केला आन सांगतल ‘देवा कोणची का टेस्टं ते सापडू दे मी गाववाल्यायले जेवणासंग धोतराच पानबी देइन.’

गावात कोणाले काही माहीत असत तर कोणतरी कधीतरी तस सांगतल असत. तवा आता शयरातल्याच नातेवाइकाले नाहीतर दोस्ताले इचाराव लागनार होत. कोणाले इचाराच्या आधी मोबाइलले येकदा इचारुन पाहू बा म्हणून त्याने फोनलेच सांगतल ‘डिनए टेस्ट’. पायता पायता मोबाइलन धडाधडा माहीती देली. शाम्याले सार समजल नाही पण येवढ मात्र समजल हे अशी टेस्ट त्यानच का त्याच्या खानदानात कधी कोणी केली नव्हती. तवा आता आपण काही शाम सोनवणे म्हणून जिते होउ शकत नाही अशी त्याची खातरी झाली. आपल नशीब खोट या नाराजीतच तो घरी आला आन न जेवता तसाच आंथरुणावर पडून रायला. कामं आटपून शेवंतीबी आली.

“काहून जी का झाल? पोट बराबर नाही का?” शाम्या काही बोलला नाही तसाच वर आटाळ्याकड पाहत पडला रायला.
“तुम्ही तुमच्या त्या दाखल्याच्या कामात गुतला होता म्हणून तुमाले सांगतल नाही. म्या सपनीले घेउन डाक्टरकड गेलती आज. सोनोग्राफी कराची होती. लइ टणाटण उड्या मारत होत बाळ. बापावर गेलय येकदम.”

शाम्याच काही लक्ष नव्हत. तो वर पाहातच पडला होता. आता शेवंतीलेबी बोलाच जिवावर आलत. ते चुपचाप कपड्याच्या घड्या कराले लागली. अचानक काहीतरी आठवल्यासारख शाम्या टणकन उडी मारुन बसला.

“शेवंते, मले येक सांग, हे बाळ मायच हाय ना.”
“मंजी का म्हणाच का तुमाले?”
“किती महीने झाले?”
“पाच साडेपाच”
“त्या डॉक्टरले याचा बाप म्हणून जिता असलेल्या शाम सोनवणेचच नाव देलत ना आपण?”
“असे काहून इचारुन रायले जी तुम्ही?”
“तुले नाही समजाच.”

अस म्हणून त्यान बाळाचे ठोके आयकू येते का ते पाहाले तिच्या पोटावर कान टेकवले, पोटावरुन हात फिरवला, पोटाची पपी घेतली. आपल्या नवऱ्याले अस का झाल म्हणून शेवंती त्याच्याकड पाहात होती आन शाम्या शेवंतीच्या पोटात वाढून रायलेल्या बाळात त्याचा जिता असल्याचा दाखला शोधत होता.

पूर्वप्रकाशित मिसळपाव मराठी दिन

दोन फोन

“हॅलो”
“हॅलो, मगनलाल प्रकाशन, बोला”
“मी एक लेखक बोलतोय, मी माझे लिखाण आपल्याकडे पाठविले होते. त्याच्या प्रकाशनाबद्दल चौकशी म्हणून फोन केला होता.”
“कधी पाठवले होते?”
“सहा महीणे झाले.”
“सहा महीणे पूर्वीच्या गोष्टीची आज काय चौकशी करता?”
“तुम्हीच सांगितल ना लेखन पाठवल्यावर सहा महीणे कसलीही चौकशी करु नये म्हणून.”
(कुजबुजल्यासारखे) “ते तुम्ही सहा महीण्यात सारे विसरुन जावे म्हणून. (नॉर्मल) बोला काय नाव होते?”
“माझे नाव”
“तुमचे नाही पुस्तकाचे”
“झांबियातले दिवस”
“झांबिया? काय प्रकार आहे हा? नृत्यातला प्रकार आहे का?”
“नाही”
(समोरच्याचे बोलने पूर्ण करु न देता) “अहो आमची मराठी साहीत्याची मनोभावे सेवा करनारी संस्था आहे तेंव्हा पाककृती वगेरे असेल तर विसरुन जा. तो सकस आहार असला तरी आमच्या सकस साहित्यिक आहारात बसत नाही.”
“तुम्ही मला बोलू तर द्या. झांबिया एक देश आहे पाककृती वगेरे नाही.”
“अच्छा पर्यटन आहे, या वर्षीचा पर्यटनाचा कोटा संपलाय. फक्त सहा पुस्तके वर्षाला. पुढली तीन वर्षे पर्यटनाचा कोटा नाही. हल्ली जो तो उठतो आणि कुठेतरी फिरुन येतो.”
“मी फिरायसाठी तिथे गेलो नव्हतो.”
“मग कशाला गेला होता?”
“ऑफिसचे काम होते.”
“पटपट सांगा काय ते, माझ्याकडे फार वेळ नाही.”
“मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्ताने तिथे असताना मला तिथली माणसे, तिथली संस्कृती, तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचा जो अनुभव आला होता त्याविषयी मी लिहिलेले आहे.”
“अच्छा म्हणजे देशोदेशीचे अनुभव. एक मिनिट हं. ए ती देशोदेशीचे अनुभवची फाइल कुठे असते ग?”
“पर्यटनाच्याच फोल्डरमधे.”
“अच्छा ते अनुभव पण पर्यटनातच मोडतात का? ओके पर्यटन, अमेरीका इस्ट कोस्ट, अमेरीका शिकागो, अमेरीका वेस्ट कोस्ट, अमेरीका…, अमेरीका.., …. अरबांच्या देशात कतार, अरबांच्या देशात, अ अ अ डी हं देशोदेशीचे अनुभव सापडले.”
“सापडले?”
“नाही. देशोदेशीचे अनुभव म्हणजे काय ते सापडले. तुमचे ते झांबिया काबूलमधे येते की कंदहारमधे?”
“नाही हो तो एक स्वतंत्र देश आहे.”
“अफगाणिस्तान?”
“अफगाणिस्तानात कसे येइल, ते आफ्रिका खंडात आहे.”
“बर इराक, सिरीया”
“मी सांगितले ना ते आफ्रिका खंडात येते.”
“ते सांगू नका, ते खंडगिंड महत्वाच नाही, इराक, सिरीया मधे आहे का तेवढ फक्त सांगा”
“नाही”
“यापैकी कुठल्याच देशात नाही तर. (कुजबुजत) हे काय आहे जे डब्लू. ए.. हं (नॉर्मल) तुमचा अनुभव ज्वलंत, दाहक वगेरे आहे का?”
“म्हणजे?”
“तुम्ही तिथून पळून आला का? तुम्हाला कोणी ओलीस ठेवले का? तुमचा भयंकर छळ झाला का?”
“नाही असे काही नाही. याला एक सांस्कृतीक देवाण घेवाण म्हणता येइल. दुसऱ्या देशातला माणूस समजून घेण्याची प्रक्रिया.”
“मग शक्य नाही. देशोदेशीचे अनुभव मधे काय हवे ते मी वाचते, ‘देशोदेशीचे अनुभव अंतर्गत इराक, सिरिया, अफगाणिस्तान, काबूल, कंदहार, सुदान इथले अनुभव येतात. किंवा कुणाचा ज्वलंत दाहक असा अनुभव उदाहरणार्थ अतिरेक्यांच्या तावडीतून निसटून पळून जाणे, ओलीस असने, भयंकर छळ किंवा भयंकर भयप्रद दिवस काढने असे अनुभव प्रकाशित करता येतील.’ त्यात कुठेही तुमच्या त्या सांस्कृतीक देवाणघेवाण विषयी लिहिलेले नाही.”
“लिहिले नाही म्हणून काय झाले परंतु माणसाने माणसाला समजून घेण्याचा अनुभव तर असतोच.”
“असला तरी आम्ही प्रकाशित करु शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही असे का करीत नाही?”
“कसे?”
“तुम्ही तुमचे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित करा.”
“मी मराठी आहे. माझ्या भावना, माझे अनुभव मी माझ्या मातृभाषेत म्हणजे मराठीतच चांगल्या रीतीने सांगू शकतो.”
“असच काही नसत. इंग्रजी लिहिनारे सारे इंग्रजच असतात असेच काही नाही. मी तर म्हणेल तुम्ही स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा भाषेत लिहा. नाहीतर तुम्ही ज्या देशात गेला होतात तिथल्या भाषेत लिहा. तेही नसेल जमत तर गुजराती, बंगाली, तेलगु किंवा छत्तीसगडीसुद्धा चालेल.”
“पण मराठी का नको?”
“मराठीतच लिहिले तर त्याचा अनुवाद कसा छापनार? अनुवादाला वर्षाचा कोटा नाही, वर्षात कितीही छापू शकतो.”
“हं….. बाय.”
“बाय.” (फोन ठेवल्यावर) “ए तू तुझ्या नणंदेविषयी बोलत होती ना, काय झाल तिच?”

