व्याजासहित

त्या पडक्या वाड्यास काहीतरी सांगायचे होते
अंगणात पेरलेल्या गव्हास अंकुर फुटायचे होते

वड्याळकरांचा वाडा अशा नावाने जरी तो परिसर ओळखला जात असला तरी आता एक पडकी इमारत सोडली तर त्या परिसराशी वड्याळकरांचा काही संबंध उरला नव्हता. वड्याळकरांची पोर आता विदेशात राहत होती त्यांना दोन बिऱ्हाडाकडून मिळणाऱ्या महिना तीस रुपये भाड्याशी देणे घेणे नव्हती. समोरची जागा विकली तेंव्हाच पोरांनी कॉर्पोरेशनला सूचना दिली होती की इमारत मोडकळीस आलेली आहे लवकरात लवकर पाडण्यात यावी. कॉरपोरेशनच ते, दोन वर्षात पडण्याची शक्यता असलेल्या इमारतीवर गेल्या दहा वर्षात कारवाई करायला कॉर्पोरेशनला वेळ मिळाला नाही. नित्यनियमाने कॉरपोरेशन अधूनमधून नोटीस देत असते मग विसरुन जाते. एक काळ असा होता की आजूबाजूचे लोक वड्याळकरांच्या वाड्याजवळ असा पत्ता लिहित होते आणि पत्र पोहचत होते. वड्याळकरांचा प्रशस्त वाडा माणसांनी भरलेला होता. रस्त्यावर समोर दुकान होती, त्या दुकांनांच्या मधे लोखंडी गेट होते, तिथून आत आले की मोठे अंगण होते, अंगणाच्या दुसऱ्या बाजूला खाली वड्याळकर कुटुंब राहत होते. एका बाजूला लाकडी जिना होता. वर दहाबारा भाडेकरु राहत होते. अंगणात सतत मुल खेळत असायची, त्यांची भांडणे, त्यांचा आवाज, गोंधळ, बायांच्या गप्पा याने वाडा दणाणलेला असायचा. वड्याळकरांनी वाडा विकला आता तिथे मोठ सुपर मार्केट उभे झाले. काही भाडेकरुनी जास्त रक्कमेसाठी हट्ट केला म्हणून घराचा काही भाग विकायचा राहिला. वड्याळकर मानले नाही तो भाग तसाच राहू दिला. हळूहळू भाडेकरु सोडून गेले. आता फक्त दोन बिऱ्हाडे उरली. त्या वाड्याच्या अंगणात कितीतरी मैत्री जमल्या, फुलल्या, मोडल्या, विसरल्या गेल्या पण एक मैत्री मात्र अजून टिकून आहे. ही मैत्री का टिकून आहे हे वाड्याची दोन वर्षात पडनारी इमारत अजूनही का उभी आहे त्यासारखेच कोडे आहे.

कांतीभाई आणि राजाभाऊ जन्मापासून वाड्यात राहत होते. वड्याळकरांच्या वाड्यातच कांतीच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते. वाड्यातले सारे भाडेकरु त्यांचे गिऱ्हाईक होते. कांतीचे वडील महिनाभर सर्वांना हवे तसे किराणा सामान पुरवित होते आणि महिना संपला की व्याजासहित सारे पैसे वसूल करीत होते. आपले वडील या सर्वांना उधारीत किराणा देतात म्हणून यांची महिनाभर पोट भरतात याची पूर्ण कल्पना कांतीला होती. खेळताना या उधारीची आठवण करुन द्यायला तो चुकत नसे किंबहुना त्याचे खेळण्याचे सारे नियम कुणाची किती उधारी बाकी आहे यावर ठरत होते. राजुच्या वडिलांची नोकरी पक्की नव्हती त्यामुळे कधी पैसे मिळायचे कधी नाही त्याचमुळे त्यांची उधारी अधिक होती. कांती याच कारणाने राजुवर सतत दादागिरी करायचा. तसाही तो राजुपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. पहिली बॅटींग, एक डाव जास्त इथपर्यंत ठिक होते पण कांतीच्या व्याजाचे गणित त्याही पुढे होते. तो सांगायचा
“माझी बॅट आहे आणि माझा बॉल आहे तेंव्हा मी रोज दोनदा बॅटींग करणार पण तुम्ही साऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस बॅटींग करायची नाही. राजु तुझी उधारी जास्त आहे तेंव्हा तू बॅटींगला असताना चार स्टंप”
कांतीचे बाबा उधारी लिहायला कातीला सांगताच की काय अशी शंका यावी असा तो ज्याची त्याची उधारी काढायचा. बिचाऱ्या राजुला मुद्दल, व्याज याचे गणित काही कळत नव्हते. मुळात त्याला गणितच कळत नव्हते. त्यामुळे कांती सांगेल ते तो करायचा. शाळेत असेपर्यंत त्याने कांतीची दादागिरी निमूटपणे कुरबुर न करता सहन केली. शाळेत जाताना सुद्धा त्याची तशीच दादागिरी असायची.
“राजु माझी बॅग तू उचल”

