अशी उधळली सभा

(मागील भिंत हॅपी बर्थडे, बारशाला यायच हं, मगळागौरीची पुजा, अभिनंदन असल्या पोस्टर्सनी भरलेली असते. एका बोर्डावर मेहंदी आणि टॅटू असे लिहिले असते ठळक अक्षरात शुल्क आकारण्यात येइल असेही लिहिले असते. अमृतानंद स्वीटस, इंडीयन जुगाड प्रस्तुत सोसायटीच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा असे लिहून आपला बंटी म्हणून एक मोठा फोटो असतो. एका ठिकाणी ‘फ्री सेल्फी’ असा बोर्ड लावून एखाद्या सेलेब्रिटी सारखे कपडे घातलेल्या व्यक्ती सोबत तरुण मुल मुली सेल्फी काढीत असतात. सेल्फी अशा प्रकारे घेतला जातो की त्यात ती व्यक्ती नसली तरी फरक पडत नाही. एका ठिकाणी वाढदिवस असा बोर्ड लावलाय तिथे एक दहा वर्षाचा मुलगा उभा आहे, एके ठिकाणी प्रमोशन असा बोर्ड लावलाय तिथे एक व्यक्ती सुटाबुटात उभा आहे आणि एके ठिकाणी मंगळागौर असा बोर्ड लावलाय तिथे एक स्त्री नववार नेसून उभी आहे. एके ठीकाणी बारसे असा बोर्ड आहे तिथे एक स्त्री साडी नेसून उभी आहे. कार्यक्रमाला येनारा त्याचा बोर्ड कोणता ते बघतो तेथे जातो अभिनंदन करतो आणि प्रेक्षकात जाउन बसतो. एक व्यक्ती प्रमोशन वाल्यांचे Happy Birthday असे आभिनंदन करतो. तेंव्हा त्याला योग्य बोर्ड दाखविण्यात येतो एक स्त्री येते आणि मंगळागौरीच्या बोर्डाजवळ उभ्या असलेल्या स्त्रीला एका लहान मुलाच्या कपड्याचे पाकीट देते.)

हे काय

बाळाचे कपडे

इश्श हे काय, इकडे मंगळागौर, बारसे तिकडे. आमच्या लग्नाला फक्त तीनच महीने झाले.

(स्टेजच्या पुढील भागात काही माणसे आपसात बोलल्यासारखी परंतु प्रेक्षकांना ऐकू जाइल असे बोलत असतात)

जाधव: केतकर संपूर्ण कार्यक्रमाचे तुम्हीच संचालन करनार आहात ना की मधेच देनार माइक त्या देशपांड्याच्या हातात. गेल्या वर्षी तुम्ही तेच केले होते.

केतकर: काय जाधव साहेब नको त्या आठवणी का जागवता. मला आता शुगरचा (करंगळी दाखवत) त्रास नाही. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन मीच करनार. गेले वर्षभर रोज त्याचसाठी वॉक करीत होतो

जाधव: (करंगळी दाखवत) याच्यासाठी तुम्ही वर्षभर वॉक करीत होता.

केतकर: काय जाधव साहेब तुम्ही पण ना.

जाधव: हे घ्या कार्यक्रमाचे पेपर. लक्षात ठेवा सोसायटीचा वर्धापन दिवस, परबांच्या मुलाचा वाढदिवस, फणसाळकरांचे प्रमोशन, गुप्तेंच्या मुलाचे बारशे, आमच्या सूनेची मंगळागौर. पाठ करुन टाका.

केतकर: सगळ पाठ आहे हो. तुमच्या सुमेची मंगळागौर सुद्धा पाठ आहे मला.

जाधव: मंगळागौर तुम्ही कशाला पाठ करता त्यासाठी महिलामंडळ बोलावले आहे. काय आहे  कुणाला किती फोकस करायचे आणि कुणाला कसे लाथाडायचे ते लक्षात ठेवा. फणसाळकरांनी अजून पैसे दिले नाही तेंव्हा त्याचा कार्यक्रम असा गुंडाळायचा की पता लागायला नको सुरु कधी झाला आणि संपला कधी. घोरपड्याला हातात माईक मिळाला कि बोंबलत सुटतो. त्याला आवरला पाहिजे. पब्लीक जमली की फक्त सांस्कृतीक कार्यक्रम झिंग झिंग झिंगाट.

केतकर: हे सार करायलाच तर यावर्षी कार्यक्रमाचे संचालन हातात घेतले आहे. कार्यक्रमाच्या संचालकानेच कार्यक्रम पाडण्याचे पुण्यकर्म मी करनार आहे. दहा वर्षे या सोसायटीत राहतो मी. समजणार सुद्धा नाही. (डोक्यावरील केस मागे करीत मानेला झटका देत) जोर का झटका धिरेसे लगे.

