पांढरी रेघ येताना

पांढरी रेघ ही ४९ आणि ५० यातील फरक दाखवायला नाही, तर तुमच्या स्वातंत्र्याची सूचक असते. आतातरी मुलगी, बायको, आई वगैरे अशा लेबलमधे जगणे सोडून स्वतःसाठी स्वतःप्रमाणे जगा असे ओरडून सांगणारी असते.”

तिने अभिमानाने हे तिच्या ब्लॉगवर लिहिले असेल, पण आज रुद्र अमेरिकेला चालला होता, तेव्हा सबकुछ रुद्र होते. तो गाडी काढून वाट बघत होता. ती धावत आली. तिने त्याची बॅग उघडली, त्यात एक पॅकेट टाकले.
रुद्रचे लक्ष होते. त्याने चिडून विचारले,
“काय गं आई, टूथ ब्रश? मी काय अ‍ॅमेझॉनच्या जंगलात चाललो का?”
“असू दे रे.”
“पुढल्या वेळी तू संडास साफ करायचा ब्रशसुद्धा दे.”
“गुड आय़डिया.” असे म्हणत ती थेट ड्रायव्हर सीटवर जाऊन बसली.
“गाडी तू चालवणार आहेस? तू रात्री ड्रायव्हरला का बोलावत नाहीस?”
दर वेळी रुद्र परत जाताना हा संवाद असतो. रुद्र बडबड करीत होताच, तितक्यात तिची गाडी गेटच्या बाहेरसुद्धा आली. मुख्य रस्त्यावर येताच तिला काहीतरी आठवले. तिने लगेच ब्रेक मारले.
“आता काय राहिलं?”
“लोणचं”
“कम ऑन. त्यासाठी मागे फिरू नको.”
“आदर्श भारतीय आई लोणचं दिल्याशिवाय मुलाला परदेशी पाठवत नाही.”
तिने लगेच गाडी वळवली. लोणच्याची बॉटल आणण्यात वेळ गेला, मग नेमके ट्रॅफिक जास्त लागले, पार्किंग मिळायला उशीर झाला. एकंदरीत परिणाम ठरल्यापेक्षा एक तास उशीर झाला. धावपळ करीत एक बॅग घेऊन रुद्र आणि एक बॅग ती घेऊन पळत निघाले. तिथे बघतो, तर सिक्युरिटीची भली मोठी रांग. मग याला विनंती कर, त्याला विनंती कर असे करत ते एंट्रीपर्यंत पोहोचले.
रुद्र ओळखपत्र दाखवून एअरपोर्टमधे शिरायच्या आधी तिने त्याच्याकडे प्रेमाने बघितले आणि त्याच्या कपाळाचा मुका घेतला. रुद्रला ते अजिबात आवडले नाही.
“का अशी फिल्मी वागते तू? सारे बघतात.”
“बघू दे रे! काही होत नाही.”
असे म्हणते तिने कपाळावरची बट मागे घेतली. तिचे सहज समोर लक्ष गेले, तर समोर तो बघत मिश्कील हसत होता. हा इथे कसा?
तो नेहमी असाच हसतो.

आठ महिन्यांपूर्वी तो तसाच हसत होता. हायटेक्सला प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी भरपूर, पण पार्किंगची जागा कमी होती. गाड्या जवळ जवळ पार्क केल्या होत्या. त्यात तिची लांबलचक स्कोडा सुपर्ब रिव्हर्समध्ये पार्क करताना तिला खरोखरीच घाम आला होता. किती वेळा मागे-पुढे करुन झाले होते. ‘सुलूमॅडम, पुढल्या वेळी ड्रायव्हरला घेऊनच येत जा.’ असा विचार तिने किती वेळा केला असेल. कुणी दिसला तर त्याला गाडी पार्क करायला साांगावी, म्हणून तिने समोर बघितले तर तो हातात चहाचा कप घेऊन मिश्कील हसत होता. तिला त्याचा खूप राग आला मदत करायची सोडून हसतोय का म्हातारा..
तिने रागानेच त्याच्याकडे बघितले. गाडी पार्क करणे हा आता तिच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. खूप मेहनतीनंतर शेवटी कशीतरी तिने गाडी पार्क केली. गेल्या कित्येक वर्षांत तिच्याकडे बघून कुणी हसल्याचे तिला आठवत नव्हते, त्याचमुळे त्याचे ते मिश्कील हसू तिच्या चांगलेच लक्षात राहिले.
तिने ब्लॉगवर लिहिले –