***********************************************************
“हॅलो”
“हॅलो, बोला प्रकाशक महोदय अलभ्य लाभ. आज कशी काय आमची आठवण झाली.”
“तुम्ही सदैव आमच्या आठवणीतच होता. फोन फक्त आज केला.”
“धन्यवाद. काय म्हणतोय धंदा? सापडतोय कुणी नवीन वाचक?”
“काय राव, खेचता का आमची? वाचक शोधने केंव्हाच सोडून दिले. आता वाचनालय शोधतो आम्ही.”
“काय काम होते?”
“प्रस्तावना हवी होती”
“आमच्याकडून तुमचे ते नेहमीचे श्री कृ अजून जिवंत आहेत ना.”
“हो पण व्हेंटीलटरवर असल्यासारखेच आहे. त्यांच्या नावाने प्रस्तावना छापली आणि पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधीच गचकले तर प्रॉब्लेम होइल. म्हणून एखादे तरुण सळसळते रक्त हवे होते साठीतले.”
“मी पुस्तकासाठी प्रस्तावना सहसा लिहीत नाही. समीक्षेची समीक्षा लिहनारा आहे मी. माझ्या पिचडीचा विषय होता स्वातंत्रपूर्व कालीन संतसाहीत्य समीक्षा आणि हरवलेला आधुनिक चष्मा.”
“माहीत आहे मला. पण म्हटल जठार बाईंच्या घरचे काम आहे तेंव्हा तुम्हाला विचारुन बघाव. आमच्या संपादक मंडळाने जीपींचे नांव सुचवले होते.”
“जठार बाइ, त्या जठार एक्सपोर्टवाल्या. त्यांच्या कामासाठी तुम्ही जीपींकडे जानार होता. त्याला काय कळते साहीत्यातल.”
“त्यांचाही आग्रह तुम्हाला विचारा असाच होता. त्यांच्या पाककृतीच्या पुस्तकाला तुम्हीच प्रस्तावना लिहिली होती.”
“पाककृती? पाककृती काय म्हणता राजे. थकलेल्या शरीरातल्या पेटलेल्या जठराग्नीला शांत करुन आत्मिक शांतता साधण्याचा मार्ग आहे तो. जगात भूक हे एकमेव सत्य आहे बाईंनी त्याचाच शोध घेतलाय. हा शोध कधी मिरची, कधी कोथींबीरी, कधी फो़डणी यासारख्या कठीण मार्गाने जातो तर कधी चीज, कधी पनीर यांच्यावरुन सहज खाली घरंगळत जातो. जेंव्हा तुम्हाला जाणीव होते या साऱ्या प्रवासात तुम्ही पण सोबत आहात तो अनुभव भयंकर रोमांचकारी असतो. तो तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर घेउन जातो. त्यानंतरची ती तृप्तीची ढेकर न राहता तो त्या सत्य शोधण्याच्या प्रक्रियेचा एक सुखद अंत असतो. तुम्ही त्याला पाककृती म्हणता?”
“तुम्ही म्हणा हो, तुम्हाला जे वाटते ते म्हणा.”
“मी माझ्या पिचडीच्या विद्यार्थांना त्यांच्या पुस्तकाचे समीक्षण लिहायला सांगितले आहे. मी त्या समीक्षणांवर समीक्षण लिहिनार आहे. नाव पण तयार आहे ‘मराठी पाककृती: शबरीच्या बोरांना रामाची वाट’. माझे लिहून झाले काही समीक्षण आले की हे समीक्षणांचे समीक्षण येनार. पाककृतीला मराठी साहीत्यात्याच्या अभ्यासात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठीच झटतोय आम्ही.”
“मग तुम्ही लिहता ना प्रस्तावना?”
“म्हणजे काय, जठार एक्सपोर्टवाल्यांचे कार्य आहे आम्ही कसे मागे राहनार. बोला काय विषय काय आहे?”
“पर्यटन.”
“तुम्ही अनुवाद सोडून पर्यटनाचे मागे कसे धावायला लागला?”
“जाउ द्या साहेब का उगाच जखमेवर मीठ चोळता. एकाच पुस्तकाचे चार खंड केले आम्ही. झांबियातले दिवस खंड १ ते ४”
“अरे बापरे. चार खंड तेही झांबियावर, तुमचे ते अमेरीका,अरब सार सोडून. फारच जास्त प्रभावी दिसतात लेखक. कोण आहेत?”
“खुद्द मालक, जठारसाहेब”
“क्या बात है. हे म्हणजे अंबानींनीच बॅट घेउन मैदानात उतरण्यासारखे झाले.”
“नाही अंबानींन बॅटींग मिळावी म्हणून त्यांनी अख्खी टिमच विकत घेतली.”

डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स

dancer

(चित्रे: ज्योति कामत. )

नमस्कार मंडळी मी डॉ. वाटमारे, गेली कित्येक वर्षे मी साबुदाण्याच्या गोळ्यात काय मिक्स करतो ह्याचे रहस्य मलाच काय पण स्वतःला फार मोठा रहस्यसंशोधक, सत्यन्वेषी समजनाऱ्या माझ्या मित्राला म्हणजेच ढेरपोट गोम्सला सुद्धा उलगडलेले नाही. त्याचे आडनाव तसे गोमासे परंतु तो स्वतःला शेरलॉक होम्सच्या व्यवसायातला समजतो म्हणून त्याने गोमासेचे गोम्स असे करुन घेतले. माझ्या मते हा माणूस सत्यन्वेषी नाही तर सत्यविध्वंसक आहे. या माणासाला एकच सत्य माहीत आहे ‘पैसा’ आणि पैसा देणारा जे सांगेल तेच याचे सत्य. येवढ पैसा पैसा करुनही हा माणूस मात्र भिकारडाच आहे. सुटलेल पोट, खाली काळी हाफ पँट, वर कळकट बनियान या अशाच अवतारात असतो. या अवतारामुळे याला काही अक्कल आहे अशी कुणाला साधी शंका सुद्धा येत नाही त्याचमुळे याच फावत बस. हा माणूस ज्या काही उचापती करतो ते कागदावर उतरावायची कुरापत मी करतो. त्याचसाठी मला या माणसासोबत फिरावे लागते. त्याच्यासोबत फिरल्यामुळे इथली लोक मला त्याचा सहायक समजतात उलट या ढेरपोट गोम्सचा सर्वात जास्त द्वेष करनारा कुणी व्यक्ती या जगात असेल तर तो मी आहे. जेंव्हा कुणी या ढेरपोट गोम्सची चांगली जिरवतो तेंव्हा मला सर्वात जास्त आनंद होतो.

या ढेरपाट्याची जिरवनारी एक भेटली होती, हो भेटला होता नाही तर भेटली होती. दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी आणि ढेरपोट्या त्याच्या बकरी गल्लीतल्या ऑफिसमधे बसलो होतो. ऑफिस कसल अंधार कोठडी, ना धड हवा येत होती तिथे ना धड उजेड. उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे जरा जास्तच उकडत होत. कुणीतरी भेटायला येनार आहे असा फोन आला होता आम्ही दोघही त्याची वाट बघत होतो. एक गाडी आमच्या ऑफिससमोर येउन उभी झाली, अंगात शेरवानी, खाली जिन्स आणि पायात कोल्हापुरी अस एक ध्यान त्या गाडीतून उतरल. त्या ध्यानाला मी तिथे असलेल आवडल नाही परंतु गोम्सने याच्याशिवाय माझा पान हलत नाही (कारण शेवटी पानं मीच लिहितो ना) अस सांगितल्याने त्याने मला तिथे राहू दिले.
“नमस्कार मीच मेसेज केला होता.”
“नमस्कार, तुम्ही कुण्या संस्थानाचे राजे वाटता.”
“अगदी बरोबर, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील भोरनळी संस्थानाचा मी राजा. तुम्ही कसे ओळखले?”
“सोप आहे. तुम्ही तुषारपासून टायगर पर्यंत साऱ्या स्टारपुत्रांना ट्वीटरवर फॉलो करता, त्यांचे ट्वीट रिट्वीट करता, त्यांचे पिक्चर बघता, तारीफ करता म्हणजे तुमचा घराणेशाही वर पक्का विश्वास आहे. फेसबुकवर तुम्ही फालतू गणिताच्या पोस्टला लाइक करता, उत्तरे देता पण ती चुकीची देता. याचा अर्थ तुम्हाला काहीही अक्कल नाही. अक्कल नाही आहे पण बुडाखाली मात्र मोठी गाडी आहे, हातात आयफोन आहे. बापजादाची इस्टेट असल्याशिवाय ते शक्कच नाही.”
“वॉ हुश्शार आहात तुम्ही”
त्याच फेसबुक अकाउंटची सुरवातच आहे राजे अशी आणि फोटो सुद्धा राजासारखा. ते सोडून ढेरपोट मात्र कशाचा संबंध कशाशीही जोडतो लोकांना त्यातच हुषारी वाटते.
“बोला काय काम आहे?”
“माझ लग्न ठरलय.”
“हूं म्हणजे होनाऱ्या राणीची चौकशी करायची आहे तर?”
“नाही. जुनी गोष्ट आहे मी कॉलेजात होतो तेंव्हा, आमच्या इथे एक तमाशाचा फड आला होता. इरावतीबाई आढले यांचा तमाशा. बाइ खूप सुंदर होती, एकदम नूराणी चेहरा. गात तर काय होती, नाचन विचारुच नका.”
“आल लक्षात तुम्हा श्रीमंतांच्या सवयीनुसार तुम्ही तिच्या नादाला लागला.”
“काहीस तसच झाल, भुरळच पडली होती. ती सांगेन ते करत गेलो.”
“ममसत पकडल्या गेलात?”
“छे.”
“कुठल्या हॉस्पीटलच पेमेंट कराव लागल, तेही क्रेडीट कार्ड वापरुन.”
“नाही नाही. तशी पाळी नाही आली.”
“मिळून फोटो वगेरे?”
“तो असला तरी त्याला कोण विचारतो. मॉर्फ केल अस सांगता येत.”
“फेसबुक लाइक, व्हाटस अॅप चॅट, घाणरडे जोक्स.”
“नाही तेही नाही”
“मग केल काय अस?”
“पत्र, पत्र लिहील मी तिला.”
ढेरपोटला तर हसायला संधीच मिळाली तो जोरजोरात हसायला लागला. जस पत्र हा शब्द त्याने याआधी कधी ऐकलाच नव्हता.
“पत्र लिहील या काळात. मोबाइल, लॅपटॉप च्या काळात जिथे पेन आणि पेन्सिलमधे काय फरक आहे ते कळत नाही त्या काळात तुम्ही पत्र लिहिल. ही चूक नव्हे घोडचूक. It’s blunder.” समोरच्यावर आपला शेवटचा वार करायला ढेरपोट नेहमी इंग्रजीचा वापर करतो.
“काय होत पत्रात?”
“गाण. तिच्या तमाशासाठी मी एक गाण लिहील होत.”
“अर्रर, पत्र लिहिल तर लिहिल त्यात गाण लिहिल. नक्कीच टाइप केल नसनार स्वतःच्याच दुर्वाच्च, दुर्गम, दुर्बोध अजून कसले कसले दु अशा अक्षरात लिहल असनार.”
“हो मीच लिहिल. जगात माझ अक्षर समजू शकनारे जे मोजके लोक आहेत त्यातली ती एक.”
“शिट, शिट, लेखी पुरावा, अक्षम्य गुन्हा. याला माफी नाही.”
“ते गाण आता तिच्याजवळ आहे. मला भिती वाटते ती ते गाण माझ्या होनाऱ्या सासरच्या लोकांना दाखवून आमच्या लग्नात अडथळा आणेल. माझ राजघराण्यात लग्न ठरतेय.”
“तुम्ही पैसे फेकले असनार पण तिने ऐकले नाही, चोर पाठवले त्यांना काही सापडले नाही. धमकी दिली तर तिनेच तुम्हाला धमकावले. बरोबर?”
“अगदी बरोबर तुम्ही खरच खूप हुषार आहात”
“अस काही झाल नसत तर तुम्ही माझ्याकडे कशाला आला असता?”
“तुम्ही हुषार आहात, महान आहात, तुमची किर्ती सर्वत्र आहे. मी संकटात आहे माझी मदत करा. मला आता त्या गाण्याची ओऱीजनल कॉपी हवी. काय करुन बसलो मी. ”
“येवढ काय घाबरायच? गाण लिहिल म्हणून वॉरंट निघत नाही. ”
“डॉक्टर, डॉक्टर ते क्लायंट आहेत आपले. त्यांच दुःख समजून घ्या, अडचणीत सापडलेत ते बिचारे. तुमची अडचण आम्ही दूर करु फक्त तुम्ही आमची अडचण समजून घ्या.”
“त्याची काळजी करु नका. हे घ्या पन्नास हजार.”
“मी मानधन घेत नाही फक्त समाजसेवा करतो. समाजसेवेची पण किंमत असते. खात्री बाळगा तुमचे काम नक्की होइल.”

