जंग्या रघू आणि कंपनी

शेर तो शेर ही होता है
शेर तो आखिर शेर ही होता है

जंग्या रघू, ढोकरवाडीतला एक कुविख्यात दरोडेखोर, ज्याच्या नावाने एकेकाळी सारी ढोकरवाडी कापत होती. हा ढोकरवाडीतल्या जंगलातला वाघ, जंगलात मोकळा असूनही आज पिंजऱ्यात बंदीस्त असल्यासारखा येरझारा मारीत होता. आता वय एंशीच्या वर गेले होते त्यामुळे येरझारा मारायलाही काठीचा आधार घ्यावा लागत होता. केस पांढरे झाले होते, ती दरोडेखोराची आणबाण शान मिशीही आता फारसी राहीली नव्हती, जी होती तिही पांढरी झाली होती, तरीही हात मात्र सतत नाकाजवळ जात होते. इतक्या वर्षात काहीही झाले तरी मिशीवरुन हात फिरवायची सवय काही जात नव्हती. आता काही झाले नाही तरी हात तेथेच जात होते. असे बघितले की पोर ओरडायची ‘जास्त हात नाकाजवळ नका नेत जाऊ, नको ते हातात यायचे.’ पण जंग्याची सवय काही सुटत नव्हती. तो अजूनही इतिहासात वावरत होता. केवढा दरारा होता जंग्याचा, नुसता घोड्यांच्या टापांचा आवाज जरी ऐकला तरी लघ्वीला बसलेली माणसे धोतर तेथेच टाकून पळून जात होती. जंग्याच्या माणसांनी त्याच कारणाने कित्येक वर्षे धोतराचे पान घेतले नव्हते. बऱ्याचदा तर आवाज जंग्याच्या घोड्यांचा नसून गाढवांच्या पावलांचा असायचा तरीपण लोक पळत होते. उगाच रिस्क कोण घेणार, जंग्याचा दराराच तसा होता. नवीन लग्न झालेली नवरी जर जास्तच लाजत असेल तर नवरा तिला हळूच ‘जंग्या आला’ असे खोटेच कानात सांगायचा, त्यानंतर ती त्याला अशी काही बिलगायची की नवऱ्याची पुढची सारी कामे सहज होउन जायची.
जंग्याची माणसे धडधड धडधड घोड्यावर यायची, सावकाराच्या नाहीतर जमीनदाराच्या कानपट्टीवर बंदूका ठेवायची, सावकार कसलाही विरोध न करता घाबरुन तिजोरीच्या चाव्या काढून द्यायचा, सारा ऐवज घेउन पुढच्या क्षणाला जंग्या आणि त्याची टोळी जंगलात गायब होउन जायची. त्यानंतर दोन तास सावकाराचा नोकर त्या सावकाराने केलेली मुतारी साफ करीत बसायचा. तर कधी अंधारा रस्ता आणि रस्त्यात पसरवलेली दगडं, एसटी वेगात यायची, वळण घ्यायची आणि समोर पसरलेली दगडं बघून ड्रायव्हर कच्च ब्रेक मारायचा. मग वादळामुळे आंब्याच्या झाडावरुन आंबे पडावे तशी जंग्याची माणसे भराभरा झाडावरुन उड्या मारायची, बसमधे शिरायची, लुटता येइल तेवढा सारा ऐवज लुटायची, घाबरुन बाया अगदी ब्लाउजच्या आत दडवलेले पैसेसुद्धा न मागताच काढून द्यायच्या. जंग्याचा दराराच तसा होता कोणाची टाप नव्हती जंग्याच्या विरोधात जायची. जंगलात राहून जंग्या अख्या गावावर राज्य करीत होता.
