साहित्यवड पुष्प दुसरे प्रकाशात आणताना


(साहित्यवड दिवाळी अंक इथे जाउन बघता येईल. तसेच हा अंक पिडिएफ आणि ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे. त्यासाठी hydsahityakatta@gmail.com वर मेल करुन स्वतःची ओळख देऊन मागवू शकता. या दिवाळी अंकासाठी मी नाटिका लिहिली होती ती नाटिका एका अशाच स्टेशनवर तुम्ही वाचू शकता. )

साहित्य कट्टा हैदराबादचा दिवाळी अंक साहित्यवडचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षी फक्त दहा दिवसात दिवाळी अंक प्रकाशित केला होता. यावेळी वेळ होता म्हणून आधीच दिवाळीअंक प्रकाशनाची प्रक्रिया सुरु करण्याचे ठरले. यावेळी विषय देऊन लिहून घ्यायचे ठरले तेंव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा विषय देण्यात आला. साहित्यकट्टाच्या पाच वर्षाच्या कार्यक्रमादरम्यान तशी रितसर घोषणा करण्यात आली. लगेच प्रश्नांचा भडिमार सुरु झाला. हे लिहिले तर चालेल का ते लिहिले तर चालेल का शब्दमर्यादा किती वगैरे वगैरे. मग एक बैठक घेऊन विषयाची व्याप्ती वाढविण्यात आली आणि विषय फक्त स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असा मर्यादित न राहता आता त्यात स्वातंत्र्य या व्यापक संकलपनेविषयी लेखकांनी लिहावे असे सांगितले.

यावर्षी वेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या. संपादक मंडळ, मुद्रित शोधन, रेखाटन, डिजीटलीकरण या सर्वांमधे संयोजन साधणारी एक समिती. तसेच हि संयोजन समिती लेखकांशी संपर्क साधून त्यांना लिहिते व्हायला सांगत होती. यावर्षी हैदराबादमधील जेष्ठ लेखक, विचारवंत डॉ. जयंत कुलकर्णी यांनी मुख्य संपादकाची जबाबदारी स्वीकारली. मी अर्थात डिजीटलीकरण समितीमधे होतो. लेखकांनी लेख मला पाठवायचे असल्याने मला संपादक मंडळाच्या व्हाटसअॅप ग्रुप मधे आणि मिटिंगमधे राहण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे त्या महत्वपूर्ण चर्चांचा मला भाग होता आले. संपादक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत काही सूत्रे ठरविण्यात आली.
१. सातत्याने लिहिणाऱ्या सोबतच नवीन मंडळींना लेखनासाठी आवाहन करावे. नवीन संवेदना व्यक्त होणे, लिहित्या होणे हे उत्तम लिखाणाची पहिली पायरी आहे त्याचमुळे आतापर्यंत न लिहिणाऱ्या मंडळींकडून लिहून घ्यावे.
२. व्हाटसअॅप थाटाचे किंवा विकीपिडियासारखे लिखाण नको (स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा विषय असल्याने हा धोका होता.) तर लेखक त्यात दिसायला हवा. हे कठीण आहे पण आपण हे करु या असे मुख्य संपादकांनी सांगितले.
३. लेखन हे विषयाला धरुनच असायला हवे. विषयाला धरुन नसणारे लिखाण घेऊ नाही. लेखकांना सांगून त्यांच्याकडून परत लिहून घेऊ.

