बाहुबली आन जानराव

bahubali poster1

दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती ‘कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.’ आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो. धन्यान तर परेसान करुन सोडल होत, घंटाघंट्याले इचारे ‘फोन आला का, फोन आल का’. साडभावान टिकिट काढल्याचा फोन केला आन म्या आन धन्या शिद्दे नागपुरात पिक्चर पाहाले पोहचलो. तुम्हाले सांगतो राजेहो येक रुपयाचा पछतावा नाही झाला, का पिक्चर हाय पूरा पैसा वसूल. असा पिक्चर आजवरी बनला नाही. मजा आली.

पिक्चरमंधी जे बी हाय ते पहील्या बाहुबलीवाणीच लय मोठ, कोठ बी लहाणसहाण काम नाही. कंजूशीचा कारभारच नाही. येथ बैल मोकाट नाही सुटत हत्ती मोकाट सुटते, तो बाहुबली खासर वढत नाही आणत तर रथ वढत घेउन येतो. येकटा माणूस हत्तीले आटोक्यात आणते, मंग बाहुबली हाय तो. त्या बाहुबलीले पाहून आमचा धन्या तर नुसता लवत होता. तिकड तो बाहुबली कुदला का इकड आमचा धन्या लवे. म्या त्याले म्हटल ‘आबे धन्या कायले लवते बे येवढा, चांगल नाही दिसत अस.’ तो काही आयकत नव्हता, आता पिक्चरच तसा चालला होता नाी जी त्याचा बी काय दोष म्हणून मंग म्याच त्याले पक्का धरुन ठेवला. बिल्कुल लवू नाही देल. तिकड तो बाहुबली हत्तीच्या सोंडेवरुन हत्तीवर यंगला, हत्तीच्या सोंडेत त्यान बाणाची दोरी देली. आता तो बाण मारनार तसा म्या धन्याले सोडला म्हटल ‘धन्या लव लेका तुले जेवढ लवाच तेवढ लव.’ बाहुबली पायताना नाही उड्या माराच्या तर कवा माराच्या जी. खर सांगू मले बी लवाव अस वाटत होत पण … जाउ द्या.

या पिक्चरमंधी का नाही ते सांगा लवस्टोरी हाय, मायलेकाच प्रेम हाय, येकापेक्षा येक फायटा हाय, गाणे हाय, कॉमेडी हाय, मोठाले माहाल हाय, शिनशिनेरी हाय, भावाभावातला झगडा हाय. प्रेम, वचन, धरम साऱ्या गोष्टीचा झोलझाल हाय. कणच्या बी चांगल्या अशा बेस पिक्चरमंधी जे जे पायजेन ते ते हाय. बंद येकाच पिक्चरमंधी मंग हाय का नाही पैसा वसूल. आपल्या बाहुबलीची लवस्टोरी अशी जोरदार हाय का नुसत्या लवस्टोरीचाच पिक्चर बनला असता. बाहुबलीच्या हिरोइनचे नुसते डोळेच दिसले आन तिच्या डोळ्यान बाहूबलीच का म्या बी घायाल झालतो. फॅन झालतो. नुसती तिलेच पाहत राहाव वाटे जी. पहील्या पार्टातली खप्पड म्हातारी तिच्या जवानीत अशी गोड पोरगी असन अस वाटलच नाही जी. ज्यान कोण त्या गोड पोरीची खप्पड, खंगलेली म्हातारी करुन टाकली अशा माणसाले जगाचा काही अधिकार नाही. अशा भल्लाले मारलाच पायजे चांगला ठेचून काढला पायजे. आता ते बाहुबलीची हिरोइन तवा ते बी त्याच्यावाणीच पायजेन का नाही. तेबी अशी तलवार चालवते, बाण तर असा मारते य़ेका झटक्यात तीन तीर समोरचा खल्लास. रानडुकरायची शिकार करते. डेरींग बी केवढ पोरीत, ते महाराणी शिवगामीच्या राजदरबारात जाउन त्या महाराणीलेच खरीखोटी सुनवुन येते. डेरींग लागते ना भाउ, मजाकची गोष्ट हाय का. बाहुबलीले हिरोइन पायजे होती तर अशीच, ते काही महालात बसून इकडून आले ना तिकडून गेले अशी बोंबलत नाही बसत. महालावर हमला झाला तर तेबी हातात बाण घेउन धावते. का सिन हाय जी तो, दिलखूष. अशी हिरोइन जवा प्रेम करते ते मनापासून करते. येकदा प्रेम केल ना का मंग त्याच्या संग कोठबी जाले तयार होते. लयच आवडली आपल्याले हिरोइन, म्या त्या हिरोइनच नाव टिपून ठेवल आता फुड तिचा कणचाबी पिक्चर आला तरी आपण पायनार, भाषा समजो अगर ना समजो.

