एक फसलेले नाटक

WhatsApp Image 2019-03-24 at 3.50.23 PM

एक फसलेले नाटक या दिर्घांकमधला एक प्रवेश किंवा एक फसलेला प्रवेश. मूळ नाटकाची संकल्पना अशी आहे की एक मुलगा आणि एक मुलगी स्वतः लिहून नाटक करायचे ठरवितात. या नाटकाची संकल्पना कशी उभी होते त्यातलीच ही गंमत. संपूर्ण नाटकात दोनच पात्रे आहेत आणि ते दोघे मिळूनच सारे प्रवेश उभे करतात नंतर त्यावर चर्चा करतात.  एकूण आठ प्रवेश आहेत. त्यातला असाच एक प्रवेश. दोन प्रवेश एक फसलेल नाटक-आणखीन एक, एक फसलेल नाटक-१

(रंगमंचावर लाइट येतात तेंव्हा एका घराचा दिवाणखाना आहे असे समजा. प्रत्यक्षात काही नाही आहे. रंगमंचावर जे काही ते सारे अर्धवट अवस्थेत आहे. जुनाट लाकडी सोफा आहे आणि एक अर्धवट भिंत आहे. एके ठिकाणी ही सिंहाची फोटो फ्रेम आहे अशी पाटी आहे. अर्धवट लावलेली भिंत कुणीतरी व्यवस्थित करीत असतो. मुलगा घरातला नोकर बनून सोफा, फोन साफ करीत असतो. फोनची रिंग वाजते)
मुलगा ए अजून झाले नाही का रे तुझे. आता हे जे राहिल त्याला काय भिंतीला भगदाड पडले असे समजायचे. सुकवातीलाच अशी भगदाड पाडाल तर नाटक पडनार नाही का. हि वेळ आहे का भिंत ठिक करायची. नाटकाच्या तीन घंटा कधीच्याच वाजल्या आता जी वाजतेय न ती नाटकातल्फोया नची घंटा आहे. अरे हो रे घेतो फोन जरा याला आत तर जाउ दे. दोन मिनिटे ती बेल उशीरा वाजवल्याने नाटक झोपनार आहे का. (परत फोनची बेल वाजते) अरे हो माहीती आहे मी नोकर आहे ते उचलतो फोन. (भिंतवाला आत जातो. परत फोनची रिंग वाजते मुलगा भिंतीच्या भगदाडातून बाहेर जाउन दुसऱ्या बाजूने आत येतो.) या घरातला फोन घरातली मंडळी बाहेर गेल्यावरच का वाजतो देव जाणे. (फोन उचलतो) हॅलोSSS मी सरपोतदार इस्टेट्सचे मालक श्री. माधवराजे सरपोतदार (पॉझ)…. यांचा नोकर बोलतोय. साहेब? ते घरात नाही. कुठे गेले?… भाजी आणायला.. भाजी आणायला कसे जातील ते, मी तुम्हाला सांगितले ना ते सरपोतदार इस्टेट्सचे मालक आहेत ते काय भाजी आणतील. मग काय करतात. सांगितल ते इस्टेट्सचे मालक आहेत. संपल. काय ओळख…. अच्छा विसरलोच मी माझे काम या फोनवर सर्वांची ओळख करुन द्यायची असे आहे. साहेब क्लबात गेले, आल्यावर ते मोठा झब्बा घालून बुद्धिबळ खेळतील……… बाईसाहेब क्लबात? त्या क्लबात कशा जातील. बाईसाहेब महिलामंडळात गेल्या, त्या तिथेच जात असतात पत्ते कुटायला. सोशल वर्क यू नो. छोट्या बाईसाहेब. श्रीमंत बापाची एकलवती लेक एकच काम असत तिला कॉलेजच्या नावाने कुणाचा हात धरुन पळण नाही तर घरात लोळत पडण. बर बाय. (तो फोन ठेवतो) च्यायला केवढ्या चौकशा. नक्की कुणाशी बोलायच होत याला. मुळात बोलायचच नव्हत.
