एक फसलेले नाटक – असे होते प्रेम

एक फसलेले नाटक- असे होते प्रेम

(नाटक कशा प्रकारचे लिहायचे, कशा प्रकारचे नाटक करायचे या गोंधळात अडकलेले दोघे. नाट्यलिखाणातील अलिखित परंपरा कुठल्या वगैरे अशा गोंधळात ते सापडले आहेत. या परंपरा पाळत ते लिखाणााचा प्रयत्न करतात. या एकांकिकेत साराच गोंधळ अपेक्षित आहे. वेषभूषा, नेपथ्थ, संगीत सारा गोंधळ . गोष्ट आणि पात्रे यात गोंधळ तर आहेच. त्यातला आणखीन एक प्रवेश. त्याच कलाकारांची चर्चा चालली आहे. एकूण आठ प्रवेश आहेत. तीन प्रवेश इथे दिले आहेत. एक फसलेले नाटक-१एक फसलेले नाटक-प्रवेश, एक फसलेले नाटक – आणखीन एक. हा चौथा प्रवेश. हे प्रवेश क्रमाने नाहीत)

(रंगमंचावर प्रकाश येतो त्यावेळेला दोन मुले हातात बसस्टॉपचा फ्लेक्स घेउन उभे राहतात पण बसस्टॉपचे चित्र दुसऱ्या बाजूला कोरी बाजू प्रेक्षकांच्या बाजूला असते.)

मुलगा अरे काय आहे सिनेमाचा पडदा आहे. अरे मूर्खा उलटा लावलाय तो पडदा, सरळ लाव. (मुले सरळ लावतात) किती चुरगाळलाय तो बसस्टॉप. गेली कित्येक वर्षे झाले तोच बसस्टॉप वापरताय. निदान बसस्टॉप तरी बदलायचा. बरोबर लावा, किती हलतोय तो बसस्टॉप. तो काय झुलता पूल आहे बसस्टॉप आहे तो बसस्टॉप. (ते निघून जातात. मुलगा बाहेर जातो)

(मुलगी प्रवेश घेते. ती रोमँटीक गाणे गुणगुणत प्रवेश करते. पेटीवाला बाबुलकी दुवाये लेके जा ही किंवा तत्सम दुःखी धुन पेटीवर वाजवतो. ती तशीच थांबून कंबरेवर हात ठेवून पेटीवाल्याकडे बघते. तो वाजवायचे थांबवतो. ती खूप उशीर झाला आहे असे करीत सतत घड्याळ बघते आणि बसच्या रांगेत उभी राहते. तिच्या मागून मुलगा येतो आणि रांगेत उभा राहतो. दोनच पात्रे रांगेत उभी असली तरी गर्दी आहे असे भासवत उभे राहतात. मुलगा चोरुन चोरुन मुलीकडे बघत असतो पण मधेच गर्दीचे धक्केही बसत असतात. धक्क्याने मुलगा खाली वाकतो, खिशातला रुमाल काढून खाली टाकतो. तोच रुमाल उचलतो)