आता जंग्याचा तसा दरारा राहीला नाही, ढोकरवाडीतल्या नवीन पिढीतील कित्येकांना जंग्या कोण आहे हेही ठाऊक नाही. कोणी म्हातारा कधीतरी कुरकुरतो ‘अरे तुम्ही त्या कुबड्या पिंट्या किंवा मुतऱ्या जग्ग्याला घाबरता, तुम्ही जंग्याला बघितला नाही त्याचा दरारा बघितला नाही, तो आला तर लोक असेल तिथे असेल त्या अवस्थेत पळत होते. एकदा तर मी तिकडल्या बस्तीतून तसाच पळत सुटलो होतो. माया बापाला समजल आन लगेच लगीन लावून देल.’ म्हाताराच तो त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ आहे? तसेही गेल्या काही वर्षात पेपरात नाव छापून यावे असा कुठलाही पराक्रम जंग्याच्या टोळीने केला नव्हता. पेपरातच नाही म्हटल्यावर टिव्हीवर कुठुन येनार? बर इंटरनेटवर काही माहीती मिळवावी तर गुगल, विकीपिडीयावर जंग्याविषयी कुणी एकही वाक्य लिहीलेले नाही कारण जे इंटरनेटवर लिहीतात त्यांचा जन्मच मुळी जंग्या संपल्यानंतर झाला. आता जंग्या म्हातारा झाला, त्याची काही माणसे माणसे मेली तर काही म्हातारी झाली. ते काठीच्या आधाराशिवाय काही करु शकत नाही. नवीन पिढी आळसी निघाली मैदानावर जाउन कुणाला दोन ठेऊन द्यायच्या, कुणाचा ऐवज पळवून आणायचा तर ते ती टिव्हीवरची WWF मधली फाइट बघत बसतात, त्यात कुणाला मार खाताना बघून खूष होतात. अवघड जागी दुखण्याचा त्रास होइल या भितीने ही नवीन पिढी घोड्यावर बसायलासुद्धा तयार होत नाही. तसेही हल्ली जागोजागी डांबरी सडका झाल्या त्यावरुन घोड्यांना पळायला त्रास होतो. त्यामुळे नवीन पोर घरीच बसणे पसंत करतात. कधी दरोडा टाकायला गेलेच तर तिथेही रीक्षा करुनच जातात. हातात फक्त बंदूका घेता येतात पण ती चालावायची अक्कल नाही. रिक्षात बसून कोणी दरोडा वगेरे टाकतील यावर ढोकरवाडीतल्या माणसांचा अजिबात विश्वास नाही, दरोडा टाकनारे मारुती व्हॅनमधून येतात, स्कॉर्पिओमधून येतात. त्यामुळे ते जंग्याच्या माणसांना नाटक कंपनीतले रिकामटेकडे नट समजून चांगले बदडून काढतात. मग बिचारे अस्सल खानदानी दरोडेखोर बुडाला पाय लावून जंगलात पळत सुटतात. मग त्या दुःखात निदान वर्षभर तरी सारे बिड्या ओढीत घरीच बसतात. असे रिकामे बसले की एकच उपद्वाप असतो जंग्याला शिव्या घालायच्या. ‘कुणी सांगितले झाडावरुन उड्या टाकून तंगड्या मोडून घ्यायला आणि बस लुटायला त्यापेक्षा घरीच दोन ताणून दिलेल्या बरे. ते थेरड रिकामटेकड आहे त्याच्या नादाला लागलो तर आहे ती हाडही शिल्लक राहनार नाही.’
तसेही आता काळ बदलाय, काळासोबत धंदाही बदललाय. आता कोणी सावकार घरी पेंसे, दागदागिणे ठेवीत नाही. सारे पैसे बँकेत ठेवतात, घरातल्या चड्डीतल्या पोराचेपण बँकेत अकाउंट आहे. कुणा कुणाचे तर स्वीस बँकेत अकाउंट आहे म्हणतात आता काय ते पैसे आणायला घोड्यावर बसून स्वीस बँकेत जायचे की काय. या स्वीस बँकेमुळे दरोड्याचा धंदाच बसलाय. कोणामुळे कोणाचे कसे नुकसान होइल काही सांगता येत नाही. एसट्या लुटणे तर आणखीनच त्रासाचे झाले आहे. मागे काही वर्षापूर्वी लग्नाच्या सीझनमधे मोठी मेहनत घेउन जंग्यांच्या माणसांनी एक एसटी लुटली. चांगला ऐवज जमा झाला होता, रोख रक्कम कमी होती पण दागदागिणे बरेच होते. जंग्या स्वतः लुटलेले दागिणे घेउन सोनाराकडे विकायला गेला. तर सोनाराने जंग्यालाच चांगला दम भरला ‘खोटा माल कशाला लुटता. लुटायच्या आधी बघून तर घ्यायचे माल खरा आहे का खोटा ते. खरे सोने आणि खोटे सोऩे कोणते यातला फरक ओळखता येत नाही तर दरोडे टाकतातच कशाला?’ जंग्या बिचारा तरी काय करनार, तो काय सोनार आहे खरे सोने आणि खोटे सोन्यातला फरक करायला. बरे त्याच्यावेळेस असली फसवाफसवी नव्हती. बाइच्या अंगावर दागिणा आहे म्हणजे तो सोन्याचाच असनार हे निश्चित होते. त्यामुळे त्याला बिचाऱ्यला एवढेच ठाउक होते जे पिवळे दिसते आणि चमकते ते सोने बाकी सारे पितळ. तेंव्हापासून जंग्याच्या टोळीवाल्यांनी एक निर्णय घेतला आता उगाचच रात्रीची झोप मोड करुन बस लुटायचा टाइमपास करायचा नाही. जंग्याने खूप सांगून पाहीले अरे असे करु नका, रात्रीची झोप ही दरोडेखोरांसाठी हराम असते. सारे शांत झोपल्यावरच आपण आपले काम आटपून घ्यायचे असते. पण त्याची माणसे काही ऐकायला तयार नव्हती.