लेख यायला सुरवात झाली. पहिलाच लेख आला तो कट्टयाचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या अरुण काकांचा अर्थात अरुण डवलेकर यांचा. पण त्यांनी मला सांगितले तू संपादक मंडळाला पाठवू नको मला सांग यात आणखीन काही बदल असतील तर. मी संपादक मंडळांच्या सूत्राविषयी काकांना सांगितले. अरुण काकांनी विषय निवडला होता वीज क्षेत्रातील प्रवासाचा. याविषयावर काकांनी स्वतःचे फक्त अनुभव जरी लिहिले तरी एक पुस्तक तयार होईल इतका मोठा अनुभवांचा साठा त्यांच्याकडे आहे. काकांनी तांत्रिक माहिती आणि स्वतःचे अनुभव यांची सुंदर सांगड घालीत एक संग्राह्य असा लेख लिहिला. पॉवर प्लांटमधील चिमणीचा आणि अक्षांश, रेखांश याचा काय संबंध असतो हे मला हा लेख वाचल्यावर कळले. संपादक मंडळाने परत अरुण काकांशी बोलून त्यावर आणखीन संस्कार करुन घेतले. दुसरा लेख आला तो दुसरे उत्साही व्यक्तीमत्व विनय जोशी काकांचा. स्वांतंत्रदिवस प्रत्यक्ष बघितलेले एकमेव कट्टेकरी. त्यांच्या माझ्याशी, व्यंकटेश यांच्याशी काही चर्चा झाल्या आणि एक दिवस सकाळी विनय काका व्यंकटेश यांच्या घरी,

“सांगा काय बदल करायचे ते सांगा मी सारे करतो. “

काकांच्याच शब्दात सांगायचे तर “गणप्याचे गणोबा करायचे की गणपतराव हे तुमच्याच हातात आहे सागा तुम्ही.”

हे असे सत्तरीच्या पुढचे उत्साही तरुण बघितले की माझ्यासारख्या चाळीशीतल्या आळशी म्हाताऱ्याला ओशाळल्यासारखे होते आणि आपणही काहीतरी करावे असे वाटत राहते. एकामागून एक लेख येत गेले. संपादक मंडळ त्यात बदल सुचवित होते मी, पुष्कर, व्यंकटेश, माधव लेखकांशी बोलून तसे बदल करुन घेत होतो. सर्व लेखक आनंदाने बदल करुन देत होते.

इकडे लिखाण येणे सुरु होते आणि तिकडे मुद्रित शोधन सुरु होते. पुष्करकडून मुद्रित शोधनाविषय़ी माहिती मिळत होती. तिकडे असा गोंधळ होतो, तसा गोंधळ होतो. अजूनही काही मंडळींचे लेख यायचे होते. एका कार्यक्रमात मी विद्याताई, विवेक देशपांडे सर, फडणीस सर, नितीन बसरुर सर सर्वांना लिहिण्यासाठी विनंती केली. सर्वांनी लिहितो म्हणून सांगितले. विद्याताईंनी मी नुकताच तरुण भारत मुंबईसाठी लिहिलेला लेख घे पण मला काहीतरी वेगळं लिहायचे आहे असे सांगितले. त्यांनीच मग तरुण भारतात प्रकाशित लेख अंकात घेण्याची परवानगी मिळवून दिली. दोन दिवसात त्यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून एक नवीन लेख लिहून दिला. इतकेच नाही तर यात काही बदल असतील तर तसे सांगा असेही व्यंकटेश यांना सांगितले. बघता बघता जवळ जवळ प्रत्येक कट्टेकरी लिहिता झाला.