मुलगा एक्सक्युझ मी हा रुमाल तुमचा आहे का?
मुलगी शीSSS किती कळकट्ट मळकट्ट रुमाल आहे. हजारो लोकांनी खाली टाकून वापरला आहे. वर्षानुवर्षे तोच वापरलाय.
मुलगा नाही हो मी आता माझ्या खिशातून काढलाय.
मुलगी सारे हेच सांगतात.
मुलगा नवीन आहे.
मुलगी हे नवीन आहे. असा स्वतःच्या खिशातून रुमाल काढून खाली टाकून उचलायचा हे नवीन आहे. किती वर्षे तेच ते. आता त्या रुमालाच ताणून स्कार्फ झाला. तो पार तोंडाला फासला तरी तुम्ही मात्र अजूनही रुमालच उचलतात. (परत धक्का लागतो. तो आता जवळचे पुस्तक खाली टाकतो)
मुलगा हॅलो तुमचे पुस्तक (तो खाली वाकून पुस्तक उचलून तिला देतो.)
मुलगी मी किंडल वापरते पुस्तक नाही.
मुलगा (बेरींग सोडून) हे काय यार तुझ. घरुन निघताना पुस्तक घेउन निघायच ना. आता दोघे मिळून किंडल कसे उचलायचे. पुस्तक उचलण्याचा रोमँटिझमच घालवला सारा. नाटक सिनेमा बघ जरा. मुलगी कसी वेंधळी असते. तिला हलकाच धक्का लागायची देरी तिच्या हातून अख्खी लायब्ररी खाली सांडते. आणि तू
मुलगी मला काय लकवा मारलाय? अर्धांगवायू झाला आहे. का माझ्या हातून पुस्तक खाली पडावे? कुणी सांगितल तुला मुली वेंधळ्या असतात म्हणून.
मुलगा ओके पुस्तक नाही तर मग (तो विचारतो आणि ती मानेने नाही म्हणते) दुपट्टा, पैसे, लिपस्टीक, क्लचर, कंगवा (शीSSS) अरे यार अजून काय काय असत तुम्हा मुलींच्या पर्समधे (ती रागाने बघते)… अख्खीच्या अख्यी पर्स.
मुलगी (ती रागाने बघते).परत जर आता खाली पडायच्या, गोष्टी केल्या ना तर …..(खूणेनेच एक किक मारेल असे सांगते)
मुलगा ओके हिंसा नको. अग पण जर तुझ्या हातून कुठली वस्तू खाली पडनार नसेल तर मग हा बर्फ फोडायचा कसा. Icebreakingयु नो. बर्फ फोडला नाही या बसस्टॉपवर येऊन उपयोग काय? प्रेमात पडायचे कसे? प्रेमात पडण्याशिवाय या बसस्टॉपचा दुसरा उपयोग काय. हे बघ मी नायक आहे आणि तू नायिका, आपले काम आहे एकमेकाच्या प्रेमात पडणे. लिहिले आहे तसे. तेंव्हा कसेही करुन तो बर्फ तेवढा फोडायला हवा. मी कविता वाचून दाखवू.
मुलगी इथे बस स्टॉपवर कविता वाचनार तू?
मुलगा ए तो बसस्टॉप फाडा रे आता आणि तिथे एखादे गार्डन लावा. ऐक … (कविता वाचण्याच्या सुरात) हे सौंदर्यवते, हे रुपगर्विते तू तुझ्या सौदर्याचे कारंजे असे उडवीत असताना त्यातले काही तुषार या पामराला त्याच्या ओंजळीत झेलू दे. तू तुझ्या प्रेमाचे मधुकण असे खुशाल उधळीत असताना त्यातले काही मधुकण या भ्रमरास टिपू दे.
मुलगी एक अक्षर समजल नाही. सौंदर्याचे कारंजे आणि प्रेमाचे मधुकण तुझ्या बापाने बघितले काय कधी. परत सांगते (सुरात) तू मधेच अस बेअरींग सोडू नको, कालीदासारखा कवी होऊ नको. जुळल रे यमक… तू माझा दास आहे कुणी कालीदास नाही हे कधी विसरु नको. अरे वा जमतेय पुढच मीच लिहिते.
मुलगा मी अख्खा कवितासंग्रह लिहिलाय ‘फक्त तुझ्याचसाठी’ (तो एक कागद तिच्या हातात देतो)
मुलगी शी काही काय. कविता कसल्या करतोय. हल्ली मुली पॅकेज बघतात कवितासंग्रह नाही. पॅकेज मिळाल ना कि कविता करनारे छप्पन सापडतात.
मुलगा राहू दे. हल्लीची मुल पण मुलीचा बाप (हाताने पैशाची खूण करीत) बघतात. (थांबून) पात्रांमधे अशा आपण आपल्या भूमिका घुसडल्या तर त्या बिचाऱ्या पात्रांनी कुणाकडे बघायचे. नाटकातील पात्रांना भर नाटकात असे पोरके करणे कसलेले नसलो तरी तुझ्या माझ्यासारख्या नटांना शोभा देत नाही. आपण आपल्या भूमिका बाजूला ठेवून नाटक उचलायला हवे. वर न्यायला हवे.
मुलगी (ती वर बघत, स्वर्गात गेल्याची खूण करीत) वर कुठे
