एक फसलेले नाटक-१

WhatsApp Image 2019-03-24 at 3.50.23 PM
P.C. जालावरुन साभार

(या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन इथे दिले आहेत. एक फसलेल नाटक-आणखीन एक, एक फसलेल नाटक)

पात्र परिचय
मुलगा आणि मुलगी: दोन साधारणतः सारख्याच वयाचे व्यक्ती. वेषभूषा बदलणे अपेक्षित नाही.
(मंगलवाद्यांच्या गजरात पडदा वर जातो तेंव्हा रंगमंचावर अंधार असतो. वीज चमकते. ढगांचा गडगडाट होतो. जोराचा पाऊस कोसळतोय असा आवाज येतो. फाटकाचे दार वाजल्याचा आवाज येतो. मग हळूच कर्रर्र असा घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. मुलगी म्हातारीसारखी चालत हातात कंदील घेतल्याची नक्कल करीत रंगमंचावर प्रवेश करते.)

मुलगी कोण…. (काहीच आवाज येत नाही) कोण ………… (परत तेच) कोण आहे. (रंगमंचावर अंधार असतो आणि प्रकाशझोत नायिकेएवजी इतरत्र फिरतो असतो. नायिका वृद्ध असल्याचा अभिनय सोडून) अरे आता माझी एंट्री झाली ना आतातरी माझ्यावर फोकस कर. कुठे फिरतोय तुझा लाइट. (परत वृद्ध बनून) कोणS….अरे कोण आहे
मुलगा (रंगमंचाबाहेरुन) मी आहे.
मुलगी मी म्हणजे कोण
मुलगा मी म्हणजे मीच
मुलगी अरे व्याकरण काय शिकवतो? मी म्हणजे मीच नाही तर काय तू असनार आहे. हा आताचा मी कोण
मुलगा (मुलगा रंगमंचावर येतो आणि म्हातारीजवळ येउन उभा राहतो) मी चोर आहे.
मुलगी हाततिच्या चोर होय मला वाटल सल्या आला कि काय
मुलगा कोण सल्या. तुझा पोरगा
मुलगी काहीतरीच काय. (म्हातारी लाजते) ब़ॉयफ्रेंड आहे माझा.
मुलगा डोळ्याच्या खाचा झाल्या. बुबुळाची बटनं झाली तरी म्हणे माझा बॉयफ्रेंड. मी चोर आहे म्हातारे. आवाजावरुन चोर ओळखता येत नाही.
मुलगी आवाजावरुन ओळखायला तू कोणी मोठा तानसेन लागून गेलास. चोर आवाजावरुन ओळखायचा नसतो तो त्याच्या चालीवरुन ओळखायचा असतो. खिडकीतून उडी मारुन घऱात आला तर तो चोर नाहीतर रस्त्यावरच पोर.
मुलगा खिडकीतून उडी मारायला इथे खिडकी कुठे आहे म्हातारे.
मुलगी खिडकी वाऱ्याने उडाली.
मुलगा आँ खिडकी उडाली
मुलगी (म्हातारीचे बेरींग सोडून) अरे ते खिडकीचे कापड दिग्दर्शकाच्या बायकोने पापड वाळू घालायला वापरले होते. जोऱ्याच वारं आल आणि खि़डकीसहीत पापड उडाले. (परत म्हातारी) मेल्या खिडकी नाही म्हणून काय झाले तुला तर पाय दिले ना देवान मग तुला उडी मारायला काय जाते.
मुलगा का.. चोराने का आयुष्यभर खिडकीतून उड्या मारायच्या. अशा उड्या मारुन आता गुडघे दुखायला लागले. काय ग म्हातारे तू तर आंधळी आहेस. तुला काय फरक पडतो चोर दरवाजातून आला काय आन खिडकीतून आला काय. शेवटी चोर तो चोरच.
मुलगी एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कंदील असल्याशिवाय कुणी गरीब, बिचारी, गावातली म्हातारी आई होउ शकत नाही तसेच खिडकितून उडी मारल्याशिवाय कुणी चोर होउ शकत नाही. समजल. प्रत्येक गोष्टीच्या आपल्या परंपरा, नियम असतात.
