‘शोले’ आता मराठीत

य़े हाथ मुझे दे दो ठाकूर जालावरुन
य़े हाथ मुझे दे दो ठाकूर
जालावरुन

पात्र परिचय
(राम रतन स्टोरीवाला: पानाची टपरी चालवणारा एक व्यक्ती, तोंडात पान, धोतर अंगात बंडी घातलेला मनुष्य.
निर्माता: चमकदार कपडे, डोळ्याला गॉगल, खाली शॉर्ट. अमेरीकेतून आलेला वाटनारा.
जागा पानाची टपरी, त्यावर चुना लावत बसलेला राम रतन.)
स्टोरीवाला: खैके पान बनारस वाला खुल जाए बंद अकलका ताला फिर तो ऐसा करे धमाल ये छोरा गंगा किनारे वाला. बंदेको ऐसा चुना लगावो के बंदा खुदीसे पूछे बंदा कौन और चुना कौन.
(दुसरा व्यक्ती एंट्री घेतो. धावत धडपडत बेचैन काहीतरी शोधतोय. काही सापडत नाही आहे. डोळ्यावर हात ठेवून दूर बघतो, गॉगल काढून परत बघतो परत गॉगल डोळ्यावर लावतो. दुसऱ्या बाजूला जाउन तेच करतो. खिशात बघतो, खाली वाकून बघतो, उडी मारुन बघतो, टाचा उंच करुन बघतो. )
स्टोरीवाला: ओ सायंटीस्टीट, तुम्ही तुम्हीच

निर्माता: तुमचा गैरसमज होतोय मी संशोधक वगेरे नाही.

स्टोरीवाला: नाही ना मग काय फालतू टाइमपास करताय.  काय शोधताय एवढ? बायकोच झांपर हारवल की काय.
निर्माता: ओ काही काय मी मराठी चित्रपटासाठी स्क्रिप्ट शोधतोय
स्टोरीवाला: मराठी चित्रपटासाठी स्क्रिप्ट ते इकडे नाही सापडनार. ते तिकडे भंगारवाल्याकडे.  रस्ते केंव्हाच साफ केले.
निर्माता: गेलो होतो तो म्हणाला एवढ जुन भंगार ठेवत नाही म्हणून. त्याचे काय आहे. मला एक चांगला मराठी चित्रपट निर्माता व्हायचे आहे. त्यासाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे.
स्टोरीवाला: मग तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात
निर्माता : योग्य जागी, या पान टपरीवर, काय भंकस करता का राव इथे कुठे चित्रपटाची स्क्रीप्ट मिळणार?
स्टोरीवाला: पान टपरीवर चित्रपटाची स्क्रीप्ट काय अख्खा पिक्चर मिळतो भाऊ. आहात कुठे इकडे या.  काय असत त्या स्क्रिप्ट मधे. थोडासा रोमांस, दोनतीन गाणे, एक आयटम सॉंग, व्हीलेन, रडारडी आणि गोड शेवट. हे काय आहे हे
निर्माता : पान
स्टोरीवाला: पान नाही याला पडदा समजा. हा चुना बरोबर असा चुना लावणे म्हणजे रोमांस (चुना लावत) . हा कथ्था म्हणजे विलेन. चुन्यावर कथ्था टाकला कि कसा झोंबतो बघा. पण पानाला रंगत तोच आणतो. बाकीचे फक्त जागा भरायला. आणि शेवटी सारे गोड. (गुलकंद टाकत). आणि पिक्चर संपला की कोण्या लवंगी मिरचीचे गाणे. बोला काय फरक आहे. खानदानी धंदा आहे आमचा
निर्माता: चुना लावण्याचा
स्टोरीवाला: स्टोऱ्या लिहीण्याचा.
निर्माता: तसाही फार फरक नाही म्हणा.
स्टोरीवाला: पटल आता. आम्ही स्टोरी नुसती लिहीत नाही तर तुमच्या बजेटमधे स्टोरी बसवून देतो. एकच स्टोरी वेगवेगळ्या बजेट मधे. बोला तुमच बजेट बोला. हा बघा मराठीतला ग्रॅव्हीटी ‘आकर्षण’
निर्माता: What? ग्रव्हीटी म्हणजे गुरुव्वाकर्षण आकर्षण नाही.