जंग्याच्या माणसांना शॉर्टकट पाहीजे होता, झटपट पैसा पाहीजे होता. लहान सहान कामासाठी उगाचच ढोर मेहनत करायची त्यांची तयारी नव्हती. त्यांना वाटत होत दरोडाच टाकायचा आहे ना तर त्या एटीएमवर टाकावा. सोप काम आहे कुण्या बारक्या शिपुर्ड्याला एक कानाखाली लावली की तो लगेच लोळतो. बस मग मशीन फोडली की झाल सार काम. जंग्याला हे पटत नव्हते, जंग्याचे स्पष्ट मत होते की असली कामे ते गल्लीतले दादा लोक करीत असतात जंग्यासारख्या दरोडेखोरांच्या टोळ्या नाहीत. अशाने आपल्या परांपरगत दरोडेखोरीवर लांच्छन येईल, भिती दाखवून माल लुटायचा आपला परंपरागत व्यवसाय धोक्यात येइल. असे काही केल्याने गावात बदनामी होइल, लोक म्हणतील ती जंग्याची टोळीही त्यातलीच झाली आता. पोरांचे म्हणने होते तसेही कोण ओळखतो जंग्याला आणि त्याच्या टोळीला. या अशा बुद्धीवादी वादामुळेच जंग्याची टोळी हल्ली कुठेही दरोडा वेगेरे टाकायला जात नव्हती. सारे बापजाद्यांनी कमवलेल्या इस्टेटीच्या जोरावर टिव्ही बघत आणि बिड्या फुकत दिवस घालवीत होते.
जंग्याने वेगळ्या वाटा जोपासायचाही प्रयत्न केले पण त्यातही म्हणावे तसे यश आले नाही. मागे ते चोर सरकारचे अपहरणाचे टेंडर निघाले होते, जंग्याने त्याच्यासाठी अर्ज केला पण तुमच्या टोळीला या कामाचा अनुभव नाही, तुमची माणसे म्हातारी झाली आहेत त्यांना ते अपहरणाचे काम झेपणार नाही असली तद्दन भिकार कारणे सांगून ते टेंडर कुण्या दुसऱ्या टोळीला देण्यात आले. जंग्याला अजूनही संशय आहे यात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे पण त्याच्याकडे काही पुरावा नाही म्हणून तो त्याविरोधात चोर न्यायालयात जात नाही. काही लोक खुनाच्या सुपाऱ्या घेउन आले होते पण जंग्याने त्यांना परतावून लावले, आमच काम लोकांना मरणाची भिती घालायच त्यांना मारायच नाही. असल्या हिंसक मार्गाने मिळवलेला पैसा आम्हाला नकोय. कुणी राजकारण वगेरे करून बघा असेही सुचवून पाहीले पण उभी हयात गेली तोंडाला रुमाल बांधून लोकांपासून तोंड लपविण्यात आणि राजकारणात निदान पाच वर्षातून एकदा तरी लोकांना तोंड दाखवावे लागनार या भितीने जंग्याने तो नादही सोडून दिला.