(मुलगा बाहेर जातो आणि चष्मा लावून अंगात मोठा गाउन घातला असल्याचा आव आणीत, हातात पाइप असल्याची नक्कल करीत येतो. टेबलवर बुद्धीबळाचा डाव मांडला आहे. हा बसून पेपर वाचतो. बेल वाजते. पोस्टमनकडून पत्र घेतो. तो लिफाफा फोडून वाचतो. ते वाचून त्याला राग आला असे दाखवितो.)
मुलगा सौदामिनी.. सौदामिनी (प्रेक्षकांकडे बघत) ही सौदामिनी म्हणजे माझी सौ दामिनी नाही बर, माझी मुलगी सौदामिनी. मधेमधे असे विनोद टाकायला हवे नाहीतर नाटक पडत. (थोडा आवाज वाढवून) सौदामिनी
(आळोखे पिळोखे घेत, आळस देत मुलगी प्रवेश करते. खुर्चीत बसलेल्या मुलाजवळ येउन उभी राहते. तिच्या डोळ्यातली झोप अजूनही गेलेली नाही. साऱ्या गोष्टींचा तिला कंटाळा आला असे दिसते. )
मुलगा काय करत होती. (मुलगी काहीच बोलत नाही) सौदामिनी काय करत होती. (ती गप्पच) सौदामिनी मी विचारतोय तू काय करत होती.
मुलगी मी काय करनार दुसर, बाबा. कोणत काम देता तुम्ही मला. लोळत पडायच नाहीतर प्रेमात पडायच.
मुलगा का तुला क्लबात पाठवलय ना. बॅडमिंटन खेळायला.
मुलगी तिथे जाउन सुद्धा प्रेमातच पडायच ना. ढल गया दिन, हो गई शाम जाने दो अब जाना है. किती कष्ट पडतात मला. बसस्टॉपवर, कॉलेजात, बॅडमिंटन कोर्ट सर्वत्र पडत असते मी, प्रेमात. इतक्या ठिकाणी प्रेमात पडून परत सातच्या आता घरी यायचे. इथे येउन ते तुम्हाला समजेल अशी व्यवस्था करायची. कारण घटना बाहेर घडनार परिणाम इथे. आता मला ना प्रेमात पडायचा कंटाळा आला आहे. काही दुसर काम द्या. एकतर प्रेमात पडा नाहीतर स्वयंपाकघरात रडा, फारच एक्सप्रिमेंटल म्हटल पुरुष प्रधान समाजाच्या नावाने बोंबा मारा.
मुलगा काय सांगायचे आहे तुला
मुलगी नेहमी मलाच का सांगायचे असते. कधी कधी तुम्ही सुद्धा सांगा काहीतरी. मला त्या शांतेच्या कार्ट्यासारख्या टोप्या द्यायच्या आहेत बुगुबुगु, मोरुचा मामा बनायचे आहे, कुण्या मुलाला होस्टेलवर बोलावून त्याचा किस घ्यायचा आहे, ह्याचा हिने ह्याच्या ह्याच्यावर हे ठेवून हा घेतला. कपाळावर ओठ ठेवून किस घेतला. एका वेळेला दोन नवरे मॅनेज करायचे आहे, हाय काय नि नाय काय. कुण्या लालीचा उद्धार करायचा आहे. सारख का मी मनातल्या मनात घुसमटायचे. किती वर्षे झाले मी तेच ते सांगतेय आता तर मला सांगायचाही कंटाळा आला. बाबा आता मला या प्रेमात पडायच्या जाचातून मुक्त करा.
मुलगा ते बघू नंतर, या नाटकात तरी तुझी सुटका नाही. तुला प्रेमात पडावेच लागेल. (बेरींग बदलून) मी तुझा बाप आहे आणि तू माझी मुलगी. तू वर लोळत पडली होती हे सांगायला काय झाल होत. तोंड शिवलय का कोणी तुझ?
