The Great Game – अंतिम भाग

रशियाचा वाढता प्रभाव १८८० पर्यंत मध्य आशियात रशियाचा अंमल सर्वत्र पसरला होता. रशियाच्या या पराक्रमाचा सूत्रधार होता जनरल कॉफमॅन. त्याला साथ दिली ती जनरल चेरनैव्ह, स्कोबेलेव्ह, या रशियन जनरल्सनी. तसेच इग्नेटिव्ह या रशियन अधिकाऱ्याने मध्य आशियाचा दौरा करुन जी या भागाविषयी, तसेच खानांच्या सुरक्षाव्यवस्थेविशयी जी माहिती मिळविली होती त्याचा रशियाला खूप फायदा झाला. रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे ताश्कंद शहर रशियाने आधी ताब्यात घेतले. हेच शहर पुढे जाऊन रशियाच्या मध्य आशियातील हालचालींचे केंद्र बनले. ताश्कंदनंतर ऐतिहासिक शहर समरकंद, नंतर बुखारा आणि हळूहळू संपूर्ण मध्य आशियात रशियाचे साम्राज्य पसरले. फरक इतका होता की ताश्कंद हे शहर रशियाने ताब्यात घेतले होते तर इतर ठिकाणी तेथील अमिरच राज्य करीत होते. रशियन व्यापाऱ्यांना तेथे व्यापार करायला मुक्त परवानगी होती. या शहरांपासून जवळच खानांवर नजर ठेवायला रशियन फौजांची छावनी होती. मध्य आशियातील एक त्रिकोणाकृती प्रदेश अजूनही खिवाच्या खानाच्या ताब्यात होता. या आधी त्यावरील दोन आक्रमणे फसली होती. आजूबाजूला असणाऱ्या वाळवंट आणि थंडीमुळे खिवा पर्यंत पोहचायचा प्रवास खडतर होता. यावेळेला रशियाने आधी कॉस्पियन समुद्रात बंदर बाधले. हे काम फार गुप्ततेने करण्यात आले. तसेच एका बाजूने ताश्कंद आणि कोकंड वरुन फौजा आल्या तर दुसऱ्या बाजूने कॉस्पियन समुद्रावरुन फौजा आल्या. फार जास्त संघर्ष न होता खान जनरल कॉफमनला शरण आला. मध्य आशिया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रशियाच्या अधिपत्याखाली आला.

तुर्कमान टोळीचे मुख्य शहर असलेल्या Geok Tepe जिकण्याचा पहिला प्रयत्न जरी अयशस्वी झाला असला तरी रशियाने दुसऱ्या प्रयत्नात ते जनरल स्कोलेबेदेव्हच्या नेतृत्वात जिंकले. हळूहळू रशिया ब्रिटिश-भारताच्या जवळ येऊ लागला होता. रशियाने अतिशय महत्वाचे असणारे तुर्कमानातले मर्व्ह हे शहर सुद्धा ताब्यात घेतले. आता रशिया आणि ब्रिटिश-भारत यामधे फक्त अफगाणिस्तान, काशगर आणि पामिरच्या पर्वतरांगा येवढाच भाग उरला होता. अशात रशियाने पामेदज या एका छोट्या गावावर हल्ला केला. हे गाव अफगाणिस्तान्या ताब्यात आहे की तुर्कमानच्या यावरुन वाद होताच. ब्रिटिशांनी अफगाणला पाठिंबा दिला परंतु प्रत्यक्ष युद्धात मदत केली नाही. अफगाणी सैन्याचा पाडाव झाला. ब्रिटिशांनी यावरुन रशियावर आतराष्ट्रीय दबाव आणला. रशिया आणि ब्रिटिश यांच्यामधे करार झाला. पामेदज हे जरी रशियाच्याच ताब्यात राहिले तरी अफगाणिस्तानला बफर झोन म्हणून मान्यता दिली. दोन्ही देशांनी अफगाणिस्तानात सैन्य न उतरविण्याचा करार केला. ब्रिटिश माध्यमांनी रशिया हा करार माननार नाही अशी ओरड केली असली तरी सत्य हे आहे त्यानंतर जवळ जवळ शंभर वर्षे म्हणजे १९७९ पर्यंत कुठल्याही आंतरराष्ट्रिय सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केला नाही.