संपादक मंडळ आणि मुद्रित शोधन टीम असे जोरात काम करीत असताना डिजीटलीकरण टीममधे तुलनेत शांतता होती. आम्ही पिडिएफ व्यतिरीक्त अंक कशा प्रकारे प्रकाशित करता येऊ शकतो याचा शोध घेत होतो. शेवटी अंक पिडिएफ व्यतिरीक्त wordpress blog आणि epub द्वारे प्रकाशित करण्याचे ठरले. मधल्या काळात ध सरांच्या टीमला सांगून अंकातील पृष्ठासाठी एक डिझाइन तयार केले. त्यावरुन पिडिएफसाठी काही लेआउट तयार केले. त्यातले एक लेआउट वापरायचे ठरले. जशी लेखांची संख्या वाढत होती तशी माझी धडधड वाढत होती. बघता बघत पन्नासचा आकडा जवळ यायला लागला. आम्ही स्लॉग ओव्हरमधे खेळणारे आमचे काम एकदा सुरु झाले की उसंत अशी नाही परत वेळ कमी. गेल्या वेळेच्या अनुभवावरुन काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करता येईल की असा विचार मी करीत होतो. मुंबईतला पाऊस आणि मायक्रोसॉफ्टच्या खिडक्या कधी धोका देतील काही सांगता येत नाही. मी यावेळी लेखाचे नांव, लेखकाचे नांव, मोबाईल नं या सर्वांसाठी वेगवेगळ्या स्टाईल तयार केल्या तरी काही लेखाचे नाव आणि काही लेखकाचे नाव मात्र स्टाईल मानत नव्हते. का ते आजही न उलगडलेले कोडे आहे. जशी मुद्रित शोधन झालेली आणि लेखांचा सिक्वेंस ठरलेली फायनल कॉपी आमच्याकडे आली तसे मी वर्ड फाईल तयार करायला सरुवात केली आणि अवधूतने wordpress blog तयार करायला सुरवात केली. संमीर सुप्रिया यांनी फॉर्मेटिंगच्या चुका शोधल्या. अंक प्रकाशित झाल्यानंतर आम्ही EPUB फाईलची टेस्टिंग केली. गुगुल प्ले बुक, अॅमेझॉन किंडल वापरुन ई-बुक स्वरुपातील अंक वाचता येते का ते बघितले. समीरने गुगुल प्लेबुक वापरुन अंक कसा वाचायचा त्याचा विडियो तयार केला. अरुण काकांनी तो विडियो बघून ई-बुक वापरायची पद्धत समजावून घेतली. साहित्यवड दिवाळी अंक ई-बुक स्वरुपात सुद्धा उपलब्ध झाला.

एक दिवस प्रश्न आला “आर्ट वर्क आले का?”

उत्तर होते “नाही.”

सर्वांना धडकी भरली. आतापर्यंत आर्टवर्कची टीम काय करीत होती याची कुणालाच फारशी कल्पना नव्हती. प्रकाश धर्म सरांनी एखादे काम हाती घेतले म्हणजे ते पूर्ण करणारच यात तिळमात्रही शंका नव्हती परंतु हाती घेतलेले काम उत्तमोत्तम व्हावे यासाठी ते स्वतःला जो त्रास करुन घेतात तो एक वेगळ्या स्तरावरचा असतो. एखाद्या कामात झोकून देणे म्हणजे काय असते ते जर बघायचे असेल तर धर्म सरांना काम करताना बघायला हवे. त्यांचा या वर्षीचा किस्सा जयंत कुलकुर्णी सरांनी प्रकाशन समारंभाच्या भाषणात सांगितलाच. पुष्करने माहिती दिली की काम पूर्ण होत आले आहे. एके रात्री धर्म सरांचा फोन आला आर्टवर्कचे काम पूर्ण झाले आहे तुला सर्व पाठविले आहे. सरांनी मग त्यांचा तो किस्सा मला सांगितला. आर्टवर्कमधे सु्द्धा हवे असलेले बदल केले परत आर्टवर्क आले. अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत फोटो कोणते टाकायचे यासाठी काम सुरु होते. यावर्षी प्रकाशन सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी नसल्याने आम्ही अंकावर आणि ब्लॉगवर काम करीत होतो. शेवटी १६ ऑक्टोबरला दिवाळी अंक डिजीटल स्वरुपात प्रकाशित करण्यात आला. एक दिमाखदार सोहळा झाला. प्रिया जोशी आणि टीमने कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतल्याचे दिसत होते.

अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत ज्या पुढच्या अंकात कदाचित दूर होतील, काही तशाच राहतील. सर्व मिळून एखाद्या गोष्टीसाठी काम करण्यातला आनंद काही वेगळाच असते. त्यातून शिकायला तर मिळतेच पण असा अनुभव सर्वार्थाने समृद्ध करणारा असतो आणि ते असे लगेच शब्दात सांगता येण्यासारखे नाही.