परत ओबामा वऱ्हाडीत

dsc00366-2

मागे मी ओबामा आला रे ही वऱ्हाडी भाषेतली कथा लिहिली होती. बऱ्याच लोकांना ती वऱ्हाडी कथा फार आवडली होती. आमच्या एका मित्राने त्यावर लघुपट करायची तयारी दर्शविली. त्यासाठी मी मग दृष्य माध्यमाचा विचार करुन ती कथा परत लिहिली परंतु काही कारणास्तव लघुपटाचे काम लांबले. आज बाप्पाच्या उत्सवाच्या निमित्ताने लघुपटासाठी लिहिलेली ती कथा जशीच्या तशी देतोय. परत एकदा वऱ्हाडी भाषेचा गोडवा अनुभवावा.

(फक्त अंधार दिसतोय, कुणी स्त्री हळू आवाजात गाण गुणगुणतय ‘पदरावरती जरदारी हा मोर नाचरा हवा बाइ मला नेसव शालू नवा’. साडी ठीक करण्याचा, हातातल्या बांगड्यांचा आवाज येतोय. अंधारातच संवाद चाललेय)
भाऊराव: सरपंच बाई, चला लवकर
सरपंच: आली न जी, तुमची नेहमीच घाइ रायते?
भाऊराव: तो ओबामा येनार हाय अशी नुसती बातमीच आली तर तुमची ही तयारी तो आल्यावर शयरावाणी ब्युटी पार्लरवालीला गावात आणून बसवनार का?
सरपंच: चला, चला, तुमाले मोकाच पायजे. कशी दिसते जी मी?
भाऊराव: दिसन तवा सांगीन, आता अंधाराच काहीच दिसत नाय
सरपंच: हे लाइटही आताच जाचे होते.
(अस म्हणत ती दिवा लावते, मंद प्रकाश दिसतो, त्यात तिचा चेहरा दिसतो, दोघेही बाहेर छपरीत येतात. छपरीच्या भिंतीवर दरवाजाच्या एका बाजूला देवाचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला दोन शहरात राहनाऱ्या मुलांचा फोटो आहे. त्याच्याच बाजूला सरपंच बाइ आणि भाउरावांचा लग्नानंतर स्टुडीओत जाउन काढलेला फोटो आहे. दोन्ही फोटोच्या खाली खाली टॉर्च चार्ज करायला ठेवला आहे. भाउराव टॉर्च घेतात आणि त्याचा लाइट लावून अंगणात फिरवतात. वाडा, समोरच अंगण लाइटच्या प्रकाशात दिसायला लागत. सारवलेल अंगण, रांगोळी, अंगणातले तुळसी वृंदानन, त्यावर लिहिलेले राधा + दामोदर, एका कोपऱ्यात हांडा, उबड मारुन ठेवलेली मोठी टोपली, ट्रॅक्टरचे नांगर ठेवलेले आहे, दुसऱ्या बाजूला धान्याचे कोठार त्यात भरलेले पोते आणि त्यातून सांडनारे धान्य. सरपंच आणि भाउराव दरवाजाकडे चालायला लागतात. दरवाज्यातून बाहेर उभ्या असनाऱ्या ट्रॅक्टरचा समोरचा भाग दिसतो. ढोरकी दारातून बाहेर जाताना दिसतो)
भाऊराव: बे गण्या तू कोठ चालला बे?
गण्या: कोठच नाही जी, तो कोणी साहेब येनार हाय म्हणते ते पाहून येतो.
भाऊराव: तू तेथ जाउन कोणते दिवे लावनार हाय? तू तिकड गेला तर येथ ढोराकड, घराकड कोण पाहीन? माया बाप का तुया बाप? काम कराच जिवावर येते लेका, नुसत हिंडाले पायजे. (स्वतःशीच हळू आवाजात) साल येथ कधी पंचायत समितीचा अध्यक्ष आला नाही तेथ कान ओबामा येनार हाय म्हणे. हे चालले आपले कामधंदे सोडून त्याले पाहाले. (परत गण्याला ओरडत)काही येत नाही ओबामा गिबामा आधी काम करा घरातले.
(काहीवेळ शांतता. एका सुनसान रस्त्यावर एखाद दुसरी मोटारसायकल जातेय तिचा आवाज येतोय. ट्रॅक्टर जातेय, दुरुन मोटारसायकलचा लाइट दिसतो. माणसांचे संवाद ऐकू येतात)
साहेब: अजून किती वेळ आहे रे बाबा
मारुती: झाल आलच, शिद्दाच रस्ता हाय आता. दोन वावरं गेल का आल गाव
साहेब: बरच लांब आहे रे तुझ गाव
मारुती: कायच जी, हे नदीमुळ फेरा पडते नाहीतर शिद्दाच रस्ता हाय.
(एक टेंपो समोरन येतो आणि वेगात पुढे जातो)
साहेब: एकदम कुट्ट अंधार आहे रे, तुला तुझ गाव आले हे तरी कळेल की नाही.
मारुती: काही का जी साहेब, आपल गाव कधी भुलते का कोणी. तसही आमच गाव आला का पताच लागते बरोबर.
(दूर गावातले लाइट दिसू लागतात. रस्त्यावर अंधारच असतो फक्त गाडीचाच प्रकाश दिसतो.)
मारुती: (मनातल्या मनात बोलल्यासारखे) लाइट लवकर आले वाटते आज.
मारुती: राहुल साहेब तुमच गाव कोणच जी?
साहेब: पोहना
मारुती: हे वडकीपासच पोहना का?
साहेब: नाही नागपूरजवळच पोहना
मारुती: म्हणूनच
साहेब: म्हणजे
मारुती: नाही म्हटल तो ओबामा का कोण येउन रायला म्हणून तुम्ही आले. नाहीतर तुम्ही कायले याले जात होता जी या आमच्या गावात. नाही तसा रस्त्ता हाय शिद्दा पण हे नदी आडप येते ना.
(साहेब फक्त हसतो, इक़डे तिकडे बघतो, गाव जवळ येताना दिसतेय, गाडी पुढे जातेय. दुरुन गाण्याचे सूर कानावर येतात. आता अधीर झालोया, मग बधीर झालोया तुझ्याचसाठी बनून मजनू माग आलोया. उडतय बुंगाट…. कच, कच असा ब्रेकचा आवाज येतो, गाडी खड्ड्यात पडून उसळल्याचा आवाज येतो. )
मारुती: म्या सांगतल नव्हत आमच गाव आल का पताच लागते म्हणून
(गाडीवर बसल्या बसल्याच कंबर धरीतच साहेब विचारतो)
साहेब: हे अस
मारुती: कस का असेना पता लागते का नाही. (तो गाडीचा लाइट समोरच्या बोर्डावर पडतो. मारुती तो बोर्ड वाचत बोलतो. साहेबही तिकडे बघतात) ते पाहा आल गाव बोरगाव (जनाजी) आपले सहर्ष स्वागत करीत आहे.’
साहेब: हागीणदारी युक्त गाव?
मारुती: युक्त नाही जी मुक्त हाय ते. हे पोट्टे व्हय, खर्रे खाउन थकुन ठेवते. बे बारक्या चहा पाठव बे
(तिकडन काही आवाज येत नाही, तिकडे जोरात गाणे चालल असत. झाल झिंग झिंग झिंगाट)
मारुती: पोट्टे झिंगाटले नुसते. (आवाज वाढवून) बे बारक्या
आवाज: का व्हय बे मारत्या?
