अंधाधुंद

andhadhun-1
Enter a caption

(P.C. जालावरुन)

जरा जास्तच दिस झाले आपल काही बोलण झाल नाही. पण आता का करता जी उनच अस तापल होत का काही लिहूशाच वाटत नव्हत. वरुन लगनसराई, टायमच सापडत नव्हता. म्या इचार केला पाउस पडून जाउ दे मंगच बोलू. पाउस बी असा दडी मारुन बसला का बोलाच काम नाही. अख्या मिरग गेला पण येक थेंब पावसाचा पता नाही. आता कोठ दोन पाणी झाले. पऱ्हाटी टोबली आन म्हटल आता तुम्हाले सांगतो मायी गोष्ट. मायी लय मोठी पंचाइत झालती राजेहो. आजकाल आमच्यासारख्या गाववाल्यायले शिनेमे पायन कठीण होउन गेल. लय बेक्कार दिस आले पाहा. पिक्चर पायला तर डोक्याले झिणझिण्या आल्या. नाही म्हणाले साहा महिने तरी झाले असन. आमच्या गावचा नथ्थू पाटील तो पिंपळाच्या वावरवाला, कावीळान मेला. तस म्हातारं खाटेवरच होत. त्याची तेरवी होती नागपूरले, म्या मारत्या आन गावातले दोनचार पोट्टे गेलतो. तेरवीची खीरगीर खाल्ली. आता हिंगणघाटले जाउन बी का कराच म्हणून म्हटल तेथच मॉलमंधी म्या आन मारत्या पिक्चर पाहाले गेलो.

आम्ही पायला अंधाधुन, आन अस डोक सटकल म्हणता का काही इचारु नका. पिक्चरच नावच समजत नव्हत. आता तुम्ही म्हणान जानराव ते नांव अंधाधुन नाही अंधाधुंद असन. मले बी तसच वाटल होत. आपण पेपरात वाचत नाही का अंधाधुंद गोळीबार, अंधाधुंद कारभार तसच काहीतरी अंधाधुंद असन बा. पण नाही ते अंधाधुन असच होत. मले सांगा अंधाधुन म्हणजी का? दिवार म्हणजी भित, कुली म्हणजी हमाल, बॉडीगार्ड म्हणजी बाडीगार्ड तस अंधाधुन म्हणजी का? आपण आपल्या पोराच नाव बी इचार करुन ठेवतो. येथ हे पिक्चरचे नाव अस ठेवून रायले. जेथ नावच नाही समजल तेथ पिक्चर का समजन जी. अस फसल होत माणूस. मोंबइच्या गर्दीत दम घुटते ना तसा दम घुटल्यवाणी वाटत होत. मले समजतच नव्हत आपण येथ पिक्चर पाहाले आलो सारेचा पेपर सोडवाले आलो ते.

पिक्चरमंधी का पायजे येक हिरो, येक हिरोइन आन येक गुंडा. हिरो हिरोइनच लगन होते आन गुंडा मरते नाहीतर जेलात जाते. आजवरी कधी अस पायल का बंदा पिक्चर पायला पण आपल्याले समजलच नाही हिरो कोण हाय आन गुंडा कोण हाय ते. भाउ हाय, भाई हाय म्हणजे हिरो जो कोणी यायले मारतो तो गुंडा. साध गणित रायते. आस साध गणित कठीण काहून कराच म्हणतो मी? या पिक्चरमंधी बंदे नवे अॅक्टर हायेत, येक तब्बू सोडली तर कोणी वळखीच नाही. ते तब्बू बी कोठ आठवते जी आता. नवे तर नवे आम्ही का नाही म्हणतो. त्यायच वागण त्याहून इचित्र. बंद्या पिक्चरमंधी परिक्षल्या बसल्यावाणी प्रश्न पडत होता या शिनमामधी हिरो कोण आन गुंडा कोण. वळखा पाहू. बंदा पिक्चर पाहून झाला पण अजून समजल नाही हिरो कोण आन गुंडा कोण.