जाधव: स्वतःच संचालन करुन त्याच कार्यक्रमाची पार वाट लावनारे तुमच्यासारखे तुम्हीच. त्रिवार वंदन. बाकी यावेळेला मी सुद्धा हातभार लावनार आहे म्हटल.

केतकर: क्या बात है.

जाधव: त्या स्पाँसरची मी वाट लावणार आहे. आभार मानायचे सांगून असे शालजोडीतले हाणतो का जोड्याने मार दिल्याचे समाधान लाभले पाहिजे. परत इथे पाय ठेवणार नाहीत. स्पाँसरशीपच्या हजार रुपयासाठी हजार चकरा मारायला लावतात.

केतकर: माझा गोंधळ होउ न देता कार्यक्रमात पूर्ण गोंधळ होणार खातरी ठेवा. तुम्ही मात्र तुमच ते माइक, स्पीकर, ती सिडी वगेरे बरोबर चालत नाही ना याची खात्री करुन ठेवा. सांस्कृतीक कार्यक्रमाच्या वेळेला कोणी गायक गायला लागला की स्पीकरचा आवाज बसायलाच हवा. लेल्याची पोरगी भरतनाट्यम नाचायला आली रे आली की झिंगाटची सीडी लावून द्या. भरतनाट्यामच्या वेषातच झिंगाटचा नाच झाला पाहिजे. लेल्या नेहमी सांगत असतो आम्ही शास्त्रोक्त तुम्ही गावठी. (तिकडे बघत) काय हो जाधव ते सॅम्पल कशासाठी आणले आज.

जाधव:  घोरपडेंच्या ओळखीतल कुणी स्टँडअप कॉमेडीयन आहे. त्या सॅम्पलाचा असा वापर करा कि परत वापर करायच्या लायकीचा राहनार नाही.

(एक व्यक्ती प्रवेश करतो, केतकर त्यांना बघून दुरुनच नमस्कर करतात आणि लगेच माइकजवळ येतात. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केतकर जोऱ्यात भोपू वाजवतात.)

केतकर: या अध्यक्ष महोदय. (मानेची तशीच हालचाल करीत) जोरका झटका धिरेसे लगे. ….. स्पाँसरची वाट बघतोय ते आले की लगेच कार्यक्रमाला सुरवात करु. तोवर उभे राहा.

(इकडे तिकडे बघतो. मंचावर तीन खुर्च्या असतात एकावर अमृतानंद मिठाइवाला, दुसऱ्यावर राजू जुगाड, तिसऱ्यावर बंटी असे लिहिले असते. तो केतकरांना जाउन विचारतो)

अध्यक्ष: माझ्या नावाची खुर्ची नाही आहे इथे.

केतकर: काय घोरपडे खुर्चीशिवाय चैन पडत नाही का तुम्हाला. विनोद आहे हो हलकेच घ्या….. पण मी म्हणतो तुम्हाला बसायचेच कशाला? जे काही हाणायचे आहे ते उभ्यानेच हाणा. भाषण म्हणतो मी. उभे राहील्याशिवाय खुर्ची मिळत नाही हे आपल्याला का सांगायला हवे.

(तो व्यक्ती मागे जाउन उभा राहतो. तीन स्पॉन्सर येतात, त्यांच्या नावाच्या खुर्च्यावर बसतात. सोसायटीची मंडळी उभी असतात. केतकर मंडळींना शांत करण्यासाठी परत एकदा भोपू वाजवतात आणि बोलायला लागतात.)

केतकर: मंडळी नमस्कार, मी सुहास केतकर निवृत्त पाणघोडा……. म्हणजे मी निवृत्त आणि ब्लॉक पाणघोडा, फ्लॅट नं ७०७, मी व्यासपीठावरील आपले तीन स्पाँसर आणि सोसायटीचे अध्यक्ष यांचे या कार्यक्रमात स्वागत करतो. तसेच जमलेल्या समस्त सोसायटी मेंबरचे पण स्वागत करतो. (हळूच वळून बघत) फारस कुणी आलेल दिसत नाही. …. ते इमेल वगेरे केले होते न रे बरोबर….. (मागून जोरात आवाज येतो ‘केले होते’) आजच्या कार्यक्रमाचे डायमंड स्पाँसर आहेत Amrtania Diabetical Sweets चे संस्थापक श्री अमृतानिया. …..इमेल केल होत तर मग लोक आले का नाही……. (मागून परत जोरात आवाज येतो ‘नाष्ट्याला येतील सगळे. फुकटे आहेत सारे.’ ) मी श्री अमृतानिया यांना विनंती करतो की त्यांनी दिप प्रज्वलन करावे तसेच इतर स्पाँसर आणि सोसयटीच्या कार्यकारणी मंडळाच्या सभासदांनी मम म्हणत इतरांच्या हाताला हात लावावा. … त्यांना आरामातच येउ दे म्हणा, इथे बसूनही काय बघनार आहे हे तीन जाडे ….. सर्वांनी रांगेत या. तुम्ही पैसे दिलेत म्हणून आपल्याच बापाचा दिवा असल्यासारखी दिव्याजवळ गर्दी करु नका. विनोद हलकेच घ्या बरं.