मारुती: धा बारा चा पाठवून दे जो ग्रामपंचायतीच्या हापिसात. रवीभाउले बी पाठवून दे जो तिकड
(मारुती गाडीला किक मारतो. झिंग झिंग झिंगाटचा आवाज चालूच असतो. गाडी पुढे जाते. त्या बोर्डावर लिहिलेल दिसायला लागत. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान त्याखाली असनारा एक खड्डा त्यात साचलेल पाणी, गाळ, त्यावर बसलेल्या माशा. गाडी पुढे जाते दुरुन मारुतीचा आवाज येत राहतो)
मारुती: रवीभाउच दुकान म्हणजे मॉल हाय आमच्या गावचा, एकाच दुकानात समद्या गोष्टी भेटते. बिसलेऱ्या, पाणी पाउच, चीप्स च पाकीट, खर्रे, मोबाइलचा रिचार्ज समद येकाच दुकानात. रवीभाऊच दुकान नसत तर मोबाइलचा रिचार्ज माराले बी शयरात जा लागल असत पाहा. रवीभाउचा पोहा तर येक नंबर, सकाळच्या यसटीवाले पोहा खाल्याबिगर जातच नाही.
(बोरगाव जनाजी प्राथमिक शाळा असा बोर्ड लावलेली शाळेची इमारत, मारुती तेथेच गाडी उभी करतो आणि दोघेही चालत पुढे जातात. शाळेच्या भिंतीला तडे गेले असतात, ‘मुलगी शिकली तर कुटुंब शिकेल’ असे लिहिले असते त्यावरच मधे कुठेतरी बद्धकोष्ठावर खात्रीचा उपाय अशा प्रकारातली जाहीरात चिकटवली असते. त्या इमारतीच्या मागे शाळेचे पटांगण, शाळेच्या रस्त्यावर कचरा असतो ज्यात पान सुपारी मसाल्याचे रिकामे पाकीट, बिड्या, पाणी पाउचच्या रिकाम्या थैल्या, प्लास्टीक असा कचरा पसरलेला असतो. पटांगणात लोक बसलेले असतात. त्या बाजूला ग्रामपंचायतीचे छोटीसी इमारत, समोर पडवी. तिकडे एक ट्रॅक्टर उभा. काही तरुण पोर त्यावर बसलेली तर काही झेंडा असतो त्या पायऱ्यांवर बसलेली. बाया एकतर ग्रामपंचायतीच्या पायऱ्यांवर बसलेल्या किंवा खाली टाकलेल्या गोण्यावर बसलेल्या. काही छोटी मुल पळतात इकडून तिकडे काही गोण्यावर बसनू बसल्या जागेवर गोण्याचे दोरे काढत आहेत. काही खाटा टाकल्या आहेत त्यावर भाउराव काही माणसे बसलेली. श्रावण आणि त्याचे चमचे विरुद्ध बाजूला उभे असतात. भाउराव आणि त्याची माणस पंचेचाळीसच्या वरची तर श्रावण आणि त्याची माणस पस्तीसच्या खाली. बाया माणसांच्या आपल्या आपल्या गप्पा चाललेल्या असतात )
एक: भाउराव का म्हणते पाउस
भाउराव: काजी मिरग गेला, आडदडा संपत आला पण पावसाचा काही पता नाही. ची बहीण कुठ दडी मारुन बसला का.
दुसरा: काल कुठ गेलता श्रावण, म्या आलतो घराकड
श्रावण: वर्धेले गेलतो, येथ गावात बसून पापड भाजल्यान नाही होत सायबाच्या मांग मांग हिंडा लागते तवा कोठ काम होते.
शांता: बाइ साडी खासच घेतली जी, चांगली दिसते.
सरपंच: चांगली दिसते ना, माया बहीणीन दिली व्हय.
शांता: कानातले साडीले येकदम मॅचिंग झाले, नवीन घेतले का?
सरपंच: हो आता नागपूरले गेलती ना तेथच घेतले. चांगले हाय ना पाच हजाराचे हाय.
शांता: पता द्या न बर, नागपूरले गेली का पाहून येइन.
(मारुती आणि साहेब इकडे येताना बघताच गप्पा थांबतात, खाटेवर बसलेली माणसे उठतात)
सारे: या साहेब या बसा
(साहेब एका खाटेवर बसतो, एक पोरगा धावत येउन पाण्याची बॉटल साहेबाच्या हातात देतो साहेब त्या बॉटलकडे काहीसा आश्चर्यानेच बघतो.)
मारुती: घ्या साहेब बिसलेरी हाय, रवीभाऊच्याच दुकानातली हाय. यकदम चिल्डं हाय. काय हो रवीभाऊ?
रवीभाऊ: हो चिल्डं हाय
(साहेब बॉटलचे झाकण उघडून दोन चार घुट पाणी पितो)
मारुती: आमच्या गावात इहीरीले पाणी लागनार नाय साहेब पण बिसलेरी सापडते.
(साहेब फक्त हलका हसतो)
बसलेला एक: साहेब लइ थकले दिसता जी.
साहेब: नाही थकलो नाही फार. मी मागेच बसलो होतो गाडी हाच चालवत होता. अंतर जास्त आहे ना त्यामुळे तस वाटत असेल.
बसलेला: लांब कायच जी, हे नदीमुळ फेऱ्यान या लागते नायतर शिद्दाच रस्ता हाय.
(साहेब सहज मारुतीकडे वळून बघतो. मारुती सुद्धा मी हेच सांगितले होते अशा अविर्भावात साहेबांकडे बघतो. साहेब खाटेवर मागे होतो. कंबर धरतो आणि एक मोठा श्वास घेतो.)
बसलेला: साहेबाले सवय नाही वाटत इकडल्या रस्त्याची. गचके खाउन हाड खिळीखिळी झाली का?
साहेब: हो जरा जास्तच खड्डे होते रस्त्यात.
श्रावण: आता हे चालाचच रस्ता म्हटल का गड्डे आलेच. गड्ड्याबिगर कधी रस्ता होतो का?
भाऊराव: हो आता तुयासारखा ठेकेदार असल्यावर रस्त्यात गड्डे पडन नाही तर काय. अर्ध सिमिट आन गिट्टी तर घरातल्या स्लॅबमधीच भरतो.
श्रावण: ओ भाउराव काही बोलता काजी, काही पुरावा हाय का तुमच्या कड. बस आपल उचलली जीभ..
भाऊराव: पुरावा कायले पायजे ते दिसतच हाय येकावर येक मजले कसे चढून रायले ते.
श्रावण: तुमची काहून जळते माया मजल्यावर, तुमचे मजले कसे चढून रायले आमाले का मालूम नाही म्हणता का? बोलाले लावू नका आता. तुमाले समजते का रस्त्यातल काही. समजत नाही बाजारहाट आन चाल म्हणे हिंगणघाट. (इतर लोकांकडे बघत) त्याच काय हाय आपल्या इथली मातीच तशी रायते न जी. लइ भुसभुशीत हाय. येच्यावर  कितीबी डांबर टाका, कितीबी गिट्टी टाका पकडच घेत नाही ते. अशान का रस्ता टिकनार हाय. एका पाण्यात सार वाहून जाते. मुळात मुद्दलातच खोटी असन तर कोन का करन जी. काजी साहेब.