तो व्यक्ती निघून गेला. कसले राजे आणि कसले राजघराणे, या लोकांची काय ती केस मला तर असल्या फालतू केसमधे अजिबात रस नव्हता. पैसा मिळत असेल तिथे अर्थपूर्ण समाजसेवा करायचा या सत्यविध्वंसक ढेरपोटला भारी सोस आहे. मला सकाळी सात वाजता ये म्हणून सांगितले मी स्पष्ट नकार दिला. होमिओपॅथचा असलो तरी माझ्याकडे येनारे गिऱ्हाइक काही कमी नाही. याच्यासारखे दोन दोन महीने बिड्या फुकत बसावे लागत नाही. आता तर उन्हाळा, लग्नाचा सीझन लोक फुकट मिळते म्हणून नको तिथे नको तेवढ खातात आणि मग डॉक्टरचे बील भरतात. धंद्याचा टाइम खोटी करुन उगाचच त्या बाइच्या मागे या ढेरपोट्यासोबत फिरण्याचा मला अजिबात उत्साह नव्हता. मी माझा दवाखाना आटपून चार वाचता बकरी गल्लीच्या ऑफिसमधे पोहचलो. बुवा अजून यायचे होते. दोन अडीच तास त्या अंधार कोठडीत काढल्यावर बुवा आले, अख्खा जीन्स आणि अख्खा टि शर्ट अंगावर चढवला होता. अशा कपड्यात बघायची मला सवय नव्हती. मी डोळे फाडून खालपासून वरपर्यंत बघत होतो.
“घाबरु नको डॉक्टर, घाबरु नको, आलोच बदलून.”
थोड्याच वेळात ढेरपोट त्याच्या नेहमीच्या अवतारात आला, हाफपँट, कळकट बनियान आणि हातात बिडी.
“किती उशीर? मी चार वाजता पासून येउन बसलोय कुठे गेला होता? अशी जीन्स टी शर्ट घालून का फिरत होता?”
“कुठे गेलो असेल याचा अंदाज तुला आला असेलच”
“दुसर काय तू बाइच्या मागावर गेला असनार.”
“अगदी बरोबर. पण मी तिथे जे काही बघितले, तिथे जे काही घडले ते मात्र चक्रावून सोडनारे होते.”
“अस काय आभाळ फुटल तिथे?”
“ऐक. मी त्या बाइंचा तमाशा ग्रुप ज्या लॉजवर उतरलाय तिथे गेलो. त्या लॉज समोरच्या पानटपरीवर उभा राहून कॉलेजात जानाऱ्या मुलांसारखा सिगरेट ओढत होतो. पाच रुपयाला एक सिगरेट मिळते. त्या पाच रुपयांमधे मी इरावतीबाइबद्दल इत्यंभूत माहीती मिळविली. हेच नाही तर ग्रुपमधल्या इतर मुलींची पण माहीती मिळविली.”
“यात काय अस चक्रावून सोडण्यासारख?”
“सांगतो. Have patience. मला कळले बाइंच बस्तान खालच्याच मजल्यावर आहे. मी लॉजमधे आत शिरलो लपत छपत. कुणालाही मी दिसनार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो. मला स्पष्ट दिसत होते बाइनी चार खोल्यांची एक खोली केली होती. तिथेच आपला दरबार थाटला होता.”
“बर मग”
“तेवढ्यात बाइंना कुणीतरी भेटायला आला. मी लॉजच्या बाहेर आलो परंतु खिडकितून सारे बघत होतो. मी नजर हटवली नाही. अं हं. तो मनुष्य रिसेप्शनला काहीही न विचारता सरळ बाइंच्या खोलीत गेला म्हणजे नेहमीच येनारा असला पाहीजे.”
“कशावरुन? साऱ्यांनी तुझ्यासारख लपून छपूनच जायला पाहीजे काय?”
“मला प्रश्न पडला होता हा बाइंचा वकील आहे की सीए? त्या मनुष्याला बघताच बाइ बाहेर आल्या. डोक्याला टॉवेल बांधला होता तेंव्हा नुकतीच आंघोळ झाली असनार. ”
“हे कोणीही सांगेल”
“माझी नजर बाइंवर पडली. मी बाइंना प्रथमच बघत होतो. वा काय रुप होते सुंदर अति सुंदर. असे रुप बघून कुणीही पाघळेल पण मी हा गोम्स असा पाघळनाऱ्यातला नाही. मी मनावर कंट्रोल केला फक्त खिडकीवर फोकस केला. तो मनुष्य सोफ्यावर जाउन बसला, बाइ त्याच्या बाजूला जाउन बसल्या. बाइंनी डोक्यावरचा टॉवेल सोडून केस पुसायला सुरवात केली. तो मनुष्य बाइंच्या खांद्यावर हात ठेवून होता. दोघे गुलुगुलु गोष्टी करीत होते. ते नक्कीच आपल्या अशीलाविषयी बोलत असनार. मग तो मनुष्य बाहेर आला रिक्षा पकडली, रिक्षेवाल्याला दहा रुपये आगाउ देउन लवकर निघायला सांगितले, त्यापाठोपाठ बाइ आल्या, बाइ लाल रंगाची साडी नेसल्या होत्या. रिक्षेवाला फुकट न्यायला तयार झाला. मी पण रिक्षा पकडली त्या दोन रिक्षांच्या मागे जायला सांगितले. त्याने मीटरच्या दुप्पट भाडे सांगितले. रिक्षा जात होते शहरातल्या रस्त्यातून, गल्लीतून आणि अचानक एका पाठोपाठ एक असे साऱ्या रिक्षांना ब्रेक लागले. ते विवाह नोंदणीचे कार्यालय होते. संध्याकाळचे पाच वाजायला दहा मिनिटे उरली होती. मी त्या कार्यालयाच्या दिशेने जात होतो, मला आता तो मघाचा मनुष्य आणि बाइ दिसत होते. मी दरवाज्याजवळ पोहचलो तर तिथला चपराशी माझ्यावर खेकसला ‘आजका कोटा खतम अब कल आना’ . मी वळलो तितक्यात एक हात माझ्या खांद्यावर पडला. मी मागे वळून बघितले तर तो मघाचा मनुष्य होता. त्याने शांतपणे माझ्या टी शर्टचे पेन काढले, एका कागदावर चालवून बघितले. मला थँक्यू म्हणून तो निघून गेला. मी ऑफिसमधे बघितले तर तो क्लर्क मोडक पेन हातात घेउन त्या रजिस्टरवर सही करायची वाट बघत होता.”
“अच्छा त्या तनू वेडस मनू सारख?”
“येक्झाटली. घड्याळात पाच वाजायला अजूनही तीन मिनिटे बाकी होती. सही करायला तितकी पुरेशी होती. मी नंतर कुठेही न बघता थेट घरी आलो. आता सांग या साऱ्यातून तू काय निष्कर्ष काढला?”
“यात काय अस निष्कर्ष काढण्यासारख?”
“हाच तर फरक आहे तुझ्यात नि माझ्यात. अरे याचा अर्थ हा की तो मनुष्य बाइंचा ना वकील होता, ना सीए होता तर तो बाइंचा प्रियकर होता.”
“हे तुला आता समजले. ”
“मी खात्रीने सांगतो. तो कागद त्या बाइंजवळच आहे. कुठलीही हुषार स्त्री महत्वाचा कागद वकीलाला किंवा सीएला देउ शकते परंतु नवऱ्याला किंवा प्रियकराला कधीच नाही.”
“हे मात्र मान्य करावेच लागेल. मग तू आता तो कागद कसा शोधनार?”
“मी शोधनार नाही, बाइ मला तो कागद दाखवतील.”
“वाट बघ.”
“माझा प्लॅन तर ऐक.”
अस म्हणून त्याने मला त्याचा संपूर्ण प्लॅन ऐकविला. अगदी फडतूस प्लॅन होता. उगाचच मार खाण्याचे धंदे या पलीकडे त्या प्लॅमधून फारस निष्पन्न होनार नाही याची मला खात्री होती. पाचशे पानाच दा व्हिंची कोड वाचल म्हणून आपण जगातला कुठलाही कोड क्रॅक करु शकतो असेच याला वाटते.