स्टोरीवाला: अहो आकर्षण आणि गुरत्वाकर्षण मधे फारसा फरक नसतो. एकदा आकर्षण झाले की आपोआपच गुरुत्वाकर्षण नाहीसे झाल्यासारखे वाटते. बोला तुमच बजेट बोला.
निर्माता: तुम्ही सारख बजेट बजेट काय विचारताय ? हे काय साडीच दुकान आहे?
स्टोरीवाला: धंदा म्हणजे धंदा साहेब. मग तो साडी विकायचा असो की पिक्चर विकायचा त्यात बजेट हे आलच. बोला काय देउ तुम्हाला, बॉलीवूड रिमेक, हॉलीवूड रिमेक, तॉलीवूड रिमेक का  मॉलीवूड रिमेक .
निर्माता: मला एक आशयपूर्ण, आशावादी, वास्तववादी, नावीन्यपूर्ण, सामाजिक जाणीव असणारा, संवेदनशील मराठी चित्रपट बनवायचा आहे.
स्टोरीवाला: ओ साहेब जरा मराठीत बोला की.
निर्माता: I want to make meaningful, positive, impactful, realistic, socially aware, sensible new cinema.
स्टोरीवाला: अस होय मग अस करा अकरा नंबरची बस पकडा आणि निघा. कटायच म्हटल. या शब्दांचा आणि पिक्चरचा काही संबंध नाही. पिक्चर म्हणजे काय तुम्हाला काय इंग्लिश लिटरेचरचा क्लास वाटला होय. बसले एकाच शेक्सपियरला वर्षानुवर्षे चघळत. पिक्चर म्हणजे फार्मुला. सिप्पी गेला, देसाइ गेला शेट्टी आला तरी फार्मुला तसाच. एकदम फिट्ट. तुमच्यासारख्या कडूनच शिकलो आम्ही तुम्हाला निर्माता असून माहीत नाही. कोणी निर्माता बनवल हो तुम्हाला?
निर्माता: बनवल म्हणजे मीच आपला, मी ना इतर निर्मात्यांसारखा नाही मला काही तरी वेगळ धमाकेदार करायच आहे, बजेट थोड कमी आहे म्हणून म्हटल हिंदी, तामील, तेलगू परवडनार नाही तेंव्हा आपली मराठी बरी. After all it’s my mother tongue.
स्टोरीवाला: धमाकेदार करायच म्हणता मग अस करा एकदम झकास आयडीया आहे तुम्ही शोले करा शोले मराठीत. नुसते धमाकेच आहे त्यात.
निर्माता: शोले नाही हो
स्टोरीवाला: का?
निर्माता: मला माझा रामगोपाल वर्मा नाही करायचा
स्टोरीवाला: नाहीतरी तुम्हाला कोण विचारतोय निदान रामगोपाल वर्मा तर होइल. तुम्ही पेटला आहात तेंव्हा शोलेच करा. स्वस्तातला मराठमोळा गरमागरम शोले.
निर्माता: गरमागरम काय? गरमागरम असायला ती काय भजी आहे?
स्टोरीवाला: ओ ते शोले आहेत ना ते गरमच असतात.
स्टोरीवाला: तर स्टोरी अशी आहे दोन जीवाभावाचे मित्र, गणप्या आणि शिरप्या, भुरटे चोर, कुठेतरी पाकेटमारी करुन आपल पोट भरणारे चाकरमानी. चित्रपट सुरू होतो पहीला सीन गिरगावातली चाळ
निर्माता: गिरगावातली चाळ, अहो गिरगावच्या चाळीतून सुरु व्हायला हा काय केदार शिंदेचा शोले आहे? हा माझा शोले आहे काहीतरी वेगळ हव.