(केतकर एकदा भोपू वाजवतात, भोपू वाजताच सारे उठतात. केतकरांच्या भोपूच्या तालावर नाचत सारे दिव्याजवळ येतात. भोपू वाजतच राहतो. जाड्या लठ्ठ स्पाँसर पुढे त्याच्या हाताला हात लावून दुसरा, त्याच्या हाताला हात लावून तिसरा, त्याला हात लावून सोसायटीचे अध्यक्ष, त्यांच्यामागे इतर अशी रांग लावून उभे राहतात. )

अमृतानिया: माचिस

केतकर: (केतकर नाहीच्या सुराचा भोपू वाजवतात) काडेपेटीची गरज नाही, तिथे एक बटन आहे ते दाबले की लाइट लागतो.

(स्पाँसर बटन दाबतो, दिवा लागतो. केतकर भोपू वाजवून लोकांना टाळ्या वाजवायला सांगतात आणि मग टाळ्या वाजवतात. सारेच केतकरांसोबत टाळ्या वाजवतात.)

अमृतानिया: बरे दिवे लावता तुम्ही.

(परत भोपू वाजतो आणि सारे परत खुर्चीत येउन बसतात)

केतकर: आता स्वागतगीत वाजवले जाइल. वाजवा रे वाजवा.

(बराच वेळ काहीच वाजत नाही. अचानक अधे मधे भयंकर आवाज वाजतात, मग वेलकम असा जोरात गाण्याचा आवाज येतो. परत थांबतो. )

केतकर: काय झाले?

आवाज: सीडीवर कचरा झालाय साफ करतोय.

केतकर: करा सावकाश काही घाई नाही. ए सॅम्पल इकडे ये. ओ तुम्ही तुम्ही इकडे या. इतक्यातच तुमची गरज पडेल असे वाटले नव्हते

कॉमेडीयन: कोण मी

केतकर: हो तुम्हीच. एखादा कडक जोक सांगा.

कॉमेडीयन: कडक जोक, तो काय चहा आहे कडक करायला.

केतकर: फालतू जोक करु नका. तुमचा जोक संपला की मला खूण करा. मी भोपू वाजवतो म्हणजे लोक हसतील. भोपू वाजविल्याशिवाय कुणी हसणार नाही. मी भोपू वाजवला की लगेच थांबायचे.

कॉमेडीयन: एक संता असतो, एक बंता असतो दोघेही जंगलात जातात. (अचानक वेलकम हो राया वेलकम असा आवाज येतो. कॉमेडीयन दचकून मागे जातो. साऱ्यांना शांत करण्यासाठी केतकर जोरात भोपू वाजवतात)

केतकर: संता बंता तुम्ही थांबा, सीडीवाले तुम्ही चालू द्या (सीडी परत थांबते, केतकर परत भोपू वाजवतात) संता बंता शुरु.

कॉमेडीयन: मी संता बंता, एक संता असतो एक बंता असतो. (जोरात आवाज येतो वेलकम हो राया वेलकम, पण लगेच सीडी बंद पडते. हा खेळ असाच एक दोन वेळा रिपिट होतो. नंतर फक्त संता म्हटले की वेलकम आवाज येतो. बंता म्हटले की परत गाणे सुरु होते. काही वेळाने कॉमेडीयन जोक सांगत राहतो आणि गाणेही अधून मधून रडत रखडत वाजत राहते. शेवटी कंटाळून केतकर जोर जोरात भोपू वाजवून दोनही थांबवायला सांगतात आणि स्वागत गीत संपल्याचे टाळ्या वाजवून जाहीर करतात. सारेच टाळ्या वाजवतात.)

केतकर: वेलकम हो राया वेलकम, वॉ काय सुंदर शब्द आहेत. स्वागतगीत असावे तर असे. असे सुंदर स्वागत झाल्यानंतर मी आता स्पाँसर्स आणि त्यांच्या प्रॉडक्टविषयी माहीती सांगण्यासाठी श्री जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. बघू या ते कशी वाट लावतात ते.