आता कुण्या मुलाने – म्हणजे पंचावन-साठीच्या पुरुषाने हो बघितले तर एक वेगळीच समस्या होते. कुण्या मुलाला लुक कसा द्यायचा, त्याच्याकडे चोरून कसे बघायचे, या साऱ्याचा विसर पडला आहे. तेव्हा निदान चांगले तरी दिसावे, म्हणून मुलांना सांगावेसे वाटते – अरे बाबांनो, तुम्हाला जर आमच्याकडे बघायचे असेल, तर जर आधीच कल्पना देत जा, म्हणजे एखादी छान साडी नेसता येईल, पांढऱ्या बटा काळ्या करता येतील, कानात छान रिंग घालता येईल, मॅचिंग लिपस्टिक लावता येईल, अगदीच हील नाही, पण छान सँडल घालता येईल.. तेव्हा बाबांनो, थोडं आधी सांगत जा.

त्या दिवशी तिला रात्रभर उगाचच झोप आली नाही. दुसरे दिवशी सकाळी दहाची अपॉइंटमेंट असल्यामुळे ती नऊ वाजताच ऑफिसमध्ये पोहोचली. साधारण दहा वाजता तिच्या दरवाज्यावर खटखट झाली. आत आलेली व्यक्ती ती कालचीच मिश्किल हसणारी व्यक्ती होती हे बघून तिच्या तोंडून सहज निघाले
“तुम्ही?”
“Do you know me?”
“Oh….. no… no… no” तिची चूक तिच्या लक्षात आली. परत परत नो म्हणून ती चूक सुधारायचा प्रयत्न करीत होती.
“Colonel Harish Iyer, propritor of Avani Securities. Nice to meet you” असे म्हणत त्याने तिच्याशी हस्तांदोलन केले.
“Nice meet you” तिने मग इकडे तिकडे शोधाशोध करुन तिचे कार्ड दिले.
“Sulochana Deshmukh”
“Nice office. BTW you can speak to me in Marathi. मी डोंबिविलीचा आहे.”
“I am born and brought up in Hyderabad.”
असे म्हणत तिने सरळ मुद्याला हात घातला. तिने तिच्या वेगवेगळ्या कमर्शियल बिल्डींग आणि प्रत्येक बिल्डींगच्या सिक्युरीटीच्या गरजा त्याला समजावून सांगितल्या.
“मोठा व्यवसाय आहे.”
“वडिलांचा आहे, मी फक्त नाव बदलले. Deshmukh Constructions चे Rudra Constructions केले”
“रुद्र म्हणजे”
“माझा मुलगा.”
“अरे वाह माझा बिझनेस पण मुलीच्या नावाने आहे. अवनी माझी मुलगी”
“हूं.. दोन बिल्डिींग वडिलांच्या काळापासून होत्या. मी त्या पाडल्या, परत बांधल्या. दोन नवीन बांधल्या. मोठे मॉल आल्यापासून….” तिने हातानेच फार छान नाही असे सांगितले. ऑफिसबॉय चहा घेऊन आला. “चहा?”
“No Thank you.”
ती चहा पित होती. तो बघत होता. आता काय बोलावे ते दोघांनाही समजत नव्हते. काही वेळ अशाच शांततेत गेल्यावर तो बोलला
“मी सर्व बिल्डींग बघतो आणि त्याप्रमाणे प्रपोझल देतो.”
“ओके. फायनान्सच्या मूर्तींना इ-मेल करा.”