मुलगी (परत आळस देत) कंटाळा आला होता.
मुलगा बर बरं. त्या लेखकांच्या लाडाने तुला आळशी करुन ठेवली आहे. हे बघ काय आलेय ते. वाच
मुलगी अय्या लव्ह लेटर
मुलगा लव्ह लेटर नाही सरकारी लेटर आहे ते. RTO मधून आलेय.
मुलगी माझे RTO मधल्या कुणासोबतही झेंगाट नाही.
मुलगा भाषेच बेरींग सोडू नको बर. उच्चभ्रू कुंटुंबातली मुलगी आहे. झेंगाट काय. RTO चे लेटर आहे ते. तू लोकांच्या गाड्या ठोकल्या म्हणून आलेय. गेल्या महीन्याभरात तू दहा लोकांच्या गाड्या ठोकल्या.
मुलगी प्रेमात पडायच होत मला.
मुलगा अस गाड्या ठोकून प्रेमात पडायला हा काय डॅम इट सिनेमा आहे?
मुलगी कधी कधी इकडल तिकडे आणि तिकडल इकडे होत. पण प्रेमात पडायचा फॉर्मुला चांगला आहे. हे हल्लीचे तरुण मूर्ख, नादान, निर्ढावलेल्या समाजाचे प्रतीक
मुलगा ते मूर्ख, नादान ठिक आहे पण निर्ढावलेले काय? ते समाजाचे प्रतीक वगैरे तू राहूच दे.
मुलगी बरं राहिलं. मूर्ख, नादान तरुणांना या प्रेमवेड्या तरुणीचे दुःख काय कळनार. त्यांना त्यांच्या बंपरवर (तो मागे हात लावतो) .. कारच्या बंपरला लागलेली डॅश दिसली पण या तरुणीच्या ह्रदयाला पोहचलेली ठेच नाही दिसली. त्यांना ते फुटलेल इंडिकेटर दिसले पण माझ्या प्रेमाचे इंडिकेटर नाही समजले. कोर्टाची पायरी चढत आहेत मेले. अरे कोर्टाची पायरी चढायची ती लग्नानंतर घटस्फोटासाठी. बोहल्याच्या पाटावर चढायच्या आधीच कोर्टाची पायरी चढणे म्हणजे जेवायच्या आधीच चूर्ण खाण्यासारखे आहे. बर झाल मी अशा मूर्ख तरुणांच्या प्रेमात पडले नाही ते. ही अशी माणसे माझ्या प्रेमाच्या लायकीची नव्हती बाबा.
मुलगा तुझ्या या प्रेमात पडण्यासाठी असे किती दिवस दंड भरु मी.
मुलगी आता काळजी करायचे काम नाही. हे शेवटल. मी माझे या मंचावर यायचे कार्य पू्र्ण केले. मी आता प्रेमात पडलीय बाबा, मी आता प्रेमात पडलीय.
मुलगा सुटलो बाबा एकदाचा तू प्रेमात पडली.
मुलगी अहो तुम्ही बाप आहात, जरा विरोध करा.
मुलगा अरे हो मी विसरलोच होतो. (रागावून)प्रेमात पडली कुणाच्या
मुलगी त्याच्या, माझ्या स्वप्नातला राजकुमार. सफेद घोड्यावर होउन स्वार
मुलगा कुठे भेटलीस तू तुझ्या स्वप्नातल्या राजकुमाराला. स्वप्नातच काय
मुलगी नाही. आपल्याच घरी. तुम्हाला चपला झिजवाव्या लागल्या नाही की मला सँडल. घरबसल्या मी त्याला शोधले बाबा.
मुलगा आपल्या घरी कधी आला तो. मला कसा दिसला नाही. इथे पाइप ओढीत बुद्धिबळ खेळत बसण्याखेरीज मला दुसरे काय काम आहे. … एक मिनिट आपला रामू तर नाही.