स्टोरीवाला: बर गिरगावची चाळ नको मग कोल्हापूरचा माळ घेउ आय मीन कोल्हापूरचा मळा
निर्माता: हो ते चालेल. दोन्ही बाजूला असे उसाचे मळे, मधे रेल्वेचे ट्रॅक, त्यावरुन धावणारी ट्रेन, त्यात ठाकूर दोन चोरांना म्हणजे गणप्याला आणि शिरप्याला घेउन निघालाय. तेवढ्यात गुंडाचा हमला होतो आणि हे चोर जीवावर उदार होउन लढतात. ठाकूर हे बघून खूष होतो. वा क्या सीन है
स्टोरीवाला: झाल तुमच. परवडणार आहे का हे सार. काय हो तुम्हा मुंबईवाल्यांना कोल्हापुरात काय नुसते उसाचे शेतच दिसतात का? दिसल कोल्हापूर का घुसले उसाच्या शेतात. दिसल कोल्हापूर घुसले का उसाच्या शेतात. कोल्हापुरात तांबडा पांढरा आहे, अंबामातेचे देउळ आहे ते सारे सोडून तुम्हा फक्त उसाचे मळेच पाहता. ते रेल्वे काही परवडत नाही आपण काळी पिवळी घेउ. नाही तर सरऴ रिक्षात घेउन जाउ. बजेट कमी आहे ना.
निर्माता: परवडत नाही म्हणता ठीक आहे मग रिक्षात टाकून घेउन जाउ, इन्सेपेक्टर ठाकूर दोन चोरांना
स्टोरीवाला: थांबा
निर्माता: का आता काय झाल
स्टोरीवाला: मराठी सिनेमात इन्सपेक्टर एकच बाकी सगळे हवालदार डॅम इट, इन्सेपेक्टर फक्त महेश जाधव बाकी सारे हवालदार.
(दुसराही डॅम इट ची ऍक्शन करतो)
स्टोरीवाला: आता त्या ठाकूरचे दोन्ही हात तुटल्यावर त्याला डॅम इट करता येणार आहे का? नाही ना मग इन्सपेक्टर कट हवालदार.
निर्माता: पॉइंट आहे तर हवालदार ठाकूर
स्टोरीवाला: ते नको
निर्माता: का आता काय झाल?
स्टोरीवाला: अहो तो गब्बरला ठेचून मारनारा ठाकूर होता. तो हवालदार कसा असेल. मराठी सिनेमा आहे आपलीच माणसे ठेवू.
निर्माता: तुम्हीच आता म्हणाला ना इन्सपेक्टर नाही म्हणून
स्टोरीवाला:  ठाकूर कट, पिक्चरमधून. खिळ्यांच्या बुटांचा खर्च वाचला. सरळ साधा आपला हवालदार शिंदे घेउ.
निर्माता: ठिक आहे हवालदार शिंदे दोन चोरांना रिक्षात घेउन चालले असतात. रिक्षा जोरात चालली असते.
स्टोरीवाला: थांबा
निर्माता: का आता काय झाल?
स्टोरीवाला: अहो पोलीस स्टेशन आल उतरणार नाही का. पूर्ण पिक्चरभर नुसती रिक्षाच फिरवत राहणार घिर्र घिर्र. आता दुसरा सीन ऐका
निर्माता: अहो पहीला सीन पूर्ण झाला नाही.
स्टोरीवाला: तेवढ्या पैशात हेच परवडत.
निर्माता: दुसरा सीन म्हणजे हवालदार शिंदेच गाव
स्टोरीवाला: बरोबर जमतेय जमतेय तुम्हाला. इथे आपण काहीतरी वेगळ करु, आजवर मराठी सिनेमात झाल नाही अस काहीतरी करु पूर्णपणे वेगळ. त्या गावात काहीतरी वेगळ असेल.
निर्माता: वा गावात वेगळेपण, वा काय वेगळ असेल गावात.
स्टोरीवाला: ते गाव भोकरवाडी, हे गाव मराठवाड्यातल असेल, आहे का नाही एक़दम वेगळ
निर्माता: हो वेगळ आहे. हल्लीचा मराठी सिनेमा पुणे मुंबइ, मुंबइ पुणेच करीत असतो. पण काय हो गाव शेवटी गाव, लोकांना हे कस कळणार का गाव मराठवाड्यातल आहे का पश्चिम महाराष्ट्रातल? भोकरवाडी जिल्हा औरंगाबाद अस लिहायच का?