पामिर काशगर चीनच्या राजाने परत जिंकले त्यामुळे आता रशिया आणि ब्रिटिश भारत मधे पामिरच्या पर्वतरांगा हाच भाग उरला होता. रशियन सैन्याच्या हालचाली या पामिराच्या भागात दिसायला लागल्या अशा बातम्या ब्रिटिशांपर्यंत पोहचत होत्या. चित्राल आणि हांजा या राज्यातून ब्रिटिश भारतावर आक्रमण करता येते अशी भिती ब्रिटिशांना होती. तेंव्हा या कारणाने ही दोनही राज्ये ब्रिटिशांना त्यांच्या प्रभावखाली हवी होती. ब्रिटिशांचा दूत Fransis Younghusband हा काराकोम मार्गे हंजाला पोहचला. प्रवासातच त्याला माहिती मिळाली होती कि रशियाची आणि हंजाच्या राजाची बोलणी झाली आहे आणि रशिया त्याला मदत करायला तयार आहे. तरीही Younghusband ने हंजाच्या राजाची समजूत काढायचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही. १८९१ साली कर्नल डुरांडच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश सेना हंजा आणि नागर जिंकायला निघाल्या. संघर्ष झाला आणि ब्रिटिशांनी कब्जा मिळविला, रशियावरुन मदत आली नाही. चित्रालवरील आक्रमण मात्र ब्रिटिशांना कठीण गेले. ब्रिटिशांनी महतप्रयासांनी तो भाग जिंकला. परत एकदा दोनही देश एकमेकांच्या अगदी जवळ पोहचले.

शेवट १९०७ साली एका कराराने ब्रिटिन आणि रशियामधला हा संघर्ष संपला. ते संपण्याचे कारण मात्र वेगळे होते. रशियाने आता पूर्वकडे लक्ष द्यायला सुरवात केली होती. पूर्वेच्या राज्यात सुद्धा रशियन साम्राज्याचे जाळे पसरावे, तिकडे व्यापारी संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी रशियाचे प्रयत्न सुरु होते. रशियाने मॉस्कोपासून व्लॉदिव्हॉस्तोक पर्यंत जवळ जवळ ४५०० किमीची रेल्वे बांधायची ठरविले. या रेल्वेमुळे रशियाला सैन्य, व्यापारी सामुग्री पश्चिमेकडून पूर्वेकडे त्वरीत हलवावयला मदत होणार होती. जपानला रशियाची हि चाल त्याच्या राज्याला धोका वाटली. जपानने रशियाशी टक्कर घ्यायचे ठरविले. जपानने रशियाच्या पोर्ट आर्थर या बंदरावर हल्ला केला. दुसऱ्या बाजूला जर्मनी आता आपले साम्राज्य वाढवित होते. ब्रिटिश आणि रशिया या दोघांनाही जर्मनीपासून असलेला धोका वाढत चालला होता. जपानचे आक्रमण रशिया सहज परतावून लावेल असे वाटत होते परंतु तसे झाले नाही. जपानी सैन्याने रशियाचा पराभव केला. पोर्ट आर्थर ताब्यात घेतले. त्याचवेळेला रशियात बंड सुरु झाले होते. ते ताब्यात ठेवायला रशियाला सैन्याची गरज होती. ब्रिटनमधे निव़डणुका होऊन टोरी पराभूत झाले होते आणि लिबरल निवडून आले होते. रशिया आणि ब्रिटन यांच्यामधे चर्चा सुरु झाल्या. अखेर ३१ ऑगस्ट १९०७ साली दोन देशात करार होऊन हा संघर्ष थांबला. हा करार काय होता ते पुस्तकातच वाचायला हवे.