‘Not bad’ तो जाताच ती मनाशी पुटपुटली. ‘पुरुषांसारखे बिझनेस एके बिझनेस न करता थोड इतरही बोलला.’ काल त्याच्या हसण्यावरुन त्याचा आलेला राग आता मवाळ झाला होता. ‘मिलिटरीवाला दिसतोय. शिस्तीचा, फिटनेसचा अभिमान असणार. हम सिव्हिलियन भी कुछ कम नही कर्नल. हम भी फिट है. मॅराथॉन दौड चुके है. सर्टिफाईड योगा टिचर आहे.’ घऱी येताच तिने फेसबुकवर जाऊन कर्नल हरीश अय़्यर या माणसाची माहीती मिळवायचा प्रयत्न केला. पण दोनचार जुने फोटो वगळता तिला फार काही सापडले नाही. ‘सिक्युरीटीवाला आहे इथेही काहीतरी सेटींग केल्या असतील. फेसबुक प्रोफाईल फोटो सुद्धा मिलिटरीच्या ड्रेसमधे. इथे तरी बायकोसोबत फोटो टाकायचा. कशाला अभिमान दाखवायचा’ मग तिने पुरुषांचे अभिमान या विषयावार पोस्ट टाकली.

काल परत एकदा अभिमान बघितला. गाणी आजही ताजी वाटतात. दोघा नवराबायकोंच्या मधे अभिमान आला तर लग्न तुटते हे जरी खरे असले तरी तो अभिमान असा हवेसारखा उडून परत दोघे जोडले जातात असे नाही. माझा घटस्फोट होऊन आता सोळा वर्षे झाली. आमच्या दोघांपैकी कधी कुणी जोडण्याचा प्रयत्न केला नाही. संसारात पुरुषांचे छोटे अभिमान कसे सांभाळू शकता त्याची गंमत सांगते.
क्लिष्ट आर्थिक बाबी बायकोला समजावू सांगणे नवऱ्याला खूप आवडते. तुम्ही जरी F&O ट्रेडींग करीत असला तरी नवऱ्याचा P/E Ratio शांतपणे ऐकून घ्या.
बायकोला जोक उलगडवून सांगायला नवऱ्याला आवडते. जोक नॉन व्हेज असेल तर त्याचा उत्साह द्विगुणित होतो. उगाच थांबवू नका गंमत निघून जाईल.
माझी बायको माझ्यापेक्षा फिट आहे हे पचवायला नवऱ्यांना जडच जाते. अशा वेळेला तुमचा फिटनेस त्याच्यामुळेच आहे हे त्याला पटवत राहा.
नटबोल्ट, स्पॅनर या प्रकारावर पुरुषांचे फार प्रेम असते. समजा तुमची गाडी पंक्चर झाली, नवरा अमेरीकेत असेल तरी तिथल्या रात्री नवऱ्याला फोन करा. त्याला विचारा स्पॅनर कुठल्या दिशेने फिरवायचा ते. मग तोच गाडीच्या सर्व्हिस सेंटरचा नंबर देईल.

तिच्या ब्लॉगवर व्यायाम, तिला भेटलेली माणसे, व्यवसायातील अडचणी, फॅशन, पार्टी, प्रवास असे कशाविषयीही ती लिहित होती पण पुरुषांविषय़ी लिहताना तिच्या लेखणीला वेगळीच धार येत असे.
“सुलोचनाजी नमस्कार.” रविवारी सकाळचे तिचे रुटीन ठरले सकाळी पळणे, ऑर्गॅनिक ब्रेकफास्ट मग केबीआर पार्कमधे वॉक. ती अशीच वॉक करीत असताना आवाज तिच्या कानी पडला. पार्कसारख्या सुंदर जागेत कुणी सुलोचनाजी असे म्हणणे म्हणजे गुलाबजाम खाताना खडा लागल्यासारखे होते. तिने नाराजीतच वळून बघितले. तोच होता
“ओ हाय. आपण इतक्यात भेटलो ना. सॉरी तुमचे नाव विसरले.” त्याचे नाव पूर्ण आठवत असले तरी न आठवल्याचे नाटक करीत तिने विचारले.
“कर्नल हरीश अय्यर” ‘पार्कमधे भेटलो तरी सुद्धा कर्नल जात नाही’ तिच्या विचारांची चक्री फिरली.
“येस, तुम्ही मिलिटरीवाले शिकवा आम्हाला फिटनेस.”
“हल्ली मी फक्त वॉक करतो. पूर्वी धावायचो तर बायको म्हणायची तिने मिलिटरी ट्रेनींग केले नाही. तिच्यामुळे हळूहळू धावणे कमी झाले. आता तिला जाऊनही पाच वर्षे झाली पण परत रनिंग सुरु करायची इच्छा होत नाही. तुम्ही रेग्युलरली येता का?”
“कुठे हो कधीतरी अमावस्या पोर्णिमेला. आम्ही मुली आय मीन बायका फिटनेसच्या नावाने व्यायाम करण्यापेक्षा शॉपिंगच जास्त करतो.” तिने मुद्दामच खोट सांगितले.
“एक सुंदर मराठी ब्लॉग आहे. पांढरी रेघ येताना, पन्नाशीच्या पुढे व्यायामासाठी छान माहिती असते. स्त्रियांसाठी आहे मी सुद्धा वाचतो.”
“I am not good in reading on internet. कुणाचा ब्लॉग आहे?” आता दोन मिनिटांपूर्वी आपण खोटे बोलले ते पकडल्या गेले तर नाही या भितीने तिने विचारले.
“कुणी अमेरीकेतील मराठी बाई आहे.”
“तिथे बायांना खूप वेळ असतो हो. इथे घरात आणि ऑफिसमधे फिरण्यातच व्यायाम होतो. माझी आई पंच्यांशी वर्षाची आहे. ठणठणीत. कधीही मुद्दाम कुठलाच व्यायाम केला नाही.”
“तेही बरोबरच आहे.” ती मनात विचार करीत होती. मूर्खा तो ब्लॉग मीच लिहिते. मागे सहा महिने रुद्रजवळ अमरिकेत असताना ब्लॉग लिहायला सुरवात केली होती.
“घरी गेल्यावर वाचते तो ब्लॉग.” दोघेही शांत चालले होते. ती तिच्या विचारात गुंतली होती. काहीवेळानंतर तोच बोलला.
“माझे प्रपोझल रेडी आहे.”
“प्रपोझल?” तो अचनाक बोलल्यामुळे तिला अंदाज आला नाही.
“सिक्युरीटीचे”
“ओह या. मूर्तींना मेल कऱा.”
“मी म्हातारा पुरुष आहे. ते इमेलपेक्षा उद्या पर्सनली येऊनच भेटतो. मूर्तींशी ओळख होईल.” त्याच्या म्हातारा पुरुष या शब्दाने तिला तिने म्हाताऱ्या पुरुषांची संकल्पना तिच्या ब्लॉगवर उलगडली होती ते आठवले.

पुरुष कधी म्हातारे होतात सांगू जेंव्हा त्यांना नवीन तंत्रज्ञान फालतू वाटायला लागतं. पळणे, एरॉबिक्स पेक्षा सकाळचा वॉक हाच आरोग्यासाठी उत्तम आहे हे ते पटवून सांगायला लागतात. जोरजोरात हसणे पोरकटपणाचे वाटायला लागते. मॉल किंवा रेस्टॉरंटमधे जमण्यापेक्षा त्यांना पार्कमधे जमून राजकारणावर चर्चा करायला आवडायला लागते.