या बदलेल्या परिस्थितीत जंग्या आपल्या टोळीच्या आणि कुटुंबाच्या भवितव्याच्या काळजीने चिंताग्रस्त होता. त्याच्या टोळीतल्या काही माणसांनी टोळी सोडून ढोकरवाडीत हॉटेल टाकली तर कुणी कपड्यांचे दुकान टाकले. अरे एका दमात जो गल्ला लुटायचा तर तो गल्ला जमवायला ते दिवस रात्र राबत होते. जंग्याला कधी कधी स्वप्न पडत होती त्याची नातवंड ढोकरवाडीतल्या मारुतीच्या देवळासमोर भीक मागताहेत. देवळातून येणारे एक रुपया त्यांच्या हातावर ठेवातहेत आणि तो एक रुपया मिळाला म्हणून ते त्याला उदंड आयुष्याचे आशीर्वाद देताहेत. असे काही स्वप्न पडले की जंग्या रात्री अपरात्री उठून जंगलात भटकू लागला. तसेही भटकून भटकून जाणार कुठे हातात काठी घेउन एक फर्लांगही फिरता येत नव्हते. नातवंडांच्या चिंतेपेक्षाही आपला पारंपारीक व्यवसाय आता उतरणीला लागला हेच दुःख त्याला सतत खात होते. रक्ताचा एकही थेंब न गाळता लाखो रुपये जमा करायचे जे कसब जंग्याकडे होते ते आता जंग्यासोबतच संपनार असे त्याला वाटत होते. त्याची ती कला आता लुप्त होणार की काय अशी भिती जंग्याला वाटत होती. मग काही वर्षानंतर कधी कोणीतरी त्यावर ‘ढोकरवाडीतला जंग्या’ अशा नावाने डॉक्युमेंटरी काढणार, त्यात जंग्याच्या टोळीविषयी, त्याच्या दराऱ्याविषयी माहीती सांगनार. टिव्हीवर चर्चासत्र होणार, इटरनेटवर पेजच्या पेज लिहीले जाणार, ढोकरवाडीतली माणसे उगीच हळहळनार पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असनार. जंग्याची नातवंडं भिकेला लागलेली असनार. तसेही जंग्याची नातवंड भिकेला लागल्याशिवाय त्याच्यावर डॉक्युमेंटरी काढावी असे कुणाला वाटनार नाही. जंग्याने हे सारे बदलायचे ठरविले. हयात आहे तोवर असे हातात हात घालून बसायचे नाही असे ठरविले. सारा व्यवस्थित सविस्तर विचार करुन जंग्याने एक योजना आखली होती. त्याने त्याच कामगिरीवर त्याच्या माणसांना पाठविले होते पण हे तरी काम आपली माणसे बरोबर करतील की नाही याच विचारात तो येरझरा मारीत होता.
..
“आजीबाई तुम्हाला काय धाड भरलीय मरायला आता कुठे तुम्ही सत्तरी गाठलीय. असे अर्ध्या डावात रनआउट व्हायला तुम्ही का इंजमाम उल हक लागून गेला की काय? पण आपल्या देशात रस्त्याचा काही भरवसा आहे काय. कोणते कोणते केबलवाले, ते टेलिफोनवाले त्या रस्त्याच्या जीवावरच उठले असतात. एका रात्रीत त्या रस्त्याचा पार खड्डा करुन टाकतात. आता तुम्ही सकाळी उठून रस्ता समजून मॉर्निंग वॉकला गेला आणि खड्ड्यात पडला म्हणजे. तेवढ्यासाठी हा सारा प्रपंच नाहीतर अजून पन्नास वर्षे तरी तुम्हाला हॉस्पीटलची पायरी चढायची काही गरज नाही. कधी कोणती इलेक्ट्रीकची तार तुमच्यावर पडली म्हणजे. काहीही झाली तर ती सरकारी तार ती काय तुमच्यासाऱखी खमकी आणि मजबूत थोडी असनार आहे. गळनारच लवकर. म्हणून माझा आपला तुम्हाला सल्ला. एक पॉलीसी काढली म्हणजे कसे पुढची पन्नास वर्षे निर्धास्तपणे जगता येते.”
सदा हातपावले ग्राहकाला गंडवण्याचा प्रयत्न करीत होता. रात्रीचे दहा वाजले होते तरी त्याचा गिऱ्हाइक गंडवण्याचा उद्योग काही सरत नव्हता. काही कामासाठी वेळ काळ बघायची काही गरज नसते. जसे मरण वेळ बघून येत नाही तसेच विमा एजंट सुद्धा वेळ बघून येत नाही. बऱ्याचदा ते तुम्हाला नको असले त्याच वेळेला येतात कारण त्यांना त्यांचे काम साधायची तीच योग्य वेळ असते. सदा कुटारवाडीतून ढोकरवाडीकडे चालला होता, रस्ता सुनसान होता. रस्त्यावर काळाकुट्ट अंधार होता, भयानक शांतता पसरली होती पण सदाला काही भिती वाटत नव्हती. सदा आणि सतत किरकिर करनारा त्याचा भ्रमणध्वनी जगातला कुठलाही शांतता करार भंग करु शकत होते. आताही त्याचे तेच चालले होते कुण्या बाहेरच्या व्यक्तीला वाटेल की रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी आहे म्हणून. सदाचा भ्रमणध्वनी परत वाजला.
“बोल”
“कुठे आहात?”