स्टोरीवाला: नाही त्यान फिलींग नाही येणार. फिलींग यायला पाहीजे फिलींग डिटेलींग महत्वाच नाही.
निर्माता: मग काय अनासपुरेला घ्यायचा
स्टोरीवाला: नाही परवडणार नाही. आपण त्याच्या सिनेमाचे पोस्टर लावू गावभर. काय कशी वाटली आयडीया. आल की नाही फिलींग. शेवटी फिलींग महत्वाच आहे हो डिटेलींग नाही.
निर्माता: पटल पटल. तर भोकरवाडी मराठवाड्यातल एक गाव. त्या गावात हवालदार शिंदेची हवेली
स्टोरीवाला: ओ, तुम्हाला वास्तववादी सिनेमा बनवायचा आहे ना.
निर्माता: हो
स्टोरीवाला: अहो तो शिंदे हवालदार आहे त्याची हवेली कशी असेल त्याला साध पोलीसाच क्वार्टर मिळाल तरी पुष्कळ आहे. हवालदार शिंदेची दहा बाय दहाची खोली.
निर्माता: ठीक आहे तुम्ही म्हणता तस करु. दोन चोर गणप्या आणि शिरप्या भोकरवाडीत उतरतात. त्यांना बसंती भेटते, ती खूप बडबड करते. ती त्यांना तिच्या धन्नो नावाच्या घोडीच्या टांग्यात घेउन दोघांना शिंदेच्या खोलीपर्यंत सोडून द्यायला निघते.
स्टोरीवाला: थांबा
निर्माता: का आली का शिंदेंची खोली?
स्टोरीवाला: नाही एक विचार आलाय,
निर्माता: तुम्हाला
स्टोरीवाला: हो कधी कधी मी पण विचार करतो. मराठवाड्यातल्या गावात जीथ माणसाला प्यायला पाणी नाही तिथ घोडीला पाणी कस मिळणार. नाही आपण घोडी नाही घेउ आपण कोंबडी घेउ कोंबडी. तसेही मराठी सिनेमात घोडीपेक्षा कोंबडीचाच भाव जास्त आहे.
निर्माता: काय कोंबडी. अहो आता ती बसंती का कोंबडीचा टांगा करुन ऑं ऑं करीत टांगा चालवणार आहे का? कोंबडी पळाली तंगडी धरुन लंगडी घालायला लागली. तशीही ती चिकनी चमेली आल्यापासून आपल्या कोंबडीत कोणाला इंट्रेस्ट नाही.
स्टोरीवाला: गप्प बसा. कोणाचही नाव बसंती असल म्हणून तीन टांगाच चालवला पाहीजे असा काही कायदा आहे का? आपण तीला बसंती कोंबडेवाली करु. पाहीजे तर तिला एक छोटा भाउ ठेवू. तो करेल पूर्ण पिक्चरभर ऑं ऑं. आणि गरज पडली की गाण म्हणेल गोड गोजीरी लाज लाजीरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घालू या दारी. आहे की नाही एकदम ऍबस्ट्रॅक्ट थिंकींग. अस ऍबस्ट्रॅक्ट थिंकींग पाहीजे. नुसत मला वेगळ काही करायच आहे अस म्हणून होत नाही त्यासाठी अनुभव लागतो.
निर्माता: बर पुढचा सीन घेउ. ते खोलीवर येतात. रात्र होते. शिरप्या बाजा वाजवतो. शिंदेची सून येते आणि लाइट बंद करते.
स्टोरीवाला: सून नाही, हवालदाराला पोरगी हवी
निर्माता: का?
स्टोरीवाला: माझ्यासाठी सून लकी नाही. पोरगीच हवी हव तर तिच्या नवऱ्याला मारा, भावाला मारा, साऱ्या खानदानला मारा, त्या पोरीला विधवा करा, पोरकी करा. पण पोरगीच हवी सून नको. आपल्यासाठी सून अजिबात लकी नाही.
