नाट्यछंद २०२३

“अरे काय तुम्ही तिकडे कोटीच्या भागात जाऊन कार्यक्रम करता कधी इकडे करा”
“हायटेक भागात कार्यक्रम करणे परवडत नाही. प्रेक्षक कार्यक्रमाला येत नाही.”
“अशी खूप लोक आहेत ज्यांना लिहिण्या बिहिण्यात काही इंटरेस्ट नाही. तुम्ही कार्यक्रम करा लोकं येतील.”
“काय बघायचे आहे इथल्या लोकांचे कार्यक्रम? ते काय प्रशांत दामले आहेत काय?”

अशी परस्परविरोधी वाक्ये खूपदा ऐकली होती. त्याला उत्तर म्हणून हैदराबादला हायटेक सिटी भागात काहीतरी करावे असे खूप दिवस डोक्यात होते. नक्की काय करावे ते कळत नव्हते. अशात मराठी ग्रंथ संग्रहालयाने नाटिका स्पर्धा घ्यायचे ठरविले. तेंव्हा त्यातील काही नाटिकांचा प्रयोग हायटेक भागात करता येईल असा विचार लगेच डोक्यात आला तेव्हाच मी साऱ्या नाटिका बघायचे ठरविले. नाटिका बघितल्या त्यातल्या ज्याला हायटेक सिटी भागात मार्केट आहे अशा पाच सहा नाटिका निवडल्या. मग एक प्रेमकथा, एक विनोदी, एक बालनाट्य, एक विचार प्रवर्तक अशा चार नाटिका करायचे ठरविले. विषय आणि नाटिकांचा प्रकार यातील विविधता हा नाटिका निवडण्यामागे विचार होता.

अशा कुठल्याही कार्यक्रमाचे आय़ोजन हा एक नाट्यमय प्रवास असतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असला तरी साधारण समस्या सारख्याच असतात. स्थानिक कलाकारांचा Performing Arts चा कार्यक्रम म्हटला की या समस्या आल्याच. आमच्यासाठी नाट्यगृह या समस्येवर तोडगा दोन वर्षापूर्वीच निघाला होता. जय झा आणि संजीव आचार्य या दोन रंगकर्मींनी हायटेक भागात रंगभूमी हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. यात थेटरला लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा आहेत म्हणजे रंगमंच, सभागृह, ध्वनी, प्रकाश योजना वगैरे वगैर सर्व उत्तम दर्जाचे उपलब्ध होते. आता एसी सुद्धा लावल्याने एकंदरीत सभागृह एका छोट्या कार्यक्रमासाठी उत्तम आहे.