आम्हाले का पिक्चर समजत नाही म्हणता का. पिक्चर तीन टाइपचा रायते येक बदला, बदला म्हणजे हिरोइनचा बाप हिरोच्या बापाले मारते. मंग मोठा झाल्यावर हिरो हिरोइनच्या बापाले मारुन नाहीतर त्याले जेलात टाकून त्याचा बदला घेते. तरीबी हिरोइन त्या हिरोशीच लगन करते. दुसर लव स्टोरी येखाद गरीब पोट्ट कोण्या अमीराच्या पोरीच्या प्रेमात पडते. कोण्या पोरीचा बाप अशा लगनाले तयार होइल तो नाही म्हणते मारामाऱ्या होते, रडारडी होते आन मंग येकतर हिरो हिरोइन दोघबी मरते नाहीतर दोघ सुखान लगन करते. तिसर रायते सस्पेंस पिक्चर त्याच्यात पहिल्यांदी मर्डर होते आन पिक्चरच्या येंडंमधी हिरो त्या मर्डरचा तपास लावते. बंद समजावून सांगते कोण मर्डर केला, कसा मर्डर केला आन काहून मर्डर केला. ज्यायन ज्यायन हा पिक्चर पायला त्यायन मले सांगा अंधाधुन कोण्या टाइपचा हाय. याच्यात ना बदला हाय ना लव्ह स्टोरी होती, ना सस्पेंस.

एक पोरग हाय नाही म्हणजे जेवढे दिसले त्यात तोच एक चिकना होता, त्यान येक गाण बी म्हटल तवा तो हिरो असन. तो आंधळा रायते. त्याच्यासंग येक पोरगीबी फिरते. म्या म्हटल मारत्याले

“मारत्या पाय लय गहरी लव ष्टोरी हाय. नवा हिरो हाय नवी हिरोइन हाय. आता अमीरीगरीबीचा जमाना गेला. येथ हिरो आंधळा हाय म्हणून हिरोइनचा बाप लग्नाले नाही म्हणन पायजो. ”
“नवे कोठचे जी जानराव. म्या टिव्हीवर गाणे पायले याचे. हे हिरोइन तर तो आपला लयाभारीवाला माऊली नाही त्याची हिरोइन व्हय.”
“मारत्या लेका मायाच पैशान पिक्चर पायते आन मलेच शिकवते का बे?”
“शिकवत नाही जी म्या पायल ते सांगून रायलो.”
“माया पॉइंट काय हाय तो आंधळा हाय म्हणून तिचा बाप नाही म्हणन. मले अस बी वाटून रायला तो म्हातारा नाही त्याचा त्या पोरीवर डोळा असन.”
“काहून जी?”
“अबे येका विलनन नाही होत आजकाल अजून येखादा सोबतीले लागते. तवा कोठ हिरोची पावर दिसते.”
“हे बारकं का पावर दाखवनार हाय. येक गचांडी देली का लंब होते.”
“मले शिकवू नको तू.”
“शिकवत नाही जी मले का वाटते जानराव याच्यात बदला असन. कोणतरी याच्या बापाले मारला, याला आंधळा बनवला आन हा आता त्याचा बदला घेईन.”
मारत्यान बदला म्हटलं आन तिकडं मर्डर झाला.
“मारत्या आता कोण कोणाचा बदला घेईन बे? येथं तर भलत्याच माणसाचा मर्डर झाला. मंग का सस्पेंस म्हणाचा”
“नाही जी त्याच्या बायकोनच मर्डर केला. कायचा सस्पेंस रायला आता.”

दोघाचीबी पिक्चरची ष्टोरी मायीच गंडली होती. हिरो काय आंधळा राहत नाही नाटक करते लेकाचा. हिरोइनले समजते न ते त्याले सोडून जाते. तुम्ही म्हणान का जानराव पिक्चरचा मजाच खराब केला. अशी ष्टोरी सांगतली तर आम्ही पिक्चर कायले पाहाचा. तुम्हाले सांगतो हा पिक्चरचा येंड नाही हे स्टार्टिंगलेच हाय. येथूनच मोरं का होते ते त्याचा काही म्हणता काही पता लागत नाही. कोण आंधळा हाय कोणाले डोळे हाय, कोण चांगला हाय कोण वांगला हाय काही समजत नाही. बंदा पिक्चर संपते पण कायचाबी पता लागत नाही. असा कोणता सस्पेंस रायते का जी पिक्चर संपला तरी समजत नाही.

मले सांगा माणूस पिक्चर कायले पायते डोक्याले ताप द्यायले का डोक शांत कराले. येखादा हिरो येखादी हिरोइन त्यायच लव्ह, येखाद दोन डायलाग आन दोनचार फायटा झाल अजून का पायजेन जी? असा साध सोप सोडून हे अस भलतसलत कायले बनवते का बा? या पिक्चर बनवऱ्याले का वाटते आम्ही रिकामटवळे आहोत, आम्हाले काही कामधंदे नाही. तवा द्या यायच्या डोक्याले ताप लावून. लय म्हणजे लयच डोस्क दुखाल. म्हणून म्हणतो राजेहो आताच्या जमान्यात आम्हा कास्तकाराले आता पिक्चर पाहाचीबी सोय राहिली नाही. अशी पंचाइत झाली हाय पाहा.

लिहिनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट जिं. वर्धा

Advertisements