जसा राजु मोठा होत गेला त्याला गोष्टी कळत गेल्या तशी त्याला कांतीच्या वागण्याची चीड यायला लागली. तो मनात कांतीला शिव्या घालायचा विचार करायचा एक दिवस तुझी सारी उधारी मी व्याजासहित चुकवतो बघ. बँकेतून आल्यावर घटकाभर गप्पा म्हणून राजु दुकानात बसला असला की कांती त्याला दुकानातली छोटी मोठी कामे सांगायचा. राजू निमूटपणे सारी कामे करायचा त्या बदल्यात त्याला कांती संध्याकाळचा चहा द्यायचा. मुळात कुणाला उलटून बोलणे राजुच्या स्वभावतच नव्हते. कांतीला तर कधीच नाही. तो स्वप्न बघायचा तो कांतीला सांगतोय
“मी तुझे का ऐकू, मी का तुझा नोकर आहे” मग कांती म्हणणार
“उधार देतो तुला.” त्यावर राजुच्या डोक्यात उत्तर ठरलेले असायचे.
“एक दिवस तुझी सारी उधारी व्याजासहित चुकविन. तुझ्या नाकावर टिचून त्या सुपर मार्केटमधून माल घेईन.” हे सार स्वप्नातच पण प्रत्यक्षात मात्र काही बोलणे त्याला जमले नाही. भिती सुद्धा वाटायची उद्या कांतीने जर उधार देणे बंद केले तर जगणार कसे. कांतीने सांगितलेले काम करण्यात कुचराई केली किंवा काम करण्यात चुकले तर कांती त्याला चांगलाच ओरडायचा
“ओय बंदर के मुह क्या करके रखा तुने. कोई कामका नही तू. मै उधार देता हूं इसलिये खा रहा है नही तो भूखा मरता. आजकल कोण उधार पैसा देता है हर जगह नगद पैसा देना पडता है.”
राजु एका अर्बन कोऑपरेटिव्ह बॅँकेत चपराशी म्हणून नोकरी करत होता. कांपुटर आल्यामुळे राजुला बँकेत बँक साफ करणे, बँकेतल्या मंडळींसाठी चहा आणणे असली कामे करावी लागत. तो मनात प्रत्येकाला खूप शिव्या देत असला तरी प्रत्यक्षात कुणाला काही बोलायची त्याची कधीच हिंमत होत नव्हती. राजु अजूनही अस्थायी नोकर म्हणूनच काम करत होता. राजुचे आईवडील त्याच्या तरुणपणीच वारले. त्याचे रुप चांगले नव्हते, काळा चेहरा, समोर आलेला तोंडाचा भाग त्यामुळे शाळेत असल्यापासून मुल त्याला माकडतोंड्या म्हणून चिडवत होते. खूप चांगली नसलेली नोकरी, पडक घर आणि हे विचित्र रुप यामुळे त्याचे लग्न चाळीशी ओलांडल्यानंतर झाले.