दुसरे दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी नऊ वाजता मी लॉजजवळ पोहचलो. संपूर्ण प्लॅनमधे ढेरपोटला भरपूर मार खायचा असल्याने मला उत्साह होता. काही टारगट पोर जीन्स टी शर्ट घालून, पानटपरीवर उभे राहून खोलीतल्या पोरींशी दृकसंवाद साधत होते. बाइ बाहेर आल्या, रिक्षा बाहेर उभीच होती. बाइ रिक्षात बसल्या तशी समोरुन दोन पोर बाइकवर आली, रिक्षातून बाइंची पर्स उचलून वेगात पळाली. रिक्षेवाल्यांने मग जोरात रिक्षा वळविला. रिक्षा आता वेगात त्यांचा पाठलाग करनार तसा कुणीतरी रिक्षाला आडवा आला. रिक्षेवाल्याने कचकन ब्रेक मारला तरीही तो व्यक्ती ‘अग आइ ग मेलो’ असा ओरडला.
“अंधा है क्या? येवढी मोठी रिक्षा दिसत नाही का?” अस म्हणत त्या रिक्षेवाल्याने त्या झोपलेल्या माणसाच्या कंबरड्यात एक लाथ हाणली.
“काय झाले कोण आहे?” बाइ आता बाहेर आल्या होत्या.
“कोणी हमाल दिसतो.”
“नाही हा चांगला ढेरपोट्या दिसतो”
“मिठाइच्या दुकानात असेल.”
तितक्यात मघाची मुल हातात पर्स घेउन परत आली, ठरल्याप्रमाणे मी सुद्धा त्यांच्यात सामील झालो.
“रिक्षावाल्याने ठोकला बघा गरीबाला.” मी आग लावली.
“ए रिक्षा चालवतो का फेरारी? मारला ना त्याला. चल आता पोलीसात.”
“मला नका बोलू. बाइंनी मला वेगात घ्यायला सांगितले.”
“ओ बाइ तुमच्या पर्ससाठी गरीबाचा जीव घेता का?” खाली चाललेला आवाज गोंधळ ऐकून सारे सृष्टीसौंदर्य लॉजच्या प्रत्येक खिडकीत जमा झाले होते. ते बघताच टारगट पोरांना आणखीन चेव आला. प्रत्येक वाक्याला वर बघत होते.
“मेला का?”
“अजून नाही पण त्याच मार्गावर आहे.”
“चपलेचा मार देउन बघ शुद्धीवर येतो का ते?”
मग कुणी चप्पल नाकाजवळ नेली, कुणी बडवून बघितली. पण काही परिणाम झाला नाही.
“त्याला दवाखान्यात न्या आता”
“अॅम्बुलंस बोलवा.”
“तिथपर्यंत टिकनार नाही. काहीतरी प्रथमोपचार केले पाहीजेत.” मी अजून आग लावली.
“ए तुझ्याकडे First Aid Kit आहे का?”
“नाही.”
“लॉजमधे असेल ना. हलवा याला लॉजमधे.”
“सरळ बाइंच्या खोलीतच हलवा. थोडी एसीची हवा खाउ द्या बर वाटेल त्याला.”
“नाही नाही, माझ्या रुममधे कशाला? ओळख ना पाळख”
“ओ बाइ दहा मिनिटे तुमच्या सोफ्यावर पडल्याने सोफा झिजनार आहे का? एसी गरम हवा फेकनार आहे? मेला तर पोलीस केस होइल.”

बाइ काही म्हणायच्या आत आम्ही साऱ्यांनी उचलून त्याला लॉजमधे नेला. बाइंच्या सोफ्यावर नेउन झोपवला. काय झाल म्हणून बघायला सार सृष्टीसौंदर्य आता खाली जमा झाल होत. मी लॉजमधली First Aid Kit घेउन मलमपट्टी केली. एसी लावायला सांगितला. त्याला काही काळ आराम करु द्या असे बजावले. बाइ आत गेल्या. सृष्टीसौंदर्य तिथेच घुटमळत होत म्हणून टारगट पोरही रिसेप्शन जवळच उभी होती. थोडी गर्दीच झाली होती. मीही गर्दीत सामील झालो. ठरल्याप्रमाणे ढेरपोटला इशारा करुन मी फायर अलार्मची बटन दाबली. हल्ली हे बर असत आग लागली असे सांगायला नुसती फायर अलार्मची बटन दाबायची असते. आग, आग असे ओरडत मी, सृष्टीसौदर्य, टारगट पोर, लॉजचे कर्मचारी सारे लॉजच्या बाहेर आलो. काही वेळाने आमचा ढेरपोट्या सुद्धा बाहेर आला. आम्ही दोघेही चालतच बकरी गल्ली पर्यंत आलो. ढेरपोट्या खुशीत होता.
“डॉक्टर काम फत्ते.”
“मिळाल पत्र?”
“नाही पण पत्र कुठे आहे याचा सुगावा लागला.”
“कुठे आहे पत्र?”
“सोफ्यात.”
“सोफ्यात, कशावरुन?”
“कुठल्याही संकटात मनुष्य आधी त्याची मूल्यवाण वस्तू जपून ठेवतो बरोबर?”
“बरोबर”
“उदाहरण द्यायचे झाले तर कुठलाही पुरुष आग लागल्यावर काय शोधेल?”
“वॉलेट नाहीतर एटीएम कार्ड”
“करेक्ट, आणि स्त्री?”
“मोबाइल किंवा पर्स”
“येक्झाटली. फायर अलार्म वाजला, आग आग करीत तुम्ही सारे बाहेर पळाला. बाइ सुद्धा धावतच बाहेर आल्या गाउन मधेच. वाह काय रुप होते. हॉलमधे येउन बाइंनी ना मोबाइल शोधला ना पर्स. बाइ सरळ माझ्याजवळ येउन उभ्या राहिल्या. मला तिथे बघताच मग बाहेर गेल्या. बाहेर पडतपर्यंत त्यांची नजर सोफ्यावरच होती. आग लागल्यावर गाउन मधे बाहेर येउन माझ्याजवळ उभे राहावे इतका मी मूल्यवाण नक्कीच नाही.”
“यात काही वाद नाही”
“याचा अर्थ एकच मोबाइल किंवा पर्सपेक्षाही मूल्यवाण असे काहीतरी बाइ शोधत होत्या. जे सोफ्यात होते. ती मूल्यवाण वस्तू म्हणजे ते पत्र.”
“काहीपण मोबाइल फोन सोफ्यावर नसेल कशावरुन? तुझ्या या ढेरीच्या खाली मोबाइल आला तर तुला कळेल तरी काय? त्याचा रिंगटोन सुद्धा व्हायब्रेटर मोड मधे असल्यासारखा वाजेल.”
“No Doctor, She was looking for that letter only.”
तितक्यात एका रिक्षातून एक टारगट पोरगा ‘ए ढेरपोट्या’ असा आवाज देउन निघून गेला. आम्ही दोघेही त्या रिक्षाच्या धुराळ्याकडे बघत तिथेच उभे होतो.