निर्माता: एक मिनिट, पैसे कोण मोजतोय मी की तुम्ही? माझ्यासाठी काय लकी त्याचा विचार करा तुमच्यासाठी काय लकी आहे त्याच काय घेउन बसलात?
स्टोरीवाला: ओ तुमच्यासारखे छप्पन निर्माते बॅग घेउन उभे आहेत पण चांगला लेखक सापडत नाही हल्ली. आहात कुठ?
स्टोरीवाला: मला ना एकदम भन्नाट कल्पना सुचलीय काहीतरी अस ओरीजनल, एकदम वेगळ.
निर्माता: अच्छा
स्टोरीवाला: तो शिरप्या बाजा नाही वाजवणार तुणतुण वाजवणार.
निर्माता: तुणतुण
स्टोरीवाला: का तुमच्यात ते वाजवत नाही?
निर्माता: नाही तस नाही हो पण तुणतुण .
स्टोरीवाला: त्या तुणतुणाच्या आवाजान तिच्या काळजात धडधड होणार त्याचा आवाज ढोलकीच्या तालासारखा. टॅण टॅण. हाच मोका आहे द्या आयटम सॉंग टाकून ही पोली साजूक तुपातली तिला चोरांचा लागलाय नाद.
निर्माता: अहो ती विधवा आहे हो. ती अशी नाचली तर प्रेक्षक काय म्हणतील. कोळीगीत मराठवाड्यात. Not folk from region.
स्टोरीवाला: येवढा विचार करुन बनवायला ते काय सॉफ्टवेअर आहे. विधवा आहे तर काय झाल तिच तंगड बिंगड मोडल की काय? नाचेल बापडी धूम नाचेल. हे विधवा बिधवा नुसत साडीपुरत हो बाकी पिक्चर आपल प्रेक्षकांच काय घेउन बसला. अहो बचत होइल बचत एकाच हीरोइन मधे तुमच आयटम सॉंग पण झाल आणि हिरोइन पण झाली. तसेही तिला पूर्ण पिक्चरभर दिवे विझवण्याशिवाय कोणते काम आहेत. यानिमित्ताने दोन दिवे तरी पेटवील बिचारी. नुसते दिवे विझवण्यासाठी कोणी दुसरी जया बच्चन परवडण्यासारखी नाही.
निर्माता: चांगली बचत आहे. बर आता पुढचा सीन त्या गब्बरचे गुंड गावात प्रवेश करतात.
स्टोरीवाला: हो गब्बरचे गुंड गावात प्रवेश करतात रात्रीचे वेळ आहे, अमावसेची रात्र, सर्वदूर काळोख
निर्माता: अहो गब्बरचे गुंड भरदिवसा दरोडा घालत होते अस पंचांग पाहून अमावसेच्या रात्री जात नव्हते
स्टोरीवाला: अमावस्येची रात्र हवी हो त्याशिवाय फिलींग नाही येत. फिलींग यायला पाहीजे फिलींग, डिटेलींग महत्वाच नाही.
स्टोरीवाला: अमावस्येची रात्र, सगळीकडे काळोख, अंधार. आजूबाजूला कोणीच नाही. या अंधारात गब्बरचे गुंड सायकलवर गावाकडे निघाले
निर्माता: सायकलवर, अहो ते गुंड घोड्यावर फिरत होते.
स्टोरीवाला: घोडीचा चार्ज माहीत आहे. एका तासाचे एका घोडीचे पाच हजार पडतात, लग्नात पण घोडी वापरत नाही हल्ली आणि तुम्ही निघाले गुंडांना घोड्या द्यायला. ही काय सरकारी स्कीम आहे का? कोणी निर्माता बनवल हो तुम्हाला? त्यापेक्षा पानाची टपरी काढा चार पैसे तरी मिळतील. गुंड सायकलवरच जातील. फिलींग यायला पाहीजे फिलींग डिटेलींग महत्वाच नाही.
निर्माता: तुम्ही म्हणाल तस सायकलवर तर सायकलवर.