स्पाँसर्स: आँ

जाधव: नमस्कार मी दशरथ जाधव, माझ्याच सुनेच्या मंगळागौरीचा कार्यक्रम आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जायचे फुकट आहे. फणसाळकरांना एकदाचे प्रमोशन मिळाले आता तरी ते थोडा खर्च करतील अशी आशा करु या. आजचे आपले डायमंड स्पाँसर आहेत Amrtania Diabetical Sweets, खाओ और खिलाओ. हे त्यांची युएसपी आहे. जगासाठी ते अमृतानिया सेठ वगेरे असले तरी आपल्यासाठी मात्र नाक्यावरचा अमृत जिलेबीवाला. आठवा त्यांची जिलेबी पचवायला काय भीमपराक्रम करावे लागते होते ते. कोणी वीस, कोणी पंचवीस तर कोणी चक्क शंभर वाऱ्या केल्या होत्या. कुठे हेही का मी सांगायला हवे. जिलेबी खाल्ली की दवाखाना, सलाइन कुणाला चुकल नाही. ज्यांने आपल्या पोटात येवढे दुखविले त्याची अमृत जिलेबीवाला ते अमृतानिया सेठ अशी प्रगती बघून तुमच्याआमच्या पोटात दुखनार नाही तर काय.

अमृतानिया: ओ जाधवसाब तुम हमारी तारीफ करत हो या गाली मारत हो कुछ समझमे नाही आ रहा है. हमारे दुकानके बारेमे कुछ बोलो.

जाधवः हम तारीफही कर रहे है, बुराइ तो करतेही नही. ते आपले डायमंड स्पॉंसर आहेत म्हणजे त्यांनी सोसायटीला डायमंड दिला आहे अशा भ्रमात राहू नका (असे म्हणत ते प्रेक्षकांकडे बघतात पण कुणीही हसत नाही.) ओ केतकर भोपू वाजवा, हा विनोद होता. अमृतानिया सेठ माफ करना हं ये जोक था. पण मिनिटा मिनिटाला विनोद हवा नाहीतर फाउल धरतात असे पुल सांगून गेले. अमृतानिया सेठ यांच्या दुकानात शेवेपासून फाफड्यापर्यंत आणि अंगूरी पेढ्यापासून बालुशाहीपर्यंत सर्व मिठाइ अगदी वाजवी भावात मिळते. तुम्हा आम्हा सर्वाना यांच्या दुकानातील मिठाइ फार आवडते. ती मिठाई फक्त मनुष्यप्राण्यालाच आवडते असे नाही बर. त्यांची मिठाइ अगदी मच्छरापासून माशीपर्यंत आणि मुंगळ्यांपासून उंदरांपर्यंत सर्वांना तितकीच आवडते. त्यामुळेच या सर्वांचाच त्यांच्या दुकानात मुक्त वावर असतो. त्यांच्या दुकानात कधीही जा हे सारे प्राणी मिठाइवर येथेच्छ ताव मारीत असलेले दिसतात.

अमृतानिया: ओ घोरपडे ये बहुत हो रहा है. तुम्हारे लोक दुकानको गाली मार रहे हो.

जाधवः अमृतानिया सेठ यांच्या हितशत्रूनी त्यांच्यावर भेसळ करणे, सरकारी जमीन हडपणे असे आरोप केले. ते डगमगले नाही या साऱ्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. ज्या माणसाची सरकार दरबारी उठबस आहे अशा माणसावर आरोप करने त्यांच्या विरोधकांना शोभते का. आजचा प्रसाद त्यांच्या दुकानातूनच आला आहे. हा प्रसाद मोफत आहे तुमची हिम्मत असेल तर नक्कीच खाऊन बघा. अशा या महान दानशूर कर्तबगार पुरुषाचे मी पुष्प गुच्छ देउन स्वागत करतो. (स्वागत करतात)

अमृतानिया: मुझे नही चाहीये तुम्हारा फूल, तुम हमाराही पैसा लेके हमे ही गाली देता है. घोरपडे मै तुम्हे छोडूंगा नाही. मै तुम्हे एक्सपोझ कर दूंगा. मुझे पता है ये सब तुमनेही करवाया है. ए वो प्रसाद लेके चल. दुकानमे बेच देंगे.

जाधव: आपले दुसरे स्पाँसर आहेत ‘इंडियन जुगाड’ या मोबाइल अॅपचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेंद्र झलके म्हणजेच आपला राजू प्लंबर.

राजू प्लंबर: ओ जाधवसाहेब माझी काय वळक करुन द्यायची गरज नाही. समदे आपल्यासनी चांगले वळखून हाय बघा. आपण जावई आहोत सोसायटीचा. तुम्ही ते नाष्टाचा केंव्हा आहे ते सांगा.