राजुचे लग्न झाले तेंव्हा कांतीचा पोरगा लग्नाचा झाला होता. देवाने कांतीला नेहमीच भरभरुन दिले होते. लहान असताना तो गोरा गोमटा गुबगुबीत छान दिसत होता. वडिलांचे दुकान होते. लग्नही लवकरच झाले, दोन पोर झाले. वड्याळकरांनी दुकानाचा भाग विकला तेंव्हा साऱ्या दुकानदारांना भरपूर पैसे दिले तेंव्हा छान मोठे दुकान टाकले, घर घेतले. असे सारे वैभव मिळाले असले तरी पै पैचा हिशेब ठेवायचा त्यावर व्याज घ्यायचे, कुणालाही एक रुपया व्याज माफ करायचे नाही अशा त्याच्या सवयीत काही फरक पडला नव्हता. कुणी कांतीला विचारले
“कांतीभाई सुपरमार्केट मुळे तुमच्या धंद्यात काही फरक नाही पडला का?”
“नही. वो सब नगद वाले गिऱ्हाईक है अपने नही. जोपर्यंत राजुसारखे लोक उधारी घेत राहतील तोपर्यंत कांतीका धंदा चलता रहेगा.”
राजुचे नवीन लग्न झाल्यानंतर नेहमीप्रमाणे राजु कांतीच्या दुकानातून किराणा माल घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजुच्या बायकोने राजुची चांगलीच खरडपट्टी काढली. हातात मूठभर कंकड दाखवित ती म्हणाली
“हे त्या तांदूळात होते. तेलात काय मिसळले देव जाणे कढईत टाकताच कसा वास येतो.” तुमचा मित्र तुम्हाला लुटतो. राजुलाही बायकोचे म्हणणे पटत होते. त्याने मनात विचार केला हा आहे तसाच लहानपणापासून त्या कांतीला लबाडी करायची सवय आहे. पण तो तसे काही म्हणाला नाही. तो तिला म्हणाला
“अग ते खडे पिशवीत असतील. उधारीत माल द्यायचा म्हटले की बाकी दुकानदार भयंकर भेसळ करतात.”
“तुमच तोडं उघडत नाही मी उद्याच त्याला जाब विचारते. उधारी देतो तर व्याजसुद्धा घेतो ना.”
“अग असे नको करु त्याने उधारी देणे बंद केले तर…”
“तुम्ही एकदाची त्याची उधारी चुकवुन टाका बरं. आपणही समोरच्या दुकानातून माल घेऊ. किती स्वच्छ आहे ते.”

राजु काही बोलला नाही. त्याच्या मनात जरी तेच असले तरी असे करणे शक्य नाही याची त्याला पूर्ण कल्पना होती. राजुच्या बायकोने ऐकले नाही. दुसरे दिवशी सकाळी ती राजुला कांतीच्या दुकानात गेली. कांती देवाची प्रार्थना करीत होता. कांतीने प्रार्थना केली, उदबत्ती फिरविली. मग राजुकडे बघत विचारले
“बसा वहिनी. थोडावेळ बसावे लागेल. का रे राजु तुला माहित आहे ना. बोहनीच्या टायमाला उधार देत नाही.”
“कांतीभाई ये क्या है. दोन किलो तांदूळात पावभर कंकड.”
“तो कौंसी बडी बात है वहिनी. कंकड काढून ठेवून तांदूळ खायचे.”
“तुम्ही बालमित्र म्हणून आम्ही तुमच्या दुकानातून किराणा घेतो आणि तुम्ही असे फसविता.”
“कोण मित्र हा. घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या. गिऱ्हाईक आहे तो, मित्र नाही.
“अहो तुम्ही बोलत का नाही”
“वो बंदर का मुह क्या बोलेगा. उसके बापक जमानेसे उधारी चालू है.”
“येवढा घमंड बरा नव्हे कांतीभाई.”
“वहिनी, तुम्ही नव्या आहात समजेल तुम्हाला. मी उधारी नाही देला तर हा माणूस खाऊ शकनार नाही. कटोरा घेऊन बसा लागेल त्या समोर झाडाखाली.”
“अहो तो तुम्हाला भिकारी म्हणतोय आणि तुम्ही शांतपणे ऐकताय.” राजुला खूप राग आला असला तरी त्याच्या तोंडातून कांतीविरोधात एक चकार शब्द निघत नव्हता. तो आपल्या बायकोलाच बोलला.
“वेळेत धान्य मिळते ना. मग त्यात थोडे खडे आले तर काय बिघडले. तुला थोडेसे खडे निवडायला काय जाते.”
राजुच्या बायकोला काय बोलावे तेच कळत नव्हते. ती रागाने फडफडत निघून गेली.
“तो माणूस तुम्हाला मित्र मानत नाही मग तुम्ही त्याला बोलत का नाही. असा किती हिशेब आहे. या महिन्याच्या पगारात तुम्ही सारी उधारी चुकती करा बरं तेही व्याजासहित.”

