गोवा एका वेगळ्या रुपात – भाग २

भाग १

मागील भागात सायकल दौऱ्याचा मार्ग त्याच्या आजूबाजूला असलेले निसर्ग सौदर्य याविषयी लिहिले होते. या भागात त्या मार्गात सायकलींग करताना आलेल्या अडचणी, त्रास या विषयी लिहेिले आहे. सायकलींग करताना भरपूर पाणी पिणे आणि अधून मधून इलेक्ट्रॉल पावडरचे पाणी पिणे गरजेचे असते ते लिहिले नाही पण आम्ही करीत होतो. तसे नाही केले तर पायात गोळे येणे, डिहायड्रेशन अशा समस्या येऊ शकतात. गोव्याच्या वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने खूप घाम येतो शरीरातून बऱ्याच प्रमाणात सोडियम बाहेर पडत असते. तेंव्हा खारेदाणे असे काही खायला असले तर चांगले असते. एका काळानंतर चिकी, एनर्जी बार वगैरे खाण्याचा कंटाळा येतो.

दिवार किंवा दिवाडी बेटावरील सुंदर मंदिर

सायकलींग
हैदराबादच्या आसपासचा संपूर्ण परिसर सपाट आहे इथे पुण्यातल्या सिंहगड किंवा बंगलोरच्या नंदिहिल्स सारखे चढ तर नाहीच पण साधे पाच टक्क्याचे चढ सुद्धा फार नाहीत. जे काही आहे ते फक्त मायक्रोसॉफ्ट हिल आणि बीएनआर हिल. तेंव्हा सरावासाठी हिल रिपीट शिवाय पर्याय नाही. सराव करताना Man Proposes and God Disposes आडवे आले. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात घरगुती कारणांमुळे फारशी सायकलींग झाली नाही आणि नोव्हेंबर महिन्यात पावसाने त्रास दिला. कधी नव्हे ते हैदराबादमधे नोव्हेंबर महिन्यात पाऊस फक्त पडला नाही तर धोधो बरसला. सायकलही त्रास देत होती खूपदा पंक्चर झाली. शेवटी टायर बदलला. त्यामुळे एकही शंभर किमीची राईड करता आली नाही. थाडे बहुत हिल रिपीट केले पण फार नाही. सरावाच्या नावाने इतकी बोबाबोंब होती की बायको म्हणाली तू गोव्यात काय फक्त कारमधे बसणार आहे का? सायकल सर्व्हिसिंगला दिली तर त्याने सांगितले कॅसेट आणि चेन बदलावी लागेल. मला आता ११x२८ ची कॅसेट नको होती ११x३२ कॅसेट हवी होती. त्यासाठी डिरेलर बदलावे लागणार होते पण ते उपलब्ध नव्हते. तेंव्हा मी कॅसेट आणि चेन न बदलताच टूर करण्याचा निर्णय घेतला.

सायकलच्या मागच्या चाकाला जी गियरची असेंब्ली असते त्याला कॅसेट म्हणतात. सायकलनुसार कॅसेटमधे ९, १० किंवा ११ गिअर असतात. प्रत्येक गियरमधे असणाऱ्या दातांची संख्या वेगळी असते. जेंन्हा ११x२८ ची कॅसेट म्हणतो तेंव्हा लहान गियरमधे ११ दात असतात तर मोठ्या गिअरमधे २८ दात असतात. अधिक दातांच्या गियरमुळे चढ चढताना मदत होते ते सोपे होते तर कमी दातांच्या गियरमुळे सपाट रस्त्यांवर वेगात जायला मदत होते. सायकल चालवताना रस्ता आणि चालवणाऱ्याची शक्ती बघून सतत गियर बदलत राहावे लागतात. गियर बदलायला जी यंत्रणा लागते त्याला डिरेलर म्हणतात.

मित्राची सायकल पंक्चर झाली तेंव्हा हिला आराम मिळाला

गोव्यात चार दिवसात ३४५ किमी सायकल चालविली त्यात ३७८३ मीटर एलेव्हेशन गेन केले. पहिल्या दिवशी ११४, दुसऱ्या दिवशी ७२, तिसऱ्या दिवशी ७५ आणि चौथ्या दिवशी ७५ किमी सायकलींग केेल. पहिले तीने दिवस रोज एक हजार मीटर उंची गाठायची होती आणि शेवटल्या दिवशी ६५० मीटर उंची होती. शंभर किमी मधे ३०० ते ४०० मी एलव्हेशन करणाऱ्यांसाठी हे नक्कीच जास्त होते. तिसरा दिवस सर्वात कठीण होता. फक्त ७५ किमी अंतरात अकराशेच्या वर उंची गाठायची होती. दोन पाच किमी लांबीचे पाच टक्के चढाईचे चढ होते, दोन दीड किमी लांबीचे पाच टक्के चढाईचे चढ होते. वेरळेचा चढ जवळ जवळ नऊ टक्के चढाईचा दोन किमी लांबीचा होता. दमछाक होणार अशी आधीच कल्पना असल्याने तशी मानसिक तयारी होती. मला शेवटला वेरळें चढ चढणे कठीण गेले. नेत्रावळी जंगलात फॉरेस्टच्या चौकी (इथे प्रवेशासाठी टिकिट काढावे लागते) नंतर जंगल घनदाट होते, रिमझिम पाऊस सुरु होता. थंड वातावरणात सायकल चालवायला मजा येत होती. मधेच हॉर्नबिल पक्ष्यांचा थवा उडत गेला. फोटो काढणे शक्यच नव्हते परंतु कायम स्मरणात राहिल असे दृष्य होते. पक्ष्यांची जाणकारी असणारे विविध पक्षी दाखवित होते पण आता नावे लक्षात नाही. जसजसे वर चढत गेलो तसा चढ कठीण होत गेला. चढ संपतच नव्हता. बराच वेळ पायडल मारल्यावर आता चालत जावे असे ठरविले. चालायला लागलो तेंव्हा लक्षात आले कि माझ्या बुटाचे सोल निघाले आहे त्यामुळे आता चालणे सुद्धा शक्य नाही. मला पायडल मारीत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मी मधेच उतरत होतो आणि परत पायडल मारीत होतो. असे करीतच शेवटले काही अंतर कापले. एका मित्राकडे क्लिपलेस पायडल आणि बूट होते आणि धबधब्यासाठी खाली उतरावे लागेल म्हणून त्याने जास्तीचे बूट आणले होते. त्याने मला ते बूट दिले म्हणून मी पुढे सायकलींग करीत परत पाळोळे बीचला येऊ शकलो नाहीतर कारमधे बसून यावे लागले असते. काही मंडळी धबधबा बघायला उतरली नाही त्यांनी खूप सुंदर धबधबा बघितला नाही. सायकलींग नंतर लहान ट्रेक करण्यात सुद्धा वेगळीच मजा असते. धबधबा जंगलाच्या आत असल्याने गर्दी नव्हती खूप सुंदर होता. मजा आली. परत येताना मघाचा वेरळे चढ उतरायचा होता. उतरताना खूप काळजीपूर्वक उतरलो. चढ चढताना त्रास होतो पण उतरताना जर थोडी जरी गडबड झाली तरी मोठा धोका असतो. पाऊस असल्याने अचानक मारलेले ब्रेक कामात येणार नाही याची कल्पना होती.

नेत्रावळीच्या जंगलात सावरी धबधब्याकडे जाताना

अंबेघाटाचा चढ मात्र तुलनेत सोपा होता आणि चढताना मजा येत होती. काणकोणवरुन वळण घेतल्यानंतर अंबेघाटाच्या आधी एक दोन किमीचा चढ लागला. सकाळच्या थंड वातावरणात तो चढताना काही वाटले नाही. अंबेघाट काणकोणकडून चढताना सकाळ असल्याने चढताना मजा येत होती. अर्धा चढ चढल्यानंतर आम्ही बामनबुडो या धबधब्यापाशी थांबलो, फोटो काढले मग पुढचा चढ चढलो. इथून पुढे चढ कठीण होतो. सकाळ असल्याने तितके जाणवत नव्हते. तसेच काणकोणला व्यवस्थित नाष्टा केल्याने पोटात इंधन व्यवस्थित होते. मी पूर्ण चढ चढायच्या आधी एक ब्रेक घेतला पण तो ब्रेक उगाच घेतला असे वाटले कारण चढ पूर्ण व्हायला फक्त शंभर मीटर उरले होते नंतर सपाट रस्ता होता. वळण असल्याने पुढे रस्ता सपाट आहे असे नाही दिसले नाहीतर ब्रेक न घेताच चढ पूर्ण केला असता. सारे वाट बघत थांबले होते. नेत्रावळीच्या बाजूने अंबेघाट फॉरेस्ट चोकीचा चढ चढताना मात्र उन झाले होते. जंगलाची सावली असली तरी घाम येत होता. व्यवस्थित पोटपूजा झाली होती. तीन किलोमीटर नंतर एक ब्रेक घेतला, पाणी प्यालो मुख्य म्हणजे श्वास नियंत्रणात येऊ दिला. फार जास्त वेळ ब्रेक घेऊ नये त्यामुळे लगेच निघालो आणि शेवटपर्यंत पोहचलो. परतीला तानशीकरकडे मस्त घरगुती जेवण केले होते. त्यामुळे भूक लागण्याचा प्रश्नच नव्हता.

Bamanbudo Water fall
अंबेघाट चढल्यानंतर वर हिलटॉपला लागलेली फॉरेस्टची चौकी

मला दुसऱ्या आणि चौथ्या दिवशीचा कोला बीच जवळचा चढ (नक्की लोकेशन सांगता येत नाही. याला Strava Segment मधे Nh66 Climb असे का म्हणतात माहित नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे तो रस्ता Nh66 नव्हता.) चढताना भयंकर त्रास झाला. एकतर साडेसात टक्के चढाईचा दोन किमी लांबीचा चढ होता. त्यात मधे खूप जास्त चढाईचे चढ होते. दुसरे दिवशी सकाळी निघताना खूप पाऊस होता. जीपीएस त्रास देत होते. नेत्रावळीच्या जंगलात नेटवर्क नसल्याने कुणाशी संपर्क करता येत नव्हता त्यामुळे आपण जातोय तो रस्ता बरोबर आहे की नाही ही शंका होती. मी, माझा सोबती आणि मागचा ट्रक सर्वांची तिच समस्या होती. बाकीचे पुढे निघून गेले होते. काही अंतरानंतर बघितले एकाची सायकल पंक्चर झाली होती तो हातात सायकल घेऊन पायी चालला होता. तो मग ट्रक मधे बसला. त्याचे जीपीएस चालू होते त्यामुळे बाहेर पडायला मदत झाली. जंगल रस्त्याच्या बाहेर पडल्यावर नेटवर्क मिळाले आणि जीपीएसची समस्या देखील दूर झाली. त्याला सुरु करताना नेटवर्क हवे होते. पुढे रस्त्यात एकाच्या सायकलची चेन अडकली होती. हे सारे करीत जेंव्हा आम्ही घाटाच्या पायथ्याशी पोहचलो तेंव्हा दुपार झाली होती. उन वाढले होते. उशीर झाल्यामुळे मधला सपाट रस्ता वेगात कापायचा प्रयत्न केला त्यामुळे अजून दमायला झाले होते. पायथ्याशी असणाऱ्या हॉटेलात नारळ पाणी प्यालो आणि चढ चढायला सुरवात केली. प्रचंड थकवा आला होता, पायडल मारणे जड जात होते, खूप दम लागत होता. ११x३२ ची कॅसेट असती तर कदाचित थोडा फायदा झाला असता. मुळात माझं मशीन म्हणजे मी कमजोर आहे याची जाणीव होत होती. तीनशे मीटर अंतर मी हातात सायकल घेउन चालत गेलो. तिच गोष्ट शेवटल्या दिवशीची, तीच टेकडी परंतु उलट्या बाजूने चढायची होती. तिसऱ्या दिवशीच्या कठीण सायकलींगमुळे पाय खूप थकले होते. कसाबसा पायडल मारीत तर पायी चालत चढत होतो. सुरवातेचे चोवीस किमी सोडले तर शेवटल्या दिवशीचा रस्ता सपाट होता. अगदीच सपाट होता. तीन दिवसानंतर सपाट रस्ता मिळाल्याने पाय तीन दिवसाचे भुकेले असल्यासारखे पायडल मारीत होते. तेंव्हा ते सारे अंतर भराभर कापले.

पहिला दिवस तुलनेत सोपा होता परंतु सततच्या चढाईचा होता. एकशे चौदा किमी मधे अकराशे मीटर उंची गाठायची होती. त्यात एक दोन अपवाद वगळता एक किमी किंवा त्यापेक्षा जास्त लांबीचे चढ नव्हते परंतु रस्ता सतत चढाईचा होता. दिवार बेटावरुन फेरीतून उतरुन बिचोलीच्या दिशेने जायला लागलो तेंव्हा जो चढ लागला तोच त्या दिवसातला लांब आणि कठीण चढ. काही खूप जास्त चढाईचे चढ होते परंतु त्याची लांबी फक्त दोनशे ते तीनशे मीटर होती. काहींना पंक्चरचा खूप त्रास झाला. त्यांना थांबावे लागले. सरते शेवटी एकच विचार मनात होता सपाट रस्त्यावरुनच जर सायकलींग करायची होती तर गोव्यात यायची गरज नव्हती. एक वेगळा गोवा आणि वेगळ्या प्रकाराची सायकलींग अनुभवायची होती तेच मी अनुभवत होतो हा विचार केला की चढ चढताना जोश येत होता.

आणखीन एक गंमत दिसली, यावेळी गोव्यात सर्वत्र दिदिंचे फ्लेक्स होते. जिकडे तिकडे ‘दोन फुलांचो काळ, गोयंची नवी सकाळ’ असे फ्लेक्स दिसत होते. या महिन्यात निवडणुका आहेत की काय असे वाटत होते. साखळीच्या पुढे जंगलाच्या भागात मात्र फ्लेक्स दिसले नाही. चारही दिवस ट्रफिक, ट्रक, टॅक्सीवाल्यांचे हॉर्न वाजविणे असा कुठलाही त्रास झाला नाही. तीन दिवस जंगलातून गेल्यामुळे खूप सावली मिळत होती त्यामुळे उन्हाचा त्रास तितका जाणवत नव्हता. भूक लागणे, पायात गोळे येणे असल्या काही समस्या झाल्या नाहीत. गोव्याच्या वातावरणात आर्द्रता जास्त आहे त्यामुळे घाम खूप येतो तरी दोन दिवस पावसाळी वातावरण असल्याने तितका त्रास झाला नाही. किरकोळ अपवाद वगळता रस्ते व्यवस्थित होते. एकंदरीत काय सायकलींग आणि चढाई याचा त्रास सोडला तर इतर कुठलाही त्रास नव्हता. कोला बीचजवळील घाटात काही अंतर पायी चालावे लागले तेवढे सोडले तर बाकीचे अंतर व्यवस्थित कापू शकलो होतो. तरी आता सात ते साडेसात टक्के चढाईचे चढ चढण्याचा सराव करावा लागणार आहे. तसे केले तरच पुढे दुसरे टूर करु शकेल याची पूर्ण जाणीव झाली.

क्रमशः

One thought on “गोवा एका वेगळ्या रुपात – भाग २

टिप्पण्या बंद आहेत.