स्टोरीवाला: अमावस्येची रात्र, सगळीकडे काळोख, अंधार. आजूबाजूला कोणीच नाही. या अंधारात गब्बरचे गुंड सायकलवर गावाकडे निघाले. पायात चड्डी अंगात बंडी, हातात काठी घेउन ते दरोडा टाकायला निघाले.
निर्माता: कुठ बँकेवर?
स्टोरीवाला: मधे मधे बोलू नका हो. माझी लिंक तुटते. मराठी माणसाच्या बँकेत काय मिळणार कपाळ. ते आमदारच्या घरावर दरोडा टाकायला निघाले. ते तिकडे दरोडा टाकताय आणि इकडे गणप्याला जोऱ्याची (एक करंगळी दाखवतो) लागते.
निर्माता: तुमची परवानगी असेल तर एक विचारु. हे जरा अती होत आहे अस नाही वाटत आपल्याला. This is too much.
स्टोरीवाला: तुमची मचमच थांबवा आधी. अती नाही आता ट्विस्ट आहे आपला शोले वेगळा आहे. फिल करा तुम्ही.
स्टोरीवाला: अमावस्येची रात्र, सगळीकडे काळोख, अंधार. आजूबाजूला कोणीच नाही. गुंड आमदाराच्या घराची सफाइ करतोय, गणप्या आमदाराच्या घराबाहेर घाण करतोय. गब्बरचे गुंड त्याचे काम आटोपतात गणप्या आपल काम आटोपतो. गुंड बाहेर येताच टॉर्च मारतात. टॉर्च गणप्याच्या……….. (पॉझ) तोंडावर पडतो. गणप्या ओरडतो. महेश महेश.
निर्माता: हा महेश कोण
स्टोरीवाला: सॉरी सॉरी राँग कनेक्शन. हँगओव्हर गेला नाही अजून. गणप्या ओरडतो अयाया, अयाया. गब्बरचे गुंड त्याला धरतात, मार मार बदडतात. आणि फेकून देतात.
निर्माता: अहो तुमच काहीतरी चुकतय अस नाही घडत हो.
स्टोरीवाला: का प्रत्येक वेळेला काय विलेनच मार खाइल का? त्याला काय तुम्ही मार खायचे जादा पैसे देता का?
निर्माता: नाही तसे नाही हो पण प्रेक्षकांच्या काही अपेक्षा असतात
स्टोरीवाला: कोण प्रेक्षक? तुम्हाला खरच वाटताय तुमचा पिक्चर कुणी बघनार म्हणून.
निर्माता: Yes it will be it hit but sensible movie.
स्टोरीवाला: आता आपण इथे एक ट्विस्ट टाकू. (असे म्हणत बाजूचे चऱ्हाट थैलीत टाकतो) तिथे एक देउळ असत, गुंड गणप्याला तिथेच फेकून देतात. मग अचानक देवळातल्या घंटा वाजायला लागतात, जोऱ्याच वार वाहायला लागत, वीजा कडकडायला लागतात, जोऱ्यात पावसाला सुरवात होते.
निर्माता: पाउस भर मे महीन्यात
स्टोरीवाला: अहो मे महीना आहे हे तुम्हाला माहीती आहे, मला माहीती आहे त्या प्रेक्षकांना कुठे माहीती आहे. तेंव्हा पाउस पडतो पावसान कस फिल येत बघ फिल शेवटी फिलिंग…… त्याच्या स्वप्नात छोट्या गणप्या येतो तो त्याला सांगतो ‘कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाउंगा. च्यायला तो पण नाही तुझ्यात. च्यायला औकात नाही तर कशाला गब्बर वगेरेला मारायचे चॅलेंज घेता बे. गल्लीतले मच्छर मारायचे ना. त्या बिरुने नुसते कुत्ते कमीने म्हटले तरी गब्बर घाबरुन जायचा. तुमचा तर साला आवाज कुठुन येतोय तेही कळनार नाही.’ अशा शिव्या देउन तो त्याला जयबीरुची ताकत देतो. पावसात मारुतीच्या साक्षीने गणप्याच्या अंगात जयबीरुची ताकत येते.