राजु मनातल्या मनात हसला. कांतीभाईची उधारी चुकती करुन त्याच्या ऋणातून कायमचे मुक्त व्हायचे स्वप्न तो लहान असल्यापासून बघतोय पण हे सारे कसे करायचे हेच त्याला कळत नाही. आता तर त्याने या साऱ्याचा विचार करनेही सोडून दिले. आपण आय़ुष्यभर कांतीभाईच्या ऋणातच राहू याची त्याला पक्की खातरी पटली. आपला नवरा काही कांतीची उधारी चुकवु शकत नाही हे समजायला कांतीच्या बायकोला वेळ लागला नाही. आता आपले पुढील आयुष्य तांदूळातील खडे निवडण्यात जाणार आहे याची तिला लवकरच कल्पना आली. तिने हळूहळू या साऱ्याशी जुळवुन घेतले.

पण आजचा दिवस मात्र वेगळा होता. राजुने कांतीकडे बघितले आणि कांतीने लगेच तोंड दुसरी कडे फिरविले. राजु घरी घरी आला. त्याने पडक्या भग्न वाड्याकडे बघितले. वाड्याच्या भिंतीला जिकडे तिकडे भगदाड पडली होती. वाड्यात खाली भरपूर गवत उगवले होते तिथे उंदीर, घुशी यांचेच राज्य होते. अधून मधून साप मुंगुस हे सुद्धा फेरी मारुन जायचे. सुंदर चित्रावर डाग पडावा असाच तो वाडा नवीन इमारतींच्या जंगलात भासत होता. राजुने परत एकदा वाड्याकडे बघितले. वाड्याच्या भिंतीवर परत एकदा कॉरपोरेशन नोटीस लावून गेले होते. हे नेहमीचेच म्हणून त्याने ती नोटीस फाडून टाकली. बाजूला लाल रंगाने केलेली फुलीची खूण दिसली. तो फक्त हसला. त्याने वाड्याच्या बोळीत सायकल ठेवली. वाडा आणि सुपर मार्केट यामधली बोळ इतकी अरुंद होती की सायकल ठेवली तर त्यातून एका व्यक्तीला जायला त्रास व्हायचा. राजु लाकडी जिन्याच्या पायऱ्यांजवळ आला त्याला पावलांचा आवाज आला. जिना अरुंद होता, दोन माणसांना जायला त्रास व्हायचा. अंधार असला तरी जिना लाकडी असल्याने पावलांचा आवाज यायचा. राजु बाहेरच थांबला. कांतीभाईचा मुलगा उतरत होता. त्याने वाकून राजुला नमस्कार केला. राजुने त्याचे खांदे धरुन त्याला थांबवले. त्याच्या पाठीवर हात फिरविला. त्याला हात जोडले. तो अरुंद बोळीतून वाट काढीत निघून गेला. राजु वर आला, त्याच्या बायकोने त्याला पाणी दिले.
“कसे वाटते तुम्हाला?” तो काही बोलला नाही त्याने फक्त तिच्याकडे विचित्र नजरेने बघितले.
“खूप थकल्यासारखे दिसता?”
“कांतीचा पोरगा आला होता.”
ते पैसे आणि कागद देऊन गेला. राजुने खोलीत अंधार असल्याने दिवे लावले. शांतपणे सारे पैसे मोजले, कागदपत्रात काय लिहिले ते व्यवस्थित वाचले.
“तुम्ही कांतीभाईला भेटला होता का?” राजुने परत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळ तो एकटक शांतपणे कसला तरी विचार करीत बघत होता. आपला नवरा असा का वागतो आहे हेच तिला कळत नव्हते. तो पैसे मोजीत होता, कागद वाचत होता. जोरात हसत होता आणि परत तेच करीत होता.

गेले काही दिवस कांतीला ताप येणे, उलटी येणे असा त्रास होत होता. हे जेंव्हा थांबले नाही तेंव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याने काही टेस्ट केल्या. ज्याची भिती वाटत होती तेच घडले, कांतीभाईला कॅन्सर झाला होता. कांतीच तो एक डॉक्टर जो सांगतो त्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याने तीनचार डॉक्टरांना आपली तब्येत दाखविली. सर्वांचे निदान एकच होते. या साऱ्यांचे निदान बरोबर आहे हे माहित असले तरी त्याचे मन ते मानीत नव्हते.
“कोई आयर्वेदीक उपाय होगा सस्तेमे.”
“नही पापा. एकही उपाय है पहले किमो करना पडेगा, फिर बोन मॅरो ट्रासप्लांट.”
“मेरा ये डॉक्टरपे बिलकुल विश्वास नही. लुटते है. वो क्या बोल रहा था तू वही करना है तू किमो क्यू करनेका.”
“पापा दुसरा उपाय नाही. डॉक्टर बोलले दुसरी स्टेज है जान बच सकती है.”
“मरना होगा ना तो आदमी वैसे भी मरेगा. बेकार पैसे खर्च करके जिंदगीभर कर्जेमे डूबेगा तू.”
“पैसे के लिये मै आपको मरने नही दूंगा पापा.”
“तुझे कोशिश करनी है तू करना नेचर थेरेपी, आयुर्वेदीक. उसमेभी सक्सेस की उतनी ही चांस होती है बेटा.” मुलगा काही बोलला नाही. थोड्यावेळात काहीतरी आठवल्यासारखे करुन त्याने विचारले.
“एक बात बता ये जो क्या ट्रांसप्लांट करना है वो कौन देगा. तू, तेरा भाई, तेरी मॉ.” मुलगा बापाजवळ गेला. त्याने कांतीला शांतपणे खाली बसविले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले.
“पापा आप वो सब हमपे छोड दो. आप अपनी चिंता करो.”
“चिंता कैसे ना करो. मॅच होना मंगता ना.”

मुलाने त्यांना शांत बसा मी बघतो असे हातानेच सांगितले. मुलानी जरी समजूत काढली असली तरी त्याला स्वस्थ बसवत नव्हते. त्याच्या डोक्यात एकच विचार येत होता. पैशाची सोय तर कशीही होउन जाईल कांतीने बरीच इस्टेट जमविली होती पण देणदार कोण. मुलगा नक्कीच काहीतरी लपवत आहे असा त्याला संशय आला. त्याचे जेवणात लक्ष नव्हते कशात लक्ष नव्हते. रात्री लवकर झोपायचे म्हणून तो झोपायला निघून गेला तरी दार बंद करुन ते रिपोर्ट तो वारंवार वाचत होता. त्याने इतर कागदपत्रही वाचायचा प्रयत्न केला पण त्याला हवे ते मिळत नव्हते. बायको आत आली तर कांतीला न झोपलेले पाहून तिलाही आश्चर्य वाटले.
“थे काई कर रियो सा, हुतो नही” कांतीने हातातले पेपर दाखवत तिला विचारले.
“ये रिपोर्ट पढके तुम्हे लागे है मै बच जाउ.”
“मै काई डाक्टर हूं सा. डाक्टरलोग यही कहत है. तन्ने भी तो कई डाक्टरोसे पूछो सा .”
“सब मिले हुवे है.”
“मारी बात सुणो, छोरो कोशीश कर रियो है. करने दो. भगवान का दियो सबकुछ है. अब काम नही आयेगा तो कब.”
“बोन मॅरो कोन दे रहा है, तुम?”
“है कोई आपणो.”
“मतलब घरका नही है.”
“खूब देर वेई गी हैं, पट पट हुई जा. बावजी भलो करी.” असे म्हणत तिने त्याच्या अंगावर पांघरुण टाकले.
“कोण हे मेरी कसम है तुम्हे.”
“थे अजीब माणस हो. मै बोल रियो सा, कोई अपणो है.” तो तिच्याकडे फक्त बघत होता.
“थारा पुराना भाईलो राजुभाई.”
“वो बंदरका मुह मेरा दोस्त नही कर्जदार है. पैसे खर्चने तो किसी बाहरवालेपे खर्चते.”
“अब बीकोही मेच होवो सा.”
“तुम समझ नही रही हो. वो माणूस मुझसे उधार लेता रहा अब मै उससे उधार लू.”
“उधार काई है? रोकडा दे रहे है.”
“बात पैसेकी नही है.”
“तो काई है?”
“वो मेरा कर्जदार है. पुरी जिंदगी मेरा कर्जदार था. बचपनसे मेरा काम करता था. मेरे सामने सर नही उठाया, उलटी बात तक नही किया अब सीना तानके चलेगा.”
“थै भातको खीच रियो सा”
“नही. तुम्हे क्या लागे है ये उधारी रोकडा देनेसे जायेगी. रोकडेसो तो मुद्दल भी चुकता नही होंगा ब्याज कैसे देंगे. मुझे जीवनभर उसका कर्जदार नही रहना है. सहन नही कर पाउंगा. कोई दुसरा होता तो अलग बात थी. राजुको मेरे सामने सर उठाते मै नही देख सकता. कोई और ढूंढते है.”
“अब सो जायो. कल सोचेंगे.” असे म्हणत कांतीची बायको गाढ झोपी गेली परंतु कांतीची झोप उडाली. त्याचे कशात लक्ष लागत नव्हते. काय करता येईल, घरातून पळून जाता येईल का असले विचार त्याच्या डोक्यात येत होते. तो रात्री घरातून पळून जायला निघालाही पण तो फाटक उघडतच होता तर त्याच्या मुलाने आवाज दिला.

