नट्या नाटक करतो

एक उदयोन्मुख नटाची व्यथा नट्या नाटक करतो वाचन सुरू ठेवा

Rate this:

जोशाची गर्लफ्रेंड

जोशाची गर्लफ्रेंड

प्रेमात पडलेला बिचारा रोमँटीक कवितेचे पुस्तक शोधत असतो पण जग मात्र त्याला सतत त्याच्या रिकाम्या पासबुकचीच आठवण करुन देत असते. कुणी प्रेमात पडला की त्याची चारचौघात औकात काढायला जग टपलेले असत ‘बेटे कितना कमाते हो ?’. कमवायला आयुष्य पडलेय वयाच्या साठाव्या वर्षीही पैसे कमावता येतात पण प्रेमाची गोडी याच वयात. साठाव्या वर्षी प्रेमात पडल तर हेच लोक सुनावतील या वयात हे धंदे का म्हणून. जोशाची गर्लफ्रेंड वाचन सुरू ठेवा

Rate this:

उदंड झाले ……………..

 

एक बंदर
मी एकटा

“च्यायला मला वाटले मी एकटाच आहे पण इथे तर ……”

 

“We do not hire people from Amravati and Shivaji university.” चिडलेल्या स्वरात निर्मल नटाचारीला दिवसभरात काय घडले ते सांगत होता.
“च्यायला सकाळपासून फोन लावत होतो तो चार वाजता लागला. अन तो साला एचआरवाला म्हणतो We do not hire people from Amravati and Shivaji university. अरे आम्ही का आंघोळ करीत नाही? का आम्ही डीओ वापरीत नाही? का आमच्या अंगाचा फोनमधूनही वास येतो यांना. अरे इंटरव्यू कॉल तर द्या, नाही झाल सिलेक्शन तर पुढची गोष्ट. हे दारावरुनच सेल्समनला हाकल्यासारखे हाकलून लावतात. शेवटी माणूस सारीकडे एकच तर शिकनार ना. अमरावतीत युनिव्हर्सिटीत अस तर शिकवित नाही ना, थ्री व्हिलर आहे म्हणून त्याला थ्री स्ट्रोक इंजिन असते.”
“आबे जाउ दे यार या एचआरवाल्यांना अक्कल नसते.”

डोंबिविलीतल्या कनिफनाथ टपरीवर उभे राहून, चहाचा घूट घेत, फक्त डिप्लोमा शिकलेला आणि सेंट्रलाइजड एसीच्या मेंटनन्सचे अनिव्हल कॉँट्रक्ट घेणाऱ्या कंपनीत काम करनारा नटाचारी कुण्या मोठ्या आयटी कंपनीच्या एचआरच्या मॅनेजरची अक्कल काढीत होता. नटाचाऱ्याला येउन तीन महीणे झाली होती. तो निर्मलचा अगदी शाळेपासूनचा मित्र, घरची परिस्थिती हालाखीची. छोट्यामोठ्या नोकऱ्या करीत कसाबसा डिप्लोमा पूर्ण केला. निर्मल मुंबईत घर घेउन राहायला लागला आहे असे कळताच तो आपला बाडबिस्तर उचलून मुंबईत शिफ्ट झाला होता. मुंबईत सहज मिळनारी नोकरी हा जरी उद्देष असला तरी त्याचा मुख्य उद्देष होता नाटक. नटाचाऱ्याला दोन गोष्टींचा भारी शौक होता एक नाटक आणि दुसरे म्हणजे जेवण बनविणे. त्याच्या या गुणांमुळेच निर्मलच्या आप्पांनी त्याचे नांव नटाचारी (नट आणि आचारी) असे ठेवले होते. तेंव्हापासून सारे त्याला नटाचारीच म्हणतात. मुंबइत आल्यावर त्याला एका एसीच्या मेंटनन्सच्या कंपनीत नोकरी लागली. दिवसभर नोकरी आणि रात्री नाटक पाहणे हा त्याचा उद्योग. एका लग्नाची तीच गोष्ट, त्याची दहा वेळा बघून झाली होती. अख्या महाराष्ट्राला सही रे सहीचे तिकीट मिळत नव्हते पण या पठ्ठ्याने तीन महीन्यात सहा वेळा नाटक बघितले असेल. एक वेळ भरत जाधव डॉयलॉग विसरेल पण नटाचारी विसरायचा नाही. त्याला कोणी भरत जाधवच्या प्रॉम्प्टरचा रोल जरी दिला तरी तो एका पायावर करायला तयार होता. पण अजून पर्यंततरी त्याला कोणी साधे पडदा ओढायलाही बोलावले नव्हते. आता असे रात्री अपरात्री नाटक बघितले तर सकाळी उठायला उशीर होणारच, दांड्या माराव्या लागनारच. कोणाला कुठे काय टोपी द्यायची याबाबतीत नट्या वस्ताद. तो जरी डोंबिविलीतल्या पीसीओ बुथवर उभा असला तरी आपल्या बॉसला फोन करुन सांगायचा ‘इथे चेंबूरमधे ट्रक उलटलाय, ट्रॅफिक जॅम आहे, लांब लाइन लागली आहे, मला सायनला पोहचायला उशीर होइल.’