जाधव: नाष्टा आहेच. राजूच म्हणण अगदी बरोबर आहे त्याची ओळख करुन द्यायची गरजच नाही. आजचा दुर्मिळ योग बघा आपले एक स्पाँसर आहेत अमृतानिया आणि दुसरा हा राजू. एक खायला लावतो दुसरा फ्लश करायला लावतो. असा स्वीटफ्लश योग परत येणे नाही. गेली कित्येक वर्षे कुठेही काहीही खाल्लेले केवळ या राजूमुळे फ्लश करु शकलो. विचार करा राजू नसता तर. आता तर त्याने कंपनी काढली इंडीयन जुगाड. राजुचे सोसायटीत जे जे जुगाड केलेत सारे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याच्या कंपनीचे ब्रीदवाक्य आहे “तुम्ही तोडा आम्ही जोडतो’. त्यांनी हे फक्त कंपनीतच नाही तर वैयक्तीक आयुष्यात सुद्धा अंमलात आणले. घोरपड्यांचा संडासचा पाइप हो कितीवेळा तुटला आणि राजूने तो न चिडता जोडला. पाइप जोडता जोडता त्यांनी घोरपड्यांच्या मुलीशीच संबंध जोडला. गाठी अशा जुळल्या होत्या की त्यांना लग्न करुन देण्याशिवाय पर्यायच नव्हता. असे जुगाड करण्यात त्यांचा हातखंडा आहे. हा माणूस काय जोडत नाही ते सांगा. आपल्या सोसायटीच्या नळाचा पाइप त्याने स्वतःच्या घरात जोडला आणि आपल्याला आजवर समजले नाही पाण्याचे बिल का वाढते ते. समोरच्याच्या तोंडचे पाणी तुमच्या फ्लशमधे जोडतो तर तुमच्या घरातला फ्लश समोरच्याच्या (पॉझ) स्वयंपाक घरात नेउन सोडतो. गेल्या आठवड्यात बापटाने याला अशीच जोडतोड करताना पकडले. तेंव्हा बापटांवर सूड उगावायचा म्हणून या आपल्या लाडक्या राजूने शेंड्यांच्या घरातला चिमणीचा एक्झॉस्ट बापटांच्या फॉसेटला जोडला. फॉसेटमधून पाण्याएवजी सरळ गरम हवा. बिचारे बापट. बसणे मुश्किल झाले होते त्यांना. लोकांना मुळव्याध म्हणून सांगत होते. सत्य लपते का कधी? जोडायला राजू काहीही वापरतो कुणाची गॅलेरीत वाळत घातलेली भरजरी साडी, कुणाचा नवीन जीन्स, कुणाच्या केबलची वायर असे काहीही चालते. आपण मेलवर चर्चा करतो सोसायटीत चोरांचा सुळसुळाट झालाय. असे सारी जुळवाजुळव करनाऱ्या या जुगाडी व्यक्तीचे मी पुष्पगुच्छ देउन स्वागत करतो. (पुष्पगुच्छ देतो)

राजू प्लंबर: ओ सासरेबुवा घरात तर शिव्या देता. इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून  सोसायटीतल्या पब्लीकसमोर शिव्या देता. बराबर नाही सासरे बुवा. ते नको तुमच पुष्पगुच्छ, पयले नाष्टा द्या.

केतकर: जाधवसाहेबांनी आपल्या स्पाँसरची अशी भारदस्त ओळख करुन देउन कार्यक्रमाला फर्मास सुरवात करुन दिली आहे. धन्यवाद जाधवसाहेब. तर मंडळी तुम्ही आपल्या स्पाँसर्सच्या सेवांचा लाभ घेउ शकता. अर्थातच Please do it at your own risk. Society will not be responsible for any mishap.  जाधवसाहेब या राजूला नाष्ट्याला घेऊन जा. आजचे मुख्य अतिथी आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री गुलाबराव कर्दाळे उर्फ बंटी. त्यांची ओळख मी काय सांगावी तरीही त्यांच्याविषयी दोन शब्द बोलतो.

बंटी: ए घोरपडे तुझ्या माणसांना आधीच सांगून ठेव जे काही बोलायचे ते शिस्तीत बोलायच. इकडत तिकडच बोलला तर राडा होइल.

घोरपडे: माझी माणसे. अहो ही सोसायटी आहे का गुंडांची गँग. ओ केतकर तुम्ही त्या जाधवसारखे करु नका हो. जरा सांभाळून घ्या.

केतकर: तुम्ही काही काळजी करु नका घोरपडे. मी सार व्यस्थित सांभाळतो. असे शालजोडीतले देतो की त्याला काही (घंटा वाजण्याचा आवाज येतो) कळणार नाही.

बंटी: ए शालजोडीतले देतो म्हणजे काय करतो रे तू.