दुसरे दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत मी बकरी गल्लीतल्या ऑफिसमधे पोहचलो. माझ्या मागेच तो भोरनळीच्या संस्थानवाला सुद्धा आला. आल्या आल्या त्याने ढेरपोटला विचारले.
“ते पत्र बघायला मी उतावीळ झालोय मि गोम्स.”
“बस जरा धीर धरा, तुमच्या सुखाची किल्ली थोड्याच वेळात तुमच्या हातात असेल.”
“सरळ सांग ना. पत्र मिळाले नाही फक्त कुठे आहे याचा पत्ता लागला.”
“मग चला उशीर कशाला?”
“आसपास टॅक्सी दिसत नाही.” ढेरपोट मोबाइल मधे गढून सांगत होता. जसा काही खरच टॅक्सी शोधत होता.
“टॅक्सी कशाला माझी गाडी आहे.”
आम्ही सारे संस्थानाच्या गाडीत बसून लॉजवर आलो. लॉजवर पोहचताच ढेरपोटने रिसेप्शनला स्वतःची ओळख दिली.
“मी गोम्स, मी मघाशी फोन केला होता.”
“ए फोन आला होता कारे कुणाचा.”
“नाही”
“कोणचाच फोन नाही आला.”
“मीच फोन केला होता. मला त्या इरावतीबाइंना भेटायचे होते.”
“त्या बाइ लॉज सोडून गेल्या.”
“अशा कशा जाउ शकतात.”
“गाडीने गेल्या, पस्तीस सीटर बस होती.”
“नक्की गेल्या.”
“बघा तिकडे. सार सामान विस्कटून गेल्या. तीन महीण्याची सोय केली होती महीण्याभरातच पळाल्या.”
ढेरपोट हे ऐकायला थांबलाच नाही तो थेट बाइंच्या खोलीतील सोफ्याजवळ गेला. त्याने सोफ्यात इकडे तिकडे शोध घेतला, त्याला त्यात एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी मग मी मोठ्याने वाचली.

‘ए ढेरपोट्या स्वतःला जास्त हुषार समजतो का रे. अरे आम्ही कलाकार माणस आपली कला दाखवतो. हा तुझा अशील आम्हाला काय समजतो. माझ्या आयुष्याच वाटोळ करायला निघाला होता. हा कसला राजा? कंगाल आहे. स्वतःची कंगाली दूर करायला दूरच्या संस्थानातल्या साठीतल्या म्हातारीशी लग्न लावतोय. त्याला पैसाही हवा आहे आणि …. जाउ दे. तो खुळा नाही ढेरपोट्या तू खुळा आहेस. विवाह नोंदणी कार्यालयातच मी तुला ओळखले. त्यानंतर मी तुझ्यावर नजर ठेवून होते. तुझा प्लॅन माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तुला काय वाटले तू त्या ऑटोखाली आला तेंव्हा मी तुला ओळखले नाही. अरे मी ओळख पण दिली ‘ढेरपोट्या’ अशी. तू आपल्याच मस्तीत होता. मी तुझ्या ऑफिसमधे येउन तुला ‘ढेरपोट्या’ असा आवाज देउन गेली. पण इशारा समजशील तर तू ढेरपोट्या कसला. अरे महामूर्खा इतका महत्वाचा कागद लॉजच्या सोफ्यात ठेवायला मी येडी का खुळी. तो कागद माझ्याजवळ आहे आणि माझ्याचजवळ राहील माझ्या सेफ्टीसाठी. सांग तुझ्या त्या अशीलाला.’

त्यानंतर त्या भोरनळीच्या राजात आणि ढेरपोटमधे काय झाले असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. ढेरपोट मात्र अजूनही विचार करतोय त्याचा सारा प्लॅन बाइंना समजलाच कसा. खर म्हणजे तेही फार मोठे रहस्य आहे. ते रहस्य फक्त दोनच व्यक्तींना माहीती आहे एक त्या बाइ आणि दुसरा..
मला तमाशा बघायला जायचे आहे बाइंनी पास पाठवलाय. आसपास कुठेही तमाशा असला की बाइ मला हमखास पास पाठवतात.

gomes

(चित्रे: ज्योति कामत)

(रहस्य कथांच्या महान लेखक आर्थर कॅनन डायल याला साष्टांग दंडवत. शंभराच्या वर वर्षे झाली पण त्याच्या रहस्य कथा नव्या पिढीलाही वाचावयाशा वाटतात. कित्येक डिटेक्टीव्ह आले नि गेले पण मनातली शेरलॉक होम्सची प्रतिमा मात्र पुसल्या जात नाही. )

पुर्वप्रकाशित मिसळपाव दिवाळी अंक

दंगल: असा का पिक्चर रायते भाऊ?

लय आयकून होतो दंगल दंगल. टिवी लावा के तेच चालू रायते हानिकारक बापू नाहीतर धाकड. जो तो सांगत होता लइ मस्त पिक्चर हाय. तवा म्हटल आपण बी दंगल पाहाले जाच. कापसाचा चुकारा उचलला आन बंद्या फॅमिलेले पिक्चर पाहाले घेउन गेलो, ते बी साध्यासुध्या टॉकीजमधे नाही तर नागपुरातल्या मॉलमंधी. असा पचतावा झाला ना. तुमाले सांगतो राजेहो लइ म्हणजे लइच भंगार पिक्चर हाय. असा का पिक्चर रायते भाऊ? लइ बेक्कार पिक्चर हाय. मी तुमाले येकयेक मुद्दा बराबर समजावून सांगतो.