(साहेब पाणी पित असतो, अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळतो. ठसका लागतो. काय उत्तर द्यावे सुचत नाही. मग थोडा सावरुन बोलतो)
साहेब: बरोबर आहे.
भाऊराव: कायच बरोबर जी साहेब. काय नाव काय तुमच साहेब?
साहेब: राहुल जाधव
भाऊराव: मी काय म्हणतो तो जाधव साहेब तो ओबामा का कोण येनार म्हणते त्याले का अशा रस्त्यावरुन आणनार तुम्ही? या रस्त्त्यावरुन येक डाव आल का कंबर लचकलीच म्हणून समजा, तुम्ही तर पायलच. गचका बसाच्या अगुदर रस्ता इचारत नाही तू ओबामा हाय का मारत्या म्हणून. साऱ्यायले येकसारखा गचका बसते.
श्रावण: तुमची नाही मोडली कंबर कधी, त्या ओबामाची मोडन कान. फुकाच्या बाता नुसत्या.
भाऊराव: ह्या फुकाच्या बाता हाय, समोर येवढ उदाहरण हाय. (साहेब ओशाळतो सावरुन व्यवस्थित बसतो) साहेब तो ओबामा का कोणी खरच येनार असन तर रस्त्याच तेवढ मनावर घ्याच.
साहेब: तुमचे म्हणणे बरोबर आहे. रस्ता असा ठेवता येनार नाही, चांगला करावा लागेल.
भाऊराव: हं आता कसे बोलला, हे येकदम बेस, येक नंबर (श्रावण कडे नजर टाकतो)बस ते शर्टाले ठिगळ लावल्यावाणी नुसते गडडे नका बुजवु. चांगला पक्का रस्त्ता करा साहेब येकदाचा.
साहेब: मी बोलतो कलेक्टर साहेबांशी. तुम्ही मात्र गावातल मनावर घ्या. केवढा मोठा खड्डा आहे तो, आणि स्ट्रीट लाइटचे काय? (गावातल्या लोकांचे चेहरे ब्लँक, कुणी ग्रामपंचायतीतल्या ट्युब लाइटकडे बघतो. त्यांचे चेहरे बघून साहेबांना त्यांची चूक उमगते) सॉरी रस्त्यावरचे लाइट, दिवे बंद होते सगळे फक्त एक दिवा चालू होता.
श्रावण: तो बी कालच बनवून घेतला नाहीतर अंधारच होता सारा.
भाऊराव: हे गावातले पोट्टे व्हय जी गोटे मारुन बल्ब फोडून टाकते. बे पोट्टेहो का करुन रायले बे तेथ. कायले गोण्याच्या सूत ओढून रायले. तुमच कोणत काम हाय येथ. चला पळा घराकड. चांगला अभ्यास गिभ्यास कराचा सोडून बसले इथ गोष्टी आयकत. (गोण्याचे धागे ओढनारे पोर थबकतात. काही पोर उठून जातात काही तिथेच शांत बसले राहतात) साहेब पण ते खबर तर पक्की हाय ना.
साहेब: कोणती?
भाऊराव: हेच ते ओबामा का कोण गावात येनार हाय ते.
साहेब: हो, का?
भाऊराव: नाही तुम्ही आपले म्हणून तुम्हाले स्पष्टच सांगतो. आमच गाव पडते अस नदीच्या आडप. येथ कोणचा साहेब काय पटवारी बी येत नाही. तुम्ही नवे असान म्हणून आला गावात. अशा गावात तो ओबामा का कोण कायले याले जाइन बॉ. नाही आपण येवढी तयारी गियारी कराची आन ऐन टायमावर त्यान चाट द्याची. नाही म्हणजे वऱ्हाडी हाय, बँड हाय पण नवरानवरीच गायब का जी ?
साहेब: येनार तर आहे, तस मेल सुद्धा आलेल आहे. (अस म्हणून साहेब त्याच्या बॅगची चैन उघडतो. लोकांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह, पोर परत गोण्याचे सूत काढण्यात गुंतले. दूर हातात तपकीर घेउन बसलेल्या बायांमधे हळू आवाजात खुसपुस सुरु होते)
एक: मेलं तर कस आल व
दुसरी: काजीनकाबा, काहीतरी येगळ असन
एक: म्हणजी.
दुसरी: ते नाही का नर्स बाइ फिमेल फिमेल करते. तस काही असन
(साहेब कागद काढून भाउरावांच्या हातात देतो)
एक: नाही व कागदाची काहीतरी भानगड दिसते. तो साहेब पाय कागूदच दाखवून रायला.
भाऊराव: कागद राहू द्या तुमच्याकड. आम्हा कास्तकाराले वाघाच जेवढ भेव वाटत नाही ना तेवढ त्या कागदाच वाटत. तुमच्या शब्दावर भरोसा हाय आमचा. तो येतोच म्हणत असन तर त्याच अस जंगी स्वागत करु का तो बी का याद राखन. काहो गाववाल बराबर हाय का नाही.
एक आवाज: करु म्हणजे काय कराच लागन.
दुसरा आवाज: करुच करु.
तिसरा आवाज: समदे काहीतरी करु.
भाऊराव: सारा गाव धावते पाहा. तुम्ही त्या गड्ड्याच लाइटाच टेंशन घेउच नका. ते मायाकड लागल. दोन दिवसात गड्डा बुजवुन टाकू त्याले का लागते जी. कारे श्रावण बुजवशीन का नाही गड्डा. गावासाठी येवढ तरी करशील का नाही?
श्रावण: (हातातल्या खर्रा चमच्याकडे देत) मी करतच रायतो तुम्हालेच दिसत नाही. गावासाठी तर आपली जान बी हाजिर हाय. एका दिवसात गड्डा बुजवुन टाकू. तुम्ही तेवढ लायटाच पाहा. नाहीतर एन टायमावर ओबामाच्या गळ्यात हार टाकाचा सोडून भलत्त्याच कुणाच्या गळ्यात हार टाकाल.
भाऊराव: लायटाच करतो मी बराबर मले शिकवू नको. त्याच्या स्वागताची बी जंगी तयारी करु. गावातल्या बायायले पातळ आन चार शायन्या माणसाले, श्रावण तुले बी धरल त्याच्यात सफाऱ्या शिवून देउ. गावातल्या बायका ते टिका लावाच, ओवाळा गिवाळाच पायतील. येथ मस्तपैकी स्टेज बनवू. दोन माइक लावू चार कोपऱ्यात चार स्पिकर लावू. स्टेजच्या मांग त्या ओबामाच मोठ पोस्टर लावू, खाली गावातल्या चार पाच माणसाचे फोटो लावू. पायजेन का नाही. चांगल्या खुर्च्या घेउन येउ, मारत्या हे तुयाकड लागल, त्या रतनपूरवाल्याच्या खुर्च्या नको आणू हिंगणघाटवाल्याच्या आण. ची बहीन त्या रतनपूरवाल्याच्या खुर्च्यांमंधी बी खटमल रायते. हिंगणघाटाहूनच बँड बोलवू, फटाके लावू. असा बार उडवून देउ ची बहीण. मी सोता पुढ राहून त्याच स्वागत करतो.