ब्रिटिश धोरण पुस्तकात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण संघर्षात ब्रिटिशांनी दोन प्रकारचे धोरण वापरले एक Forward policy आणि दुसरे Masterly inactivity. साधारणतः एकोणवीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी Forward Policy जे धोरण अवलंबिले होते. मध्य आशियात केलेले प्रवास, नकाशे काढून सैन्याच्या मार्गक्रमणाविषयी आखलेली धोरणे, हेरगिरी, तेथिल राज्यांशी आपणहून केलेली बोलणी आणि गरज पडल्यास केलेली आक्रमणे हे सारे या धोरणाअतंर्गत येत होते. १८४३ साली अफगाणिस्तानात ब्रिटिशांचा झालेला पराभव, त्यात झालेला रक्तपात, त्याच सुमारास दोन ब्रिटिश अधिकारी सॉडर्ट आणि आर्थर कॉनेली यांची बुखाराच्या अमिराने केलेली क्रूर हत्या यामुळे ब्रिटिशांनी Masterly inactivity हे धोरण स्वीकारले. ज्यामधे हेरगिरी, साहसी प्रवास, आक्रमणे यावर बंधने होती. ब्रिटिश फक्त रशियाच्या मध्य आशियातील हालचालींवर लक्ष ठेवून होते. रशियाला पश्चिमेत गुंतवुन ठेवण्यावर ब्रिटिशांचा भर होता. रशियाचे साम्राज्य जसजसे मध्य आशियात पसरत गेले तसतसे ब्रिटिशांच्या धोरणात बदल होत गेला. प्रवास परत सुरु झाले, हेरगिरी परत सुरु झाली. हंजा, चित्राल या प्रांतावर हल्ले करुन ते ताब्यात घेण्यात आले. साधारण धोरण एकच असले तरी ब्रिटनमधे होणाऱ्या सत्ताबदलांचा धोरण राबविण्यात फरक पडत होता. ठोबळमानाने असा विचार करता येईल की टोरीच्या राजवटीत धोरण हे forward policy कडे झुकत होते तर लिबरलच्या काळात धोरण Masterly inactivity कडे झुकत होते. कर्झन वगैरे मंडळींनी ज्याप्रकारे १९०७ च्या कराराला विरोध केला त्यावरुन अशी शंका येते कि जर टोरी सत्तेत असते तर कदाचित करार झाला नसता किंवा तो करार व्हायला विलंब झाला असता.

पुस्तक का वाचावे हे पुस्तक कादंबरी नाही तरी तर एका विशिष्ट विषयाला (The Great Game) धरुन ऐतिहासिक घटनांची मांडणी केलेली आहे. असे असले तरी हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही याचे मुख्य कारण आहे पुस्तकातली रोमहर्षक प्रवासवर्णने. लेखकाने प्रवाशांनी स्वतः लिहिलेली प्रवासवर्णने, त्यांची आत्मवृत्ते, त्यांनी ब्रिटिश सरकारला दिलेला अहवाल असा सारा अभ्यास करुन ते प्रवास लिहिले आहेत. कादंबरीसारख्या लिखाण शैलीमुळे लिखाणात थरार येतो, संवाद येतात, प्रसंगांची बांधणी येते, रहस्यात्मकता येते आणि व्यक्तीच्या मनातील द्वंद्व येते. खिवाचा खान आणि कॅप्टन शेक्सपियर यांच्यातील रशियन गुलाम सोडण्याच्या वाटाघाटीच्या चर्चा तर थरारक आहे. कल्पना किती भयंकर आहे बघा एक ब्रिटिश अधिकारी परक्या अशा खिवा प्रांतात जातो. तेथे जाऊन ब्रिटिशांशी वैर असलेल्या रशियाचे गुलाम त्या खिवाच्या राजाने सोडावे म्हणून वाटाघाटी करतो. त्याच वेळेला दुसऱ्या एका अधिकाऱ्याला बुखाराच्या अमिराने पकडून ठेवले आहे हे त्या ब्रिटिश अधिकाऱ्याला माहीत नसते पण आपल्याला माहीती असते. एकसुद्धा रशियन गुलाम शहरात नको म्हणून जेव्हाही त्याला गुलामांविषयी माहीती मिळते तो परत येतो, वाटाघाटी करतो.