नटाचाऱ्याच्या कामामुळे त्याचा कंपन्यांमधे वेगवेगळ्या लोकांशी संबंध यायचा. त्यामुळे आपण कॉर्पोरेट जगातले कोणी ज्ञानी पुरुष आहोत या अविर्भावात तो वावरायचा. कुठल्याही प्रशानावर त्याचे एकच उत्तर ठरलेले ‘आपण कंपनीच्या रिसेप्शनपासून ते लेडीज टॉयलेट पर्यंत कुठेही घुसु शकतो. आपल्याला साऱ्या गोष्टीची खबर असते, आपल्यापासून काहीही लपलेले नाही. तुला सांगतो मित्रा त्या बॉसला त्याच्या कंपनीवरच्या केसपेक्षा रीसेप्शनसीस्टच्या केसांची जास्त काळजी असते. त्याचे लक्ष सतत तिकडेच असते. जगातल्या अर्ध्या कंपन्या रिसेप्शनीस्ट नाहीतर सेक्रेटरीमुळे बुडतात, राहीलेल्या अर्ध्या मालकाच्या आगाऊ धाडसामुळे बुडतात.’ आता नट्या सारख्याने असे तत्वज्ञान सांगने म्हणजे आयपीएल मधे नाचनाऱ्या मुलींनी क्रिकेटवर एक्सपर्ट कॉमेंट्री करण्यासारखे होते, तरी तो ते रोज सांगत होता आणि ऐकणारे ऐकत होते. नटाचाऱ्याच्या नियमाने चालले तर ज्या कंपनीची रिसेप्शनीस्ट सुंदर आहे त्या कंपनीचे भवितव्य काही खरे नाही असे समजावे लागेल. या अशा सरळ साध्या शिक्षणामुळे एमबीए सारखे जटील शिक्षण धोक्यात येइल.

“अरे यार चार महीने झाले मुंबइत येउन एक साधा साला इंटरव्यू कॉल नाही.”
“नोकरी चालू आहे ऩा”
“आबे मास्तरकीच करायची होती तर त्यासाठी इथे मुंबईत येउन त्या थेरड्याच्या कुचकड्यात राहायची काय गरज होती? मास्तरकी तर घरी आरामात बसून यवतमाळात पण करता आली असती.”
तेवढ्यात समोरुन एक सुंदर मुलगी गुडघ्यापर्यंतचा काळा स्कर्ट आणि वर पांढऱ्या रंगाचा टॉप घालून येत होती. नटाचाऱ्याची नजर त्या मुलीवर गेली
“आई शप्पथ! काSSय पोरगी आहे यार.” चांगली मुलगी बघताना आईची शप्पथ का घालतात देव जाणे.
“आबे मी इथे मर मर मरतोय तुला साल्या त्या पोरीची पडली आहे.”
“आबे तू तर तसाही मरनार आहेस ना तेंव्हा निदान ती पोरगी पाहून तरी मर.” असे म्हणत नट्या निर्मलला ओढतच तिच्यामागे ती कोणत्या सोसायटीत राहते हे बघायला घेउन गेला.
“तू काहीही म्हण यार निर्मल, डोंबिविली बनवण्यात देवान घाइ केली पण डोंबिविलीतल्या पोरी मात्र एकदम फुरसतीत बनवल्या.”