साहेब: आपण गावाचे सरपंच का?
भाउराव: मी नाही जी. मायी बायको हाय  सरपंच.
साहेब: मग गावचे सरपंच या नात्यान स्वागताच मान त्यांचा. तुम्हाला प्रेक्षकात बसावे लागेल.
( साहेबांच्या या उत्तराने भाउराव ओशाळतो. खाली बघतो. त्याची थोडी चिडचिड होते तरीही साहेबांच्या म्हणण्याला मान डोलावतो. श्रावण तोंडातला खर्रा चघळत आपल्या चमच्यांकडे बघून गालातल्या गालत हसतो. मागच्या इंदीरा गांधींच्या फोटोच्या वरच्या खिळ्याला कोणीतरी अडकवून ठेवलेली टोपी खाली पडते आणि इंदीरा गांधींचा चेहरा दिसायला लागतो. सरपंच दिसतात.)
भाऊराव: तस म्हणता, ठीक हाय. जे काही व्हाच ते तुमच्या प्रोसिजर परमान होउ द्या. आम्ही आहोच काही मदत गिदत लागली तर.
(सरपंच बाइ उगाचच साडीचा पदर व्यवस्थित करतात. साहेब घाम टिपतो, दोन घुट पाणी पितो.)
साहेब: स्वागत मात्र जंगीच होउ द्या अगदी आपल्या पद्धतीच बँडबाजा सकट, हं फक्त ते फटाक्याच तेवढ राहू द्या.
(उगाचच टिंगल करायची म्हणून ट्रॅक्टरवर बसलेला सुरेश म्हणतो)
सुरेश: काहून फटाक्याच्या आवाजान तुमचा ओबामा पळून जाइल का बॉ?.
मारत्या: बे सुरशा समजत नाही तेथ तोंड कायले खुपसते बे.
सुरेश: तुले समजते ना मंग तूच सांग ना समजावून.
साहेब: फटाके किंवा इतर कुठल्याही स्फोटक पदार्थामुळे सेफ्टी चा इश्यू निर्माण होउ शकतो म्हणून मी फटाके नाही म्हटले.
(कोणाला काही फारसे कळत नाही. आतापर्यंत शांत असलेल्या सरपंच बाइ आता सरपंचाचे अवसान अंगात आणून विचारतात)
सरपंच: मले येक सांगा राहुल साहेब, मंगानपासून आपण येवढं ओबामा ओबामा असा जप करुन रायलो, हा ओबामा हाय कोण, कोण हाय हा ओबामा?
भाऊराव: हे पाहा आता, हीले हे बी ठाउक नाही, येवढ रामायण झाल आन हे बया इचारते रामाची सीता कोण? का माहीत का राहते हो तुम्हा बायाले? लइ मोठा साहेब हाय तो, साहेबाच्या साहेबापेक्षाही मोठा.
साहेब: ओबामा हा अमेरीकेचा प्रेसिडेंट आहे.
शांता: म्हणजी
साहेब: जसा भारत देश आहे तसा अमेरीका सुद्दा एक मोठा देश आहे.
शांता: आता हे कोठ आल म्हणाच आणखीन
मारुती: ए शांते कायच लावल व, कोण कुठ. ते अमेरीका लइ दूर रायते. पार साता समुद्रापार.
शांता: तू तेथ हिंडाले गेलता का?
मारुती: तेथ कायले जाले पायजे. तो रतनपूरच्या श्रीहरी पाटलाचा नातू नव्हता आला तो तेथच हाय अमेरीकेत. तोच सांगत व्हता.
(ट्रॅक्टरवर बसलेल्या पोरांना मात्र हा उगाच काहीतरी फेकतोय असच वाटते, सुरेश तशा नजरेने इतरांकडे बघतो. मारत्या त्याना समजवण्याच्या सुरात सांगतो.)
मारुती: आबे तो नाही काबे, तो आन त्याची बायको दोघबी हाफ पँट घालूनच फिरे गावात, वावरात कोठ बी. (दोन पोर काहीतरी आठवल्यासारखे करुन स्वतःचेच ओठ दाबतात)
सुरेश: काहून, तेथ का फुल पँट शिवनारे टेलर नाही का बा? अस असन तर आमच्या रंगराव टेलरले घेउन जा म्हणा तो मस्त शिवते फुल पँट.  आजकाल मारत्यासारखे पोट्टे बाट्टे बी फुलपँट घालून फिरते.
(अस म्हणत त्याने बाजूच्या पोराच्या हातावर टाळी दिली. साहेब सुद्दा हसले मारुती गप्प बसला.)
साहेब: दोन देशातले व्यापारी, सांस्कृतीक आणि राजकीय संबंध घनिष्ठ व्हावे म्हणून दोन देशांचे प्रमुख एकमेकांच्या देशांना भेटी देत असतात. ओबामांची भारत भेट सुद्दा त्यातलीच. भारत आणि अमेरीका यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावे, त्याच्यातल्या व्यापारात वाढ व्हावी, दोन देशात सांस्कृतीक देवाणघेवाण व्हावी म्हणून ओबामा भेट देत आहेत.
शांता: अरे बापा !! येवढ समद होइन काजी बोरगावात.
साहेब: (आपली चूक लक्षात आल्यासारख करुन) मी दोन देशातल्या परराष्ट्र संबंधांबाबत बोलत होतो.
(अस म्हणत साहेब आतापर्यंत हातात असलेली बिसलेरीची बॉटल खाली ठेवतो)
रवीभाउ: साहेब ते लोक बिसलऱ्या, कोका कोला हेच पित असन नाही.
साहेब: असेलही, का?
रवीभाउ: कोणी म्हणे नुसते बियरच पिते म्हणून. मले तसा स्टॉक ठेवा लागन जी.
साहेब: (हसत) तसेच काही नाही. त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था तेच करतील, त्यासाठी तुम्हाला स्टॉक ठेवावा लागनार नाही. हा पण सोबत जो लवाजामा असेल त्यांची मात्र सोय करावी लागेल. परत आसपासच्या गावातली लोकही येनार.
रवीभाउ: त्याच काही टेंशन नाही, चांगल धा बारा किलोचे भजे तळतो. पाणी पाउच, बिसलेऱ्या, चिप्सची पाकिट समद भरुन ठेवतो बराबर.
सरपंच: लवाजमा म्हणजे अस कितीक माणस येनार हाय जी साहेब?
साहेब: असेल शे पाचशे
सरपंच: शे पाचशे, येवढे. येवढ्या माणसायच कोणच काम हाय?
साहेब: आता ओबामा येताहेत म्हंटल्यावर त्यांच्यासोबत त्यांच्या देशाच शिष्टमंडळ, आपल्या देशाच शिष्टमंडळ, सिक्युरीटी, काही सरकारी माणसे असा लवाजामा हा असनारच.
सरपंच: बापा बापा, कोठ रायतील जे येवढी माणस? गावात तर राहाची काही सोय नाही.
मारत्या: ते काही मुक्कामान थोड येनार हाय, लागलाग येतीन आन जातीन. मोठच झाल तर दोनचार तास. का जी साहेब. (साहेब मान डोलवतात)
सरपंच: पण मारत्या मुक्कामान नाही आले तरी त्याले बसाले तर जागा लागन का नाही. कुठ बसवनार हाय त्यायले?
