करफू

ही कथा साधारण २०४७ साली महाराष्ट्रातील एका खेड्यात घडते.

पायटं पायटं रत्नाबाईचा कोंबडा आरवला, आता का कोंबडं आरवते, बंदे गेले पोल्ट्री फार्मात, रत्नाबाईच्या मोबईलचा आलाराम वाजला.  तवापासून मन्याच्या डोळ्याला डोळा नाही. त्याले रत्नाबाईचा लय राग आलता. घरात नळ हाय, नळाले पाणी येते तरीबी हे बाई आलराम लावून पायटं उठते आन बोरींगवर पाणी हापसाले जाते. तो मनात शिव्या देत होता ‘बोरींग हापसल्याबिगर हिले उतरत नाही का? झोपेच खोबरं केल माया?’ शेवटी कंटाळून मन्या आंथरुणातून उठला हातपाय धुतले आन वावराकडं जाले निंगाला. समोरच्या आवारात रव्याचा आजा तोंडात कडूलिंबाची काडी टाकून ट्रॅक्टरच्या टायरावर बसला व्हता. तो दिवसभर तेथेच बसला रायते.  मंजन गेले, पावडर गेली आता पेस्ट आन ब्रश आले पण बुढा कडूलिंबाची काडी काही सोडत नाही. मन्या घराभायेर पडला अन त्यान काही इचारल नाही अस होतच नाही.

“का सरपंच कोठ चालले सकायी?”

“खारीत जाऊन येतो. हळदीले पाणी द्याच हाय ना तवा मशीन चालू करुन देतो”

यायच बोलणं आयकून रव्या भायेर येत बोलला “का बे मन्या आज ड्युटीवर नाही जात का?”

“जातो नं बे. पाणी देल का झालं.”

“तुले तर म्हटलं व्हत रोबो घेऊन टाकं मंग कायले वावरात जा लागते.”

“ते का परवडते बे. अंतर हायेच किती असं?”

अस म्हणत मन्या वावराकडं निंगालाच व्हता का सुलुची अंजी ‘मन्या काका, मन्या काका’ करत धावत आली.

“काव अंजे डायनसोर मांग लागल्यावाणी कायले बोंबलून रायली?”

“मम्मीले तुम्हाले निरोप द्याचा व्हता म्हणून थांबून ठेवा म्हणे.” अंजीची मांग तिची माय डोलत डोलत आली. ते सुपरमार्केटात कामाले हाय तवा ड्युटीवर जाच्या कपड्यात होती.

“कावं वहिनी का झालं ड्युटीवर नाही गेली अजून?”

“भाऊजी निंगालीच व्हती तर सरकारचा मेसेज आला हिंगणघाटात करफू लागला म्हणे.”

“आं करफू?”

“कसा का? आता कोणता पुतळा फोडला आणखीन?” बुढ्याने मधीच डायलाग टाकला.

“आबे बुढ्या आजकाल असा पुतळा फोडता येत नाही लय शिक्युरीटी रायते”

“येवढी शिक्युरीटी हाय तर करफ्यू लागला कसा?”

“कोण काहीतरी पोस्ट टाकली असनं”

“ह्याट पोस्ट टाकली दिल्लीत आन आग लागली गल्लीत त्याला काय अर्थ हाय”

“नाही ना भाऊ. आजकाल तशी पोस्ट टाकूच देत नाही, एआय अशी काही पोस्ट दिसली का उडवून टाकते.”

“मंग करफू लागला काहून?” बुढा काही आपला पॉइंट सोडत नव्हता.

“म्या काय पोलीसात हाय.”

“मन्याकाका करफू म्हणजे काय”

“जो कोणी हातात सापडनं त्याले पायजेन तसा ठोकाची पोलीसाले दिलेली परमिसन म्हणजे करफू”

“हे या बुढ्याचं गणित. काही शिकवते का बे पोरीले.  तसं हाय बराबर पण.. अंजे करफू म्हणजे संचारबंदी.” अंजीने समजल्याची मान हालवली. “अंजे अज्या काकाले जाऊ सांग दुधाची गाडी घेऊन जाऊ नका म्हणजा करफू लागला हाय. दुधाच दही, पनीर का कराच ते करुन टाका.”

“तो कायचा जातो तो इकडच येऊन रायला” अज्या येताना पाहून सुलुन टिपणी केली.

“वहीनी मेसेज चेक केला ना सरकारचाच हाय”

“पहले खरं का खोटं तेच चेक केल भाऊजी”

“सरकारी मेसेजच काही खरं नाही अर्ध्या लोकायले पोहचते अर्ध्यायले नाही. वहिनी तू बायाच्या ग्रुपमधी मेसेज टाक आज कोठ जाऊ नका. ड्युट्या, सारा सारं बंद. रव्या तू आपल्या ग्रुपमंधी टाक. हिंगणघाटात जाऊ नका, निंगाले असान उलट्या पावली परत या. पोलीसाशी हुज्जत घालू नका म्हणा हे शीआरपी रायते ते ढुंगणावर पट्टा मारुन सोलून काढते.”