निर्मल मात्र कोपगृहातून बाहेर पडत नव्हता. त्याचे एचआरवाल्यांना शिव्या घालणे चालूच होते. खरेच बिचारे एचआरवाले कित्येक फ्रेशरचे आणि नोकरी पिपासू मुलांचे शिव्याशाप घेउन जगतात. बर या साऱ्यात त्यांचा काहीच दोष नसतो. त्यांचे बोलविते धनी कोणी वेगळेच असतात हे फक्त संदेशवाहक.

“तो एचआरवाला आम्हाला भिकारी समजतो की दारावर माल विकायला आलेला सेल्समन. साल आता तर त्या सेल्समनच्याही भावना समजायला लागल्या आणि भिकाऱ्यांच्या सुद्धा.”
“आबे जाउ दे बे, तू का एवढा मनाला लावून घेतो, तुला सांगितल न मी मघाशी. या एचआरवाल्यांने अक्कल नसते.”
“तू तुझ पुऱाण बंद कर बे.”
“मजाक नाही करत खरच सांगतो, तूच सांग तुमचे ते कोडींग करन कठीण आहे का बायोडेटामधे अमरावती, शिवाजी, मराठवाडा, ओरीसा, हैद्राबाद हे असे शब्द शोधन कठीण आहे. पुढे काय होते ते वाचा

मर मर बॅचलर

बुद्दीमान पुरुष
बुद्धिमान पुरुष

(नोंद: हे चित्र बोलक्या रेषावरुन श्री घनश्याम देशमुख यांच्या पूर्व परवानगीने इथे देण्यात आलेले आहे.) या देशात या बुद्धिमान पुरुषांचा कसा छळ होतो बघा.