लवस्टोरी
आता मले सांगा पिक्चरमंधी कमीत कमी येकतरी लवस्टोरी पायजेन का नाही. लवस्टोरी बिना पिक्चर रायते का कधी? येथ कोण स्टोरी लिवली का पण बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरीच नाही. लवस्टोरी नसन तर पिक्चरमंधी हीरोइनी घ्यायच्याच कायले म्हणतो मी. त्यायले कामच का रायते जी या बगीच्यातून त्या बगीच्यात मस्त झकपक कपडे घालून हिंडाच, गाण म्हणाच, नाचाच. हिरोनबी मंग तिच्या मांग मांग फिरत गाण म्हणाच, नाचाच. तवा कुठ पिक्चर पायल्यावाणी वाटते पण यायन बंद्या पिक्चरमंधी लवस्टोरी काय बगीच्या बी नाही दाखवला. अस रायते का जी कधी? कोणी म्हणे ते कान कोण्या का पहेलवाणाची खरी स्टोरी हाय. खरी स्टोरीच दाखवाची होती तर तीन घंट्याचा पिक्चर कायले बनवाचा पंधरा मिनिटाच्या बातम्यात बी काम भागले असते ना. स्टोरी लिहनाऱ्याले पैसे द्याच जीवावर आल असन म्हणून खरीच स्टोरी घेतली. स्वस्तात निपटाले पायते लेकाचे पण तिकिट मात्र काही कमी करत नाही. बर जाउ द्या खरी स्टोरी तर खरी स्टोरी पण खऱ्या स्टोरीत लवस्टोरी राहात नाही अस काही कायदा हाय का? धोनी मंदी दोन दोन लवस्टोऱ्या होत्या, तो जिंदा है वाला कणचा पिक्चर होता त्याच्यात बी दोन लवस्टोऱ्या होत्या. येथच का घोड मेल होत. तो अमीर खान जवा जवान होता तवा त्यान त्या बहू( सिरेलमधली बहू. तेथ बी कंजूषी हीरोइन घ्याची सोडून सिरेलवालीच घेतली) सोबत लव केला असलच ना. एखांद मस्तपैकी गाणगिन टाकल असत, अस इहीरीवर, वावरात दोघ फिरली असती पायनाऱ्यालेबी बर वाटल असत. यायन लवगिव करन देल्ल सोडून आन शिद्दया चार पोरी झाल्या तेच दाखवल. अस रायते का जी कधी? पोर नाही झाले तरी चालते पण लवतर दाखवाच लागते न जी. मले तरी वाटत त्या डायरेक्टरले लवच अजीर्ण असन म्हणूनच त्यान लवस्टोऱी कट केली.

फायटा
आपण मोठ्या भाउचे पिक्चर पायले, मंग मिथुन दादाचे पायले, आता सल्लू भाइचे पायतो काहून. सांगा काहून, बराबर फायटा. पिक्चरमंधी कमीत कमी चार फायटा तरी पायजेन का नाही. मले समजल का पहेलवाणाचा पिक्चर हाय तवा म्हटल मस्त फायटा असन. कायच का तो पहलवाण नुसता कुस्त्याच खेळतो. कुस्त्या पाहाले आम्ही आखाड्यात जाउ, टाकीजमधी कायले येउ जी. कुस्ती पायताना मले तर समजतच नव्हत आपण पिक्चर पाहून रायलोय का टिव्ही पाहून रायलो ते. कोणी म्हणे खरच कुस्त्या खेळल्या म्हणून, मले नाही वाटत बातम्या घेउन काहीतरी कॅमेऱ्य़ाची करामत केली होय. अशा खऱ्याखुऱ्या कुस्त्या रायते का कधी?

तो पहलवाण तर मले पहलवाण वाटलाच नाही. येवढा पहलवाण गडी त्याले गाववाले काही काही नाव ठेवते आन हा चुपचाप आयकून घेतो. अस रायते का कधी? पहलवाण हाय ना मंग दाखव न पहलवाणकी. एखांदी हवेत उडून फाइट माराची, दोन चार दुकान तोडाची, हातगाड्या उडवाच्या. हा बुवा थेंबभर रगत सांडवत नाही. याची सारी पहलवाणकी घरातल्या पोरीवर, सकाळी उठा धावाले जा, सकाळी उठा पोहाले जा, सकाळी उठा दंडबैठका मारा. त्यायच्यावर पहारा ठेवाले स्वतः त्यायच्या मांग मांग स्कुटर घेउन हिंडतो. पहलवाण गडी तवा बुलेटवरुन हिंडाव का नाही हा गडी कालेजातल्या प्रोफेसरासारखा स्कुटरवर हिंडतो. नाहीच काही तर एमएटी घ्याची. हेल्मेट घालून स्कुटर चालवनारा माणूस कधी पहलवाण रायते का जी. असा लुलुपुच्या पहलवाण रायला तर स्वतःच्याच पोरीच्या हातचा मार खाणार नाहीतर का. त्याले जवा त्याच्या पोरीन पटकनी देल्लीना तवा मले लइ आनंद झाला. म्हटल याले असच पायजेन जेथ पहलवाणकी दाखवाची तेथ नाही दाखवली आता भोग लेका.

हीरोइनी
पिक्चरमधल्या हीरोइनी म्हणजे कशा? आहा. त्यायचे ड्रेस, त्यायच्या साड्या, त्यायच्या अदा, त्यायच नाचन, त्यायचे केस, त्यायन झटका देल्ला का पदर कसा हवेत उडतो, केस हवेत उडतात. पायनाऱ्याले कस पैसा वसूल. हिमालयात थंडीत बी शुटींग असन ना तर तेथ बी पंखा लावून पदर आणि केस उडवते म्हणते. याले म्हणते पिक्चर पायनाऱ्याच्या पैशाची कदर करने. येथ हा बुवा लहानपणीच पोरीले हाफपँट घालाले लावतो, साड्या सलवार अस काही घालू देत नाही. त्यायचे केस कापून टाकतो. अशा रडते ना पोरी तवा, तुमाले सांगतो लइ बेक्कार वाटल राजेहो. मायाच्यान तर ते पायनच झाल नाही वाटल अस उठाव आन त्या पहलवाणाले तेथच झोडून काढाव. आर माणूस हाय का हैवान. अशा हैवानाले खोलीत कोंडून ठेवला ना ते बरच केल अशायले असच पायजे.

गाणे
पिक्चर म्हटल का गाणे आलेच. एखाद आयटम साँग, लग्नाच गाण, लवच गाण, सॅड गाण हे बंद आलच पायजे. त्याच काय आहे आपल्या येथ सणवार रायते, लगीनसराई रायते त्याले गाण लागते ना. चांगल लग्नाच गाण चालू रायते तेथ हा पहलवाण जाउन टपकतो आन गाण बंद करुन येतो. अमदाच्या लगीनसराइत कोणत गाण वाजवाच ‘दंगल दंगल’ का ‘हानिकारक बापू’. कस वाटन जी ते? नवरा बायकोच्या गळ्यात हार टाकतोय आन इकड गाण वाजतय ‘दंगल दंगल’. पोरगी सासरी चालली, बापाजवळ येउन उभी रायली, रडून रायली. तेथ का आता ते ‘बापू तू तो हानिकारक है’ अस गाण वाजवाच. दरवर्षी लगीनसराइले नव गाण द्याच हे पिक्चरवाल्यायची जिम्मेवारी हाय. यायन गाणे नाही दिले तर त्या बँडवाल्यायन कोणाकड पाहाच? त्यायन का वाजवाच? त्यायच्या पोटावर लाथ काहून माराची म्हणतो मी.