दुसरी समस्या होती पासेसची विक्रि कशी करायची मार्केटिंग कसे करायचे. लोकांपर्यंत कसे पोहचायचे. अभिनव कल्पना येत होत्या. येथे पोस्टर लावू, तेथे पोस्टर लावू. वेगवेगळ्या सोसायट्यांच्या व्हॉटसअॅप ग्रुपमधे टाकू. म्युझीक विडियो बनवू, कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांच्या नाटिकेविषयी लिहायला, बोलायला सांगू. असे विडियो बनविले सुद्धा आणि ते बनविताना धमाल मजा आली. सर्वांचा उद्देष एकच होता कार्यक्रम हाऊसफुल करायचा त्यासाठी जे करता येईल ते करु या. मला हे सर्व पटत असले तरी मला वाटत होते की अशा कार्यक्रमासाठी जाहिरीतीपेक्षा वैयक्तीक ओळखीतून, संबंधातून लोक गोळा करायला मदत होते. या नाटिकांमधे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सर्वच नवीन होते. तेंव्हा लोकांना कार्यक्रम आहे हे माहित जरी झाले तरी त्यांना कार्यक्रमाला खेचून आणू शकेल असे त्या कलाकारांचे नाव नव्हते. याबाबतीत माझे म्हणणे अंशतः खरे ठरले. सुरवातील पासेस कुणी घेत नव्हते पण मग अचानक पासेसची मागणी खूप वाढली. तीन आठवडे आधीच शो हाऊसफुल्ल झाला म्हणून सांगावे लागले. कुठेही पोस्टर वगैरे लावायची गरज पडली नाही. खूप लोकांना पासेस नाकाराव्या लागल्या. व्हायरल होण्यामागे दोन कारणे ठरली एक काही जेष्ठ मंडळींनी स्वतःचा शब्द खर्च केला. उदा. आमचे अरुणकाका सांगत होते. “तू घे रे पास मी सांगतो तुला कार्यक्रम छान असणार आहे.” धर्म सरांनी कार्यक्रमाचे अप्रतिम आणि खूप कल्पक असे पोस्टर तयार केले होते. आम्ही त्याचा पोस्टर म्हणून वापर न करता पास म्हणून वापरले आणि पासवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव दिले. त्या पासमुळे कार्यक्रमात कल्पकता आहे हे तर कळले परंतु एक आपुलकीची भावना देखील निर्माण झाली. तसेच सारा कार्यक्रम प्रोफेशनल पद्धतीने होतोय हेसुद्धा कळले. आपल्या सोसायटीतलेच कुणीतरी मराठी काम करीत आहे ही भावना देखील मोठी होती. ते इतके व्हायरल झाले की आम्हालाच आमच्या कार्यक्रमासंबंधी मेसेज यायला लागले. या संपूर्ण प्रकारातून शिकवण ही की अशा स्थानिक कलाकारांच्या कार्यक्रमाला प्रेक्षक मिळवायला प्रेक्षकांमधे कार्यक्रमाविषयी आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. हे करीत असताना हा घरगुती हळदीकुंकवाचा कार्यक्रम नाही हेही लोकांपर्यंत पोहचायला हवे त्यासाठी प्रोफेशनल वाटेल अशी जाहिरात, पोस्टर हे सारं हवे. आता कबूल करायलाच हवे माझे आकलन अर्धे चुकले होते.

ऐनवेळेवर काही कलाकारांनी कार्यक्रमातून माघार घेणे हा हौशी रंगभूमीला असलेला शाप आहे. शेवटी जो तो ज्याची त्याची हौस म्हणून करीत असतो त्यामुळे ती बांधिलकी देखील हौस इतकीच असते. हे योग्य की अयोग्य यावर काथ्थाकुट करीत बसण्यापेक्षा हे असे होऊ शकते हे समजूनच कार्यक्रमाची आखणी करायला हवी. संगीत आणि प्रकाश योजनेची तांत्रिक बाजू सांभाळू शकेल अशा तंत्रज्ञाची गरज होती. ती जबाबदरी निखिलने आपणहून पुढे येऊन बेमालूमपणे निभावली. काही तांत्रिक रिहर्सल झाल्या त्यात त्याने मार्गदर्शन केले. तो रंगभूमी या संस्थेशी खूप जवळून जो़डला असल्याचा खूप फायदा झाला. त्याच्याशिवाय हे शक्य नव्हते…….. (आणि हो नुकताच थम्स अप च्या जाहिरीतीत तो विजय देवरकोंडा सोबत झळकला बरं)…..