भाउराव: कुठ म्हणजे का आपल्या घरी. छपरी साफ करुन घेउ, आंगणात गोणे टाकून देउ बसतील तेथ ओबामा येतवरी. रवी देते त्यायले चहापाणी.
सरपंच: ते का माये इवाही हाय घरात बसवाले? येथच कोठतरी सोय पाहा त्यायची.
भाउराव: येथ? काही बोलते का तोंडाच्या आवडीन. येथ कोठ बसनार हाय? ग्रामपंचायतीवरच टिनाच छप्पर साल कधी उडन काही सांगता येत नाही. शाळेत तरी धड जागा हाय का पाहुणायले बसवायले.
(कुणाचा तरी मोबाइल वाजतो, आवाज वाढव डिजे तुला. फोन शांत होतो)
शांता: शाळेच तर सोडूनच द्या, बरसादीचे पोट्टेच काय मास्त्तरबी शाळा गळते म्हणून शाळेले चाट मारते. तेथ पाहुण्याले बसवाच?
सरपंच: कार्यक्रम येथ हाय ना तर पाहुण्याची बसायची सोय बी येथच पायजे. याले का जाते घरात बसवा म्हणून सांगाले, त्यायची सोय कोण पाहीन. मी ओबामाच्या स्वागताच पाहू का पाहुण्याची सोय पाहू. बसवाच नसन तर त्यायले शाळा दाखवून टाइम पास करा. का जी साहेब?
साहेब: शाळा दाखवायची कल्पना छान आहे सरपंच वहीनी. आपल्या देशातली माणसे त्यांच्या देशात जातात, नाव कमावतात, मोठमोठ्या पदावर काम करतात. कल्पना चावला, सुनिता विल्यम्स तर अंतराळात गेल्या होत्या. हे सार शिक्षण आणि मेहनतीच्या जोरावर. तेंव्हा इथल्या शिक्षण पद्धतीबद्दल अमेरीकेतील लोकांना नक्कीच कुतुहल असनार आहे. त्यांना आपल्या इथली शाळा दाखवू या.
भाउराव: शाळेत काय हाय दाखवासारख? क्रॅक गेलेल्या भिंती, तुटके बेंच आन शेंबडे पोट्टे. तसे कोणते दिवे लावते आपल्या शाळेतले पोट्टे. शाळेच तुम्ही राहूच द्या साहेब (कुणाचा तरी मोबाइल वाजतो, आवाज वाढव डीजे तुला.) मंगानपासून कोणाचा फोन वाजत हाय बे, गळा दाबान त्याचा. येथ येवढ महत्वाच बोलन चालल आन नको तेथ यायचे फोन वाजते मधामधात.
शांता: आता तो ओबामा येनार हाय म्हणून येवढ काम काढलच हाय तर शाळा कायले ठेवाची. कामात काम ते बी करुन घ्या.
भाउराव: अव शांते नुसत्या भिती उभ्या करुन शाळा व्हते का? आपल्या पोट्ट्यायले अक्कल कुठ हाय. (दूर मुलांकडे बघत) बे पोट्टेहो ते का मुताची जागा हाय का बे. जा तिकड. (परत शांताला समजावत) त्यायन इंग्रजीत प्रश्न इचारला तर पोट्ट्यायच जाउ द्या मास्तरले तरी समजन का नाही शंका हाय.
(परत मोबाइल वाजतो, भाउराव आवाजाच्या दिशेने नुसता बघतो,)
साहेब: गावात मोबाइल बरेच आहे वाटत
मारत्या: प्रत्येकाकड मोबाइल रायतेच ना जी गावात. आता तर गाणे आयकाले बी मोबाइल पायजे. ते रेडीओ तर कवाच बंद झाले.
साहेब: अरे वा छान आहे. बर काय बोलत होतो आपण शाळेविषयी. तसे शांताताईंच सजेशन उत्तम आहे. शाळा दाखवायची की नाही हे नंतरही ठरवता येइल पण शाळेची डागडुजी करुन घेउ.
सरपंच: शाळेची डागडुजी करन तस सोप काम नाही साहेब. लगीत पैसे लागन त्याले, कोठून आणाचे येवढे पैसे.
भाउराव: त्याच्यात काय मोठ, जाउ देशपांडे सायबाकड.
सरपंच: ते देशपांडे साहेबाच राहू द्या, ते का बोलते काही समजत नाही. हा निधी, तो निधी, हे बजट, ते बजट. पैसा काही मंजूर करत नाही.
साहेब: तुम्ही अस करा मग, काय काय काम करायची आहे याची एक यादी बनवा, त्याला लागनारा अंदाजे खर्च लिहा. ती यादी या मारुतीच्या हातून माझ्याकडे पाठवून द्या.
सरपंच: म्या करते लीस्ट, काही इसरल गिसरल तर सांगाले मारत्या, शांता आमचे हे हायेच. (मारत्या मान डोलावतो, शांता हो म्हणते, भाउराव नुसतेच बघतात.)
रवीभाउ: ते फाट्यावर सुपर गाड्याचा स्टापबी करुन टाका. येवढा ओबामा येनार हाय तर येसटीचा स्टाप पायजेन का नाही गावात. माया दुकानाच्या समोरच ठेवा स्टाप.
सुरेश: नाहीतर रवीभाउ गावाच नावच बदलवून घ्यान, बोरगाव जनाजी च बोरगाव ओबामा करुन टाका साल्याले.
भाउराव: अजून लीस्ट बनवालेच घेतली नाहीतर यायच सुरु झाल. ते लीस्ट बनन कवा, साहेब त्याच्यावर काम करल कवा, अन पैसे भेटन कवा, कायचाच पता नाही अजून. कायच्यात काय फाटक्यात पाय.
साहेब: तुम्ही लवकर लीस्ट तयार करा मी स्वतः ती घेउन जातो कलेक्टर साहेबांकडे. आता ओबामाच येनार आहे म्हटल्यावर पैशाची काळजी कशाला करायची.
शांता: लोक तर लइच भेते म्हणाचे ओबामाले, तो का खातो का बा?
मारत्या: तस नाही पण लइ पॉवरबाज माणूस हाय तो. मांग म्या पेपरात वाचल होत त्यान त्या ओसामाले म्हणे त्याच्या घरात धसुन मारला होता.
सुरेस: त्याले का लागते, कालच बोकड्याच्या पोट्ट्यान गंगीच्या भाच्याले त्याच्या घरात धसुन कुटला. काहो रवीभाऊ. रवीभाऊल तर माहीत हाय. त्यायच्याच दुकानात बाचाबाची झालती.
मारत्या: आबे खेड्यातल्या येड्यावानी बोलू नका.
सुरेस: तू लइ शायना हाय ना मंग तूच सांग. तो फाटक तोडून घरात धसला का फाटकावरुन उडी मारुन गेला.
मारत्या: कायले चिंध्या फाडून रायले बे. तो तसा फाटक गिटक तोडून नाही गेला, छपरातून धसला डायरेक्ट.
सुरेस: च्यामा…, हे खासच, सांगनार सांगतो आन आम्ही आयकतो.