“रस्त्यावर, म्हणजे ढोकरवाडीच्या रस्त्यावर आता यावर्षी एक करोडचा बिझनेस करायचा म्हणजे मेहनत तर घ्यावी लागनारच ना.”
असे म्हणत त्याने फोन ठेवला आणि कुणाचा तरी नंबर फोनवर शोधू लागला. तेवढ्यात दाणा फेकताच आतापर्यंत नजरेस न दिसनारी कबुतरी अचानक उडत यावी तशी अचानक चारी बाजूनी माणसे बाहेर आली. सारे काळा चुडीदार त्यावर काळा डगला, डोक्यावर काळा फेटा आणि डोळ्याला काळा गॉगल लावून त्या काळ्याकुट्ट अंधारात चालत येत होते. काळा फेटा तोंडाभोवती सुद्धा गुंडाळला होता त्यामुळे एक श्वास घ्यायला नाक सोडले तर अंगाचा साराच भाग झाकला गेला होता. साऱ्यांच्या हातात त्या जत्रेत फुगे फोडायला वापरताता तशा दिसनाऱ्या बंदूका होत्या. हे अंधारातही काळे कपडे आणि काळे गॉगल लावून फिरनारे पब्लीक कोण असावे याचा सदाला काही अंदाज येत नव्हता.
“कोणत्या सर्कशीतले जोकर म्हणायचे हे का कुण्या थीम पार्क मधले कार्टून?”
त्यांच्यापैकी कुणीच सदाशी काहीही बोलायला तयार नव्हते, काही बोललो तर तोंडावर बांधलेला रुमाल खाली पडण्याची भिती होती. जंग्याने सांगितले होते कोणालाच तोंड दाखवायला अजिबात जागा नाही. तोंडावरचा रुमाल अजिबात ढळू द्यायचा नाही. तोंडातून एक शब्द बाहेर काढायचा नाही की, कुणावर डोळे काढायचे नाही. माणूस आहे का बाई हे सुद्धा समजायला नको. त्याने काहीही विचारले तरी कुठल्याच प्रश्नाचे काहीच उत्तर द्यायचे नाही. ढोकरवाडीतल्या माणसांशी बोलायला लागले कि तो बोट मागून हात धरतो. ढोकरवाडीतला माणूस कुठेही भावबाजी करतो अगदी संडासातल्या क्यूपासून ते सरणावरच्या लाकडापर्यंत तेंव्हा तोंड अजिबात उघडायचे नाही. त्याप्रमाणेच जंग्याच्या माणसांनी तोंडातून एक शब्द न काढता सदाला धरला, त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्म मारले, त्याला काळा डगला घातला, डोळ्याला काळी पट्टी बांधली. कुणाला संशय येउ नये म्हणून त्यावरुन एक काळा गॉगल पण लावला. त्याला एका टेंपोत भरुन जंगलात घेउन गेले. त्याचे हात बांधण्यात आले, पाय बांधण्यात आले आणि त्याला झाडाला तसेच बाधून सारे निघून गेले. बऱ्याच दिवसात रात्रीला बाहेर जाउन एवढ कष्ट घेतल्याने सारेच ताणून झोपले. काहींनी तर थकवा आला म्हणून तर काहीनी काम फत्ते झाल्याचे सिलिब्रेशन म्हणून दोन दोन थेंब पोटात ओतले आणि मग मस्त ताणून दिली.