मुलगी नाही असे अभद्र बोलू नका बाबा. रामूशी लग्न केले तर घरात दुसरा नोकर ठेवणे आपल्याला परवडनार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. तो मला भेटला ते मोबाईलवर, लॅपटॉपवर, फेसबुकावर, इंस्टावर. रोज आम्ही एकमेकांना भेटतो. दिवसातून कितीतरी वेळा तिथेच भेटत असतो.
मुलगा ओह त्याने ऑनलाइन लाइन मारली तर. आमच्या वेळेला नव्हत काही अस. जे आमच्या वेळेला नव्हत ते चुकीचच असल पाहीजे. तुमच्या नवीन पिढीत काहीच चांगल नाही असे आमचे अण्णा सांगत होते आम्हाला. हे नवीनच फॅड आल आहे हल्ली. काय करतो तो मुलगा
मुलगी इंस्टावर, फेसबुकवर माझे फोटो लाइक करतो. माझे ट्विट रिट्विट करतो. माझ्याशी लिपस्टीक, फॅशन, सँडल, गॉसिप, पबजी, कँडी क्रश अशा एक नाही अनेक विषयावर चॅट करतो. त्याचा अभ्यास फार दांडगा आहे बाबा. तो पबजीचा पहिल्या लेवलचा खेळाडू आहे.
मुलगा आणखीन काय करतो तो
मुलगी कधी कधी कॉमेंटसुद्धा करतो माझ्या फोटोखाली. बॉव एकदम पत्रा..
मुलगा अग पोटापाण्यासाठी काय करतो.
मुलगी तो ना अगदी तुमच्यासारखा आहे बाबा. काही करीत नाही. पाय लांब करुन घरात बसला असतो. तो बुद्धिवादी आहे कारण बुद्धिबळ खेळता येते. त्याच्या मते त्याला एक वैचारिक बैठक आहे म्हणून तो घरीच बैठक मांडून बसला असतो. अशा एका निरुपयोगी माणसाचीच आपली ही इस्टेट सांभाळण्यासाठी गरज आहे. तुम्ही एकटे किती वर्षे हा पाइप ओढीत इथे एकटेच बुद्धिबळ खेळत बसनार आहात. तुम्हालाही कुणीतरी सोबती हवाच. कधी ना कधी हा पाइप दुसऱ्याच्या हातात द्यावाच लागनार आहे बाबा.
मुलगा हूं म्हणजे तुझा निर्णय झाला आहे तर. कोणत्या राशीचा आहे मुलगा. (ती काहीच बोलत नाही) मी विचारतोय रास काय आहे त्याची
मुलगी (खाली मान घालून हळू आवाजात) मेष
मुलगा मेष म्हणजे मेंढा. एका मेंढ्याशी लग्न करनार आहेस तू. शक्य नाही ते. अग तू सिंह राशीची आहेस. मी सिहं राशीचा आहे. तुझी आई सिंह राशीची होती. आजूबाजूला सारे सिंह असताना या माझ्या सिंहाला मेंढा सापडला तरी कसा. ह्या भितीवरचा फोटो बघ भगदाड पडली तरी तो सिंहाचा फोटो आहे. लहानपणापासून तुला टॉम अँड जेरीचा कार्यक्रम दाखविला ते काय उंदरामांजराचा खेळ बघायला. नाही त्याच्याआधी ओरडनारा सिंह बघायला. तेंव्हा आताच्या आता त्याच्याशी लग्न करायचा विचार मनातून काढून टाक.
मुलगा असा लगेच काढून फेकायला तो काय चहात पडलेला डास आहे की दातात अडकलेला कण आहे. तसेही फार कष्टाने मी हा निर्णय घेतलाय. तुम्हाला माहीती आहे मी किती आळसी आहे ते आता निर्णय बदलने मला शक्य नाही.