बाहुबलीची हिरोइन अशी जबरदस्त तर त्याची माय का कमी होती का. ते तर महाराणीच व्हय. महिष्मती साम्राज्याची महाराणी शिवगामी, हे वटारडोळी, कवाबी पाहाव तिचे डोळे तसेच मोठाले. डोळे वटारुनच रायते ते. तिच्या नुसत्या डोळ्याले पाहूनच कोणाले बी भ्याव वाटन जी तिच मंग तो बाहुबली का असेना. का तो तिचा महाल, का तिचा राजदरबार, का तिची बसाची स्टाइल का तिच सिंहासन, साली नजर खालपासून वर पर्यंत पोहचालेच केवढा टाइम लागत होता. तिन नुसती नजर फिरवली का बंदे चूप. तिची चाल बी तशीच. महाराणी पायजेन तर अशी, तिले पहीली चिंता आपल्या प्रजेची. लोकासाठी ते काहीबी करु शकत व्हती. मंग मागपुढ पाहात नव्हती येच्यात आपला जीव जाउ शकते, पोरायचा जीव जाउ शकते. अंहं पयल काम लोकायले वाचवाच, त्यायच रक्षण कराच. महाराणी म्हणून ते अशी येकदम कडक तर माय म्हणून लय जीव लावनारी. आपल्या पुतण्याले पोटच्या पोरावाणी सांभाळल तिन. म्या तुम्हाले सांगतो बाहुबली नशीबवान होता त्याले देवसेना सारखी बायको आन शिवगामी सारखी माय भेटली. हे जर त्याले भेटले नसते तर तो आखाड्यात कुस्त्या खेळनार पहेलवाण बनला असता, बाहुबली बनला नसता. बाहुबलीले बाहुबली बनवल ते त्याच्या मायन आन बायकोन. साऱ्यायलेच अशी बायको आन अशी माय भेटली तर बंदेच बाहुबली बनते पाय.

बाहुबली असा तगडा तर त्याच्यासंग फाइट करनारा विलन बी तसाच तगडा पायजेन जी. तो जर लुचुपुचा असता तर कस जमन जी. बाहुबलीन येवढी ताकत का हत्ती आन घोडेच अडवाले वापराची का? विलन नुसता ताकतवाला पहेलवाणच होता आस नाही तर लय डोकेबाज होता. त्याचा दिमाग कांपुटरपेक्षाही तेज चालत होता. कोणच्या टायमाले कोण का बोलल पायजे त्याले बराबर समजे. त्याचा बाप येडा होता, त्या कटप्पान त्याले सांगतल व्हत तू मंदबुद्धी हाय म्हणून. फालतूची बडबड करनारा पण तो भल्ला त्याले बराबर चूप करे आन त्याले तवाच बोलू दे जवा जरुरत राय. आखरीच्या फायटमंधी विलन का दिसला जी साल कणच्या हिरोले खाली पाहाले लावन. केसाची गाठ पाडून शर्ट फाडून का फाइट खेळतो जी. मोक्यांबो मेल्यापासून असा विलन पायलाच नव्हता. त्याचे दंड व्हय का व्हय. त्यान आखरीच्या फायटमंधी बाहुबलीले म्हणजे पहील्या बाहुबलीच्या पोराले माराले का का नाही वापरल जी. लोखंडाचा गोळा माराच तर तो केवढा मोठा शंभरक किलोचा असन, तो उचलाले बी ताकत लागते न जी अस चिरकूट लकडी पहेलवाणाचा काम हाय का ते. त्यायच्या आखऱीच्या फायटीमंधी का नाही तुटत सांगा. भल्लाचा रथ तुटते, भल्लाचा पुतळा खाली पडते, भितीच्या भिती तुटते, झाडच्या झाड मोडून निघते. येक गोष्ट सुटत नाही, येवढा खर्च करुन जे जे काही मोठ बनवल ते बंद तोडून टाकल. जे हातात लागन त्यान फाइट खेळले. याले म्हणते दुष्मनी याले म्हणते फाइट. का हो भाउ बराबर हाय का नाही. अशी फाइट म्या याच्या आधी पायली नवती. तिकड त्यायची फाइट चालली होती इकड आमचा धन्या फायटा मारत होता. जोरजोरात वरडत होता मार. मार.

कॉमेडी कराले आपला कटप्पा हाय न जी, बाहुबलीचा मामा. लय हासवल बा त्यान. पहील्या पार्टात त्याले पायल तवा वाटलच नाही हा बुढा कॉमेडीबी करत असन म्हणून. पण काहीही म्हणा खरा कटप्पा हातात तलवार घेउन लढाइच्या मैदानावरचाच. त्यान शेवटी बाहुबलीले मारलाच नाहीतर बाहुबली काही असा मरत नव्हता. मले वाटते त्याले बाहुबलीले माराची गरज नव्हती त्यान बाहुबलीले नुसत सांगतल जरी असत तर बाहुबलीन सोताच सोताले मारुन घेतल असत. त्याचा लय जीव होता कटप्पावर आन कटप्पाचा बाहुबलीवर. या कटप्पानच मायी लय मोठी परेशानी दूर केली त्यानच शेवटी उत्तर देल ना
‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?’

लिहनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा.