मी कणिक मळली नाही

२०१९ मधे साहित्य कट्टा हैदराबादचा महाकट्टा असा कार्यक्रम झाला होता. त्यात धर्म सरांनी खूप सुंदर गाणे बसविले होते. ‘मी कविता लिहिली नाही, नाही हो नाही. मी नाटक लिहिले नाही, नाही हो नाही.’ याचे सुरवातीचे शब्द मराठीतील एका प्रसिद्ध गाण्याच्या (मी मोर्चा नेला नाही) जवळ जाणारे होते. पण ते गाण वेगळ्या प्रकारे बसविले होते आणि शब्दही वेगळ्या लयीत होते. त्यात आमच्या सारख्या गाणभिकार, गाणराक्षस मंडळींना फक्त जोरजोरात नाही, नाही ओरडण्याव्यतिरीक्त काही काम नव्हते. आम्ही उदरापासून ओरडून ओरडून ते काम चोख बजावत होतो. रिहर्सल मधे सतत ते गाण ऐकून त्याची चाल डोक्यात बसली होती. असे काही झाले की त्यात वेगळे शब्द टाकून ते म्हणणे जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे आम्ही वागतो. आता तर चाल सुद्धा पूर्ण आठवत नाही. एक आठवते गाण्यात नकटी असा शब्द होता आणि त्याने मजा यायची. त्यामुळे या गाण्यात सुद्धा आहे. गंमत म्हणून वाचा आणि विसरुन जा.   

मी कणिक मळली नाही, नाही हो नाही

मी पोळ्या केल्या नाही, नाही हो नाही,

मी कांदा चिरला नाही, नाही हो नाही

मी बटाटा सोलला नाही, नाही हो नाही

नाकाला झोंबत जाणारी फोडणीही दिली नाही, नाही, नाही, नाही ||


मी भेंडी कधी चिरली तर पापुद्रयातच फसते

ती धार चाकूची नकटी मग बोटावर घसरते

कोचावर आरामात कुणी गालातच हसते

अरे माझेच कसे चुकते, अन माझेच कसे फसते

या चाकूला शिकवा कुणी काय कापायचे असते

बटाटाही मग कधी पुढ्यात पडला नाही, नाही हो नाही,

त्या हसण्याच्या भितीने मी प्रयोग केला नाही, नाही, नाही नाही

मी भेंडी चिरली नाही, नाही हो नाही

मी कांदा चिरला नाही, नाही हो नाही

मी  बटाटा सोलला नाही, नाही, हो नाही

नाकाला झोंबत जाणारी फोडणीही दिली नाही, नाही नाही नाही ||


तो ओला ओला गोळा अजूनही सुकला नाही

त्या हिरव्या हिरव्या जुड्या सैलच झाल्या नाही

हट्टाने ओट्यावरती पसारा करुनी झाला

सारा कचरा नुसताच उलथून पालथून झाला

मग वास्तवात मी येतो, मॅगी घेउन परततो

त्या मॅगीच्या वासातच पोळी भाजी शोधतो

मी खिचडी केली नाही, नाही हो नाही

त्यात हळद टाकली नाही, नाही हो नाही

मी भात मांडला नाही,  नाही हो नाही

त्यात पाणी टाकले नाही, नाही नाही नाही


मी कणिक मळली नाही. नाही हो नाही

मी पोळ्या केल्या नाही, नाही हो नाही

मी कांदा चिरला नाही, नाही हो नाही

मी बटाटाही सोलला नाही, नाही हो नाही

नाकाला झोंबत जाणारी फोडणीही दिली नाही. नाही नाही नाही ||