केतकर: शाल जोडी. (खांद्यावर शाल टाकायची नक्कल करीत) शाल जोडी देउन तुमचा सत्कार करावा अस म्हणत होतो. तर मंडळी. श्री. राजमान्य राजश्री बंटी उर्फ गुलाबराव कर्दाळे यांच्यासारख सोनेरी व्यक्तिमत्व आज आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभले आहेत आपल्यासाठी यासारखा सोनियाचा दिवस कोणता असेल. हल्ली इतके सोन्याचे दागिणे फक्त बंटीसारखे व्यक्तीमत्वच अंगावर मिरवू शकते नववधूला सुद्धा शक्य नाही. टाळ्या झाल्या पाहीजे. बंटीसर तुमची तारीफ करतोय. एक लाकडाचा टाल चालवनारा भुक्कड दुकानदार जमीनीला भाव आल्याने अचानक श्रीमंत होतो काय, लगेच नगरसेवक बनतो काय, त्याचा भाऊ बंटी गल्लीबोळात चाकूछुरे घेउन फिरतो काय, तोच आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभतो काय. कौतुक कराव तेवढ थोड आहे. तारीफ करु क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. टाळ्या. बंटी साहेब तुमच कौतुक आहे. अशा महान माणसाची ओळख करुन देण्यात मी माझ्या तोंडाची वाफ अजिबात दवडणार नाही. शहरातल्या कित्येक पोलीस स्टेशनात त्याच्या पराक्रमाच्या गाथा त्याच्या फोटोसहीत बघायला मिळतील. टाळ्या होउ द्या. बंटीसारेब कौतुक बघा कौतुक. शहरातील कित्येक नामांकित वकील रोज कोर्टात त्याची पारायणे करीत असतात. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असतात. टाळ्या. अशा या जेलभिमूख पराक्रमी, सुवर्णअंकीत तेजशून्य, मुख्य म्हणजे अक्कलशून्य माणसाला शालजोडीतले द्यावे म्हणजे शालजोडी द्यावी अशी विनंती मी श्री घोरपडे यांना करतो.

(घोरपडे बंटी यांचा शाल देउन सत्कार करतात. घोरपडे बंटीला घेऊन जातात.)

केतकर: मुछे हो तो नथ्थूलाल जैसी वरना ना हो याच तालावर आपण नेहमी म्हणत असतो अध्यक्ष हो तो घोरपडे जैसे वरना ना हो. या अध्यक्षांची ओळख करुन द्यायला मी

घोरपडे: काही गरज नाही कुणीही माझी ओळख करुन द्यायची माझी ओळख मीच करुन देतो.

केतकर: बर… राहील.

(घोरपडे पुढे येउन बोलायला लागतात)

घोरपडे: (हातात कागद घेउन) माझी ओळख मीच काय करुन देउ. तरीही माझ्याविषयी सांगण्याची आज गरज आहे. मी या सोसायटीसाठी किती झटतो ते सांगणे गरजेचे आहे. आज सोसायटीचा पंचवीसावा वर्धापन दिन. बघता बघता आपल्या सोसायटीला पंचवीस वर्षे झाली.

एक आवाज: झाली तर झाली त्यात तुम्ही काय तीर मारले.

घोरपडे: कोण बोलल?

एक आवाज: आकाशवाणी होती.

घोरपडे: सोसायटीत नळ कुणी आणले मी. सोसायटीत वीज कुणी आणली मी. सोसायटीत रस्ते कोणी आणले मी, सोसायटीत गणपती कुणी आणला मी,

एक आवाज: सोसायटीत कुत्री कुणी आणली

घोरपडे: मी …… कोण बोलल?

एक आवाज: आकाशवाणी, मच्छर कुणी आणले …. मी

घोरपडे: मला समजत नाही असे समजता का.

सदस्य: ओ घोरपडे. अहो तुमच्या त्या कुत्र्याच काहीतरी करा.

घोरपडे: माझ्याकडे कुत्रा नाही

सदस्य: ते कुत्रा रोज मोठ्या हक्काने तुमच्या कारवर टांग वर करतो आम्हाला वाटल तुमचच कुत्र आहे.

घोरपडे: आता समजल ना.

सदस्य: घोरपडे त्या कुत्र्याला टाइम टेबल द्या. रोज रोज काय तुमच्या कारवर टांग वर करायची. प्रत्येकाचा वार लावा.  कुत्र्याची मनमानी खपणार नाही.

घोरपडे: काही काय बोलता.

