आजीस पत्र

||श्री||

ता. ४ जून २०२२

ति. स्व. कमळा आजीस
शिर. साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्र लिहिण्याचे कारण की …… काही नाही वं तुझी आठवण आली. तू म्हणशील आबा माझी आठवण यायला का झालं. असा विसरन का, तू माझ्या मायची माय होती. तेंव्हा आली आठवण.
काय आहे ना कमळाबाई (मला हेच जास्त आवडते) पत्र लिहायचे म्हटले की तूच आठवते. तुलं काही जास्ती लिहता वाचता येत नव्हतं पण पोस्टकार्ड, इनलँड घरी येणे याचे महत्व काय असतं ते तुला चांगले ठाऊक होतं. तेंव्हा काही समजत नव्हतं पण आता जाणवतं. फोन आला, तार आली म्हटलं की घाबरुन जायचं आणि पत्र आलं म्हटलं की हायसं वाटायचं असे दिवस होते ते. आता तर उठसूठ फोन येत रायते. भाजीत मीठ किती टाकायचे पासून ते चपलेच्या रंगापर्यंत सर्व गोष्टीसाठी फोन होत रायते. तू कधी केल्या आईशी अशा गोष्टी. तुला कधी उषाची आठवण येत होती का. लग्न झालं का झालं पोरगी रायते सुखानं. आता पाहा बरं रोजचे फोन चालते.

लोकांच काय मी पण तसाच आहे. परवा घरचे म्हणजे बायको आणि दोन पोरं, तू तर बायको पोराला पाहलच नाही. घाईच झाली होती. ते सारे मुंबईला गेले होते. तू गेली तेंव्हा मी मुंबईत असलो तरी आता मी मुंबईत राहत नाही सासरचे तिथे आहे. टॅक्सी केली, लिंक पाठवली. लिंक म्हणजे मी जरी इथे हैदराबादला असलो तरी मुंबईत यांची टॅक्सी कुठे आहे हे समजते होते. अचानक काय झालं माहित नाही ते दिसण बंद झालं. माझी घाबरली मी फोन लावला पण फोन लागत नव्हता. तास दोन तासात कितीवेळा फोन लावले फोन लागत नव्हते. टॅक्सी कुठे आहे काही समजत नव्हते. पार घाबरुन गेलो काय करावं ते समजत नव्हतं. डोक्यात भलते सलते विचार येत होते. तीन तासांनी सुखरुप घरी पोहचल्याचा फोन आला आणि माझा जीव भांड्यात पडला. हे असं तेंव्हाच झाल होत का नाही. साधा फोन केला आणि कुणी उचलला नाही तर राग, चीड, भिती सारं एकावेळी वाटते. धीर सुटतो. उगाच बेचैनी होते. हे नेहमीचच झालं आहे. समजतच नाही हे चांगलं का तुझ्या जमान्यातले पत्र चांगलं होतं ते.

पत्र लिहायचा विषय निघाला आणि हे सारं आठवलं. विचार आला तू कशी करत होती. तुझ्या जमान्यात तर पत्राशिवाय दुसरी सोयच नव्हती. या पत्रामुळं तुझा धीर वाढला. आता पत्र गेले आनं मोबाईल आले तर आम्हा आजच्या पोरांना आता धीरच धरवत नाही. संयम नाहीच. आताच्या आता समजलं पायजे. दादाचा(आजोबा) स्वभाव तर जगाला माहित होता. कशी करत होती तू, कुठुन आणत होती धीर. दादा सकाळी उठले का आंघोळ करत. उन, थंडी, पाऊस ताप काहीही राहो दादा पहाटे उठून आंघोळ करणार म्हणजे करणार. तेही थंड पाण्यांन तुझ्या भाषेत सांगायच तर त्यांले कधी कडतं पाणी लागत नव्हतं. तसच ओल्यानी पूजा करणार जोर जोरात मंत्र म्हणणार. तू कितीही ओरडली तरी काही फरक पडत नव्हता, मंत्र तेवढ्याच जोऱ्यात म्हणणार. तरीही तू प्रत्येक गोष्टीला ओरडत होती आणि ते त्यांना जे करायच ते करत होते. मला तर कधी समजले नाही तुझे ओरडणे चांगले का दादाच शांतपणे साऱ्याकडं दुर्लक्ष करण. घरी नसले तर करमत नव्हते आणि असले तर भांडल्याशिवाय राहत नव्हते.