या आयोजनासंबघित जरा सविस्तरपणे (अजून बरेच लिहायचे होते पण आवरते घेतले) लिहिले कारण या समस्या महाराष्ट्राबाहेर सर्वत्र भेडसावतात मग तुम्ही अमेरीकेतल्या कुठल्या शहरात कार्यक्रम करा की भारतात हैदराबाद मधे कार्यक्रम करा समस्या सारख्याच असतात. स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम म्हटला की अशा समस्या आल्याच. आमच्या प्रवासाचा कुणाला फायदा झाला तर उत्तमच आहे म्हणून थोडा सविस्तर प्रपंच केला. आता थोडे नाटिकांविषयी बोलू या. पहिली नाटिका होती प्रेम आहे का? या नाटिकेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता (आणि आयोजक) अशी ३६० कोनातली भूमिका माझा मित्र डॉ. पुष्कर याने वठविली होती. नेपथ्थ आणि प्रकाश योजना फडणीस सर यांची होती तर संगीत अस्मिताचे होते. अभिलाषा, अवधूत आणि चारु मावशी यांनी यात भूमिका केल्या होत्या. सुरवातीला काही वेळ आवाज पोहचत नाही अशा तक्रारी येत होत्या. जसाजसा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचत होता तशा या तक्रारी दूर झाल्या. विषय हा आजच्या पिढीचा होता. कदाचित आजच्या पिढीला विषय पूर्णतः माहिती असेलही कारण ती त्यांची समस्या आहे पण या नाटिकेने ही समस्या आधीच्या पिढिच्या लोकांना समजवायला मदत केली. नाटिकेच्या पुढे जाऊन मी असे म्हणेल Love is not a bravery or romanticism but it is a responsibility. Love is not about just living together but It is a belief that there is someone to talk may be a phone call away, there is a shoulder to cry may be a flight away, a speechless tight hug when you need it most. It is a strong belief deep somewhere in heart that there is someone for me who can do anything for me unconditionally. उद्या जर ही नाटिका बघून कुणी सासू आपल्या मुलगासुनेला किंवा मुलगीजावयाची समस्या संमजून घेऊन मदत करायला तयार झाली तर नवल वाटायला नको. या टिव्हीच्या एकांगी गोष्टी दाखवायच्या व्यावसायिक गणितात हा सुखद धक्का आहे. तो सुखद धक्का प्रेक्षकांना नाट्यछंद या कार्यक्रमाने दिला.

मराठीतले शोले ही नाटिका मी २०१२ साली लिहिली होती आणि २०१३ साली प्रकाशित केली होती. त्याचे प्रयोग झाले पण कुणीही मला विचारुन प्रयोग केला नाही. मला युट्युबचे विडियो फॉरवर्ड झाले तेंव्हा मला त्याविषयी समजले. त्यामुळे सुहास आणि विशाल यांनी केलेला प्रयोग हा माझ्यासाठी तरी पहिला ऑफिशियल प्रयोग होता. त्यांनीच केलेला हा तिसरा प्रयोग होता. या नाटिकेचे संगीत, प्रकाशयोजना आणि दिग्दर्शन निखिलने केले होते तर नेपथ्थ सुशांतने साभाळले होते. विशालने केलेला पानवाला लोकांच्या खूप वर्षे लक्षात राहिल. यावेळी सुहासने निर्मात्याच्या भूमिकेत थोडासा आंग्ल अॅक्सेंट घेतला त्याने एक वेगळी मजा आणली. मीच विनोद लिहिले होते त्यामुळे पुढे काय येणार मला माहित होते तरी मला हसू आवरत नव्हते. जबरदस्त टायमिंग होती आणि एकमेकाला पूरक असा अभिनय होता. ते विसरले तरी तो विनोद आहे असे लोकांना वाटले. ‘फिलिंग समजून घ्या डिटेलिंग महत्वाचे नाय’ हा संवाद नंतर नंतर प्रेक्षकच म्हणायला लागले. या नाटिकेने वातावरण एकदम बदलले पब्लिक जाम खूष झाले होते. सर्वांचा आठवडा भराचा थकवा निघून गेला होता. प्रेक्षकांना ताजेतवाने केले. मध्यांतरात त्याच चर्चा सुरु होत्या. समोसेवाल्याचे पूर्ण समोसे विकल्या गेले, चहा तो बनवितच होता. लोक चर्चा करतच होते. त्या नाटिकेने मध्यांतर करण्याची कल्पना माझी नसली तरी मला आतातरी प्रचंड आवडली.