मुलगा (चोराच बेरींग सोडून देतो) हेच समजत नाही बघ. असे किती नियम आहेत अलिखित परंपरा आहेत. हे कळनार कसे? तूच मला सांग जगातले सारे चोर काय खिडकितून उड्या मारतात. नाही ना मग चोर म्हटला की तो खिडकितूनच यायला हवा. का? हल्ली गलोगल्ली मोतीबिंदूचे ऑपरेशन फुकटात होतात तरी गावातली गरीब बिचारी म्हातारी आई म्हटली की ती आंधळीच हवी. का? गरीब चांगला, श्रीमंत दुष्ट, मध्यमवर्गी पळपुटा, श्रीमंताच्या तोंडात पाइप, गरीबाच्या खांद्यावर कुऱ्हाड आणि मध्यमवर्गीयाच्या हातात पुस्तक का? किती दिवस तेच ते घासायचे. कुणी का हे बदलत नाही?
मुलगी बदलनारे सिद्धहस्त असतात आपल्यासारख्यांनी त्या परंपरा गुपचुप पाळाव्या. कारण पंरपरा बदलायला आधी परंपरा पूर्ण समजायला हव्या.
मुलगी नाही पटत. खून चौकात होतो पण चौकशी दिवाणखान्यात. कुणी स्वतःशी मोठ मोठ्याने बोलत राहतो त्याचे स्वगत म्हणून कौतुक करायचे. कुणी रस्त्यावर उभा राहून जर अशी जोरजोरात बडबड केली तर लोक त्याला वेडा म्हणतात पण इथे त्याला टाळ्या मिळतात. नाही पटत हे माझ्या बुद्धिला, काहीतरी वेगळ करायच मला.
मुलगी मग काहीतरी क्लासिक कर.
मुलगा क्लासिक. जे कुणालाही कळत नाही ते क्लासिक ही तुमची क्लासिकची परिभाषा.
मुलगी अरे म्हणजे प्रायोगिक कर
मुलगा प्रायोगिक, प्रायोगिकच्या नावाखाली आपण वर्षानुवर्षे तेच करतोय हे ज्यांना कळत नाही ते प्रायोगिक. असंबद्ध बोजड शब्दांच्या पिचकाऱ्या, कवायतीसारखे हातवारे, उगाच फिरनारा लाइट या साऱ्याला काय म्हणायचे तर थेटर एस्थिटिक. यात असनार काय तर जात, पंथ, धर्म, सेक्स यावरील निरुपयोगी चर्चा …..नको पुण्यातल्या कुठल्या तरी व्याख्यानाला गेल्यासारखे वाटते. नुसत्या कल्पनेने अंगावर काटा येतो माझ्या. मला माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी नाटक करायचे आहे. परंपरा तर हव्या पण आजच्या काळानुसार साजेशा बदल हवा, कुठेतरी वास्तववादाची झालर हवी आणि मनोरंजनाची फोडणी हवी. मला आजच्या काळातल आजच्या पिढिच नाटक करायचे आहे. आजच नाटक आजच आहे.
मुलगी अरे बापरे कठीण आहे तुझ. तोंडावर पडशील
मुलगा पडू दे
मुलगी नाटक फसेल.
मुलगा फसू दे.
मुलगी ठिक आहे सुरु करु या. मी सांगते तसे कर. फॉर्मुला माझा गोष्ट तुझी. आधी आपली ओळख देउ मग सुरु करु
मुलगा तर मंडळी मी आहे एक नट
मुलगी मी एक नटी
मुलगा स्त्री पुरुष नात्यातले असंख्य पदर सांभाळनारे (ती लगेच पदर सांभाळल्यासारखे करते) अग तो पदर नाही ग. असे अधून मधून फालतू विनोद करायला हवे. नात्यांचा पदर ताकदीने सांभाळनारे दोन जीव.
मुलगी नात्यातले भाव समजून घेतल्याचा आव आणून, भूमिकेत वगैरे शिरल्याच नाटक करुन सार काही बटबटीतपणे उभे करनारे दोन जीव.
मुलगा मी पुरुष ही स्त्री, मी प्रियकर ही प्रेयसी
मुलगी हा भाऊ मी बहीण, ए भाsss
मुलगा मी नवरा ही बायको
मुलगी मी आई हा मुलगा
मुलगा मी बाप ही मुलगी
मुलगी मी बॉस आणि हा कारकून
मुलगा अरे बस बस नाटकावर ये.
मुलगी ऐक तर मग नाटक म्हणजे काय असते ते
मुलगा तू तुझ्या प्रायोगिक नाटकाविषयी सांगू नको हं.