सरळ साधी सोपी भाषा हे पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट आहे. जिथे पूर्ण संदर्भ उपलब्ध नाहीत तेथे लेखकाने थोडी मोकळीक घेऊन ते काही प्रसंग कल्पनेने उभे केले आहे. उदाहरणार्थ जॉंर्ज हेवर्ड या ब्रिटिश प्रवाशाचा मृत्यु, किंवा सॉडर्ट आणि कोलोनीचा मृत्यु, हे मृत्यु जेंव्हा झाले तेंव्हा कुणीच ब्रिटिश तेथे नव्हता. त्या मृत्युंची माहीती नाही. लेखक मी अशी मोकळीक घेउन लिहतो आहे असे सांगून ते प्रसंग लिहितो. त्यामुळे ती गोष्ट पूर्ण होते. लेखकाने पुढे तो कसा मारला गेला माहिती नाही असे म्हणून सोडले असते तर ती गोष्ट अपूर्ण वाटली असती. अशा बऱ्याच गोष्टी लेखकाने पूर्ण केल्या आहेत. काहींविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत लेखक त्यादेखील सांगतो. पुस्तक रंजक बनते.

या पुस्तकातले बरेच संदर्भ हे ब्रिटिश पुस्तकातून आले आहेत किंवा ब्रिटिश प्रवाशांच्या प्रवासवर्णनातून आले आहेत किंवा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या नोंदीवर आधारीत आहे. तरी बऱ्याचदा यात रशियन इतिहासकार काय म्हणतात हे सांगितले आहे. काही वेळेला तर एकाच घटनेकडे बघण्याचा रशियन आणि ब्रिटिश इतिहासकारांचा दृष्टिकोण कसा भिन्न असू शकतो हे दाखवून दिले आहे. ब्रिटिश अधिकारी रशियन गुलामांना मुक्त करुन तो स्वतः रशियात घेऊन गेला. ब्रिटिशांच्या मते ही अतिशय शौर्याची गोष्ट होती. रशियन इतिहासकारांच्या मते मात्र ब्रिटिश अधिकारी रशियाच्या सुरक्षेव्यवस्थेची पाहणी करायला आला होता. अशा संदर्भामुळे दोन्ही बाजूंची माहीती मिळते पुस्तक एकसुरी न राहता काहीसे संतुलित होते.

काही खटकलेले. या पुस्तकात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे ज्या भारताविषयी हे पुस्तक आहे त्याचा उल्लेख फार कमी आहे. १८५७चा उठाव झाला येवढेच काय ते पुस्तकात येते. या व्यतिरीक्त कलकत्त्यात कोण व्हाइसरॉय आला कोण गेला इतकाच काय तो भारताचा उल्लेख येतो. ज्या भारतासाठी मध्य आशियात हा संघर्ष झाला त्या भारतात असे काय होते की ज्यामुळे ब्रिटिशांना काहीही झाले तरी भारत हातातून जाऊ द्यायचा नव्हता. त्याकाळी ब्रिटनमधे लोकशाही होती तेंव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेचे तेंव्हाचे आकडे नक्कीच उपलब्ध असतील. या संघर्षात भारतीय होते. ब्रिटिशांच्या सैन्यात शीख, गोरखा, काश्मिरी सामील होते. सॉडर्ट आणि कॉनेलीची बुखारामधे कत्तल झाल्यानंतर ब्रिटिशांनी अशा साहसी प्रवासावर, हेरगिरीवर बंघने घातली. तरीही नकाशांची गरज होती. अशा वेळेला ब्रिटिशांनी स्थानिक भारतीयांना अशा प्रवासासाठी तयार केले. भारतीयांनी ब्रिटिशांसाठी असे खडतर, धोकादायक प्रवास करुन नकाशे बनविण्यात मदत केली. हे भारतीय नागरीक प्रवासी किंवा मुस्लिम धर्मोपदेशक म्हणून प्रवास करीत असत. असे असतानाही ब्रिटिशांच्या या संघर्षाविषय़ी भारतीयांना काय वाटते. भारतात काय घडामोडी घडत होत्या याचा उल्लेख पुस्तकात येत नाही हे नक्कीच खटकते.