तो पिक्चर पायल्यापासून आमच्या घरचा तर तालच बिघडला. आमच्या बायकोच डोस्कच फिरल. पिक्चर पायला तवापासून तिच्या मनात पक्क भरल आमची पोरगी पहलवाणच हाय म्हणून. मी म्हटल
“कशावरुन म्हणते तू?”
“तुमाले आठवत नाही लहाणपणी घोडा घोडा खेळताना पोरगी कस तुमाले लोळवत होती”
“अव ते मले लोळवत नव्हती म्या असाच पडत होतो.”
“तुमाले पोरीच कवतुकच नाही. तुमी पायजा येक दिवस कोणीतरी पोरगा येइन आन सांगन का आपल्या पोरीन त्याले धुतला, चांगला झोडून काढला. माये डोये त्याच दिवसाची वाट पाहून रायले.”
म्या तिच्याकड पायत रायतो. ते कोण्या पोराले खरचटल बी दिसल ना तर हे हातची बोरींग हापसाची सोडून त्याले जाउन इचारते
“का र कोण मारल?”

लिहनार
जानराव जगदाळे
ता हिंगणघाट, जि. वर्धा.

आमचे मित्र मिसळपाववरील संदीप डांगे यांनी याचे वाचन इथे केले.

यांचेकडून प्रेरणा घेउन आम्ही पण केलेल प्रयत्न

नूतन वर्षाभिनंदन (२०१७)

newyearचला २०१६ संपलेय आणि २०१७ येतेय. सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या नवीन वर्षात तुम्च्या साऱ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत. काहीतरी चांगले वाचायला मिळेल, विनोदी आवडनाऱ्याला विनोदी वाचायला मिळेल, गंभीर वाचनाऱ्यांना गंभीर वाचायला मिळेल, काव्यप्रेमींना उत्तम कविता वाचायला मिळतील, उत्तमोत्तम कथा लिहील्या जातील आणि वाचल्या जातील. असे हे नवीन वर्ष सर्वांसाठीच वाचनीय आणि लेखनीय जावो हीच सदिच्छा. बाकी आपले आहेच नेहमीचे आहेच, लग्नाळू मुलांचे (हल्ली मुलांचेच लग्न जमत नाही) लग्न जमावे, नोकरी शोधनाऱ्याला नोकरी मिळावी, कॉलेजात सुंदर फ्रेशर यावी आणि तिने तुम्हालाच तिचा वर्ग विचारावा, मुलींना सहजच अचानक कुणीतरी भेटावा आणि तो मोठा व्यक्ती निघावा. (धोनी बघितला की नाही?) ज्याला जे जे हवे ते ते मिळो हीच सदिच्छा.

तसे बघायला गेले तर नवीन वर्ष म्हणजे नक्की काय, घड्याळातला बाराचा टोला. आता २०१६ जाउन २०१७ होनार म्हणून काही तो वेगळा वाजत नाही. नवीन वर्ष म्हणून बायको चिडायची थांबत नाही, नवीन वर्ष म्हणून बॉस बोंबलायचा थांबत नाही, नवीन वर्ष म्हणून ट्रॅफिक कमी होत नाही, नवीन वर्ष म्हणून प्रदूषण थांबत नाही, नवीन वर्ष म्हणून बकवास सिनेमा बघितला नाही असेही होत नाही. बदलत काहीच नाही तरीही काहीतरी बदलनार, काहीतरी वेगळे घडनार हा आशावाद फार मोठा असतो. आजच्या पेक्षा उद्या चांगला असेल हा आशावादच जगायची गुरुकिल्ली आहे. या आशावादाचाच जल्लोष म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष. तो तेवढाच मोठा असायला हवा जेवढा आशावाद मोठा असेल. जोषात आणि जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करु या.

मित्रहो ब्लॉगने २०१६ मधे चांगलेच बाळसे धरले. नवनवीन वाचकांपर्यंत लिखाण पोहचले. १२ पोस्ट आणि जवळ जवळ १२ हजार वेळा ब्लॉग बघण्यात आला. धन्यवाद. कित्येकांनी त्यांना लेख आवडल्याचे कळविले. २०१७ मधेही लिखाण तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाइकांपर्यंत पोहचू द्या. इंटरनेटवरील लिखाणाचा मूळ उद्देषच हा आहे की कसलाही आडपडदा न ठेवता, कुणेही मधे मध्यस्थी न ठेवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचने, वाचक आणि लेखकाचा थेट संवाद. तेंव्हा वाचकांनो तुम्ही सुद्धा आवडले नाही आवडले तशी प्रतिक्रीया द्या, इमेल करुन कळवा पण संपर्कात रहा, वाचत रहा. इमेलने ब्लॉग फॉलो करा फक्त काही नवीने लिहिले तरच मेल येइल म्हणजे नवीन लिखाण सुटनार नाही. वाचनारा वाचकच लेखकाला नवीन लेखणाची उर्मी देतो.

आज सहजच ड्रॉपबॉक्समधे बघितले तर जाणवले की कितीतरी लिखाण अपूर्ण पडले आहेत. जंग्या तसाच आहे अर्धवट, स्ट्रगलर्सची नवीन गोष्ट लिहायला सुरवात केली सोडून दिली, दोन वऱ्हाडी कथाही अपूर्णच आहे, परत वरातचा तिसरा भाग ९५ टक्के लिहून तयार आहे पण पुढे थांबला, मित्रहो लिहायला लागायच्या आधीपासून लिहायला घेतलेल्या दोन कादंबऱ्या तशाच २०० पाने लिहून पडल्या आहेत पूर्ण करायची ताकत होत नाही. हे असे अपूर्ण का? कलात्मक भाषेत सांगायचे झाले तर कलेची निर्मिती ही एक क्लिष्ट प्रक्रीया आहे, तुमच्या आजूबाजूंच्या घटनांचा त्यावर सतत परिणाम होत असतो. कधी अचानक समुद्राला भरती यावी तशी प्रतिभा उफाळून येते तर कधी दुनियेचे दुःख पोटात पचवनाऱ्या हिमालाय सारखी शांत असते पण कळत न कळत त्यातून गंगा झिरपत असते, एक प्रवाह सतत सुरु असतो. वगेरे, वगेरे. काही कळले नसेल तर सोडून द्या ते न कळावे म्हणूनच लिहिले माझ्यासाठी एकच कारण आहे आळस, फारच झाले तर सुचत नाही हो. या नवीन वर्षात या अपूर्णतेला पूर्णत्वाचा आकार देइल असा नवीन वर्षाचा संकल्प सोडतो. संकल्प पूर्णत्वास नेउ शकेल अशी आशा धरतो.

२०१६ तले मला आवडलेले

आोबामा आला रे 

तिचे न येणे

परत वरात

एम एच बारा आणि मी 

नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!!!

२०१७ हे आनंदाचे सुखाचे समाधानाचे आणि उत्तम वाचनाचे जावो हीच सदिच्छा !!