धर्म सरांची आली डार्विनची टोपीवाली माकडे हि नाटिका माझ्यासाऱख्या लेखकांच्या कानाखाली आवाज केल्यासारखी होती. कथासूत्र आणि संवाद ही लेखकांची शस्त्रे असतात. पण जर का कथा प्रेक्षकांना आधीच माहिती असली आणि नाटकात संवादच नाही किंवा फारच मोजके संवाद आहे तरी नाट्य तितकेच प्रभावीपणे कसे उभे करायचे याचा ती नाटिका परिपाठ होती. अगदी सुरवातीलाच अहो माकडाची आणि टोपीवाल्याची कथा सर्वांनी ऐकलेली आहेच ना असे सांगूनच नाटिकेला सुरवात होते. नंतर मुले रंगमंचावर एक शब्द न बोलता जो धुडगुस घालतात तो फक्त बघण्यासारखा असतो शब्दात सांगण्यासारखा नाही. धर्म सर नेपथ्थ आणि लाइटचा कसा वापर करतात हे धर्म सरांसोबत काम केलेल्या व्यक्तीला माहिती असते. त्यांच्यातला आर्किटेक आणि चित्रकार दोन्ही अशा वेळेला पूर्ण फॉर्मात असतो. त्याला साथ मिळाली ती मुक्ताच्या अप्रितम संगीताची. आला टोपीवाला आता कित्येक वर्षे विसरणे शक्य नाही. आम्ही घरी सतत तेच वाजवत असतो. या माहिती असलेल्या गोष्टीतून प्रेक्षकांना हसवत नाटिका वेगळेच सांगून जाते. ते सर्वांपर्यंत पोहचते. यावेळेचा प्रयोग आधीपेक्षा खूप अधिक प्रभावी होता.