वर उल्लेख केल्या प्रमाणे हे पुस्तक प्रवास वर्णनातून सारा संघर्ष उभा करते. प्रवास समजायचा असेल तर नकाशे हवे. मध्य आशिया हा बहुदा माहिती नसलेला प्रदेश आहे. अशा वेळेला नकाशांची खूप मदत होते. फार थोडेच नकाशे पुस्तकात आहे. हा दोष किंडल व्हर्जनचा आहे की मूळ पुस्तकात नकाशे कमी आहेत याची कल्पना नाही. पुस्तक वाचताना सतत गुगल मॅपचा वापर करावा लागला. त्याकाळातील काही गावांची नावेही आज बदललेली आहेत.

हे पुस्तक ब्रिटिशाने लिहिले आहे तेंव्हा यात बऱ्यापैकी ब्रिटिशांचे उदात्तीकरण असणारच. याला मानसिकतेचा दोष म्हणा किंवा नका म्हणू पण जे आहे ते आहे. तरीही काही रशियन अधिकाऱ्यांच्या रोमहर्षक प्रवासाचे वर्णन यात आहे. ब्रिटिशांनी सतत रशियाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला असला तरी ब्रिटिशांचे धोरण सुद्धा दुटप्पीच होते पण यावर लेखक फार लिहित नाही. अफगाणिस्तानातून परत येणाऱ्या ब्रिटिश सैन्याची ज्या प्रकारे कत्तल झाली त्याचे सविस्तर वर्णन या पुस्तकात येते. त्यानंतर ब्रिटिशांनी घेतलेला बदला हा तितकाच क्रूर आणि संहारक होता. ते मात्र एका परिच्छेदात संपते. मैवांदच्या लढाईतील मलालाच्या पराक्रमाच्या गाथा अफगाणी लोकगीतात आहेत. पुस्तकात मलालाचा उल्लेख येत नाही. ब्रिटनमधील सत्तांतरामुळे ब्रिटनच्या मध्य आशियातील धोरणात कसे बदल होत होते हे फार सविस्तरपणे सांगितले आहे पण रशियातील बदलांमुळे रशियाच्या धोरणात काय बदल झाला ते तितके स्पष्टपणे समजत नाही.

हे पुस्तक एक गोष्ट शिकविते की कुठल्याही देशाच्या पराराष्ट्रीय धोरणाचा एक आणि एकमेव उद्देष असतो तो म्हणजे त्या देशाचा तात्कालीन आणि दूरगामी स्वार्थ. रशिया आपल्या गुलामांना खिवामधून मुक्त करु शकला नाही ते काम ब्रिटिशांनी केले. ती काही उपकाराची कृती नव्हती तर गुलामांची मुक्ती करायची आहे हे कारण देऊन रशियन मध्य आशियात प्रवेश करतील अशी भिती ब्रिटिशांना होती. तीच गोष्ट रशियाची. रशियाने मध्य आशियातील जुलमी सत्ता उलथवून टाकण्यासाठी म्हणून आम्ही तिथे आक्रमण करीत आहोत असे सांगून सारा मध्य आशिया ताब्यात घेतला. मूळ उद्देष होता मध्य आशियातील व्यापारावर रशियनचे वर्चस्व स्थापन करणे. कदाचित भारतापर्यंत पोहचणे.

