पूर्वेचा घाट – असा घातला घाट

आता पहिल्या भागात मी सांगितले हे असे कठीण होते तसे कठीण होते, माझा सराव झाला नाही. यावरुन जर तुम्ही असे ठरविले असेल कि आता हा सांगनार हे अस सारं असलं तरी मी कसा वर चढून गेलो वगैरे. तर असे नाही. I completed but I struggle. वाट लागली याशिवाय दुसरा सौज्वळ वाक्यप्रचार नाही तेंव्हा एकच सरावाला पर्याय नाही.
प्रवासाचा श्रीगणेशा झाला तोच आदल्या दिवशी ठरवलेली टॅक्सी पहाटे ओलाच्या ड्रायव्हरने कँसल करुन. हल्ली मी अशा प्रकाराला मी शुभशकुन समजतो. पहाटे पहाटे टॅक्सी कँसल करुन प्रवाशाच्या पोटात गोळा आणला नाही तर यांच्या पोटातला गोळा साफ होत नाही. डेटा मायनिंग करुन नको तिथे, नको तेवढ आपल्या आयुष्यात लुडबुड करनाऱ्यां या टॅक्सी कंपन्यांना साधे कळत नाही पहाटे पहाटे टॅक्सी बुक करुन कुणी गर्लफ्रेडला भेटायला जात नाही कि सिनेमा बघत नाही त्या बिचाऱ्याला ट्रेन किंवा प्लेन पकडून गावाला जायचे असते. त्याला वेळेत टॅक्सी मिळायलाच पाहिजे. प्रवासात थ्रील हवा या विचार करीत असतील. जोराचा पाऊस पडतोय, टॅक्सी कॅसल झाली आहे, पाच वाजताची ट्रेन पकडायची आहे, मी परत ओला उबेर ट्राय करतोय, फोनवरील रेषा सरकतेय (finding nearby driver), माझी धडधड वाढतेय पण ड्रायव्हर नाही. अथक प्रयत्नांनंतर अर्धा तासानंतर एक टॅक्सी बुक झाली. मी स्टेशनला कसाबसा वेळेच्या आत पोहचलो पण ट्रेन मात्र लेट झाली होती. ग्रुप ट्रेनमधेच येणार होता ओळखी झाल्या. ट्रेनमधूनच मस्ती, गमती सुरु झाल्या.

img_20190830_172310
भद्राचलम
प्रवासाचा पहिला पडाव होता भद्राचलम, गोदावरीच्या तीरावरील एक तीर्थक्षेत्र. गोदावरी बघायची असेल तर ती या भागात बघावी. माझ्या माहितीप्रमाणे शबरी नदी सोडली तर भद्राचलमच्या आधी गोदावरीच्या सर्व उपनद्या गोदावरीला मिळालेल्या असतात. आपण समुद्रकिनाऱ्यावर आहोत असे वाटावे असे रुंद पात्र, हवामानही तसेच दमट आहे. भद्राचलम हे गाव भद्राचलम रोड या स्टेशनपासून पंचेचाळीस किमी दूर आहे हा माझ्यासाठी शॉक होता. अरे का त्याला भद्राचलम रोड म्हणता? या प्रवासात एक गंमत आढळली. साहो रिलीज झाला होता. जिकडे तिकडे साहोचे पोस्टर्स लागले होते. एक फरक होता. कुण्या नेत्याच्या वाढदिवसाचे जसे मोठमोठे फ्लेक्स लावले जातात तसे पोस्टरमधे प्रभासच्या बाजूला लोकांनी आपले फोटो लावले होते.

Saho
गोदावरीच्या तीरावरच भद्राचलमला श्रीरामाचे फार मोठे देउळ आहे. भद्र ऋषींनी त्रेता युगात भगवाण विष्णूंनी या भागात यावे अशी तपस्या केली आणि मग सतयुगात श्रीराम या भागात आले. अशी आख्यायिका आहे. पुढे एका स्त्रीला इथे मूर्ती सापडली आणि मग निजामाचा सेवक रामदास याने हे मंदीर बांधले असा काहीसा इतिहास आहे. तेलंगाणा आंध्रा परीसरातील हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मंदीर सुंदर आणि भव्य होते. मूर्ती सुंदर होती. फार गर्दी नसल्याने संध्याकाळी छान दर्शन झाले. दुपारी सायकली आल्या. हलकीशी डागडुजी करुन सायकल तयार होती. घोडा आता सजला होता. घोडेस्वाराला तयार करण्यासाठी एका हॉटेलात गेलो तेथे छान फुलके मिळाले मग काय बघायचे घोडेस्वार सुद्धा तयार झाला. घोडा तयार, घोडेस्वार तयार आता वाट होती ती सवारीची.