जंग्या सकाळीच उठला, काहीतरी क्रांतिकारी असे दरोडेखोरांच्या आयुष्यात घडनार आहे म्हणून त्याला रात्रभर झोप येत नव्हती. ज्याच्यासाठी ही सारी क्रांती चालली होती ते मात्र ढाराढूर झोपले होते. जेंव्हा क्रांती होइल तेंव्हा ती होइल आपण आधी आजचे झोपून तर घेउ असा सरळ साधा विचार त्यामागे होता. सदाला सकाळी आठ नऊला जाग आली. जाग येताच सवयीप्रमाणे त्याने भ्रमणध्वनी शोधायचा प्रयत्न केला तेंव्हा त्याच्या ध्यानात आले की त्याचे हात दोराने बांधलेले आहे. थोड्याच वेळात त्याच्या ध्यानात आले की तो कुठल्यातरी जंगलात बंदीस्त आहे. कुणी येउन त्याला चहा ब्रेड खाउ घातली, अशा जंगलात सुद्धा बेकरी वगेरे आहे याचे सदाला आश्चर्य वाटले. त्याला पाणी दिले, सकाळच्या विधीस घेउन गेले. सदा विधीस जायला तयार नव्हता, त्याने आपली अडचण समजावून सांगितली हातात मोबाइल असल्याशिवाय आपण कुठलेच काम करु शकत नाही. मग कुणीतरी त्याला पोरांच्या खेळण्यातला मोबाइल दिला. ‘ही असली ट्रिटमेंट नेहमी केवळ इस्पीतळात मिळते तेंव्हा हे ओपन थियेटरच्या धर्तीवर कुठले हॉस्पीटल आहे की काय’ अशी शंका सदास आली. तसे काही नव्हते. बारा साडेबारा पर्यंत जंग्याची सारी माणसे उठली. जंग्याचा दरबार भरला. त्या दरबारात सदाला पेश करण्यात आले. जंग्या जरी मुगले आजममधल्या अकबरासारखा दिसत असला तरी तो शोले मधल्या गब्बरसिंगसारखा हातात पट्टा घेउन फिरत होता. एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात तो पट्टा होता. अधे मधे तो पट्टा जमीनीवर आपटत होता तसा पट्टा आपटताच त्याचा तोल जाउन तो पडतो की काय अशी शंका येत होती. तो जोरात आपटलेला पट्टा, तो मिशीला दिलेला ताव या साऱ्या दरोडेखोरांच्या परंपरांगत चालीरीती वय झाले म्हणून सोडून देता येत नाही.
सदाला पेश करताच जंग्याने हात वर केला. त्यासरशी सदाच्या तोंडाला बांधलेली पट्टी सोडण्यात आली. पट्टी सोडताच सदाने त्याच्या तोंडाची पट्टी सुरु केली ‘कोण तुम्ही, मला कशाला पकडून आणलेय, सोडा मला, मी पोलीसात तुमची तक्रार करील’. सदाचा आवाज वाढताच जंग्याने हातातला पट्टा जोरात दगडांवर आदळला त्यासरशी त्याचा तोल गेला. काठी घसरली आणि जंग्या खाली पडनार तो कुण्या पठ्ठ्याने त्याला धरुन ठेवले. सदाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जंग्याच्या पोराने मग हवेत बंदुकीच तीन बार उडविले. जंग्याने डोळे मोठे करुन पोराकडे बघितले, तो डोळ्यानेच सांगत होता
“अरे मूर्खा बंदुकीचा खर्च परवडतो का? कशाला उगाचच बंदुकीचे हवेत बार उडवतो?” मग कुणीतरी जंग्याला कानात सांगितले
“घाबरु नको तो छर्ऱ्याचा बार होता.” त्या बाराचा सदावर जबरदस्त परीणाम झाला तो जाम घाबरला. टिकलीच्याही बंदुकीला घाबरनारा माणूस तो. त्याचे हातपाय लटलट कापायला लागले. सदा घाबरलाय हे बघताच जंग्याच्या एका माणसाने सदाला दम भरला.
“आवाज खाली तू जंग्या रघूच्या दरबारात आहेस.”
“कोण जंग्या रघू? माझा काय संबंध? मी कोणी जंग्या रघूला ओळखत नाही.”
हे म्हणजे उभे आयुष्य सारे शरीर हलवीत ‘इतना सन्नाटा क्यू है भाइ?’ असे म्हणनाऱ्या ए के हंगलने गब्बरसिंगाला ओळख न दाखविण्यासारखे होते. मृत्युशय्येवर भीष्माला जेवढ्या यातना झाल्या नसतील तेवढ्या यातना जीवंतपणी उभ्या उभ्या जंग्याच्या ह्रदयाला होत होत्या पण करता काय आता दिवस फिरले होते. कुणीतरी त्या सदाची मानगुटी धरायला गेला तर जंग्याने त्याला हातानेच नाही म्हटले. मग सदाच बोलू लागला.
“तुम्ही कुणी असाल मोठे दरोडेखोर पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही आहे हो. मी फक्त कमिशन एजंट तो करोड वगेरेचा बिझनेस कुण्या दुसऱ्याचा. माझ्यासाठी फक्त कमिशन.”
“तुमच्या सारख्यांनी आमचा परंपरागत व्यवसाय गोत्यात आणला आणि तू म्हणतो मला जाउ द्या.”
“तुमचे काहीतरी चुकतेय, मी काहीच केले नाही”
“तुम्ही लोकांना कशाकशाची भिती दाखविता? कुणाला सांगता अंगावर खरुज येइल हा साबण वापर, कुणाला भिती घालता दात किडतील आमच्या कंपनीची पेस्ट वापर. कुणाला सांगता मधुमेह होइल, कुणाला सांगता रक्तदाब होइल. नुसती भिती, भिती आणि भिती. अरे हा भिती घालण्याचा आमचा धंदा तुम्हीच बळकावला मग आम्ही का खायचे?”