दुसरा सदस्य: गुप्ते बाईंच्या पोराच्या टेंबलण्याची वेळ ठरवा. सोसायटीचा नियमच बनवा लहान मुलांनी फक्त दुपारी बारा ते दोन याच वेळेत रडायला पाहिजे. नियम म्हणजे नियम लहान झाला म्हणून सूट मिळणार नाही. (तो बाजूच्या व्यक्तीच्या हातावर टाळी देत जोर जोरात हसतो)

घोरपडे: असा नियम कसा करता येइल. काही काय विचारताय कुठे होतो मी (कागदावर बघत बरोबर बोट ठेवत) तर अंअंअं…. (तो आवेशात येउन चिठ्ठी हातात घेउन वाचायला लागतो) गेली सव्वीस वर्षे मी इथे राहतो आणि गेली पंचवीस वर्षे मी सोसायटीसाठी काम करतोय. सोसायटीत ज्या काही भल्या गोष्टी घ़डत असतात त्या फक्त माझ्या आणि माझ्यामुळेच घडत असतात. माझ्याशिवाय या सोसायटीत त्या लिंबाच्या झाडाच पानसुद्धा हलत नाही. सोसायटीतल्या लोकांना माझ्या कामाची कदर नाही. मला वाटले होते सोसायटीला पंचवीस वर्षे पूर्ण झाले तर माझा सत्कार करतील, माझे विषयी दोन गौरवाचे शब्द बोलतील पण नाही. या केतकरांनी मला साधी बसायला खुर्ची सुद्धा दिली नाही. (केतकर कडे बघत) केतकर हे सुद्धा लिहून आणले मी. मला पूर्ण कल्पना होती तुम्ही असेच वागनार म्हणून. त्या अमृतानियाच्या मागे लागून मी त्याला प्रायोजक म्हणून आणले होते. या जाधवांनी काय सांगितले त्या अमृतानियामुळे सोसायटीतल्या लोकांना हागवण लागली म्हणून. आता त्याला तोंड दाखवायला जागा राहिली नाही मला. राजु बेशरम आहे म्हणून तुम्ही सर्वांसमोर बापटांची मुळव्याध काढायची. तो बंटी गेला ना… बर झाल तुम्ही काय म्हणाले ते त्याला कळले नाही. आजच्या या पैशाच्या जमान्यात निस्वार्थीपणे उनपाउस कशाचीही तमा न बाळगता सोसायटीची सेवा करनाऱ्या माझ्यासारख्याची किंमत राहीली नाही.

सदस्य: ओ घोरपडे

घोरपडे: काय आहे

सदस्य: कुरीयरवाला आला आहे काय करु.

घोरपडे: कुरीयरवाला आहे. त्याला आमच्या घरी पाठव. माझे शेयरचा चेक यायचा आहे.

सदस्य: तुमच्या घरी पाठवू, पाठवतो तुमच्या घरी. पण कुरीयर पाटलांच आहे.

घोरपडे: पाटलांचे कुरीयर आहे तर मला कशाला विचारता मूर्ख कुठले. (मग वळून केतकरकडे बघत) मला सार कळत हं केतकर. तुम्हाला मी बरीच वर्षे ओळखतोय. माझे भाषण हाणून पडण्यासाठी सारा खटाटोप चाललाय. मी बोलू नये म्हणून सारा खेळ चाललाय पण मी सोडनार नाही, धरुन ठेवील.

केतकर: काय

घोरपडे: माइक. माझे भाषण पूर्ण होत पर्यंत हा माइक सोडनार नाही. जाधव आज मोठ्या दिमाखात यांच्या सुनेची मंगळागौर साजरी करीत आहेत. अरे यांच्या मुलाचे लग्न जमत नव्हते. (जाधव आश्चर्याने आँ असे करतात) हे जाधव डोअर टू डोअर सेल्समन सारखे दारोदार भटकत होते पोराच्या लग्नासाठी. तेंव्हा मी ……. माझ्या ओळखीने ते लग्न जमवून दिले. (जाधव हा माणूस काहीही बोलतो असे भाव आणतात) त्या फणसाळकरांचे आज प्रमोशन झाले पण येक वेळ त्यांच्यावर नोकरी जायची वेळ आली होती. त्यांचे बॉस माझ्या ओळखीतले निघाले म्हणून बरे. मी त्यांचे काम करुन दिले.

फणसाळकर: ओ काही काय बोलताय माझे बॉस अमेरीकन तुम्ही डोंबिविलीत काय संबंध.