‘आमच्या सोसायटीत बॅचलर्सला जागा भाड्याने देत नाहीत.’
निर्मलने कालपासून कमीत कमी वीस सोसायटीत तरी असला नियम वाचला होता. ह्या असल्या पाट्या वाचून त्याचे डोके जाम भडकले होते. ‘अरे हे साले का पैदाएशी मॅरीड होते? हे कधी बॅचलर नव्हतेच का? यांना काय वाटत आम्हाला काय बॅचलर राहायची हौस आली आहे म्हणून आम्ही असे संटे गलोगल्ली घर शोधत भटकतोय. अरे तुम्हीच नोकरी बिकरी लागून सेटल झाल्याशिवाय पोरगी देत नाही म्हणून आम्ही बॅचलर नाहीतर आम्ही केंव्हाही लग्न करायला तयार आहोत. अरे तुमच्यासारख्यांच्या पोरी सुखात नांदाव्या म्हणूनच तर कालपासून मी या पावसाची पर्वा न करता डोंबिविलीतल्या गल्लोगल्लीत घर शोधण्यासाठी दरदर भटकतोय. तरी तुम्ही आम्हाला असल्या रद्दी पाट्या दाखवता, तुम्हाला साली आमच्या भावनेची कदरच नाही. एकीकडे सरकार म्हणते बालविवाह करु नका आणि तुम्ही बॅचलरला घर देत नाही. मग आमच्यासारख्यांनी राहायचे तरी कुठे? झोपायचे तरी कुठे? फुटपाथवर. ह्या देशाचे भवितव्य घडवणारे हे अभियंते असेच फुटपाथवर सडू द्यायचे. ते काही नाही थोडस स्थिरस्थावर झाले की तुमच्या विरुद्ध एखादी पीआयएलच (Public Interest Litigation) टाकतो. बॅचलरला घर देत नाही का? माझ्याकडे पैसे नाही म्हणून नाहीतर मी फक्त बॅचलरसाठी सोसायटी बांधली असती त्यावर मोठा बोर्ड लावला असता इथे मॅरीडला प्रवेश नाही. दुसरी कोणतीच अट नाही. तुम्ही मराठी असा की दक्षिणी की गुजराती काही फरक पडत नाही फक्त बॅचलर पाहीजे. कांदा खा, लसूण खा, अंडी खा, चिकन खा, मच्छी खा, दारु प्या काही फरक पडत नाही. हुल्लड घाला हैदोस घाला काही फरक पडत नाही अट फक्त एकच बॅचलर पाहीजे. दूध जळून खाक होइपर्यंत तापवा, त्याचा धूर सर्व सोसाटीत पसरु द्या. रात्री अपरात्री केंव्हाही घरी या, दिवे विझवू नका राहू द्या तसेच, पाण्याचे नळ खुले सोडून निघून जा, पाणी तुंबल म्हणून येउ द्या च्यायला खालच्याला बोंबलत. कशाचीच पर्वा नाही अट फक्त एकच बॅचलर पाहीजे. तुमच्या या सोवळ्या सोसायटीसमोरच माझी सोसायटी बांधतो बघा, सालेहो बॅचलरला घर देत नाही. आबे आम्ही का तुमच्या पोरी पळवून नेणार आहोत का? मी म्हणतो आम्ही पळवून नेल्या तर कल्याणच होइल तुमच्या पोरींच. आमच्या सोबत निदान बायको म्हणून तरी राहतील, त्या साल्या लग्न झालेल्यानी पळवून नेल्या तर काय होइल त्यांच? तरी तुम्हाला तेच चालतात.’
निर्मल किंवा निर्मल उत्तरवार असा भडकल्या डोक्याने विचार करीत डोंबिविलीत घर शोधत भटकत होता. सुरवातीला तो कुठल्यातरी आमदाराची चिठ्ठी घेउन आमदार निवासात राहत होता. आता पंधरा दिवस झाले कळव्याच्या इंजिनियरींग कॉलेजमधे प्राध्यापकाची नोकरी लागल्यापासून तो इकडे घर शोधतोय. सुरवातीला काही दिवस डोंबिविली की बदलापूर हेच करण्यात गेले. शेवटी डोंबिविलीतल्या रस्त्यारस्त्यावर दिसनाऱ्या रंगीबिरंगी हिरवळीने बदलापूरतल्या हिरव्यागार हिरवळीवर मात केली आणि निर्मलने डोंबिविलीत घर शोधण्याचा निर्णय घेतला. भलेही जनाच्या समाधानासाठी त्याने डोंबिवीलीत नव्वद टक्के लोक पदवीधर आहेत, पंचाहत्तर टक्के लोक नोकरदार आहे तेंव्हा येथे माझ्या बौद्धिक सामर्थ्याला बराच वाव आहे. असली गलिच्छ कारणे शोधली. त्याने अधून मधून घर शोधले पण लवकरच त्याच्या लक्षात आले की डोंबिविलीत कुण्या बॅचलरने घर शोधने हे फार अवघड काम आहे. सकाळपासून कोसळणारा पाउस, जागा मिळेल तिथे लटकलेल्या पाट्या, सोसायट्यांचे चित्रविचित्र नियम यांनी त्याला जेरीस आणले होते. केळकर रोड, मानपाडा रोड, टिळक नगर, पांडुरंगवाडी सारे शोधून झाले होते पण कुठेच घर मिळण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. आता तो आतल्या गल्ल्यात पण घर शोधायला लागला होता. अशाच एका गल्लीत एका तिनमजली इमारतीवर ‘To LET’ अशी पाटी दिसली. सुदाम्याला कृष्णाची द्वारका बघून जसा आनंद झाला होता तसाच आनंद ती पाटी बघताच निर्मलला झाला. पुढे वाचा घर कसे मिळते ते