रंगेहाथ

पात्र परिचय

बॉसः वय वर्षे पन्नास, केस थोडे पांढरे, अंगात सुट, टाय, एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारा व्यक्ती.
मुलगी: सेक्रेटरी (Interview ला आलेली) मॉडर्न, गुडघ्यापर्यंतचा स्कर्ट, अंगात टॉप, चांगल्या कंपनीतली सेक्रेटरी वाटावी अशी.
(पहीली एंट्री बॉसची.)
बॉसः हॅलो एव्हरीबडी मेरा नाम है.. जाउ द्या शेक्सपिअर सांगून गेला नावात काय आहे तरी आपण नाव नाव करीत असतो. अहो तुम्ही तुषार कपूरला सचिन तेंडुलकर म्हटले म्हणून काय तो शेन वार्नला उभा आडवा हाणनार आहे. तर मी बॉस, बॉस हा बॉस असतो त्याला काही नाव नसत जमलस तर त्याला नावे ठेवायची असतात. मी दर सहा महिन्याला एक सेक्रेटरी बदलतो. का वगेरे असे खोलात शिरायची गरज नाही. आम्हाला हुषार, मनमिळावू, कर्तव्यृदक्ष, आधुनिक विचाराची, उदारमतवादी सुसंस्कृत कन्या हवी अशी जाहीरात पेपरात दिली. गोंधळलात ना, तो पेपरवालही तसाच गोंधळला होता. त्या मूर्खाने ही जाहीरात अपॉइंटमेंटस एवजी वधू पाहीजेच्या खाली टाकली होती. बर झाल तो संपादक नेहमीचा होता आणि त्याच्या लक्षात आले. अशी जाहीरात वाचून कित्येक सुकन्यांचे अर्ज आलेत. मग मी काय केले ती पंचवीसच्या पुढची आहे ते सारे रेझ्यमु रिजेक्ट. आता काय करायचे कुणी सलवार किंवा जीन्स मधे काकूबाइ आली असेल ना तर तिला सिक्युरीटी ऑफिस मधेच बसवून ठेवायचे दिवसभर. कंटाळून घरी जाइल बिचारी. आपण बिर्याणीवाले वरणभात जमत नाही. आज येणारी कन्या मात्र तशी नाही, ती म्हणजे चवळी आहे अगदी. तिला येताना पाहताच आपला कलेजा खलास झाला.
(सेक्रेटरीची एंट्री)
मुलगी: हाउ डू यू डू
बॉसः ओ फाइन फाइन हाउ डू यू डू . किती गोड बोलता तुम्ही. तुमच ते हाउडूयूडू ऐकताना गाण ऐकल्यासारख वाटल.
मुलगी: मायी माय म्हणली
बॉसः मायी माय म्हणली (धक्का बसल्या सारखा प्रश्नार्थक चेहरा करुन तिच्या भोवती एक फेरी मारतो परत तेच वाक्य) तुझी माय म्हणली
मुलगी: हो मायीच माय म्हणली नाहीतर का तुमची माय आलती का माझ्या घरी म्हणायला.
बॉसः देशीच्या बॉटलला स्कॉचच लेबल. नाही माझी माय कशी येणार तुझीच माय म्हणली.
मुलगी: मायी माय म्हणली
बॉसः काय म्हणली?
मुलगी: मायी माय म्हणली साखर पाण्यात आणि पुरुष गाण्यात एकसारखे विरघळतात
बॉसः तुझ्या माय(पॉज)च अस म्हणन होत. बर ते जाउ दे तुझ नाव काय
मुलगी: मंगली पांडुरंग सेनखाते
बॉसः अच्छा एम. पी. सेनखाते. तुझ गाव
मुलगी: टेंभुरड, जिला बुलढाणा
बॉसः तुझ शिक्षण.
मुलगी: तुम्ही काय शिरगणती वाले हायत का इतक्या चौकशा करुन रायले?
बॉसः नाही तस विचाराव लागत
मुलगी: बारावी झाल, बी ए होउन जाइन कधीतरी
बॉसः होउन जाइन
मुलगी: मंग म्या का खोटी बोलते काय
बॉसः नाही तू कशी खोटी बोलणार होशील होशील पास, बर तुला सेक्रेटरीच्या कामाचा काही अनुभव आहे का.
मुलगी: सिग्रेटरी, म्या सिग्रेट वढत नाही
बॉसः सिग्रेटरी नाही सेक्रेटरी
मुलगी: मंग काही येगळ असत का? ते कस वढतात
बॉसः कोणी काही ओढत नाही. हे बघ तुला सेक्रेटरीच्या कामाचा काही अनुभव आहे का? तू या आधी तुला कुठे सेक्रेटरी म्हणून काम केले आहे का? तसा अनुभव असेल तर तुला कामावर ठेवता येइल.