घोरपडे: आता प्रमोशन झाले म्हणून तुम्हाला हे बोल सुचत आहेत फणसाळकर. गुप्ते बाईंचे लग्न झाल्यावर बदली झाली म्हणून नोकरी गेली. त्यांचे सासरे माझ्याकडे आले, विनंत्या केल्या. मी फणसाळकरांना सांगून गुप्ते बाईंना त्यांच्या ऑफिसमधे चिकटविले. गुप्ते बाई पण कष्टी त्यांनी फणसाळकारांच्या साथीने ऑफिसात मेहनत घेतली. फणसाळकरांनी त्यांना साथ दिली. त्यांनीसुद्धा ऑफीसमधे मेहनत घेतली. घाम गाळला. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. आज त्यांना त्याचे फळ मिळाले (घोरपडे पान पलटवतात) गुप्ते बाई मुलाचे बारसे साजरे करीत आहे. (सगळे हसायला लागतात आणि हसतच राहतात) त्यासाठीच आपण इथे जमलो आहोत. फणसाळकर तसा माणूस कडक त्याला ऑफिसच्या कामात कसलीही कुचराइ केलेली चालत नाही पण आई होने तितक सोप नसत ह्याची त्यांना जाणीव होती. या कामात त्यांनी गुप्ते बाईंना सर्वतोपरी मदत केली. (परत हशा) घरी मेहनत घ्यायची, राब राबायचे परत ऑफिसमधे जाउन सुद्धा मेहनत घ्यायची कसली उसंत नाहीच. शेवटी ही सोसायटी म्हणजे एक एकत्रित कुटूंब आहे याची जाणीव फणसाळकरांनी ठेवली. ही सारी माझी शिकवण. फणसाळकर, गुप्ते बाई यांच्यासारख्यांनी आज आपल्यापुढे मोठा आदर्श उभा केला आहे. नवीन पिढीतल्या मुलांना माझे सांगणे आहे त्यांच्याकडून काहीतरी शिका. एकमेका साहाय्य करु अवघे धरु सुपंथ.  (सारे हसतच असतात आणि घोरपडे बोलत राहतात) आजची नवी पिढी पूर्णतः दिशाहीन झालेली आहे. तिला मार्गदर्शक अशा दिसपस्तंभाची आवश्यकता आहे. ते पुरवण्याचे काम फणसाळकरांनी केले आहे. (परत हसत असतात शेवटी केतकर उठून येतात)

केतकर: ओ घोरपडे काय बोलत आहात तुम्ही.

घोरपडे: जे लिहिले आहे तेच बोलतोय आणि पूर्ण बोलनार तुम्ही मला थांबवू शकत नाही.

केतकर: अहो बघू तो कागद

घोरपडे: माझे पूर्ण वाचून झाल्याशिवाय मी हा कागद कुणालाही देनार नाही

केतकर: घोरपडे बघू तुमच्या हातातले कागद. हे बघा कुणीतरी पिन लावून ठेवली आहे. तुम्ही मधल पान वाचलेच नाही. पहील्या पानावरुन सरळ तिसऱ्या पानावर उडी मारलीत. तुम्हीच बघा अर्थ लावून फणसाळकरांना त्यांच्या कष्टाचे आज फळ मिळाले.. आज गुप्ते बाईंच्या मुलाचे बारसे आहे. लागला का अर्थ.

घोरपडे: हा कुणाचा तरी डाव आहे. जाणून बुजुन पिन मारेलेली आहे. माझा अपमान करताय. सोसायटीच्या अध्यक्षांशी असे वागता. मला नामोहरम करण्याचा प्रयत्न करताय मी हरणार नाही

केतकर: ओ घोरपडे पळताय कुठे  केक तर कापून जा. (घोरपडे न बघताच निघून जातात)

केतकर: मंडळी तर आता आपण केक कापू या. त्याआधी काही महत्वाच्या सूचना. सूचना नंबर एक आभार प्रदर्शनात वेळ घालवण्यापेक्षा ज्यांनी आजचा कार्यक्रमाच्या आयोजनात मदत केली त्यांची नावे नोटीसबोर्डावर लावली जातील. तुमचे नाव नसेल तर उगाच रडू नका अशा चुका होत असतात. नंबर दोन सोसाटीच्या लोकांसाठी अल्पोपाहाराची सोय म्हणून बाहेर दोन फुड ट्रक उभे आहेत. पेड आहे फुकट नाही. पनीर मटर दोसा मस्त असतो त्यांचा नक्की आस्वाद घ्या. लाइनमधे जा. उगाचच सकाळपासून भुकेले असल्यासारखे खाण्यावर तुटुन पडू नका. कचरा कचऱ्याच्या पेटीतच टाका. नंबर तीन खाण्याचा सँपल घेउन या सँपल सोबत सेल्फी काढा. नंबर चार थोड्याच वेळात सांस्कृतीक कार्यक्रमला सुरवात होइल. आपली मुलगी माधुरीसारखी नाचते असा गैरसमज करुन तो विडीयो फेसबुकवर लाइव्ह करु नका. उगाचच समोरच्याचा डेटा पॅक खर्च होतो. नंबर पाच रुमाल टाकून ठेवल्याने खुर्ची तुमची होत नाही. ती सोसायटीची आहे कुणाच्याही बापाचा माल नाही. नंबर सहा…

जाधव: ओ केतकर किती सूचना देताय. का पुण्यातल्या शाळेत मास्तर असल्यासारखे वागता. घोरपडे पळाले. काहीतरी ढिनचॅक लावा आता. कुछ तो झिंगाट करेंगे आज.

( झिंगाट गाण लागत आणि सारे गाण्यावर नाचतात. पडदा पडतो)