मारत्या: तुम्हाले ओसामा म्हणजे मजाक वाटली का बे. तो लइ म्हणजे लइ डेंजर माणूस होता. त्यान कितीका हजार माणस मारली म्हणे. अशा माणसाले शिद शिद नाही मारता येत त्याच्यासाठी मिशन करा लागते मिशन.
श्रावण: (तोंडातला खर्रा थुकत) हे काय नव आणखीन, ट्रॅक्टरच मशीन, थ्रेशरच मशीन आयकल व्हत.
मारत्या: मशीन नाही गा श्रावण मिशन, मिशन म्हणजे कोण्या डेंजर माणसाले इचार करुन, ठरवुन माराच. य़ेकट्या दुकट्यान नाही जाच तर सोबतीले चांगल पंधरा वीस तयार माणस घेउन जाच, बंदुका, बॉम्ब गोळे अस सार संग न्याच. त्या ओबामान अस मिशन केलत. तो सोता नाही गेलता तेथ त्यान माणस पाठवले. तस मिशन कराले लइ पॉवर लागते राज्या. अस येड्यावाणी घरात धसल आन मारल अस केल्यान नाही होत.
(मारुतीचे बोलने ऐकून साऱ्यांनाच ओबामा म्हणजे कोणीतरी मोठा माणूस आहे असे वाटायला लागले. सारेच आश्चर्यचकीत होउन ऐकत होते. अशात आतापर्यंत साऱ्या गोष्टी शांतपणे ऐकनार एक बुजुर्ग बोलायला लागला.)
बुजुर्ग: मी काय म्हणतो
रवीभाउ: बोल बुढ्या बोल तु बी बोलून घे.
बुजुर्ग: हा जो कोणी पॉवरबाज ओबामा हाय तो आपल्या गावात आला तर त्याले आपण वळखाच कस? आपण समजाच कस का हाच ओबामा हाय ते. आपल्याल का मालूम तो काळा का गोरा, ठुस्सा का लंबा.
भाउराव: जसाकाही तो तुया घरात धसुन तुया बकऱ्याच चोरुन नेणार हाय. तुले ओबामा म्हणजे कोण वाटला बे. आपण येथ त्याच्या स्वागताले बसलो हाय का चोरं पकडाले. आता मारत्यान सांगतल ना तो लइ मोठा माणूस हाय ते. अशा मोठ्या लोकायची मोठी गाडी रायते.
साहेब: तुम्हाला फोटो बघायचा असेल तर तसा फोटो आहे माझ्याकडे. एक मिनिट हं दाखवतो.
(साहेब बॅगमधे फोटो शोधतात)
रवीभाउ: साहेब खरच त्यायची गाडी खरच लइ मोठी रायते का जी?
मारत्या: दोन खासरायेवढी रायते म्हणते ना गा
रवीभाउ: का करत असन येवढ्या गाडीच?
मारत्या: त्या गाडीतच बंदी सोय रायते म्हणते खाची, प्याची, झोपाची.
श्रावण: मुताची नाही
मारत्या: काही का, साहेब रायते का तशी सोय?
साहेब: ऑं ( साहेब बॅगेत फोटोच शोधत होते, आलेल्या प्रश्नामुळे साहेब गोंधळतात, फोटो सापडल्यावर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत. फोटो म्हणजे एका वृत्तपत्रातले कटींग) हा बघा फोटो
मारत्या: घे बुढ्या पाहून घे चांगला. बाकीच्यायले बी दे. पास करत राय.
(बुजुर्ग फोटो बघतो, डोळ्याजवळ नेउन चांगला निरखून बघतो, मागल्या बाजूनेही काही आहे का बघतो. मग विचारतो)
बुजुर्ग: हे तर पोरगच दिसत हाय.
मारत्या: नाही गा चांगला चाळीशीचा माणूस हाय.
बुजुर्ग: आमच्यासाठी पोरगच झाल न. येवढा मोठा ओबामा हाय म्हणते तवा एखादा बुजुर्ग माणूस तरी बसवाचा ओबामा म्हणून. पोराबाळाचा काही नेम सांगता येते का. गेली डोसक्यात हवा म्हणजी काहीबी करुन बसन. फुकटचीच पंचाइत व्हाची.
(बुजुर्ग व्यक्तीच्या या युक्तीवादावर सारेच हसतात. भाउराव ‘तुलेच नेउन बसावाच होत’ अस हसत म्हणतात. सारे कुतुहलाने फोटो बघतात. शेवटी फोटो साहेबांना आणून देतात.)
साहेब: बर झाल असेल तर निघतो मी आता. मारुतीला मला सोडून परत यायचे आहे.
(असे म्हणत साहेब हातातले पेपर बॅगमधे ठेवायला लागतात. अचानक काहीतरी आठवल्याच करुन साहेब परत सरपंचांकडे बघत बोलतात)
साहेब: महत्वाच सांगायचे राहीले गावात उघडी गटार वगेरे असेल तर बुजवुन टाका उगाच मच्छरांचा त्रास नको. ओबामा यायच्या दिवशी रस्ते साफ करुन घ्या. तसा मी परत एकदा येइलच पाहणी करायला.
सरपंच: तुम्ही त्याच टेंशन घेउ नका करु बरोबर .
साहेब: आणि हो हागीणदारी वगेरे गावात असेल तर बंद करा. खरोखर बंद, फक्त बंद असल्याचे बोर्ड नाही.
सरपंच: ए शेवंते आयकल ना साहेबान का सांगतल ते. बंद म्हणजे बंद. आता का तू कोठ टमरेल घेउन जाताना दिसली ना तर तंगडच मोडून ठेवील.
शेवंता: नाही न जी, काही का. म्या जातच नाही.
(तेवढ्यात कुणीतरी शाळेच्या बाजूने जोरजोरात गाणे म्हणत जात असतो. लोग कहते है मुझे मै शराबी हूं तुझ्या आज्याची येकायेकाले फोडून काढतो सालेहो. मै शराबी हूं. त्याच्या चालीवरुन तो व्यक्ती दारु पिउन असावा असे दिसते. माणस टक लावून बघत असतात. बाया आपसात कुजबुजायला लागतात.)
एक: कोण व्हय
दुसरी: किसन, चिचपासच्या सखूच पोरग.
एक: ते डोंगेवाली सखू
एक: तेच तेच, हे रोजचच हाय त्याच, डोंगे बंद झाल्यापासून रिकाम हाय मंग येते पिउन. काही नाही सापडल का मायलेच झोडते.
(साहेब हे काय चालले म्हणून सरपंचांकडे बघतात. श्रावण आता फजिती होनार अशा कुत्सित नजरेने चमच्यांकडे बघतो. साहेब आपल्याकडे बघत आहे हे माहीत असूनही सरपंच बाइ तिथेच बसलेल्या पंजाबकडे प्रश्नार्थक नजरेने बघतात. त्याला नजरेनेच हे काय चालले ते विचारतात)
पंजाब: मायाकड नका पाहू बाइ, तुम्ही सरपंच झाल्यापासून बंद हाय. कोणी दुसऱ्या गावातून पिउन आला तर मी का करु?
सरपंच: तू तुयी भट्टी बंद ठेव फक्त. डोंगेवाल्या सखूचच पोरग हाय ना हे?