“पापा अब आप रातमे किधर जा रहे हो?”
“कुछ नही बेटा नींद नही आ रही थी तो ऐसे ही टहल रहा था.”
मुलाने त्याला आत नेऊन झोपवले. कांतीची ट्रिटमेंट सुरु झाली. रोज दवाखान्यात जाताना तो वड्याळकरांच्या पडक्या वाड्याकडे बघत होता. त्यात त्याला राजु नाचताना दिसत होता. त्याला वाटायचे राजु विचारतोय ‘कांती तुम्हारी उधारी जादा है. करो तुम्ही ही बैटिंग करो ये बैटिंग तुमपे उधार.’ हे ऐकून तो वाडा त्याच्याकडे बघून विक्षिप्त हसतोय असे भास त्याला होत होते. किमो झाल्यावर ट्रांसप्लांटसाठी त्याला दवाखान्यात भरती केले. राजुला देखील भरती व्हावे लागले. ठरल्याप्रमाणे कांतीची ट्रिटमेंट झाली. राजुला डिस्चार्ज मिळाल्यावर तो कांतीला जाऊन भेटला. कांती पलंगावर झोपला होता. कांतीने राजुकडे केविलवाण्या नजरेने बघितले, एक क्षण वाटले याला धन्यवाद म्हणावे पण कांतीच्या तोंडून काही शब्द फुटले नाही. तो काही वेळ तसाच राजुकडे बघत होता. मग दुसऱ्या दिशेने तोंड फिरवून आपले तोंड लपविले.

आता राजु रोज पैसे मोजतो, कागदाची गुंडाळी बघतो, कांतीचा चेहरा आठवतो आणि जोर जोरात हसतो. थोड्या वेळाने तो परत तेच करतो. राजुला वेड लागले म्हणून राजुच्या बायकोला त्याच्या जागी स्थायी नोकरी लागली. आता ती सुपर मार्केटमधून किराणा घेते. दवाखान्यात कांती पूर्ण बरा झाला होता. सारे खूप आनंदात होते. त्याला डिस्चार्ज मिळनार होता. त्याच रात्री कांती दवाखान्यातून कसा गायब झाला, कुठे गायब झाला हे अजूनही न उलगलेले रहस्य आहे. कातीच्या मुलांनी खूप शोधाशोध केली, पोलीसात तक्रार केली, पेपरात जाहिरात दिली पण कांतीचा पत्ता लागला नाही. आता पोलीसांनीसुद्धा कांतीची फाईल बंद केली.

आणि हो एक राहिल तो वड्याळकरांचा वाडा तर केंव्हाच जमीनदोस्त झाला.