दिवस निघत नाही तर कुणाचा तरी छकडा दारात उभा
“ओ बुवा हाय काजी घरात” कुणी रामा तडस आवाज देत होता.
“रामाजी या. चहा मांडते का वं. ” अस उठसूठ येणाऱ्या जाणाऱ्याला चहा देण तुला पटत नव्हत. दादाची चलती झाली तर रस्त्यावरुन जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून चहा देतील. तुला चिंता होती महिन्याच्या साखरीची.
“बुवा, कालपासून म्हस गावत नाही न जी .” रामा तडस सांगणार. मग दादा पंचांग काढून बघणार. पंचांगात बघून म्हैस सापडते यावर माझा ना तेंव्हा विश्वास होता ना आता आहे.
“उत्तरेलं सापडणं.”
“आम्हाले का समजते जी उत्तर आन दक्षिण. तुम्हीच चला संग.” अस म्हटलं की दादा लगेच सदरा घालून छकड्यावर बसून पसार. तासभर झाला, दोन तास झाले, चार तास झाले तरी दादाचा यायचा पत्ता नाही. संध्याकाळ झाली तरी दादा आले नाही. एक दिवस गेला, दोन दिवस गेले तरी दादा यायचा पत्ता नाही. मग विचारपूस सुरु करा. कुणी गोवरी, साखरी म्हणजे रामाजीच्या गावाकडचा भेटतो का ते पाहा. कुणी भेटला का त्याला विचारा
“का रे बुवा हाय का तिकडं?”
“मालूम नाही.” परत दुसऱ्याला विचारा. मग कुणी तरी सांगणार
“ते गेले भजनवाल्यासंग”
“आबा ते तर रामा तडसाची म्हस शोधाले गेलते.”
“म्हस तर कवाच गावली जी. त्यायले बोरीचे भजनवाले भेटले त्यायच्या संग गेले ते. तुळजापूरले का कोठं जातो म्हणे.”

घरुन म्हैस शोधायला म्हणून अर्धातासासाठी गेलेला माणूस सरळ तुळजापूरला निघून जातो याचा तीन चार दिवस घरी पत्ता नाही. कुठं चंद्रपूर, कुठं तुळजापूर, तुला माहीत तरी होतं का तुळजापूर कुठ आहे ते. कस करीत होती तू. कसा धीर धरवत होती. कशी स्वतःची समजूत काढीत होती. हे असं नेहमीचच होतं. दादाचा पाय एका जागी ठैरत नाही हे साऱ्या दुनियेला माहित होतं. कधी या गावात तर कधी त्या गावात. आई सांगत होती एकदा पुरात अडकले तर चार दिवस झाडावरच होते म्हणे. यज्ञ करायच्या जागेवर सापाचे वारुळ झाले तर त्यात हात घालून साप काढून वावरात सोडून दिले. फोटो आहे घरी. दादा पुढच्या मिनिटाला काय करनं हे दादालाच माहित नव्हतं तर आपण काय सांगणारं. पूजा, भजन, किर्तन आणि गोळा केलेली माणसे यापुढे दादाला काही सुचत नव्हत. जिकडे भजन तिकडे दादा, जिकडे पूजा तिकडे दादा, आज इथ तर उद्या तिथं. अशात कसं मन घट्ट करत होती तू. खुशालीचे पत्र येणार हा विश्वासच कसा होता. तसे पत्र यायचे, पोस्टकार्डच त्यावर फक्त दोन चार ओळी लिहिल्या असायच्या.

“मी पंढरपूर आहे. सुखरुप आहे. इथे पाण्याची सोय बरोबर नाही म्हणून कालपासून उपोषण सुरु केले आहे. काळजी करु नये.” दादा उपोषणाला बसले आहे हे पत्र वाचून तुला काळजी वाटत नव्हती तर खुशालीच पत्र आलं म्हणून बरं वाटत होतं. तुला खातरी होती आता पत्र आलं मागून दादा येतील.

दादाच पत्र कधीच येणार नाही हे समजल तेंव्हा मात्र तू धीर सोडला…. मी थांब म्हटलं होतं. नाही ऐकलं माझं चार महिणे पण नाही….

कमाळाबाई तुझाच नातू
प्रवीण