मुलगी अरे प्रायोगिक, व्यावसायिक या साऱ्या मानवनिर्मित भिंती आहेत. हे बघ नाटक म्हणजे गणेशोत्सवातल्या गणेशाच्या मूर्तीसारखे असते. गणेशाची मूर्ती  झोपडपट्टीत असो नाहीतर बॉलीवूडच्या अभिनेत्रीच्या घरी ती सुंदरच असते. हे प्रायोगिक, व्यावसायिक, सामाजिक, विनोदी या साऱ्या पुरस्कार मिळविण्यासाठी तयार केलेल्या आपल्या आपल्या गल्ल्या आहेत.
मुलगा ओके ओके ओके लेक्चर बंद. मूळ विषयावर ये.
मुलगी पहिली गोष्ट म्हणजे नाटक करताना आपण काहीतरी जगावेगळे करतोय असा उगाचच अभिनिवेश हवा. नाटक बघायला शंभर लोक जरी येणार असतील तरी आपण जग बदलतोय असा अभिनिवेश हवा. दुसर म्हणजे नाटकात थेट काहीच बोलायचे नसते जे काही असते ते प्रतिकात्मक असते. जे नसते ते सुद्धा प्रतिकात्मक असत. नेपथ्थ नसलेला रंगमंच हा विश्वाच्या मोकळ्या पोकळीचे प्रतीक असतो. मघाची ती म्हातारी आणि चोर हे परंपरावादी आणि परंपरा मोडलेल्या समाजाचे प्रतीक होते.
मुलगा चोर सुद्धा प्रतीक
मुलगी म्हणजे काय परंपरा मोडनाऱ्यांना आम्ही अशा रितीने चोर म्हणत असतो ही अशी परंपरा आहे. तिसरी गोष्ट नाटक हे लाउड माध्यम आहे सार काही ओरडून सांगायचे असते. सतत ओरडतच राहायचे.
मुलगा असे का
मुलगी कळेल तुला हळूहळू. बोल तुझ्या नाटकाचा विषय काय आहे?
मुलगा विषय आपला नेहमीचा, चावून चोथा झालेला लग्न‘.
मुलगी शीकिती शिळा विषय आहे. विषय कसा हवा समाजव्यवस्थेला हादरे देणारा
मुलगा ए हादरे वगैरे जरा अतीच वाटत. नाटकातून हादरे वगैरे म्हणजे बिरबलाच्या खिचडीसारख्या प्रकार आहे. हा इथे बोंबलतो तो तिथे बोंबलतो कोणाला काही फरक पडत नाही. इथे नाटकात अमेरीकेच्या अध्यक्षांच्या नावाने कितीही शंख फुंकला ना तरी त्याला तिथे घंटा फरक पडत नाही.
मुलगी ठिक आहे गोष्ट तुझी आहे फॉर्मुला माझा आहे. पडदा वर जातोय. तू आणि मी सूत्रधाराच्या भूमिकेतून नाटकाची घोषणा करतोय.
मुलगा नमस्कार मंडळी आम्ही घेउन येतोय. तीच गोष्ट नेहमीची. लग्नाची, वर्षानुवर्षाची, प्रेमाची, आनंदाची, नात्यांच्या गुंत्याची, असलेल्या नसलेल्या अभिमानाची, स्वाभिमानाची, सो कॉल त्यागाची.
मुलगी कधी भाषणाची, कधी संभाषणाची, कधी संवादाची तर कधी विवादाची, कधी भांडणाची तर कधी तंट्याची, तीच गोष्ट, तेच प्रेम, तेच लग्न, तेच मुल आणि तेच भांडण सुरु करु या त्या लग्नाची तीचतीच गोष्ट‘, एक निरर्थक ननाट्य.
मुलगा काही वेगळ करु, आधी घटस्फोट आणि मग लग्न.
मुलगी नको. ते इलॉजिकल वाटेल. आपण अॅबसर्ड आहोत इलॉजिकल नाही. किंवा इतकेही अॅबसर्ड नाही की इलॉजिकल वाटू. सुरु कर आता, नेपथ्थ पात्र. उगाच नमनाला घडाभर तेल नको.
मुलगा ए नमनाला घडाभरच तेल का वापरतात पिंपभर का नाही.
मुलगी (त्याच्याकडे रागाने बघते आणि परत प्रेक्षकांकडे बघत) तर मंडळी. एक मुलगा, एक मुलगी आणि एक बसस्टॉप
मुलगा ए बसस्टॉपच का, ( ती न बघताच निघून जाते आणि तो तिला विचारत राहतो आणि अंधार होतो)