निर्माता: हे जरा जास्तीच होत आहे हो. छोटा गणप्या काय, ताकत काय अस कधी असते का?
स्टोरीवाला: हल्लीचा ट्रेंड आहे हो. सॉलीड टाइमपास आहे. एकदम हीट. लहान गणप्या मोठ्या गणप्यापेक्षा लई पॉवरफुल. थोडी अडचण समजून घ्या हो. तो मराठी पिक्चरचा हिरो आहे. बिचारा रोज सकाळी डोंबिविलीवरुन लोकल पकडून येतो. मग बस पकडून गोरेगाव फिल्मसिटीत येतो. घरी परत जाताना पोळी भाजीचा डब्बा घेउन जातो. असा माणूस कधी सिक्स पॅक कमावणार.  तुम्ही फिलींग समजून घ्या हो डिटेलींग मधे जाउ नका.
निर्माता: मघापासून मी फक्त फिलींगच समजून घेत आहे हो.
स्टोरीवाला: आता क्लायमॅक्सचा सीन
निर्माता : लगेच क्लायमॅक्सचा सीन
स्टोरीवाला: मराठी शोले आहे हा. ही आग जास्त वेळ तग नाही धरु शकणार.
निर्माता : अहो ते इतना सन्नाटा क्यो है भाई राहीले ना
स्टोरीवाला: तुम्हाला अजून कळल नाही
निर्माता: काय?
स्टोरीवाला: टॉकीजमधे इतना सन्नाटा क्यू है भाइ . आणि काय हो ते सचिन आता मराठीत मोठे स्टार झाले, आता तर त्यांची मुलगीही सिनेमात आली तरी तुम्ही इतना सन्नाटा क्यो है भाई करत त्यांच्या जीवावरच उठलेले असतात.
निर्माता: बर ते नाही तर निदान ते जबतक है जा जानेजहा मै नाचुंगी.
स्टोरीवाला: अजूनही जान बाकी आहे का? अजूनही तुमची नाचायची हौस भागली नाही का? एवढीच नाचायची हौस असेल तर लग्नाच्या वरातीत जाउन नाचा दोन पैसे तरी मिळतील. कोणी निर्माता केल हो तुम्हाला?
निर्माता: बर मग क्लायमॅक्सचा सीनला तो डॉयलॉग ठेवायचा का
स्टोरीवाला: डॉयलॉग कोणताही टाका हो त्याचे पैसे नाही पडत बोला कोणता डॉयलॉग टाकायचा आहे
निर्माता: कुत्ते कमीने मै तेरा खून पी जाउंगा
स्टोरीवाला: मराठीत बोला हो
निर्माता: कुत्र्या मेल्या मी तुझ रगत पीउन टाकीन
स्टोरीवाला: कस वाटल
निर्माता: दम नाही वाटला.
स्टोरीवाला: दम नाही वाटला ना त्याच काय आहे. मराठीत कुत्र्या ही बाइन माणसाला द्यायची शिवी आहे .
निर्माता: म्हणजे हा डॉयलॉग पण कट
स्टोरीवाला: इतक उदास नका होउ हो. अस चालायचच व्यावसायिक अडचण समजायची.
निर्माता: काय? व्यावसायिक अडचण हा काय प्रकार आहे?
स्टोरीवाला: अहो अवघड जागेच दुखण आहे ते जाउ द्या. मग छोट्या गणप्या, मोठा गणप्या, छोटा शिरप्या, मोठा शिरप्या मिळून गब्बरच्या गुंडाना पिटाळून लावतात आणि गब्बरला पकडून देतात.
निर्माता: चालू द्या
स्टोरीवाला: चालू काय द्या पिक्चर संपला की. काय कशी वाटली स्टोरी, आहे की नाही धमाकेदार. उगाच नाही म्हणत आम्ही मराठी पिक्चर कंटेन्टवर चालतो स्टारवर नाही.
निर्माता : अच्छा असा शोले तर मी बनवला तर तो गब्बर वरुन खाली येउन मला म्हणेल ये हाथ मुझे दे दे ठाकूर, ये हाथ मुझे दे दे.