Maredmilli2
मारेडमल्ली
३१ तारखेला ठरलेल्या वेळप्रमाणे ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीरा म्हणजे सातच्या आसपास सायकलस्वारीला सुरवात झाली. चित्रविचित्र कपडे घालून सायकले चालवनारे कोण हे कार्टुन अशा नजरेने तिथली मंडळी बघत होती. सायकल स्वारांना हा अनुभव नवीन नाही. रस्त्यात मधे मारेडमल्लीचा घाट चढायच्या आधी आमचा संयोजक क्रिश आम्हाला नाष्टा देणार होता. तोपर्यंत पासष्ट किमी पेडल मारायचे होते.
भद्राचलम सोडताच रस्त्यावरील वाहतूक कमी झाली. मारेडमल्लीचे बोर्ड दिसत नव्हते पण जगदलपूर, बिजापूर, सुकुमा असे बोर्ड दिसत होते. आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेजवळ जात होतो. रस्ता सपाट होता त्यामुळे सहज सायकलींग चालली होती. चट्टी या गावाजवळून छत्तीसगडचा रस्ता वेगळा झाला आणि मारे़डमल्लीचे बोर्ड दिसायला लागले. इथून सुरु झाले ते बांबूचे घनदाट जंगल आणि निर्मनुष्य रस्ता. साडेनऊ वाजले होते पोटात कावळे ओरडायला लागले होते. पासष्ट किमी अंतर संपले होते, फोनमधे नेटवर्क नव्हते, GPX थांबले होते, क्रिश कुठेही दिसत नव्हता, दिसत होते ते फक्त बांबूचे जंगल आणि त्यातून जाणारी काळी सडक. दूरदूरपर्यंत कुणी नाही. आम्ही उगाचच क्रिश, क्रिश असे ओरडत होतो पण काही उपयोग नव्हता. खूप भूक लागली होती. पंचाहत्तर किमी नंतर क्रिश दिसला आणि आमच्या पोटाची सोय झाली. अशा जंगलात नाष्टा करण्याचा योग दुर्मिळ होता.

नाष्टा झाला आणि काही वेळात सुरु झाला तो घाटाचा प्रवास. घाटात काकीनाड्यावरुन येणारे सायकलस्वार दिसले. साधारण नव्वद किमी प्रवास झाल्यानंतर घाटाला सुरवात झाली होती. जसजसा घाट चढत होता तसतसे जंगल अधिक घनदाट होत होते. वातावरण थोडे दमट असल्याने अधिक घाम येत होता. शेवटी घाट चढणे कठीण झाले. मी काही अंतर चाललो परत पेडल मारायला सुरवात केली. दिड किमी नंतर आणखीन दोन सायकलस्वार बसलेले दिसले मीही त्यांच्यासोबत बसलो. हा साधारण अडीच ते तीन किमी चा पट्टा चढायला पन्नास मिनिटे लागली. त्यातली वीस मिनिटे मी इथेच बसलो होतो. हळूहळू इतर स्वार पुढे निघून गेले आणि मी मागे राहिलो. आता जमेल तितकी सायकल चालवत होतो. नंतर घाट संपला नसला तरी चढ उतार अशा स्वरुपात घाट होता त्यामुळे चढता येत होते. साधारण पंधरा किमीचा हा घाट चार त साडे चार टक्के अशा चढाईचा असला तरी यात तीन ते चार किमीचे दोन टप्पे मात्र जवळे नऊ ते साडेनऊ टक्के चढाईचे होते. आमची सपोर्टची गाडी दिसली. तेव्हा कळले कि आमच्यापैकी तिघांना काही ना काही कारणांनी गाडीत बसावे लागले होते. काही वेळाने एक सहकारी भेटला आणि मग आम्ही सोबतच गेलो. घाट संपल्यानंतर दहा किमी जो उतार होता त्यात मला प्रचंड भिती वाटली.

मारेडमल्ली घनदाट जंगलांसोबत आणखीन एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे बांबू चिकन. यात चिकनच्या तुकड्याला मसाला लावून बांबूत भरतात. तो बांबू चुलीवर शिजायला ठेवतात. त्यामुळे बांबूचा अर्क चिकनमधे उतरतो. मांसाहारी लोकांनी या चिकनवर ताव मारला तर आमच्यासारख्या शाकाहारी मंडळींनी भाजीपोळीवर समाधान मानले हो इथेही पोळी मिळाली. मारेडमल्ली पासून पुढे पंधरा किमी अंतरावर आमचा मुक्काम होता आणि रस्ता उताराचा होता. संपूर्ण दिवसात १३२ किमी सायकल झाली होती. पायांनी आता साथ सोडली होती त्यांना हलकासा मसाज आणि भरपूर आरामाची गरज होती. माझ्यासाठी पहिला दिवस लक्षात राहिला तो माकडांनी केलेल्या हल्ल्यासाठी. चिंटरु या गावाच्या आधी विरळ जंगलात रस्त्याच्या दोन्ही बाजूला माकडे बसलेली होती. एकदोन ठिकाणी मी माकडांच्या गुरगुरन्याचा आवाज ऐकला पण कुणी धावून आले नाही. एका ठिकाणी मात्र माकड आधी माझ्या सहकाऱ्याच्या सायकलकडे जोरात धावत आले. तो वेगात पुढे गेला. त्याच्या मागेच मी त्या माकडाला दिसलो तसे ते माकड अधिक वेगात माझ्या दिशेने आले. मी रस्त्याच्या खाली गेलो. स्वतःचा तोल सांभाळत न थांबता मी तसाच वेगात पुढे निघून गेलो. इतरांनाही तसा त्रास झाल्याचे ऐकले. आता सारे ते मागे पडले होते. डोळ्यात होते मारेडमल्लीचे सुंदर डोंगर, घनदाट जंगल आणि त्यातून वाहणारे पाण्याचा ओढा.

Maredmilli3