आता गावात परत्येकापरतर बातमी पोहचली व्हती. साऱ्यायने आपले मेसेज वाचले होते, आय़कले होते तवा आज कामावर जाच नाही हाय म्हणून हडूहडू सारा गाव जमायला लागला होता. कोणी ट्रॅक्टरच्या टायरावर बसले व्हते तर कोणी दगडावर बसली व्हती, कोणी झाडाच्या वट्यावर बसले व्हते, कोणी बेंचावर बसली व्हते. सारा नाही म्हणताच पोर खूष सारी पोरं जमली

“करफू म्हणजी का बे?”

“साराबंदी”

“साराबंदी नाही भयताडा, संचारबंदी” अंजी आताच आयकून आली व्हती.

“येकच हाय ते. संचारबंदी असन तर सारा चालू राहीन का? शिकवू रायली मोठी”

“आस हवेत उडू नका उद्यापासून ऑनलाइन सारा सुरु करतीन. मांग पाणी भरल व्हत तवा तेच तर केलतं.”

“या ऑनलाइन सारेचा शोध लावला कोण? तुया न्यूटन का आइनस्टाइन बे?”

“का तू त्याच्या घरावर जाऊन गोटमार करणार हाय”

“माया हातात असतं तर नोटिस काढली असती ऑनलाइन सारा बंद”

पोरायच्या बाता अशा रंगल्या होत्या तर मोठे बी काही मांग नव्हते. रव्या, अज्या, पव्या, अन्या, मन्या, गणपत, रघू, सुलु, सुमन, चंदी, मंदी बंदे जमले व्हते. साऱ्यायच्या बोलण्याचा इषय येकच व्हता करफू. रव्याचा आजा सांगत होता

“ह्या आजकालच्या करप्यूत काही दम नाही घे, करप्यू व्हते आमच्या जमान्यात”

“का तुया जमान्यात करफूत बंदूका उडवत व्हते”

“काकाजी किती करप्यू पायले जी तुम्ही.” छाती कढून बुढ्यानं तीन बोटं दाखवले.

“ए बुढ्या तसाच थांब.”  अन्यान लागलीच मोबाईल काढला फोटो घेतला. तीन करप्यू पायलेला गडी #trending, #करफू

“थे ट्रेडींग सोबत हॅशटॅग युनीक पण लावजो आजकाल युनीक ट्रेंडींग लागत गड्या. निसतं ट्रेंडींग असून भागत नाही.”

“पहला करफू रौंदळ्याचा, नदी वलांडली का रौंदळा, आता गाव काही उरलं नाही. त्या जमान्यात मोबाईल, फोन काही नव्हतं, तवा का मालूम पडते. म्या ढोर चाराले नदीवर गेलतो तर ह्यो पोलीसाच्या गाड्या, बंदूका खांद्यावर ठेवून, छातीले जारी लावून पोलीस उभं होतं. म्या इचारल का झाल जी तर मले म्हणे कर्प्यू है इधर मत आणा. ते साधं पोलीस नव्हतं शीआरपी व्हतं. तेवढ्यात मायी बकरी घुसली करफ्यूमंधी आता तिले का समजते करफू ना बरफू. तिले का लिहता वाचता येते”

“मंग काय शीआरपीवाल्यायच्या मटनाची सोय झाली का?”

“नाही गा त्यायनं पकडून आणून देल्ली. तवा रौंदळ्याच्या भायेर पारध्यायची वस्ती व्हती त्यायची आन गाववाल्यायची काहीतरी बाचाबाची झाली तर गाववाल्यायन वस्तीच पेटवून दिली. मंग त्यायन बी गोटमारं केली. आता पोलीस का करन लावला करफू. काहीतरी कारण असल्याबिगर करफ्यू लावत नाही. काहो सरपंच?” बुढा बारीक डोये करुन मन्याकडे पाहत व्हता. 

“आता कुठे वस्त्या राहिल्या. पारध्याची पोरं बी शिकून शयरात गेले.”

“आता गावच कुठे उरला.”

“हो राज्या पहिलेवाणी वखराले आन नांगराले माणसं आन बैल लागले असते तर का केल असतं. येथ  तर पोळ्याले बैल भेटत नाही भाड्याने आणा लागते. निसते हार्वेस्टर आन ट्रॅक्टर आले.”

“हे आसं मशीनच अन्न खाता मंग पोटं दुखल म्हणून बोबंलता. पहिलेचा जमानाच राहिला नाही.”

“का तवा का न शिजवताच खात होता? काही झालं का पहिलेचा जमाना राहिला नाही आता. इचीबहीण तुया आजाच काय तुया आजाच्या आजाबी तेच म्हणत असनं.” मन्या भडकला व्हता

“जाऊ द्ये बे का बुढ्याच्या मांग लागत तू. त्याचा पॉइंट बराबर हाय, करफू लागाले काहीतर कारण पायजे तवा आताचा करफू कॉहून लागला असनं. आता ना वस्त्या रायल्या ना तंटे रायले, पुतळ्याचं म्हणशीन तर माणसाले राहत नाही येवढी शिक्युरीटी पुतळ्याले रायते. का रायते रे ते वायझेड का एक्स का म्हणते?”