मुलगा वर म्हणजे असे नाटक पडू द्यायचे नाही. अस बांधून ठेवायच. मी परत प्रयत्न करतो आजच्या पिढीतील मुलासारखा. (तो काही अंतर मागे जाऊन परत येतो) हेSSSS बेब, I saw your DP somewhere. तुझा डिपी कुठेतरी बघितल्यासारखा वाटतो.
मुलगी गोव्याला. माझ्या डीपीमधे गोव्याचा समुद्र आहे. दुसरे काहीतरी ट्राय कर.
मुलगा (फोनची रिंग वाजते) तुझा मोबाइल वाजतोय.
मुलगी माझा नाही.
मुलगा माझा पण नाही. (बाहेर बघत) अरे हो त्याचा फोन वाजतोय. हल्ली सर्वांच्या रिंगटोन सारख्याच असतात ना त्यामुळे कळत नाही कुणाचा फोन आहे ते. हे कसे वाटतेय?
मुलगी ओके ओके आहे नॉट सो ग्रेट. यातून ते प्रेमाचे उदात्त फिलिंग बाहेर येत नाही. पण चालेल. समस्या काय आहे ना, दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात का पडतात यात जी खोली, deep meaning of love आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवे. मला एक सांग आपण प्रेमात का पडायचे?
मुलगा दुसर कोणत काम नाही म्हणून. एकदाचे नायक नायिका प्रेमात पडले म्हणजे मग ते दोघेही बाकीचे धंदे करायला मोकळे. आधी प्रेमात पडून घ्यायचे.
मुलगी तसे नाही जरा खोलात जाउन विचार कर. पात्राची खोली समजून घेतली पाहिजे. मी कशी आहे मॉडर्न, चांगल्या घऱची, सुंदर सुंदर कपडे घालनारी. तू असा गबाळा, येडपट मग मी तुझ्या प्रेमात का पडायचे?
मुलगा कारण माझे मन स्वच्छ आहे.
मुलगी कशावरुन
मुलगा माझे कपडे पांढरे स्वच्छ आहे, अगदी आतल बनियान सुद्धा पांढर स्वच्छ आहे. अगदी.
मुलगी बस. (खूप विचार करीत) प्रेमात का पडायचे याचे आंतरीक कारण ती पांढरी स्वच्छ बनियान आहे. खूपच खोल आहे हे सारं. आता प्रेमात पडायला हव, एकमेकाच्या डोळ्यात बघायला हव. (डोळ्यात बघतात) एकमेकाची ओढ वाढायला हवी, रात्रीची झोप पळायला हवी. म्हणजे आता लोकसंगीत हव.
मुलगा लोकसंगीत. ते कशाला आणखीन, आता तूच म्हणली ना तू मॉडर्न वगैरे आहे ते. इंस्टा आणि स्नॅपचॅटवर पोसलेल्या मुलांचा लोकसंगीताशी काय संबंध.
मुलगी त्या मुलांच सोड रे तू आता. प्रेमाच्या इम्पॅक्ट कडे लक्ष दे. प्रेमाचा इम्पॅक्ट लोकसंगीताशिवाय येत नाही. हल्ली खूप बोलबोला आहे याचा. आमच्या प्रायोगिक मधेसुद्धा आम्ही कुठेही लोकसंगीत घुसडतो. काय इम्पॅक्ट येतो म्हणून तुला सांगते. अगदी लोकल ते ग्लोबल फिलिंग येत. लोकसंगीताशिवाय प्रेमाचा इम्पॅक्ट येत नाही.
मुलगा ए वाजव रे लोकसंगीत (तो कोंबडी पळाली वाजवतो) हे लोकसंगीत आहे. कोंबडी पळाली. तुझीच तंगडी धरुन हातात देइन. लोकसंगीत वाजव. (तो झिंगाट वाजवतो) तुझ्या बापाने बघितल का कधी झिंगाट म्हणजे लोकसंगीत. कुठुन आणले ग याला?
मुलगी अरे तो लग्नाच्या वरातीत बँड वाजवतो. तो हे असेच काहीतरी वाजवनार झिंगाट नाहीतर कोंबडी. तूच सांग त्याला काय वाजवायचे ते.
मुलगा अरे लोकसंगीत म्हणजे लेझीमच्या नृत्याचा बँड. (ते बँड वाजवतात) ए प्रेमाच्या बॅकग्राउंडला लेझीमचा बँड वाजवनार?
मुलगी दुसर काही बघ
मुलगा लावणी (मान हलवतो) पोवाडा.. छ्या, भारुड नाही. अजून काय असते मराठीत अभंग, ओव्या, आरत्या, वासुदेव आला, हे नाही सुचत ग. तूच सांग
मुलगी मला नाही माहीत. माझा फॉर्मुला आहे गोष्ट तुझी आहे.
मुलगा कोळी गीत गोमू संगतीन माझ्या तू येशील का? नाहीतर गुलाबाची खळी बघा हल्दीन माखली. (वाजवनारे जोशात वाजवतात) हे लगेच आल. आता मी म्हणतो त्याच्यावर वाजव. (तो गाणे म्हणतो. ती त्याच्या भवताल प्रेमात पडल्यासारखे फेर धरते, नाचते) एक गाव छोट सुंदर आटपाट नगर त्या गावात भेटले दोन जीव बसस्टॉपवर भेटता भेटता सुटले ह्दयातून तीर डुबले प्रेमाच्या डोहात ते दोघे प्रेमवीर