“मी त्यातला नाही हो माझा त्याच्याशी काही संबंध नाही.”
“अरे तू तर साऱ्यात कहर आहेस, तू तर थेट मरणाची भिती दाखवितो. हातात ना बंदूक ना तलवार तरी लोकांना रोज मरणाची भिती घालत असतो. कुणाला म्हणतो खड्डात पडशील, कुणाला म्हणतो इलेक्ट्रीकची तार अंगावर पडेल, कुणाला म्हणतो गाडीखाली येशील, कुणाला म्हणतो कँसर होइल, कुणाला म्हणतो ऍटॅक येइल. कुठुन शिकला रे हे सार? तुझ्यासारख्यामुळे लोक आम्हाला आता अजिबात भित नाही.”
“अहो पोटासाठी करतो मी सार.”
“खामोश तुझ्यासाऱख्याला तर हत्तीच्या पायाखाली तुडवायला पाहीजे, तोफेच्या गोळ्याला लावायला पाहीजे, अंधाऱ्या कोठडीत डांबायला पाहीजे.”
“सलीम” आतापर्यंत गप्प असलेला आणि येरझारा मारणारा जंग्या आता बोलला.
“शांत सलीम शांत. बर्खुरदार हमारी कंपनीको आपकी जरुरत है. पण तुम्हाला आमचे काम करावे लागेल”
“तुमची कंपनी”
“हो रजिस्टर्ड आहे. चोर सरकारतला रजिस्ट्रेशन नंबर सांग रे.”
“मुझे मरने दो का मुनीम दत्त”
“हा रजिस्ट्रेशन नंबर आहे? आणि कोण चोर सरकार?”
“ढोकरवाडीतल्या जंगलातल सरकार.”
“मी ढोकरवाडीत राहतो हो जंगलात नाही.”
जंग्या खाली उतरला म्हणजे कोणीतरी हात धरून त्याला खाली उतरवला. जंग्या खाली उतरताच त्याच्या अंगरक्षकाने सुटकेचा निश्वास सोडला त्याला उगाचच भिती वाटत होती कुठे ह्या दगडावर उगाचच म्हातारपणाच्या जोषात जंग्या काही भलते सलते करायला गेला आणि घसरुन पडला तर आधी त्यालाच पोहचावावे लागेल. तंगड गिंगड मोडल तर त्याची सेवा करावी लागेल. काहीतरी ड्रामेबाज, धडाकेबाज करण्यासाठी म्हणून जंग्या चालत चालत सदापर्यंत आला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आपल्या सैनिकावरुन एक नजर फिरविली. त्याला उगाचच आशा त्याचाही कुणीतरी सांबा असेल म्हणून. कुणा एकालाही जंग्याच्या फालतू ड्रामेबाजीत रस नव्हता. साऱ्यांना वाटत होते जे काही बोलायचे ते पटापट बोलून टाकायचे. साऱ्यांना घरी जाऊन जेवायची घाई झाली होती. त्यामुळे कुणी खाली बघून उगाचच गवत उपटत होते तर कुणी बंदूकीच्या नळीत फुकत होते. जंग्याने सदाच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांगितले.
“चोर सरकारचे अपहरणाचे टेंडर आम्हास मिळाले नाही कुटारवाडीच्या म्हात्र्याच्या टोळीस मिळाले. रजिस्ट्रेशन नंबर बुढीत क्वीनची बिमा इश्वास.” हे काय चाललेय त्या सदाला काही कळत नव्हते नेहमी लोकांची बोलती बंद करनारा सदा आता स्वतःच चूप होता. स्वतःचा बचाव कसा करावा त्याला काहीच कळत नव्हते. या लोकांना त्याच्याकडून काय हवेय तेही कळत नव्हते
“मी त्यात काही करु शकत नाही. मी कोणत्याच बिमा इश्वासला ओळखत नाही.”
“मी ओळखतो ना चांगलाच ओळखतो. म्हणे अपहरण करनार त्यांच्या बापाने तरी कधी अपहरण केले होते का? चोर सरकारात मारे बोंब केली आम्ही डॉली आणि मोती पकडला म्हणून. आम्ही आमच्या हेरांमार्फत चौकशी केली तर कळले की ते साले कुत्रा कुत्रीचे जोडपे होते. चोर सरकारलाही सांगतिले तरीही त्यांनी त्या टोळीलाच अपहरणाचा अनुभव आहे म्हणून ते अपहरणाचे टेंडर दिले.”