इतिहास काय सांगतो. हा साम्राज्यशाहीचा खेळ १९०७ साली करार झाला आणि संपला हे जरी खरे असले तरी तो संपण्याचे कारण मात्र तो करार नव्हता असे माझे ठाम मत आहे. बोलशेविकच्या उठावानंतर झारशाही संपुष्टात आली आणि म्हणूनच दोन साम्राज्यांमधला हा खेळ संपला. पुढे पन्नास वर्षांनी असाच खेळ झाला आता खेळाडू बदलले होते, अमेरीका आणि सोवियत युनियन. हा खेळ सुद्धा सोवियत युनियन संपुष्टात आल्यानंतरच संपला. रशियावर आक्रमण करुन रशियात आत घुसण्याची जी चूक नेपोलियनने केली होती तीच चूक पुढे जाऊन हिटलरने केली. अफगाणिस्तानावर हल्ला करण्याची जी चूक ब्रिटिशांनी केली तीच चूक रशियाने १९७९ साली केली. या पुस्तकात एक प्रसंग आहे एक ब्रिटिश अधिकारी अफगाणी सैन्यप्रमुखाला सोने देऊन ब्रिटिशांना तेथून सुखरुप जाऊ देण्याचा प्रस्ताव ठेवतो. त्या प्रस्तावाची बोलणी दरम्यानच त्या ब्रिटिश अधिकाऱ्याची कत्तल होते. हे वाचत असताना मला Zeo Dark Thirty या चित्रपटातला एक प्रसंग आठवला. त्यात पण अशाच बोलणीच्या वेळेला आत्मघातकी बॉम्बस्फोट होऊन अमेरीकन छावनी उध्वस्त होते. चित्रपटातील हा प्रसंग कितपत खरा होता माहीत नाही. इतिहास शिकवतो पण आपण शिकत नाही याचीच ही उदाहरणे आहेत.

हे पुस्तक जरी इतिहासाचे असले, यातला इतिहास अस्सल असला तरी मी या पुस्तकाला इतिहासाचे पुस्तक म्हणणार नाही. माझ्या मते हे पुस्तक म्हणजे नायक, नायिका, खलनायकाशिवाय लिहिलेली एक कादंबरी आहे. त्याचमुळे वाचनीय आहे. परराष्ट्रिय धोरणाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचावे. तसेच हल्ली कॉरपोरेट स्ट्रेटेजीच्या बाबतीत सुद्धा या पुस्तकाचे नाव घेतले जाते. Forward Policy, Masterly inactivity याचा कॉर्पोरेट स्ट्रेटेजीमधे समावेश करता येऊ शकतो. ब्रिटिशांचा Russophobia (रशियनांची भिती) कितपत योग्य होती, या भितीमुळे ब्रिटिशांनी जी आक्रमणे केली त्याला उत्तर द्यायला म्हणून रशिया मध्यआशियात शिरला आणि तेथे स्थिरावला कि खरच रशियाला भारतापर्यंत आपले साम्राज्य वाढवायचे होते याचे स्पष्ट उत्तर सापडत नाही. या दोन साम्राज्याच्या संघर्षात या दोन साम्राज्याशी काहीही संबंध नसनाऱ्या कित्येकांचे रक्त सांडले हे मात्र खऱे. एक लोकशाही आणि एक एकाधिकारशाही यांचा साम्राज्याच्या हव्यासासाठी कित्येकांचे रक्त सांडणे खरच योग्य होते का? हे टाळता आले असते का? हा विचार हे पुस्तक संपले तरी मनातून जात नाही.