कुणीतरी सांगून भेटायला येणार म्हटल्यावर ब्युटी पार्लरमधे जाणे आलेच. दुसरे दिवशी छान साडी नेसली, लिपस्टिक लावले, मॅचिंग सॅडल्स घातल्या. नवीन डिझाइनचे कानातले आणले होते ते घातले. कधीतरी मनात आले त्याचा इतका विचार करणे योग्य आहे का? छोड यार, त्यानिमित्ताने छान नटायला मिळते तर नटून घ्यावे असा विचार करुन तिने तो विचार सोडून दिला.

व्यायाम आणि पन्नाशीपुढील आयुष्य कंटाळवाणे असते तुम्हालाच इंटरेस्ट निर्माण करावा लागतो.

तिनेच ब्लॉगवर लिहिले होते. ती नऊच्या आधीच ऑफिसमधे पोहचली. ऑफिसमधे कुणी नव्हते. स्टाफ येणे सुरु होताच उगाचच बाहेर येऊन ती कुणाशी बोलत बसली. ती बिचारी रिसेप्शनीस्ट तिच्याशी बोलताना पंधरा मिनिटे उभी होती. पंधरा मिनिटांनी तो आला. त्याने तिला बघितले. फक्त हाय म्हटले, रिसेप्शनीस्टला मूर्तीला भेटायचे असे सांगितले आणि परवानगी मिळताच तो तिकडे चालता झाला. नेहमीचा ड्रेस घालून प्रदर्शनाला गेली तेव्हा बघून हसत होता, काल ट्रॅकसूट मधे होती तर सोबत चालला आणि आज इतकी छान नटून थटून आली तर फक्त हाय, कमाल आहे बुवा या माणसाची. असे म्हणत तिने त्याचा विचार सोडून दिला आणि तिही तिच्या कामात गढली.

तो मूर्तींना भेटायला एक दोनदा ऑफिसमधे येऊन गेला. तिचे लक्ष होतेच, कधीतरी तो हाय म्हणेल असे तिला वाटत होते पण त्याने कधी तसे केले नाही. त्यानंतर तो परत कधी ऑफिसला आला नाही. ती GVK मॉलमधे गेली, Inorbit मॉलमधे गेली पण तो दिसला नाही. ती चटणीज, पॅराडाईस वगैरे रेस्टॉरंटमधे गेली पण तो तिकडे कधी दिसला नाही. ती दोनतीनदा केबीआर पार्कमधे गेली पण तो तिथेही नंतर दिसला नाही. ती TiE च्या कार्यक्रमाला गेली पण तो तिथेही आला नाही. अरे हा कसला उद्योजक ज्याला नेटवर्कींग कळत नाही. मग तिने मूर्तीला सांगून त्याचे प्रपोझल रिजेक्ट केले. त्याने फक्त थँक्यू म्हणून उत्तर दिले. तिला वाटले होते मूर्तीने नाही म्हटले तर तो तिला येऊन भेटेल, कारण विचारेल, पण त्याने तसे काही केले नाही. उन्हाच्या तडाक्यात वाऱ्याची थंड झुळुक यावी तसा तो दोन दिवस भेटला आणि गेला. अशा म्हाताऱ्या पुरुषाचा काय विचार करायचा म्हणून तिने त्याचा विचार करणे सोडून दिले.