मुलगी: माझी माय म्हणली
बॉसः आता आणखीन काय म्हणली.
मुलगी: माझी माय म्हणली काम येत नसन तर शिकून घ्याच.
बॉसः अस म्हणाली तुझी माय. मग काय काय शिकवायच आम्ही.
मुलगी: तुम्हीच ठरवा
बॉसः जगाचा बराच अनुभव दिसतो तुझ्या मायला. हे बघ तुला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुला मिटींग सेट करता येते का
मुलगी: मिंटींग, मिंटींग म्हणजे काय
बॉसः मिटींग म्हणजे चार लोकांना एकत्र बोलवायच.
मुलगी: ते म्हणता. ते आता करते त्याले का लागते. (दोन जोरात शिट्ट्या मारते) ए संप्या, ए गंप्या, ए इन्या, ए धन्या यार साऱ्यांनो. एका शिट्टीत सारे जमते बघा. त्यायन शिट्टया मारल्या का अजून चार लोक येते.
बॉसः इथे ऑफिसात बसून शिट्टया मारनार आहात का?
मुलगी: मंग काही येगळ असत का ते?
बॉसः अहो ही ऑफीसमधली मिटींग आहे इथे अशा शिट्ट्या नाही मारता येत. इथे मिटींग कॅलेंडर मधे सेट करावी लागते. तुम्हाला कॅलेंडर तरी वापरता येते का?
मुलगी: होSSSS (जोरात हसते) कॅलेंडर वापराले का लागते. (भिंतीवरच कॅलेंडर वापरायची ऍक्शन करुन दाखवते) अस केल की झाल. आमच्या घरी मारुतीच, गणपतीच, देवीच सारे कॅलेंडर हाय. माया मोबाइल मधे पोरायचे नंबर कॅलेंडर वरुनच आहे कोणाचा जानेवारी तर कोणाचा फेब्रूवारी. इचारा काहून
बॉसः का का
मुलगी: म्हणजे लक्षात रायते कणचा कधी भेटला ते.
बॉसः अच्छा! कॅलेंडरचा हाही उपयोग आहे वाटत. ते कॅलेंडर नाही. तुला आउटलुक तरी माहीत आहे का
मुलगी: आउटलुक. माहीत आहे ना, इग्रजी साळेत नाही गेली म्हणून का झाल तेवढ तर येते. म्या एक लुक देला का पुढचा आउट.
बॉसः अहो तस आउटलुक नाही हो आउटलुक म्हणजे….. कस सांगू तुम्हाला तुला मेल माहीत आहे का मेल
मुलगी: माहीत हाय तुम्ही मेल म्या फिमेल
बॉसः ते मेल नाही. ते इ मेल, जी मेल, हॉट मेल
मुलगी: हॉट मेल ह्रितिक रोशन
बॉसः तस नाही. मेल वापरायच असत
मुलगी: म्या बारावी का अशीच पास झाले का. सारे मेलच तर होते माया मांग. माझी माय म्हणली
बॉसः आता परत काय म्हणली.
मुलगी: माय म्हणली प्रत्येक यशस्वी पुरषामाग एक स्त्री रायते पण एका यशस्वी स्त्रीमांग हजारो पुरुष रायते.
बॉसः अस म्हणली तुझी माय.
मुलगी: मंग खोट सांगते काय. मेलच माया मदतीले धावून आले म्हणून म्या बारावी झाले. सांगू तुमाले कशी पास झाले ते.
बॉसः बर ते जाउ द्या तुला एक्सेल येते का. मीच सांगतो काय ते नाहीतर परत कुठे तरी जाशील. एक्सेल म्हणजे त्यात ते उभ्या लाइनी, आडव्या लाइनी, चौकटीत आकडा
मुलगी: आकडा लावते त्याले एक्सेल नाही मटका म्हणते साहेब. मी सांगते तोच आकडा येते पाहा.
बॉसः तू लावलेलाच आकडा येतो ते कस?
मुलगी: माया एक दोस्त मटकेवाला हाय.
बॉसः अच्छा
मुलगी: आपला दोस्ताना येकदम झकास हाय येक तंबाखूवाला भोकणा, दुसरा मटकेवाला फेंगडा हाय, तो गुत्तेवाला बोबडा हाय अन तो चाकूवाला बहिरा हाय. बहिरा म्हणजे तो बहिरा नाही पण लोक त्याले अस म्हणते.
बॉसः तू जरा जास्तच मनलावू आहे, आय मिन मनमिळावू.
मुलगी: तुमाले माया दोस्ताची गंमत सांगू का
बॉसः ते राहू दे. कामाविषयी बोलू आपण. काही नाही तर निदान टायपिंग तरी येत का तुला
मुलगी: माझी माय म्हणली कॉपी पेस्टंच्या जमान्यात टायपिंगची काय गरज.