(एक दोघी बाया होकारार्थी मान डोलावतात. सरपंच बाइ पण काहीतरी ठरविल्यासारखी मान हलवतात. तो व्यक्ती तसाच गाण म्हणत दूर निघून जातो. साहेब आपली बॅग भरुन उठतात. साहेब नाही म्हणत असतानाही मारुती साहेबांच्या हातातली बॅग घेतो. )
सुरेश: साहेब येक शेवटल इचारु का?
(सुरेशाचा प्रश्न मारुतीला अजिबात आवडला नसतो. हा परत काहीतरी टवाळी करनार असेच त्याला वाटत असते. तो रागाने बघतो आणि टाळायला म्हणून भरभर निघतो. साहेबसुद्धा काहीसे नाइलाजानेच म्हणतात.)
साहेब: विचारा
सुरेश: नाही हा जो कोणी ओबामा हाय हा बोरगावात कायले येउन रायला बा.
साहेब: मला नक्की कारण सांगता येनार नाही.
सुरेश: नाही म्हणजे बोरगावच का बा? येथ अस का हाय पाहासारख?
साहेब: (साहेब काहीतरी टाळायचे म्हणून उत्तर देतात) येत असेल शेतीवाडी बघायला.
रवीभाउ: शेतीवाडी आन येथली. त्याच्यात काय हाय पायण्याजोग. नेहमीचच रडण हाय. दरसाली आज येइन, उद्या येइन करत पावसाची वाट पाहा. पाउस आला तर मजूरायची बोंब. मजूर सापडतच नाही. येवढ करुन पिक उभ रायल तर आभाळाचा काही नेम नाही, पार फुलावर आलेल्या तुरीले किड लागते दोन दिवसाच्या आभाळात. अशान का पिकनार हाय जी. पिकल तर त्याले भाव बी कोठ हाय. व्यापारी ठरवन तो भाव. तेथ कास्तकाराले कोण इचारते? मारत्या मारे बोर गिर खोदतो म्हणे, कायका आवळ्याची शेती करतो म्हणे. कोणची का सरकारी सवलत घेतो म्हणे. कायच. बोर खोदली तर पाणी लागलच नाही. कर्ज डोक्यावर झाल. सरकारची सवलत काही काही भेटली नाही. मारतोय चकरा कचेरीच्या पण कोणी भाव देत नाही तेथ. डोक्यावर येवढ कर्ज होउन गेल का आता अमदा पेराचे वांधे हाय. त्या ओबामाले सांगा येथ काही नाही हाय पाहाले. सारा मला पहा आन फुल वाहा असाच कारभार हाय.
(रवीभाउच्या गंभीर उत्तराने साहेबही दचकले. आपण उगाचच असे टोलवाटोलवीच्या उत्तर दिले असे साहेबांना वाटले. आता काय उत्तर द्यावे हेही कळत नव्हते. त्यामुळे सारे एकाच जागी शांत होते. अचानाक वातावरणात गंभीरता आली होती. तेवढ्यात काही पाच सहा वर्षाची मुल बबल उडावयाचे साहीत्य घेउन बबल उडवत पळत आले. समोर बबल, त्यामागे एक मूल त्यामागे दोन तीन मुल अशी आवाज करीत पळत आली. एक बबल उडून भाउरावच्या समोरुन गेल. समोर भाउरावला बघताच आपण चुकीच्या ठिकाणी आलो हे मुलांच्या लक्षात आले. त्यांनी इकडे तिकडे बघितले आणि परत शाळेकडे पळाले. मुल पळाले तरीही भाउराव त्यांच्यावर ओरडला)
भाउराव: बे पोट्टेहो अजून झोपलेच नाही का बे . जान घरी झोपा आता.
(काही वेळापूर्वी वातावरणात आलेला तणाव त्यामुळे कमी झाला. साहेब न बोलता खाली मान घालून चालायला लागले. त्यांच्या मागे मारुतीही चालायला लागला. आता मागचेही सारे उठले. मागे लोकांच्या चर्चा चालूच होत्या.)
..कवा यायचा म्हणाचा हा ओबामा?
..तारीख पक्की नाही म्हणते.
..तो यायच्या अगुदर निंदन गिंदन आटपून घ्या लागन.
..तुले त्याचीच पडली रायते सदानकदा.
..सुरेस तुया मास्तरीणीच नाही सांगतल, गावाले एखादी चांगली मास्तरीण बी पायजे म्हणा.
..ए शांते उद्या ये, ते लीस्ट कराले
..येते येते, ते नागपूरच्या सोनाराचा पत्ता तेवढा दे जा.
(मारूती आधीच दूर गेलेला असतो आणि साहेबसुद्धा या आवाजापासून दूर जातात आणि मोटार सायकलच्या जवळ येतात. तेथे अंधार असतो.)
मारूती: रवीभाउच म्हणन काही मनावर घेउ नका. तो दोस्त हाय आपला म्हणून बोलला.
(साहेब शांतच असतात. मारुती गाडी काढतो. एक हळू आवाज येतो ‘मारुती भाउ’. दोघांचेही त्याकडे लक्ष नसते. मारुती साहेबांची बॅग समोर ठेवतो. टांग मारुन गाडीवर बसतो. साहेबही गाडीवर बसतात. परत तोच आवाज येतो. ‘मारुती भाउ’. दोघेही अंधाराच्या दिशेने बघतात. एक व्यक्ती उभा असतो.)
मारुती: बे गण्या तू का करुन रायला बे येथ अंधारात?
गण्या: हेच व्हय का ते ओबामा.
मारुती: नाही बे हे आपले साहेब व्हय ते ओबामा मंग येनार हाय. काहून तुले कोणच काम पडल ओबामा संग.
गण्या: मालकाले सांगा ना माय लगन लावून द्याले.
मारुती: च्या बहीण. आता तुय लगीन लावून द्यायले बी ओबामा पायजेन का गा. हे तर साल खूपच झाल. सांगतो, सांगतो .
(गण्या मान डोलावतो. मारुती किक मारुन गाडी सुरु करतो आणि निघतो. गण्या मोठ्या आशेने अंधारात दूर जानाऱ्या गाडीकडे बघत उभा राहतो. अंधारात मारुतीचा आवाज येतो हळूहळू गाडीचा लाइट कमी होतो.)
मारुती: भाउरावचा ढोरकी व्हय, कोणी लक्ष देत नाही त्याच्याकड. ढोरकी हाय याले कोण पोरगी देइन जी. बरोबरीच्या पोर दोन लेकराचे बाप झाले आन हा रायला तसाच.
(सकाळचा दिवस एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याचे घर. अंगणात दोन म्हशी दोन गायी बांधलेल्या. घरावर मराठी कवेलुचे छप्पर. त्यावर टिव्हीची डीश. आत एक पलंग. पलंगाच्या बाजूला एक टेबल, त्यावर जुना मोठा टिव्ही. मोठ्या आवाजात टिव्ही चालू आहे. टिव्हीवर नवीन हिंदी सिनेमाची गाणी चालू आहे. एक पाच सहा वर्षाचा मुलगा आणि सत्तरीच्या वरची म्हातारी टिव्ही बघत बसले आहे. मारूती आंघोळ करुन फक्त टॉवेल नेसून अंगणातून पहील्या खोलीत येतो. तोंडाने भिमरुपी महारुद्रा असा मारुती स्तोत्राचा जप करीत आहे. बसलेल्या पोराकडे बघून)
मारत्या: काबे शाळा नाही का आज?