“झेड”

“तवा कोण जाइन तेथं मराले. काहीतरी मोठं लफडं असलं पायजे भाऊ”

“कणची बीमारी गिमारी आली असनं माया जन्माच्या टायमाले करोना आलता ना तवा असाच करफ्यू लागला व्हता म्हणे.” आतापावतर गपचुप आयकनारा संदीपन तोंड उघडलं

“पॉइंट हाय. बिमारी येऊ शकते. कणचातरी व्हायरल असनं.”

“व्हायरल नाही ना बे व्हायरस असते ते.”

“मांग कांपुटरमंधी धसलं व्हतं ते. टोलनाक्यावर लय लंबी लाइन व्हती.”

“ते कांपुटरवाला व्हायरस नाही न बे, हे माणसाच्या बॉडीत धसते तो व्हायरस”

“लय बेकार टाइम व्हता. काही समजे नाही. तो करोना कुठुन ये आन कोठ धसे याचा अजूनपर्यंत पत्ता लागला नाही. कितीका कमिट्या बशिवल्या.”

“त्याच काही समजे नाही. आठवडाभर खोकलनार माणूस निगेटिव्ह, ठणठणीत माणूस पॉझिटिव्ह. तोंडाले रुमाल बांधा, आंगभर कपडे घाला पण तो करोना काही आयके नाही. त्याले ज्याले धराचं असन त्याले तो धरल्याबिगर सोडेच नाही.”

“लय बुढ्यायले उचलून नेलतं करोनानं, कारे बुढ्या” मन्या बुढ्याकडं पाहत बोलला.

“मले काही होत नाही. अशा लय बिमाऱ्या पचवल्या म्या” बुढा रागात बोलला.

“खा प्याचे वांदे होते”

“राहणार कसे नाही? आजच्यावाणी हाय महिनाभराचा किराणा भरुन ठेवला. तवा हातावर आणा आन पानावर खा असा ताल होता. करफू लागला तर खाचं कसं?”

“आबे घरातलं जाऊ दे रतनच्या दुकानातला बी बंदा माल संपून गेलता. दोन तास करफू उघडला आन तो माल घेऊन आला तवा आपल्याच गावात अशी दंगल झाली का येथच करफू लावा लागते का?”

“म्या येक बोलू का?”  गणपत तोंडातला खर्रा थुकत बोलला. “कणची नवीन बिमारी असती तर ते आधी चीनमंधी आली असती ना हिंगणघाटात कायले येते.”

“चीनमधी नाही तर चीलीमधी आली असनं.”

“तेथं कोण जाते बे”

“काहून नाही आपली लोक कोठ जात नाही”

“करफू लागाचा टाइम येतपावतर जर बीमारी फैलली असनं तर दुनियाभर बोंबाबोंब झाली असती.”

“हे येक नंबर बोलला गणपत तू”

अशा चर्चा बाता फेकाफेकी दिवसभर चालू व्हती. आपण सरपंच असूनही करफ्यू का लागला हे गोष्ट आपल्याल मालूम नाही हे मन्याले आतून खात व्हते. बुढ्याचा चेहरा पायला का त्याले कसकसंच होत व्हत. त्यान हिंगणघाटात फोन लावले, मेसेज करुन पाहिले पण सारे फोन जॅम झाले होते. कोणाले फोन लागत नव्हते, मेसेज जात नव्हते. रात्री मेसेज आला करफू काढण्यात आला आहे. उद्यापासून पुन्हा सारा सुरु होणार म्हणून पोट्टयायचे चेहरे पडले. दिवसभर करफू करफू करुन बोंबलनार गाव रात्री करफूसारख शांत झोपी गेलं.

करफू का लागला याचाबी पता लागला. कोण का बरेलीत येका आयपील टीमच्या इरोधात पोस्ट टाकली म्हणून हिंगणघाटातल्या आयपील फॅनच्या भावना भडकल्या. दोन फॅन क्लब मधी जोराची बाचाबाची झाली. दोन्ही बाजूच्या लोकायनं तोडफोड केली. वातावरण लय तंग झालतं म्हणून सरकारन करफू लावला. काळ बदलला, औतं गेले, वखर, नांगर, खासरं गेली, रेंग्या गेल्या त्याच्या जागी हार्वेस्टर, ट्रॅकट्रर आली, गावात रस्ते आले, फटफट्या, गाड्या आल्या.  माणसाची कामं मशीनी करु लागल्या. शेतात रोबो राबू लागला. येवढा सारा बदल झाला म्हणून माणूस बदलते का. माणूस हाय, त्याची भावना हाय, भडकणारच. भावना भडकाले कारणाची काही कमी नाही.  सरकारन नोटिस काढली ‘यापलीकडे आयपीएल संबंधित पोस्ट देखील संवेदनशील पोस्ट म्हणून गणण्यात यावी’ 

यावर आपले मत नोंदवा