मुलगा आपल्या घरात जो जन्मला तो सिंह राशीतच. तुझ्या काकांचा जन्म सिंह राशीत नव्हता तेंव्हा आमच्या बाबांनी त्याच तोंडदेखील बघितल नाही. मग आईने कुणाला तरी पैसे देउन सिंह राशीची पत्रिका बनविली तेंव्हाच त्यांनी त्याचे तोंड बघितले. तुझ्या वेळेला तर मी डॉक्टरांपासून ते पत्रिकेपर्यंत सर्व मॅनेज केले पण तुला सिंह राशीतच जन्म घ्यायला लावला. अशा या शार्दूलविक्रिडीत कुटुंबात जन्मलेल्या मुलीने कुण्या मेंढ्याच्या प्रेमात पडावे हे मला कदापि मान्य होणार नाही.
मुलगी शार्दूलविक्रिडीत हे काय भलतच. मरु दे च्यायला….. बाबा माझा निर्णय झाला आहे. आता तो बदलण्याचा मला प्रचंड कंटाळा आलेला आहे.
मुलगा पोरी अशी अडकित्यात पकडू नको तुझ्या या वृद्ध बापाला. तुझी काळजी वाटते त्या मेंढ्यासोबत कसा संसार करशील तू. तो गावभर चरचर चरनार तू घरी डरकाळी फोडत बसनार. कस होइल तुझ. तळहातावरच्या फोडासारख जपलय मी तुला.
मुलगी किती दिवस जपून ठेवनार आहात तो तळहातावरचा फोड. लवकर ऑपरेशन करुन काढून टाका. तुम्ही हो म्हणा नाहीतर
मुलगा नाहीतर, नाहीतर काय पळून जाउन लग्न करनार. (स्वतःशीच) माझे कमीत कमी आठ ते दहा लाख तरी वाचतील. (आनंदाने) बोल पोरी बोल पळून जाउन लग्न करनार
मुलगी नाही बाबा. मी डिडीएलजेची फॅन आहे. मी डीडीएलजे बघितलाय आणि सैराट सुद्धा. पळून जाउन सकाळी सकाळी सरकारी संडासासमोर लाइन लावण्यापेक्षा मी शेतात जाइन
मुलगा आँ
मुलगी फिरायला, फिरायला. माझ्या शाहरुख सोबत. मला खात्री आहे बाबा, या पाषाण ह्रदयी, दगडी देहाच्या, राकट, अमरीश पुरीसम अशा माझ्या बापाला एक ना एक दिवस पाझर फुटेल. तो म्हणनार जा सिमरन जा जीले अपनी जिंदगी. मी वाट बघतेय त्या बिनागर्दीच्या स्टेशनची, त्या स्लोमोशन रेल्वेची, त्या बिनातिकिट प्रवासाची. जोपर्यंत तुम्ही जा सिमरन जा म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही इथे मोबाइलवर PUBG नाहीतर कँडी क्रश नाहीच काहीतर फ्रुट निंजा खेळत बसेल

(असे म्हणून मुलगी जायला निघते)

मुलगा थांब मुली. शेवटी हो असेच म्हणायचे आहे तर मी उगाचच भाव कशाला खाऊ. फालतू टाइमपास कशाला पाहीजे. आताच हो म्हणतो जा पोरी जा वाटोळ कर आपल्या आयुष्याच, कर तो बिनाटिकिटाचा प्रवास. तसाही मी तुझा हात कधी धरलाच नव्हता तेंव्हा सोडण्याचा प्रश्नच कुठे येतो. या बिनाटिकिटाच्या प्रवासात उद्या टिसीने पकडले तर बापाचे नांव सांगू नको

(मुलगी ये असे करुन उडी मारते)

दोघेही रंगमंचाच्या बाहेर जातात. आवाज येतो  ए शीट हा कसला काँफ्लिक्ट आहे. तू मेंढा मी सिंह. काँफ्लिक्ट कसा हवा. ……