(पोरगा मारुतीकडे बघतो आणि उठून बाहेर जातो. मारुती रिमोट घेउन चॅनेल बदलतो. चॅनेल बदलताना इंग्रजी बातम्यांमधे ओबामा दिसतो. मारुती ती संपूर्ण बातमी बघतो. मग बदलून कुठलातरी शेती या विषयावरचा कार्यक्रम लावतो. तोंडाने मारुती स्तोत्र चालूच असते. आत जाउन देवाला नमस्कार करतो. उदबत्ती लावतो. परत पहील्या खोलीत येतो. खिळ्याचा फुलपँट आणि शर्ट काढून घालतो. खिडकीत ठेवलेली घड्याळ घालतो. खिडकीतच ठेवलेले पाकीट उचलतो. पाकीट उघडून बघतो त्यात एक ओबामाचा फोटो असतो. तो त्याला नमस्कार करतो. ओबामाच्या फोटोचे चुंबन घेतो. जोरात आवाज देउन सांगतो)
मारत्या: म्या हिंगणघाटले जाउन येतो.
(आतली म्हातारी मान डोलावते. गाडीला किक मारुन मारुती निघतो. रस्त्यावर बाजूला काही माणसे इलेक्ट्रीकच्या पोलजवळ त्या पोलच्या दुरुस्तीचे काम करायचे आहे अशा रितीने उभे असतात. मारुती गाडी घेउन भाउरावच्या वाड्याजवळ उभा राहतो. गण्या मोठा खराटा घेउन झाडत असतो. म्हशीच्या ओरडण्याचा आवाज येतो.)
मारत्या: बे गण्या हाय का भाउराव घरात
गण्या: नाही मालक हिंगणघाटले गेले.
मारत्या: मालकीन
गण्या: मालकीन बी गेली. लगन हाय ना.
(परत म्हैस ओरडण्याचा आवाज येतो)
मारत्या: म्हस काहून वरडते बे.
गण्या:ते व्हय तिले न्या लागते
मारत्या: घेउन जा ना
गण्या: मालक उद्या घेउन जातो म्हणे.
मारत्या: गावात नको नेउ म्हणा. रतनपूरच्या पाटलाकड घेउन जा. म्हस फळते तेथ.
(मानेनेच हो म्हणतो)
मारत्या: येतो मी. म्या येउन गेलो म्हणून सांग जो तुया मालकाले.
(अस म्हणत गाडीला किक मारुन मारुती निघतो. शाळेसमोरुन जातो. शाळेच्या भितीच्या भेगा भरण्याचे काम पूर्ण होउन त्याची रंगरांगोटी चाललेली असते. फाट्यावर आल्यावर बोर्डाखालचा खड्डा भरलेला असतो. रवीभाउच्या दुकानात काही माणसे पेपरात डोके खुपसुन वाचत बसलेले असतात. मारुती गाडीवरुनच आवाज देतो. )
मारत्या: ओ रवीभाउ येतो जाउन हिंगणघाटले.
(रवीभाउ दुकानातूनच हात दाखवतो. रस्ता व्यवस्थित डांबरी झाला असतो. मारुती सुसाट गाडी पळवत निघून जातो)
(सरकारी ऑफिस. फाइलचा ढीग, समोर असनारे कांपुटर. बरेच टेबल खाली. मारुती आत येतो. तिथल्या तंबाखू घोटत बसलेल्या चपराशाला नमस्कार करीत मारुती विचारतो. )
मारत्या: हाय का जाधव साहेब.
(तो नजरेनेच हो म्हणतो. मारूती पुढे जातो. राहुल जाधव असिस्टंट कलेक्टर अशी पाटी असते. साहेब बसले असतात)
साहेब: अरे मारुती ये, चहा घेनार. घोरपडे दोन चहा पाठवा इकडे.
(असे म्हणत साहेब कांपुटरच्या मॉनिटरकडे बघत आपले काम करीत असतात. मारुती बोलत असतो पण त्यांचे लक्ष कामातच असते.)
मारत्या: ओबामाच्या नावन चमत्कारच झाला साहेब. रस्ता एकदम मस्त चिकना झाला आता येक गचका नाही. गड्डे बुजले. लाइटाच काम चालूच हाय. शाळा बी चमकून रायली. बस आता ते बेंच, फळे दुरुस्त कराच रायल तेवढ. (साहेबांचे अजूनही लक्ष नसतो. मारुती बोलायचा थांबतो आणि मग परत बोलायला लागतो) मंग ठरली का ओबामा यायची तारीख. नाही त्याच्या आत ते पैसे तेवढे मंजूर झाले तर रायलेल काम पण होउन जाइल.
साहेब: इंग्रजी वाचता येत
मारत्या: हे आपल थोडबहुत
साहेब: हे वाच
(असे म्हणत साहेब मॉनिटर मारुतीकडे फिरवतात. कोणीतरी साहेबांना आवाज देतो म्हणून साहेब उठून जातात. मारुती शब्दांची आणि स्पेलींगची जुळवणी करुन हळूहळू वाचतो.)
‘Dear Mr. Rahul Jadhav
We realized today that email about Obama visit to Borgaon in your area was sent to you by mistake. It was supposed to be sent to Mr. Rahul Yadav from Delhi (Rahul.yadav@) to visit Bhorgaon in his area. We appologize inconvenience caused to you.’
(मारुतीला पूर्ण मेल जरी कळले नाही तरी त्या मेलवरुन आता ओबामा काही आपल्या गावात येनार नाही हे कळते. तो उठून बाहेर येतो. तो मघाचा चपराशी विचारतो का रे मारत्या आज लवकरच चालला.
मारुती काही बोलत नाही. बाहेर येतो. गाडीला किक मारतो पण गाडी काही चालू होत नाही. खाली बसून स्पार्क प्लग काढून साफ करुन बघतो. मनातल्या मनात आता तुले का झाल आणखीन असे म्हणतो. असा काही वेळ गेल्यावर तिकडन साहेब येतात. )
साहेब: का रे मारुती काय झाल?
मारत्या: इंजीन फायर होत नाही, कचरा अडकला असन. साफ करा लागन.
साहेब: तू उठून का आला?
मारत्या: आता ओबामा येनार नाही म्हणते.
(साहेब एक लिफाफा काढतो आणि मारुतीला देतो)
मारत्या: हे काय
साहेब: तुझ्या सबसिडीचे पत्र. बँकेत पैसे जमा होतील. आधार कार्ड आहे ना. आणि बाइंना सांगा शाळेसाठी लागनारे सारे पैसे लवकरच पाठवतो म्हणून.
मारत्या: आता ओबामा तर नाही येत हाय.
साहेब: म्हणून शाळा भरु नये अस तर नाही ना. (मारुती डोळ्यानेच आभार मानतो. त्याच्या तोंडातून शब्दच निघत नाही.) मग कधी बोलवतो आम्हाला आवळे खायला.
मारत्या: तुम्ही कायले याले जाता आडगावात इतक्या दूर.
साहेब: काही दूर नाही. नदीमुळे फेरा पडतो नाहीतर सरळच रस्ता आहे.
(दोघेही हसतात. )

(संपूर्ण काल्पनिक)