सदा बिचारा केविलवाण्या चेहऱ्याने सारे बघत होता. त्याचे हात पाय अजूनही बांधून होते. बर पळून जाणार तरी कसे त्याला या जंगलाची काहीच माहीती नव्हती. गुगल मॅप्स बघावे म्हणाल तर मोबाइल पण जवळ नव्हता. हा जंग्या सत्तरच्या दशकातील आर्ट सिनेमासारखा असंबद्ध बडबड करीत होता. सदाची अवस्था आदिवासींच्या घोळक्यात सापडलेल्या हिंदी चित्रपटातील हिरोसारखी झाली होती. ना भाषा कळत होती ना त्याचे काय चुकले ते कळत होते. त्या हिरोला सोडवायला नेहमी आदिवासींच्या म्होरक्याची पोरगी तरी असते इथे तर या म्हाताऱ्याच्या साऱ्याच गोवऱ्या मसनात गेल्या होत्या. तेंव्हा त्याची पोरगी असली तरी तिला त्याला सोडवण्यात कशाला उत्साह असनार होता. सदा कुणीतरी मदतीला येइल या आशेने इकडे तिकडे बघत होता पण कोणी नव्हते.
“आम्हाला विम्याचे टेंडर मिळाले.”
“कशाचा विमा?”
“अपहरण झाले तर जी रक्कम द्यावी लागेल त्याचा”
“पण तुम्ही तर म्हणाला की ती बिमा इश्वास टोळी अपहरण करु शकत नाही म्हणून.”
“आहाहाहाहा.” असे म्हणत जंग्या जोरजोरात हसला. जंग्याचे हसणे संपले तरी जंग्याच्या टोळीतला एक माणूस हसला नाही. “आपल्यासाठी अपहरण झाले की नाही हे फार महत्वाचे नाही पण अपहरण होइल अशी भिती ढोकरवाडीतल्या प्रत्येकाला वाटली पाहीजे. लोकांना भिती घालून त्यांच्याकडून पैसे, ऐवज लुटणे ही आमची परंपरा आहे.”
“अहो लोक विश्वास कसा ठेवनार?” म्हाताऱ्याने परत जोरजोरात हसण्याचा पवित्रा घेतला. त्याच्या बाजूलाच उभ्या असनाऱ्या त्याच्या पोराने त्याच्याकडे डोळे रोखून बघितले. तेंव्हा त्याने जोरात हसण्यासाठी मागे नेलेल्या हातांनी जोरजोरात दोनदा टाळ्या वाजविल्या. तसाच एक लाकडी दरवाजा बाजूला झाला. त्यामागेही कुणाला तरी सदासारखेच बांधून ठेवण्यात आले होते. सदाने त्याचा चेहरा निरखून बघितला तो ढोकरवाडीतला केबलवाला होता.
“हा सांगेन” जंग्या आता परत काहीतरी फालतू ड्रामा करुन नको ती माहीती सदाला देइल असे वाटल्याने त्याच्या पोरानेच सांगितले. “हा साऱ्यांना पटवून देइल. लोकांना घाबरवून सोडील”
“लोक का घाबरतील”
“त्यात काय अस मोठ? धंदा आहे त्याचा तो. बीमा इश्वासच्या टोळीचा धाक तोच निर्माण करु शकतो. कुणाचा पेन हरविला, कुणाचा कुत्र हरवल, कुणाचा पोरग पळून गेल, कुणाची पोरगी पळून गेली तरी तो सांगेन हे काम बीमा इश्वासच्या टोळीचे आहे. आठवड्यामागे रोज एक अपहरणाची स्टोरी आज या गल्लीतले, उद्या त्या गल्लीतले. बघ आजच बातमी पसरलीय बिमा इश्वासच्या टोळीने करोडाचा बिझिनेस करनाऱ्या विमा एजंट सदा हातपावले यांचे अपहरण केले. आज दिवसभर हीच स्टोरी चालनार बघ. तो आणि तू एकत्र आले का बघ मग लोक कसे घाबरतात त्या बीमा इश्वासच्या टोळीला. सारे वीमा काढतील.”
“या साऱ्याशी माझा काय संबंध. ह्यात मी काय करायचे?”

“तेच जे तू आतापर्यंत करत आलास. कमिशन एजंट. करोडोचा बिझनेस.”

2 thoughts on “जंग्या रघू आणि कंपनी

टिप्पण्या बंद आहेत.