आज असा अचानक दिसला, नेहमीसारखा मिश्किल हसला. कशासाठी हसला तो खूप दिवसांनी तिला बघून हसला की तिची धावपळ, धांदल बघून हसला. तिने गाडी काढली आणि ती घराकडे निघाली. रात्र चांगलीच झाली होती. तिच्या गाडीने वेग घेतला होता. काही वेळाने गाडीत काही समस्या आहे असे तिला जाणवले. रिंगरोड सोडताच तिने गाडी थांबविली आणि गाडीतून उतरून बघितले. तिचा संशय खरा होता गाडीचा मागचा टायर पंक्चर होती. घर अजून सहा किमी दूर होते. आता काय करता येईल, टॅक्सी बोलावयची कि, ड्रायव्हरला बोलावायचे कि आणखीन कुणी इतक्या रात्री येऊ शकेल. ती विचार करीतच होती तर एक गाडी बाजूला थांबली. तोच होता. त्याने विचारले
“काय झाले?” तिने गाडीच्या टायरकडे बोट दाखविले.
“Oh May I help you”
“नको मी ड्रायव्हरला फोन करते”
“Are you sure? रात्रीचा दीड वाजला आहे.” तिने लांब श्वास घेतला आणि सरळ गाडीची डिकी उघडली आणि टूल्स त्याच्या हातात दिले. त्याने गाडीतून स्पेयर चाक काढले आणि रात्री दीड वाजता म्हातारा म्हातारी दोघे मिळून गाडीचा टायर बदलत होते. दहाबारा मिनिटात गाडी तयार झाली.
“स्पॅनर, नटबोल्ट असे काही दिसले कि तुम्हा पुरुषांचा उत्साह बघण्यासारखा असतो.”
“त्या उत्साहमुळेच तुमचे काम झाले.”
“Are you sure you are not following me?”
“I am hundred percent sure I was following you.” त्याच्या उत्तराने तिला हसायला आले.
“मॅडम तुम्ही जरी आमचे सुरक्षेचे प्रपोझल झिडकारले असले तरी सुरक्षा ही जबाबदारी मी टाळू शकत नाही.”
“Thank you”
“आज नाही गेली आठ महिने मी तुम्हाला फॉलो करतो आहे.”
“काय?”
“ब्लॉगला फॉलो करतो. हा म्हातारा पुरुष तुमचा नियमित वाचक आहे. मी पहिल्यांदी वाचले तुमचे विचार इंटरेस्टींग वाटले. कुणी ब्लॉग लिहिला याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला पण तुम्ही कुठेही आपले नाव दिले नाही. एका ब्लॉगरँकिंग वेबसाइटवर मात्र तुमचे नांव समजले. सुलोचना देशमुख, एमडी, रुद्र कंस्ट्रक्शन. मग त्या सिक्युरीटीच्या प्रपोझलचे इ-मेल करण्यापेक्षा मी म्हटले मीच प्रत्यक्ष जाऊन भेटतो. शेवटी म्हातारा पुरुष. नंतर वाटल तुम्हाला सांगाव पण या ओळखीतला अनोळखीपणा आणि अनोळखीमधली ओळख मला आवडायला लागली होती. विश्वास होता कधीतरी वाचकाची आणि लेखिकाची ओळख होईलच.”
त्याचे बोलणे ऐकून तिला हसू आले पण तिने आवरते घेतले.
“हे सारं काय तो कॉंट्रक्ट मिळविण्यासाठी” तिने गाडीच्या दरवाजाजवळ जात विचारले. तो नेहमीसारखा हलकेच हसला.
“परत रनिंग सुरु करायचा विचार आहे पण तरुण पार्टनर हवा.” आता मात्र तिला हसू आवरता आले नाही. ती हसली आणि जिथे उभी होती तिथे तशीच काही वेळ स्तब्ध उभी होती. तो त्याच्या गाडीत बसला. गाडी सुरु करुन त्याने गाडीच्या काचा खाली केल्या.
“यू स्टार्ट, नेहमीसारखा मी फॉलो करतो.” तिने गाडी सुरु केली. गाडी पुढे जाताच तिने ओरडून आवाज दिला.
“उद्या सकाळी साडेपाच वाजता केबीआर पार्क.” तो मिश्कील हसत होता.

पुर्वप्रकाशित मिसळपाव दिवाळी अंक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s