बॉसः तुझी माय इथपर्यंत पोहचली. ना तुझ धड शिक्षण झालय, ना तुला कामाचा अनुभव आहे. तुला नोकरी द्यायची म्हणजे कठीण आहे.
मुलगी: मी काय म्हणते साहेब ते मेल, ते वर्ड, ते एक्स्ल तुमाले येते ना
बॉसः हो
मुलगी: मंग तुम्हीच ते वापरना म्या आपली गाण म्हणते, नाचते.
बॉसः नाच गाण ऑफिसात चालनार नाही.
मुलगी: मंग भायेर जाउ
बॉसः हा विचार करता येइल. तरी ऑफीसचे काहीतर काम आले पाहीजे ना.
मुलगी: (ती रडायला लागते. जोर जोरात रडायला लागते.) माझी माय म्हणली तुम्ही सायबान, मेहरबान, कदरदान, अब्बाजान आहात.
बॉसः
मुलगी: मले नोकरी पायजे (परत रडते, जोर जोरात रडते)
बॉसः ठिक आहे मी तुला देतो नोकरी
मुलगी: तुम्ही मले काम द्यान, मले ते वर्ड, एक्सेल, ते तुमचे मेल फि मेल काही नाही आल तरी बी काम द्यान
बॉसः हो तुला ते काही नाही आले तरी मी नोकरी देतो.
मुलगी: ते टायपिंग बी नाही आले तरीही
बॉसः हो टायपिंग नाही आले तरीही
मुलगी: शाब आप कितने अच्छे हो, आप महान हो, आप ये हो, आप वो हो बल्की मै कहू
बॉसः बस, बस, अंदाज अपना अपना मी पण बघितला आहे. मी तुला कामावर ठेवतो पण माझ्या काही अटी आहे
मुलगी: अटी कंच्या
बॉसः तुला इथे ओव्हरटाइम करावा लागेल
मुलगी: ओवरटाइम हे काय असत
बॉसः ओव्हरटाइम म्हणजे दिवसा खूप काम असतात मग कधी कधी सारी काम दिवसात पूर्ण होत नाही अशावेळेला मग ती काम रात्री जास्ती काम करुन पूर्ण करावी लागतात. त्या कामाचे जादा पैसे पण मिळतात.
मुलगी: अस व्हय ते, करीन ना म्या बी ओवरटाइम करीन. पण साहेब म्या का म्हणते आपण जी काम रातच्याला करायची ती दिवसाच केली तर. तुमाले जादा पैसे बी नाय पडणार
बॉसः मला काय तसही चालेल, दुसरी अट तुला माझ्या सोबत टू… नाही ते नको हं दौऱ्यावर याव लागेल
मुलगी: दौरे (चक्कर आल्यासारखी ऍक्शन करीत बोलते)
बॉसः ते दौरे नाही. बाहेरगावी जाणे.
मुलगी: पिकनीक होय. पिकनाकले मी कुठेही येते. आमच्या साळच्या पिकनिकसाठी आम्ही नदीच्या काठावर गेलतो तेथ गेल्यावर समजल गाववाल्यांन तेथ बी हागीणदारी करुन ठेवली म्हणून. तुमाले गंमत सांगू.
बॉसः नाही नको. मी पिकनिक विषयी नाही बोलत आहे. मी म्हणतोय ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने बाहेर जाणे.
मुलगी: मंग टूर म्हणा की हो काय ते फेफर आल्यासारख दौरे म्हणता. मी कुठ बी येते.
बॉसः अस तू कुठ बी येते
मुलगी: का हो साहेब तुमच्या आधीच्या शिग्रेटवरी बी ओवरटाइम करत होत्या का, त्या बी तुमच्यासंग टूरवर येत होत्या का
बॉसः वावा यायच्यान. टूर वर यायच्या ओव्हरटाइम करायच्या
मुलगी: मंग तुम्ही काय करत होता,
बॉसः काही विचारु नको गंमतच आहे ती,
मुलगी: अस कणची गंमत आहे साहेब. तुम्ही का त्यांच्या बाथरुम मधे कॅमेरे लावून पाहात होता का, का सरबताच्या ग्लास मधे औषध देत होता.
बॉसः आता तुझ्या पासून काय लपवू काही असतात मूर्ख पोरी हटखोर तेंव्हा असे उपाय करावेच लागतात. साऱ्याच थोडी तुझ्यासारख्या समजूतदार आणि उदारमतवादी असतात.
मुलगी: अस सांगू माझी माय काय म्हणली ते. माझी माय म्हणली इंन्सपेक्टर श्रुती देशमुख अशा नराधमाची अजिबात गय करु नको. त्याच्या तोंडाला काळ फास, त्याची गाढवावरुन धिंड काढ आणि त्याला भर चौकात जोड्यान बदडून काढ. खूप तक्रारी होत्या तुझ्याविरुद्ध बरा सापडला आज रंगेहाथ.