एका अशाच स्टेशनवर ही नाटिका मी साहित्यवड-२०२२ दिवाळी अंकासाठी लिहिली होती. त्या तशाच कच्चामालावर मराठी ग्रंथालयात एक अप्रतिम प्रयोग सादर झाला होता. मी स्वतः अगदी शेवटल्या रांगेत बसून प्रयोग बघितला होता. त्याचा प्रेक्षकांवरील प्रभाव अनुभवला होता. त्याचमुळे ही नाटिका शेवटी करण्याचा निर्णय घेतला की जेणेकरुन प्रेक्षक तो अनुभव तो विचार घेऊन घरी जातील. आमचा अंदाज आमच्या अपेक्षेच्या बाहेर खरा ठरला. या नाटिकेने प्रेक्षकांच्या मनावर मोठा परिणाम केला. शेवटली नाटिका आहे तेंव्हा ती प्रभावी व्हावी म्हणून गेल्यावळेपेक्षा जास्त मसाला त्यात ओतून मी स्क्रिप्ट लिहून दिली. दुसऱ्याच दिवशी नाटिकेच्या दिग्दर्शिका वैशालीताईंचा मला व्हॉइस मेसेज आला प्रवीण ते केलेले बदल मला सुसंगत वाटत नाही. माझ्या डोक्यात जे आहे त्यात ते बसत नाही. तेंव्हा त्यातले हे, हे बदल काढू का. तसेच हे अमुक वाक्य आधी नव्हते आता का लिहिले ते सांगाल का? मी ते वाक्य का लिहिले ते माझे मलाच आठवत नव्हते. त्याचा विचार करण्यात माझा दिवस गेला. तेंव्हा मला कळले नाटक हे असे अपत्य आहे जे एकदा दिग्दर्शकाच्या हाती दिले की ते दिग्दर्शकाचे होते लेखकाचे राहत नाही. लेखकाने जन्माला घातल्यानंतर त्या अपत्याचे संगोपन दिग्दर्शक करीत असतो म्हणून पुढे त्याला ते अधिक कळते. अक्षय चा सचिन सांबरे अप्रतिम होता, ते संवाद सोपे वाटले तरी बोलायला कठीण आहेत. त्याला सोनालीने सुंदर साथ दिली. दिप्तीची खारेदाणेवाली बाई छान होती आणि खरोखर दाणे विकत होती. प्रत्येक प्रवेशात धावत येऊन अहो थर्टी अप गेली का असे वेड्यासारखा विचारणारा गोपालचा थर्टी अप जेंव्हा शेवटी नाटिकेचा गाभा उलगडतो तेंव्हा प्रेक्षक आवाक होतात. प्रेक्षकांना धक्का बसतो. तेंव्हा नाटिकेतील त्या पात्राचे प्रयोजन आणि महत्व कळते. सर्वांच्या लक्षात राहिला तो नाहुषचा सहस्त्रबुद्धे. त्याची संवादफेक, त्याची बॉडी लँग्वेज सर्वच परिणामकारक होतं. पात्राच्या तोंडचे संवाद देखील त्या पठडीतले होते. वैयक्तीक मला आवडले ते वैशालीताईंची राणेबाई, इतका सहज सुंदर अभिनय खूप वर्षांनी बघितला. यावेळी मी विंगेतून बघत होतो (बॅकस्टेजला मदतीसोबत पडदा ओढायचे काम पण माझे होते.) म्हणून ती सहजता अधिक जाणवली. मी पॅसेंजर ट्रेनने खूप प्रवास केला, खूपदा अशा राणेबाई बघितल्या, त्यांचे संवाद ऐकले. वैशालीताईंच्या राणेबाई अगदी साडीपासून ते संवादापर्यंत त्या पॅसेंजरमधल्या राणेबाईंच्या जवळ जाणाऱ्या होत्या. काही संवाद टाळ्या मिळिविण्यासाठी उगाचच आवाजाचे चढउतार करुन म्हणता आले असते मग ते नाटकाच्या लयीशी सुसंगत राहिले नसते. मला हा संयम खूप आवडला. वुडी अॅलनचा अॅनी हॉल बघताना जसे डायना किटन तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रभावित करते हे तसे काहीसे होते. ज्याप्रकारे कितीतरी प्रेक्षक माझ्यासोबत बोलले त्यावरुन नाटिकेने तिचा हवा तो परिणाम साधला हे लक्षात आले. अगदी दोन दिवसांनी फोन करुन कळविले की मी अजूनही तोच विचार करतोय. खूप सुंदर आणि परिणामकारक प्रयोग झाला हेच ते सांगत होते. साहित्यवडसाठी ही नाटिका लिहिली तेंव्हा लिहिल्या लिहिल्याच डॉ. जयंत कुलकर्णी सरांनी ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली होती त्याचे मला आश्चर्य वाटले होते. तेव्हा जाणवले की यात पोटंशियल आहे. आता हे प्रयोगाचे यश हे सारे बघितले की मला वाटते मी आता काही दिवस तरी नाटक या प्रकारात लिहू नये कारण आता जर मी लिहिले तर मला तसेच लिहायचा मोह आवरता येणार नाही. यशाचे चक्रव्यूह फार घातक असते एकदा त्यात अडकले की संपले. यशाच्या चक्रव्यूहात अडकणे हे क्रियेटिव्हिटिचे मरण असते. त्यातून बाहेर पडून वेगळा प्रयोग करणे गरजेचे आहे.

ह्या नाटिकेतील क्षणचित्रे आणि त्या निमित्ताने लिहिलेल्या कवितेच्या वाचनाचा विडियो इथे बघू शकता.

अशा कार्यक्रमासाठी एका टीमची गरज असते. कलाकारांना निदान टाळ्या आणि वाहवा तरी मिळते परंतु आयोजन आणि बॅकस्टेजच्या मंडळींना ते मिळत नाही. केवळ समर्पण भावनेने काम करणाऱ्या टीमची गरज असते. अशी उत्तम टीम मिळाली म्हणूनच संपूर्ण कार्यक्रम खूप छान झाला. त्यामुळे आमच्यावर आता दोन जबाबदाऱ्या आल्या एक वेळेच्या वेळी असे कार्यक्रम करीत राहणे आणि दुसरे कार्यक्रमाचा दर्जा उंचावत राहणे. या कार्यक्रमाला हायटेक भागात कार्यक्रम होत नाही हा एक मोठा सॉफ्ट कॉर्नर होता, असा सॉफ्ट कॉर्नर पुढे असणार नाही हे विसरुन चालणार नाही. जबाबदारी आता खूप वाढलेली आहे.

P.S. एक शिकवण Good Art is not to impress someone but to express yourself.